माझा सपशेल उडालेला फज्जा - BRM200

Submitted by limbutimbu on 30 March, 2015 - 06:59

यात सांगण्यासारखे, इथे लिहीण्यासारखे खरे तर काय आहे?
मी एका स्पर्धेत भाग घेतला, व अगदी सुरवातीच्या तासाभरातच मला स्पर्धेतून स्वेच्छेने बाहेर पडावे लागले, यात अभिमानाने सांगण्यासारखे खरे तर काहीही नाही. एका वाक्यात कळवता येते.
तरीही, वैयक्तिक अक्षमतेव्यतिरिक्तची बाहेर पडावे लागण्याची कारणमिमांसा माहित व्हावी म्हणून स्वतःच्याच फजितवड्याबद्दल हा लेखन प्रपंच.

दिनांक २८ मार्च, २०१५ रोजी पुणे युनिव्हर्सिटीच्या मुख्य गेटपासून रात्री ७ वाजता BRM200 या रेसला सुरुवात होणार होती व १३ तासात २०० किमी अंतर कापून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला संपणार होती.

ही शर्यत अर्थातच व्यक्तिव्यक्तिंमधिल नसून, व्यक्तिची स्वत:शी व वेळेशी होती. सर्व प्रवास रात्रीचा करायचा होता. व मार्ग पुणे युनिव्हर्सिटी, पाषाण रोडमार्गे देहू-कात्रज बायपासला चांदणी चौकात मिळायचे व पुढे जाऊन नविन कात्रज बोगद्यांमधुन पुढे कापुरहोळ ला पोहोचायचे, तिथे कंट्रोल पॉईंट होता, तिथुन परत फिरुन नविन कात्रज बोगद्यांकडून, कात्रज-देहूरोडबायपासने जाउन, पुढे जुन्या पुणे-मुंबै हायवेने लोणावळा गाठायचे, तिथुन परत फिरुन परत पुण्यात यायचे असा मार्ग होता.

आजवर कधीही मिळालेला नसेल इतका प्रतिसाद या शर्यतीला मिळून मजसारखे काही चूकार हवशेगवशे धरून एकूण ३६ जणांनी सहभाग घेतला, पैकी ३ जणांनी सुरवातच केली नाही, १३ जण क्विट झाले, व २० जणांनी शर्यत पूर्ण केली, पैकी सर्वात प्रथम आलेल्याने जवळपास आठ तासातच हे अंतर कापले.

