सुगंधा - भाग २

Submitted by कविता१९७८ on 7 April, 2015 - 06:09

अमोघला तातडीने इस्पितळात नेण्यात आले, पायाला फ्रॅक्चर झाले होते, ऑपरेशन करणे गरजेचे होते, तीने लगेचच फोन करुन कळवल्याने आईवडील ही कोल्हापुरला यायला निघालेच होते, तीचा मामा देखील गावाहुन निघाला. मावशी आणि तिचा मुलगा धक्क्यातुन सावरले नव्हते तरीही तिच्या बरोबरच इस्पितळात होते, तिने धावपळ करुन इस्पितळातले सोपस्कार पार पाडले. अमोघच्या ऑफीसमधे कळवुन तिने रजा वाढवुन घेतली. अमोघचे ऑपरेशन झाले, पायात रॉड बसवला गेला. मानेसाठी रोज फीजीयोथेरपी दिली जात असे, या काळात तीची धावपळ आणि कर्तुत्व पाहुन आईवडील आणि मावशी खुपच कौतुक करत होते, अमोघला मात्र ती स्तुती सहन होईना, तिच्या जागी कुणीही असती तर तिने हेच केले असते असे त्याला वाटत होते. एकतर तिला जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात घुसवण्यात आले होते आणि त्यात आता तीचे महत्व आणि कर्तुत्व त्याच्या मनावर जबरदस्तीने ठसविले जात आहे असे त्याला वाटु लागले. ती जेव्हा त्याच्या समोर येई तो तीचे कर्तुत्व विसरुन तिच्या व्यंगाबद्द्ल विचार करी. तिचे समोर येणेही त्याला खलु लागले. त्याच्या नजरेत तिच्या कर्तुत्वावर तिच्या व्यंगाने मात केली होती. इस्पितळातील प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे उपरोधात्मक पाहुन हसते आहे असे त्याला वाटे. १५ दिवसानंतर त्याला इस्पितळातुन डीस्चार्ज मिळाला आणि मावशीकडे हलवण्यात आले. रोजच्या फीझीयोथेरपीने त्याचे मानेचे दुखणे बरे झाले. पायाला प्लॅस्टर लागले होते त्यामुळे तो बेडवरच असे.

साधारण एका महीन्यानी अमोघला त्याच्या घरी पुण्याला आणण्यात आले. तिने अमोघची सर्व जबाबदारी हातात घेतली , त्याच्या खाण्याच्या वेळा, औषधे याचे तिने काटेकोरपणे पालन केले. त्याला प्रत्येक गोष्टींसाठी तिच्यावर अवलंबुन राहावे लागे, जसजसे दिवस पुढे जाउ लागले तसतसा अमोघच्या मनातील तिच्याबद्द्ला चा आकस कमी होउ लागला व त्याची जागा कौतुकाने घ्यायला सुरुवात केली, हळुहळु मने जुळली. त्याच्या ऑफीसच्या मित्रांनी त्याला सुचवले की वहीनी इतक्या कर्तुत्ववान आहे, सुशिक्षित आहेत तर त्यांना घरी बसवुन ठेवण्यापेक्षा त्यांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दे. घरी सुबत्ता असल्याने घरकाम, जेवण अशा कामासाठी त्यांच्या कडे १-२ नोकर होतेच, लग्नाआधी ती एका एन.जी.ओ. मधे काम करत होतीच त्यामुळे हरकत घेण्यासारखे काहीच नव्हते. तिच्यात व्यंग असले तरीही तिचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता, तिच्या बोलण्याची , समोरच्याला हाताळण्याची पद्धत वाखाणण्याजोगी होती. तिला हसणारे, चिडवणारे , तिला पाहुन नाक मुरडणारे हळु हळु तिच्या या स्वभावामुळे विरघळत होते, खरच ती कर्तुत्ववान होती, एक चांगली माणुस होती. तिच्या मते आता तिला एन. जी. ओ. बरोबर काम करायचे होते पण बिन पगारी, तिच्याकडे आधीही कसलीच कमी नव्हती व आताही नाही आणि पगारी नोकर असल्यावर जी बंधने येतात ती तिला नको असल्याने तिला आता गरीब अनाथ, अपंग मुलांसाठी आणि वृद्धांसाठी काही करायचे होते. अर्थातच याला अमोघ किंवा त्याचे आईवडील यांचा कोणताही आक्षेप नव्हता.

