गेल्या आठ दहा दिवसांपासून मला एक विचित्र अनुभव येतोय. इतका विचित्र कि इथे लिहायलाही अवघड वाटतेय.
खास करुन त्या अनुभवांचा अर्थ काय ते समजल्यापासून.
म्हणजे काय होतं, मी आजकाल रस्त्यावरून फिरत असतो त्यावेळी दिसणार्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मला
एक आकडा दिसतो. धूसर वगैरे नाही, अगदी स्पष्ट. आणि होतं काय हे आकडेच मला जास्त आकर्षित करतात. आधी त्या डोक्यांवरच्या आकड्यांकडे लक्ष जाते आणि मग त्या व्यक्तीकडे.
आकड्यांसारखे आकडे. विशेष असे काही नाही. कुणाच्या डोक्यावर ७,४७८ दिसतात तर कुणाच्या डोक्यावर १४,५९६. बघाना, काही अर्थच लागत नाही या आकड्यांचा.
आता इतकी वर्षे मी या रस्त्यावरून जातोय. माझ्या वेळाही नियमित असतात. कारण वेळेच्या बाबतीत मी फारच
काटेकोर असतो. रोजची ८.१३ ची लोकल पकडायची म्हणजे पकडायचीच. ऑफिसमधे ८.५५ ला सही करायची
म्हणजे करायचीच. ऑफिसमधून निघायची वेळही तशीच काटेकोर. इतक्या वर्षात मोजून १९ वेळा मला उशीर
झाला असेल. आणि त्यातल्या सोळा वेळा, बँकेतून डॉक्यूमेंटस घेऊन येणारा माझा मदतनीस वेळेवर आला नाही
म्हणून.
तर त्याने आणलेले कागद मी नीट तपासून माझा रेकॉर्ड अपडेट करत असे. २५ वर्षांपुर्वी हातानेच करत असे, मग
ते लोट्स १२३ आले आणि आता ते तूमचे एक्सेल... खरं तर आता तसे करायची गरज नसायची पण मी सवयीने
करत असे..
अरे मी काय सांगत होतो.. तर ते डोक्यावरच्या आकड्यांचे.. म्हणजे ते आकडे असतात आणि मला दिसतात.
पण त्या आकड्याच्या आणि त्याखालच्या डोक्याचा काही संबंधच लावता येत नसे मला.
म्हणजे एखाद्या आजीबांईच्या डोक्यावर ७५३ का दिसतात आणि एखाद्या तरुणीच्या डोक्यावर १५८ का दिसतात.
कळायचेच नाही मला..
पण मला आकड्यांशी खेळायला आवडायचे. माझे ऑफिसचे कामच त्या स्वरुपाचे होते ना. म्हणजे काय असायचे,
मी बिल्स कलेक्शनचे काम करतोय. गेली अनेक वर्षे. फॉरिन सप्लायर्सची बिले आली कि त्यावरच्या टर्म्स नीट वाचायच्या. सगळे इम्पोर्ट डॉक्यूमेंटस नीट बघायचे. बिल ऑफ लॅडींगवरची डेट बघायची आणि मग त्यानुसार
ड्यू डेट काढायची.. मग ते सगळे बँकेत नीट पाठवायचे. त्याचा व्यवस्थित रेकॉर्ड ठेवायचा.
कुठल्या दिवशी कुठले बिल ड्यू आहे, याचा अगदी पक्का ताळा असायचा डोक्यात. जुने साहेब तर त्यासाठी
माझ्यावरच अवलंबून असायचे. उद्याच नव्हे तर येत्या आठवड्यात, महिन्यात कुठली बिले ड्यू आहेत, ते पण
माझ्या पक्के लक्षात असायचे. साहेबांना मीच आठवण करून द्यायचो.
