अर्जुन आणि आणि इतर शिष्यांमध्ये डावा-उजवा भेद करणारे द्रोणाचार्य एकलव्याला त्याचा उजवा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागतात तेव्हा ....
तुझ्या कृपेचा मी अभिलाषी
डावे उजवे तुझ्या मानसी
अर्पिन तुजला काम्य गुरुदक्षिणा
मम-वामतीर पण ठरेल उजवा रणा
उर्मिला - लक्ष्मणाची पत्नी. लक्ष्मणाला रामाचे नीट रक्षण करता यावे म्हणून ती अयोध्येत मागे थांबते आणि लक्ष्मणाच्या वाटची चौदा वर्षांची झोप स्वीकारते.
साह्ली अजब विरह वेदना
लक्ष्मणा रामाची वंचना
वसंत चौदा गेले शयना
उर्मिले सौभाग्य तू लक्ष्मणा
सूर्य आणि चंद्राने निखळ स्पर्धा न करता एकमेकांची अडवणूक केली तर अंधाराचा विजय होतो.
रविशशीचे द्वंद्व जुंपले प्रकाशण्या ही धरा
एकाला दिवस पुरा तर एकाला ती निखळ निशा
अडवणुकीचा खेळ मांडला जर घोर मत्सरात
तेजोमय अवनीवर उगवे ती ग्रहण-काळरात
जर्मनी मध्ये कुठलीच वेग मर्यादा नसलेले रस्ते आहेत. अशा रस्त्यांवर …
फुरफुरत निहारीत अनिर्बंध मरुताला
सूत्रांचे जोखड त्यजता तो गर्जला
मोक्षाच्या दहिता अनंत आंतर्ज्वाला
अश्व हा बंधमुक्त उधळला
Something the lord made या चित्रपटात डॉ. आल्फ्रेड ब्लालोक आणि त्यांचा कृष्णवर्णीय साथीदार विविअन थोमस यांनी केलेल्या जगातील पहिल्या हृदय शस्त्रक्रियेची गोष्ट सांगितली आहे.
हृदयात हात घालून
रुधिराला केलीस वाट
समतेची घेऊन अस्त्रे
अंतरी बुजवली छिद्रे