पायाला प्लॅस्टर लावुन दोन महीने होत आले होते आणि अमोघही घरी बसुन कंटाळला होता. अजुन १० दिवसांनी त्याचे प्लॅस्टर काढण्यात आले आणि तो लगेचच कामावर रुजु झाला, आधीच २ ते २.५ महीन्यांची रजा घेतली असल्याने खुप कामे खोळंबली होती. ती ही पुण्याच्याच एका एन.जी.ओ. बरोबर काम करु लागली. तिच्या बोलण्यातुन ती या कामात खुप समाधानी आहे असे जाणवु लागले, घरी आल्यावर अमोघबरोबर व सासुसासर्‍यांबरोबर ती दिवसभराचे कार्यक्रम , मुले, आजारी माणसे, वृद्ध, श्रमसाधना , पर्यावरण, आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी याबद्द्ल भरभरुन बोलत असे. अमोघचे आईवडील तर तिच्या बरोबर जाउन या लोकांना भेटुन सुद्धा आले होते. अमोघनेही तिच्याबरोबर यावे अशी तिची इच्छा होती त्यानुसार एके दिवशी अमोघही गेला. तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर जुजबी ओळख झाल्यावर अमोघला ती आश्रम दाखवायला घेउन गेली. एके ठीकाणी एक म्हातारे आजोबा उभे होते , त्यांनी लवुन अमोघ ला नमस्कार केला, मोठ्या माणसाने आपल्याला नमस्कार केला हे पाहुन अमोघला कसेसेच झाले, आजोबा म्हणाले , "तु सुगंधाचा नवरा आहेस ना? खुप भाग्यवान आहेस हो!". सुगंधा?? कोण सुगंधा? अमोघ अचंबित झाला, तेवढयात आजोबा म्हणाले , "तिचे नाव जरी दुसरे असले तरीही आमच्या साठी ती सुगंधाच आहे, आमच्या रुक्ष, कोरड्या जीवनात तीने तिच्या प्रेमाचा, वात्सल्याचा जो सुगंध पसरवलाय त्याने आम्हाला जगण्याची नवी उमेद दिलीये. ती रोज इथे येते आणि आमच्या जीवनात जीव आणाण्याचा प्रयत्न करते, परीस्थीतीने आमच्या वर घाला घातला, सख्खी मुले वैर्‍यासारखी वागली, आम्ही इथे आलो तेव्हा जीवंत मुडदे म्हणुनच , सख्ख्या मुलांनी जेव्हा आपल्याला नाकारलं तेव्हा बाहेरची माणसे आपल्याला काय कींमत देणार , जगायचं तरी कुणासाठी असे नाना प्रश्न आमच्या मनात होते. प्रेम , ममता , वात्सल्य याबद्दल आमच्या मनात घृणा निर्माण झाली होती पण सुगंधाने तिच्या वागण्या बोलण्याने आम्हाला आम्ही जीवंत असल्याची, या जगात माणुसकी अजुन शिल्लक आहे याची जाणीव करुन दिली. आम्हाला मानाने जगायला शिकवले ते ही कुठला मोबदला न घेता. तिने प्रेमाला प्रेमाने जिंकले, ती म्हणजे असे सुगंधित झाड आहे की ज्याचा सुगंध कधीच कमी होणार नाही तर दिवसेंदिवस तो तिच्या सानिध्यात असणार्‍यांच्या जीवनात दरवळतच राहील. आणि तु तर तिचा नवरा आहेस , तिचे शारीरीक व्यंग लक्षात न घेता तिच्या मनातला सुगंध तु बरोबर ओळखलास या बद्द्ल तुझे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे." हे ऐकल्यावर अमोघला तिच्यासमोर स्वतः थिटे असल्याची जाणीव झाली, खरोखरंच आपण असा कधी विचारच केला नव्हता, शारीरीक व्यंग हे मनाच्या व्यंगासमोर कोते असते हे आपल्याला खुप उशीरा समजले.

अमोघने आजुबाजुला पाहीले तर ती लांब मुलांच्या घोळक्यात उभी होती. तो त्यांच्याजवळ गेला तेव्हा त्याला कळले की ती अपंग आणि मतिमंद मुले आहेत, ती त्यांच्या शी खुप प्रेमाने वागत होती, प्रत्येकाची आस्थेने विचारपुस करत
होती, एका लहान मुलाला काल खरचटले होते ती जखम तो तीला दाखवत होता आणि ती त्याची सख्खी आई असल्याप्रमाणे त्याला गोंजारत होती, खरंच त्या प्रेमासाठी आसुसलेल्या मुलांची ती आई झाली होती. प्रत्येका बरोबर खेळुन त्यांची विचारपुस करुन ती अमोघबरोबर घरी निघुन आली. रस्त्यात अमोघने तिच्या कामाचे खुप कौतुक केले. तिला दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी तिला अमोघच्या पाठींब्याची खुप गरज आहे हे ही सांगितले. पहीली म्हणजे तिच्या नावे गावी असलेली १०० एकर जमीन तिला एन. जी. ओ. ला दान करायचीये आणि दुसरी म्हणजे एका अपंग मुलाला दत्तक घ्यायची तिची इच्छा आहे. .........

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरीरापेक्षा मन पाहणे हे मह्त्वाचे असते. नेमके हेच अमोघच्या बाबतीत अपघाताच्या निमित्ताने का होइना पण झाले.

भाग मस्तच झाला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. Happy

मस्त