आता एक सिक्रेटच सांगून टाकतो. कुठल्याही दोन तारखा दिल्या कि त्यातला फरक किती याचा हिशोब माझ्या
डोक्यात अगदी झटकन व्हायचा. आणि आजच्या तारखेपासून १८० दिवसांनी कुठली तारीख असेल, किंवा
अमूक एका तारखेला किती दिवस उरलेत.. हे पण मी पटकन तोंडी सांगू शकत असे.
पुढे पुढे तूमचे ते लोटस आले आणि एक्सेल आले.. त्यात एका फॉर्म्यूलाने ते व्हायचे म्हणे. मी सगळे शिकून घेतले बरं का ते, पण त्यावर विश्वास नाही ठेवला कधी. एंटर दाबायच्या आधीच माझे उत्तर तयार असायचे,
मनातल्या मनात.
हे सगळे आकडे सतत माझ्या डोक्यात असत. अगदी मध्यरात्री पण साहेबांनी फोन केला असता तरी सगळे सांगू शकलो असतो.. पण साहेबांनी कधीच केला नाही फोन तसा. मग आता आता तर माझी हि मोलाची फाईल तर शेअर फोल्डरमधेच असायची. कुणालाही कधीही बघता यायची.
पण हे डोक्यावरचे आकडे म्हणाल तर मला गेल्या दहा दिवसातच दिसायला लागलेत. कारण पुर्वी मी एवढा भरभर चालत जायचो ना कि कुणाच्या डोक्याकडे बघायला उसंतच नसायची. मला आपली माझी ८.१३ ची लोकलच
डोळ्यासमोर दिसायची.
आता तशी घाई नसते. निवांत चालत असतो. ८.१३ चीच काय १२.३७ ची लोकलही पकडायची नसते आजकाल.
दोन दोन फेर्या मारल्या तरी चालतात. आहे कि नाही मज्जा !
निवांत.. कसलीच घाई नसते. अगदी प्रत्येक चेहरा न्याहाळत जातो. गेल्या दहा दिवसात बरेच चेहरे ओळखीचे
दिसायला लागलेत. म्हणजे मी ओळखायला लागलोय. कुणी माझ्याकडे बघतही नाही. माझी मीच नावे ठेवलीत
त्यांना. विचारावेसे वाटते, काय मिस येलो ( या मुलीला पिवळा रंग फार आवडतो. १० दिवसात ४ वेळा त्या रंगाचाच ड्रेस घातला होता ) आज घाईत ? पण मिस येलो कायम फोनवर बोलत असते. बोलावेसे वाटते म्हणून
अगदी सामोरा गेलो, तर माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करून निघून गेली. धक्का लागू नये म्हणून मीच बाजूला झालो.
आणि त्या मिसेस काळे. ( काळे म्हणजे यांना काळा रंग आवडतो बहुतेक म्हणून मीच नाव ठेवलेय ) नक्की सांगतो गव्हर्मेंट सर्व्हंट असणार. पण त्याही नाही बोलत कधी माझ्याशी. आता जाणवतं हे खरं, पण वाटतं आपण ऑफिसला जात होतो, त्यावेळी तरी कुठे कुणाच्या तोंडी लागलो.
तो कोपर्यावर मोची बसायचा, तो रोज, काय साहेब ? म्हणायचा पण कधी बघितले का आपण. कधी गरज
लागली तर त्याच्याकडेच जात होतो, पण म्हणून काय त्याने असे रोज हटकायचे ? प्रत्येकवेळी मागेल तितके पैसे दिले कि... नंतर तो अचानक दिसेनासा झाला तेही लक्षात नाही आलं माझ्या अनेक दिवस. अनेक दिवस म्हणजे परत बुटाचा सोल निघेपर्यंत. मग ते दुसर्या रस्त्यावरच्या मोच्याकडे जावं लागलं होतं तेव्हा.
