तलखी

Submitted by बाळू पॅराजंपे on 2 April, 2015 - 14:08

चावडीसमोर बोकडाला हार घालून उभं केलं होतं. चहुकडून वाद्यं वाजल्यानं बोकड अस्वस्थ झाला होता. पण त्याला दोन चार दणकट पोरांनी जखडून टाकला होता. चावडीत देव होते. देवापुढं नारळ फोडून झाला, गुलाल उधळायला सुरूवात झाली आणि पारूबाईच्या अंगात आलं.

ती घुमू लागली.

अस्खलित हिंदीत ती गुरगुरल्यासारख्या आवाजात बोलू लागली. गंग्याच्या चवचाल बायकोवर, नूतन वर, सगळ्यांचाच डोळा. तिचे केस धरून पारूबाई तिला शिव्याशाप देऊ लागली.

छिनाल , छिनाल है तू, बोल सच या झूठ !

तिचा अवतार पाहूनच नूतन टरकली होती. त्यातून सर्वांदेखत विचारलेल्या या प्रश्नाने तिचा धीर खचू लागला. उलट्या पायांनी पळून जावंस तिला वाटू लागलं. पण अंगात त्राणच नाही असा भास होऊ लागला.घशाला कोरड पडतेय की काय असं तिला वाटू लागलं. तिचा नवरा आत्ता इथं असता तरी काही उपयोग नव्हता. सदा न कदा दिसेल त्याला लाचारीने ह्त जोडणा-या नव-याचा तिला भयानक राग यायचा.

बोकड थिजला होता. जागेवर आता स्तब्ध उभा होता. त्याच्यापुढे टाकलेल्या हिरव्या पाल्याला तोंड लावत नव्हता.

गर्दीपासून दूर उभी राहून ती हा सगळा प्रकार बघत होती. घराला जाता जाता थबकली आणि मग आपण का थांबलो हे न कळाल्याने त्या दृश्याचा भाग झाली. निरुद्देश. सगळंच निरुद्देश. बोकडाच्या डोळ्यात पाणी असल्याचा तिला भास झाला.

फाशीच्या कैद्याला असंच जेवण देत असतील का आदल्या रात्री ?
एक घास सुद्धा घशाखाली उतरत असेल का ?
पाय फरफटत असतील.
आणि काळा बुरखा चढवल्यावर..

तिचं अंग अंग शहारलं.

बोकडाचं ओरडणं ऐकू येऊ लागलं. बें बें असे त्या मुक्या प्राण्याचे आवाज कानावर पडत होते.
पारूबाई शिणली होती.
थकून बसली होती. नूतन आता भानावर आली होती. पण बोकडाचा जीव जाण्याचा खेळ सगळे टक लावून पाहत होते.

देवाचं काम होतं.

ती हे सगळं असह्य होऊन घराकडे निघाली.

उद्या तिच्या नव-याला फाशी देणार होते.

क्रमशः
( पहिला भाग आटोपशीर ठेवला होता. अपेक्षेप्रमाणेच अनुल्लेख झालेला आहे Proud त्यामुळे पुढील भाग अन्य संकेतस्थळावर दिले जातील कृपया याची नोंद घ्यावी. संपर्कातून ईमेल कळवल्यास लिंक देता येईल).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुल्लेख नाही हो पाहण्यात आला नसेल म्हणुन प्रतिसाद नसतील कारण सुरवात फारच उत्कंठावर्धक झाली आहे त्यामुळे पुढील भाग वाचयाची नक्कीच उत्सुकता असेल.
मला तरी पाहिजे पुढील कथा त्यामुळे कृपया इथे पोस्ट करा तीही लवकर.

बापरे...भयानक....पुढे लिहा लवकर
आणि अनुल्लेख नाही हो...आज बरेच जणांना सुट्टी आहे....कदाचित त्यामुळे प्रतिसाद देणं जमलं नसेल कारण माझ्यासारखे लोक ऑफिसमद्धे असतानाच माबो बघत असतिल असा विचार करुन बघा...असो..

मस्त

प्रोत्साहन देऊन पुढील भाग लिहीण्यासाठी उत्साह दिलात याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार. (आता मात्र कथा पूर्ण करण्याचे बंधन येऊन पडलेले आहे) Happy

तलखी हा आमच्या बोलीतला शब्द आहे. आम्ही ज्या अर्थाने वापरतो तो अर्थ तगमग, कडवटपणा, काहिली, चिडचिड (कोंडमा-यामुळे) च्या जवळ जाणारा आहे.