ते शेअर फोल्डर आल्यापासून नवे साहेब म्हणू लागले, रोजचे स्टेटमेंट नका देत जाऊ. त्या फाईलमधल्या
एक्स्पायरी डेट कॉलमवरती फिल्टर केले कि मिळेल माहिती आपोआप. फक्त ती फाईल अपडेट करत रहा,
नियमित.. तरी मी माझे रोजचे स्टेंटमेंट तयारच ठेवायचो.. ३ वर्षांपुर्वी २७ एप्रिललाच सगळी सिस्टिम क्रॅश
झाली होती, तेव्हा माझेच स्टेटमेंट कामाला आले ना ? मग आय टी वाल्यांनी अर्धा तास खटपट करून डेटा
रीकव्हर केला. परत सिस्टिमवरून प्रिंट घेतला तो माझ्या स्टेटमेंटशी तंतोतंत जूळला. म्हणजे कुणी
चेक नाही केलं, माझं मीच केलं. साहेबांनी तोच प्रिंट घेतला. माझं स्टेटमेंट परत देताना, बहुतेक थँक्स म्हणाले
असतील... मला नीट ऐकू आले नाही.
माझा गोंधळ उडतोय खरा. त्या डोक्यावरच्या आकड्याबाबत लिहू का माझ्या ऑफिसच्या कामाबाबत असे
झालेय खरे.. पण हे दोन्ही रिलेटेड आहेत.. प्लीज पुढे वाचा ना.. प्लीज..
तर असाच एक नेहमी दिसणारा. देखणा तरुण. मीच त्याचे नाव हिरो ठेवले होते. रुबाबदारपणे बाईकवरून जायचा.
एका गल्लीतून मेन रोडवर यायचा तेच फूल स्पीड ने. त्याने बाहेर यायला आणि मी ती गल्ली क्रॉस करायला
नेमकी गाठ पडायची.
तरीही त्याच्या डोक्यावरचा आकडा मला दिसायचाच. रोजचे सगळ्यांच्या डोक्यावरचे आकडे कुठे माझ्या
लक्षात राहणार. या नवीन कॉम्प्यूटरमुळे ती सवय मोडलीच होती. पण व्हायचे काय त्याची टक्कर होऊ नये म्हणून मीच थोडा वेळ तिथे थांबायचो. त्यामूळे तो आकडा चांगलाच लक्षात रहायचा.
१६ एप्रिलला त्याच्या डोक्यावर मला २ हा आकडा दिसला तर १७ एप्रिलला तोच आकडा १ दिसला.
मला काहीतरी वाटले आणि त्याला सांगावेसे वाटले. पण काय वाटले ते सांगताही आले नसते, म्हणून राहिलेच ते.. आणि १८ एप्रिलला .. १८ एप्रिलला तो गल्लीतून बाहेर यायला आणि मेन रोडवरून एक ट्रक भरधाव यायला एकच गाठ पडली. होणार काय आणखी ? झाला ना अपघात. बाईक कुठे आणि तो कुठे फेकला गेला त्याचा पत्ताच नाही.
चिखलात दूरवर फेकला गेला तो. खुपजण धावत गेले पण चिखलात उतरयचे धाड्स कुणी करत नव्हते. मी
चिखलाची पर्वा न करता धावलो त्याच्याकडे. अरे, माझे ऐकले असतेस तर नसते असे झाले ? तो हसून म्हणाला,
काय आजोबा, तूम्ही कुठे कधी काय सांगितलेत मला. आज पहिल्यांदा बोलतोय आपण.. तोपर्यंत लोक त्याच्यापर्यंत पोहोचलेच. उचलून नेले त्याला.
तो बोलला तेही खरंच म्हणा, आधी बोलायला हवं होतं. म्हणजे मला आलेला संशय खरा होता तर. मला
सगळ्यांच्या तारखा दिसत होत्या तर. आता हिशेब सहज जुळू लागला, आजीबांईच्या डोक्यावरची ७५७ संख्या
म्हणजे १४ मे २०१७ आणि मिस काळ्यांच्या डोक्यावरची ३,७६७ म्हणजे १० ऑगस्ट २०२५..
कुणी ७ जुलै २०१९, कुणी १४ मार्च २०२२... एक जोडपं १६ एप्रिल २०१६... काय करू मी या तारखांचे ?
त्या जोडप्याला जाऊन सांगू, तूम्ही एकाच दिवशी संपणार आहात ? काय होईल त्यांचे अपघात कि आत्महत्या
करतील ते ? ऐकून घेतील ते माझे ? काय म्हणून ऐकतील ?
आणि ऐकल्यावरही काय करणार म्हणा ? सगळेजण माझ्यासारखे काटेकोर प्लॅनिंग थोडेच करणार आहेत ?
त्यासाठी हिशेब पक्का हवा. कुठल्या योजनेत किती टक्के परतावा मिळेल. ते पक्के डोक्यात हवे.
दर महिन्याला खर्चाला पैसे कमी पडायला नकोत. आमच्या बिलाचे कसे सगळे हिशेब माझ्या डोक्यात असत.
ड्यू तारखेला तेवढ्या रकमेची सोय पुर्वीचे साहेब बरोब्बर करत असत. नवे साहेब म्हणायचे नसतील पैसे तर
रीफायनान्स करू. बँकाना पण बिझिनेस हवाच आहे आपल्याकडून. त्याची कागदपत्रे ते मिस. अय्यर कडून तयार
करवून घेत. पण जनार्दन बँकेत जायच्या आधी मी ती बघत असे. त्यावरची तारीख बघून त्यावर बँक किती
व्याज लावेल तो पण हिशोब मी करून ठेवायचो. मला ते नव्या सिस्टीममधे अपडेट करायला आवडले असते.
पण नवे साहेब म्हणायचे तूम्ही कशाला लक्ष घालताय. मिस अय्यर करतील आणि इंटरेस्टही बूक होईल,
आपोआप... मला फक्त ते बरोबर आहे का ते चेक करायचे असायचे.. पण मिस अय्यर कधी सांगत नसत.
जानर्दन ने बेंकेकडून अॅडव्हाईस आणला, कि मी हटकून चेक करत असे.
माझ्या रीटायरमेंटची तारीख होती.. ३१ मार्च २०१८.. म्हणजे १०७८ दिवस.. मी व्यवस्थित प्लॅनिंग करुन ठेवले . दर महिन्याला किती व्याज मिळेल. त्यात आपले भागेल कि नाही. कुणापुढे हात पसरायची वेळ येईल का ?
दोन आठवड्यांपुर्वी जरा वेगळे काहीतरी घडले. वेगळे म्हणजे फार वाईट हो. मी फक्त जनार्दनच्या फोल्डरमधून
लेटर बाहेर काढले. जस्ट बघायला. आणि तो आपल्याच तंद्रीत निघून गेला. पुढे २ दिवस बँक हॉलिडे होता.
नव्या साहेबांना कळले ते. मला बरेच बोलले. म्हणाले दुसर्यांच्या कामात का ढवळाढवळ करता. माईंड यूअर ऑन बिझिनेस... वगैरे वगैरे. आणि तेही मिस अय्यर समोर.. प्रचंड संताप आला मला. हीच किम्मत माझी ? इतकी वर्षे
काम केले त्याची हि किम्मत. ?. कळच आली माझ्या मस्तकात...
पण तेही बरोबरच म्हणा.. कशाला कुणाच्या आयूष्यात ढवळाढवळ करायची.. आकडे दिसताहेत.. दिसू देत.
सहज आरश्यात बघितले.. चेहर्यापेक्षा आकड्याकडेच लक्ष गेले... आकडा होता १२...
पण त्या आकड्याच्या आधी ऊणे चिन्हही ठळकच दिसत होते.
ह्या सखाराम गटणेला आता
ह्या सखाराम गटणेला आता बडवायची वेळ आलेली आहे...
आधी मला वाटले In Time या
आधी मला वाटले In Time या वळणाने जाइल कथा.
मला अपघातानंतर थोडा अंदाज
मला अपघातानंतर थोडा अंदाज आला.
कथा छानच आहे.
थोडा अंदाज येत गेला वाचताना.
थोडा अंदाज येत गेला वाचताना. कथा आवडली.
मस्त.
मस्त.
छानच...
छानच...
छान आहे कथा!!
छान आहे कथा!!
Chanah...
Chanah...
सुरवातीलाच अंदाज आला तरी शेवट
सुरवातीलाच अंदाज आला तरी शेवट पर्यंत वाचावीशी वाटते याच लेखकाचे श्रेय. मस्त.
याला उणे १२ असे नाव पण चालले असते, हे माझे मत.
मस्तच.
मस्त खिळवून ठेवले तुमच्या
मस्त खिळवून ठेवले तुमच्या कथेने.
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्त!
मस्त!
छान आहे कथा.. फक्त शेवटी ते
छान आहे कथा.. फक्त शेवटी ते साहेब खरच त्यालाच रागावतात का ते कळाले नाही. तो जर जिवंत नाही तर ते कसे काय रागवतात ?
धन्यवाद.... इमॅजिनरी नंबर्स
धन्यवाद....
इमॅजिनरी नंबर्स
चैत्रगंधा.... रागावल्यानंतर त्याच्या मस्तकात कळ आली, तोपर्यंत तो (माणसात) कार्यरत होता !
मस्त जमलीये कथा.
मस्त जमलीये कथा.
मला अबांड्यातले आकडे वाटले,
मला अबांड्यातले आकडे वाटले, नुसतं शीर्षक वाचून>>>>>>>>>.+१
धक्का, अपेक्षित शेवट वगैरे ठीक आहे. पण त्यापेक्षा मला जुन्या पिढीतल्या काटेकोरपणे काम करणारा माणूस आणि संगणकीकरणामुळे मेंदू वापरायची गरज नाही राहिली तरी सतत तसेच विचार करण्याची सवय लागलेला माणूस त्याचे भावदर्शन आवडले.
>>>>>हे सगळे आकडे सतत माझ्या डोक्यात असत. अगदी मध्यरात्री पण साहेबांनी फोन केला असता तरी सगळे सांगू शकलो असतो.. पण साहेबांनी कधीच केला नाही फोन तसा. मग आता आता तर माझी हि मोलाची फाईल तर शेअर फोल्डरमधेच असायची. कुणालाही कधीही बघता यायची
...
ते शेअर फोल्डर आल्यापासून नवे साहेब म्हणू लागले, रोजचे स्टेटमेंट नका देत जाऊ. त्या फाईलमधल्या
एक्स्पायरी डेट कॉलमवरती फिल्टर केले कि मिळेल माहिती आपोआप. फक्त ती फाईल अपडेट करत रहा, नियमित.. तरी मी माझे रोजचे स्टेंटमेंट तयारच ठेवायचो.. ३ वर्षांपुर्वी २७ एप्रिललाच सगळी सिस्टिम क्रॅश झाली होती, तेव्हा माझेच स्टेटमेंट कामाला आले ना ? मग आय टी वाल्यांनी अर्धा तास खटपट करून डेटा रीकव्हर केला. परत सिस्टिमवरून प्रिंट घेतला तो माझ्या स्टेटमेंटशी तंतोतंत जूळला. म्हणजे कुणी चेक नाही केलं, माझं मीच केलं. साहेबांनी तोच प्रिंट घेतला. माझं स्टेटमेंट परत देताना, बहुतेक थँक्स म्हणाले असतील... मला नीट ऐकू आले नाही.
माझा गोंधळ उडतोय खरा. त्या डोक्यावरच्या आकड्याबाबत लिहू का माझ्या ऑफिसच्या कामाबाबत असे
झालेय खरे.. पण हे दोन्ही रिलेटेड आहेत.. प्लीज पुढे वाचा ना.. प्लीज..
>>>>>>>
धन्यवाद.. वंदना, खास आभार
धन्यवाद..
वंदना, खास आभार नेमका सल जाणून घेतल्याबद्दल !
Pages