खरे तर या शर्यतीत भाग घेण्याचे मी योजलेले नव्हते. पण गेले काही महिने या विचारात होतो, व म्हणून माझ्या मुलाची, तो शाळेत असताना वापरायचा, ती सायकल डागडुजी करुन घ्यायला सुरुवात केली होती. दोन महिन्यापूर्वी मुलानेच दोन्ही चाकांना टायरट्यूब बसवुन दिले. मग मी व माझा एक मित्र गिअरच्या शोधात राहिलो, अन् सरतेशेवटी आमच्या इथल्या “रोडसाईड” मेक्यानिककडून मागिल चाकास गिअर बसवून घेतले. मागिल गिअर व्हिल्सच्या रुंदीमुळे पुढील पेडलचे एकेरी चेनव्हील अडचणीचे ठरू लागले, व एकतर मागिल सर्वात लहान व सर्वात मोठ्या गिअरव्हिलवर चेन नेऊ पाहिल्यास चेन पडू लागली, म्हणून मेक्यानिकने ती व्हिल्स लॉक करुन ठेवली (म्हणजे तिथवर चेन जायचीच नाही). सर्वात बारके व्हिल वापरताच येणार नसेल, तर गिअरचा उपयोग काय? असे म्हणुन मी त्याला पुढेही गिअर व्हिल बसवायला सांगितले, ते त्याने बसवले. पण म्हणे त्याच्याकडे शिफ्टर नव्हताच. तर बिना शिफ्टरचे ते वापरू लागलो, पण आता पुढच्या चाकावरुन चेन पडू लागली. सबब, पुढच्या लहान (मध्यम) दात्यांच्या चाकावरुन चेन वापरु लागलो. या गिअरच्या मोठ्या चाकाचे दाते केवळ ४२ होते, तर मला ज्या चाकाचा उपयोग करता येत होता तिचे दाते केवळ ३२ होते. केवळ ३२ दात्यांच्या चक्रामुळे सायकल चालविने साध्या अंतराकरताही वैतागाचे होत होते व अक्षरष: २०/२२ चा वेग घेण्यासाठीदेखिल मेहनत करावी लागत होती. तेव्हा साधारण दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात जाऊन पुढील बाजुस किमान ४४ वा ४८ दात्यांच्या मोठ्या व्हिलची सोय करण्याकरता शोध मोहिम घेतली, ती फसली. परत एकदा ८ दिवसांपुर्वीच्या शनिवारी पुण्यात गेलो, तर तब्बल तिन वेगवेगळ्या दुकानातुन तिन पार्ट्स खरेदी करावे लागले. ४८चे गिअर व्हील एका ठिकाणाहून, त्याचा खालचा शिफ्टर एका ठिकाणी, तर हॅंडलपासची लिव्हर एका ठिकाणाहून.
हे सर्व आणुन स्वत:च बसवले व पुढील दोनचार दिवस ऑफिसला रोज सायकलने जाऊयेऊ लागलो.
दरम्यान, वरील रेस जाहिर झालेली दिसली, तेव्हा करुन तर बघु, वाईटात वाईट काय होईल ? बाहेर पडावे लागेल.. असा विचार करुन घरात ही गोष्ट बोलल्यावर लिंबीची तत्काळ प्रतिक्रिया होती की “तू घरातला एकमेव कर्ता पुरुष, तुला काही झाले तर बाकिच्यांनी काय करायचे? काही नकोय भाग घ्यायला”……
मी शॉकमधे, पण कसेतरी तिची परवानगि घेण्यामधे यश मिळाले.

या रेसेस् मधे भाग घ्यायचाच म्हणुन मी तिनेक महिन्यांपूर्वीच माझे वेळापत्रक आखले होते नि त्यानुसार मी निगडी ते हिंजवडी/बापुजी देवाची खिंड/ कात्रज-बिबवेवाडी/ कात्रज बोगदा, असे टप्प्याटप्प्याने अंतर वाढवित नेऊन सराव करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात यापैकी एकाही ठिकाणी जाणे शक्य झाले नाही. येऊन जाऊन निगडी ते आळंदी इतकेच एकदा जाणेयेणे झाले. रोजचा ऑफिसला जाण्यायेण्याचा घर ते ऑफिस हा साडेतिन किमीचा टप्पा इतकाच काय तो सराव(?) म्हणे.

रेसच्या नियमाप्रमाणे पुढिल व मागिल दिवे असणे जरुरीचे, तेव्हा ते घ्यायला वेळात वेळ काढून ते बुधवारी विकत आणले. तेव्हाच पंक्चरचे सामानही आणले.

तशात गुरुवारी ऑफिसबाहेर गाडी लावलेली असताना कुणीतरी हॅंडलपासच्या गिअरलिव्हरशी खेळ केला होता त्यामुळे आता चेन मोठ्या व्हिलवर ठरत नव्हती. 

शुक्रवारी एक चंडीयाग घेतलेला, तो सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० दरम्यान पुरा केला, तेव्हा जेवणखाण वगैरे काही झाले नव्हते, होमाचा धूर मात्र भरपूर प्यायला-खाल्ला होता.

त्याच दिवशी संयोजकांचा SMS आला, की तुम्ही whatsapp वर दिसत नाही, दुसरा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तेव्हा त्यांना कळविले की आता एका android चि सोय करतो व कळवतो. लगेच रात्री १० वाजता मुलिकडे जाऊन तिला दिलेला android तात्पुरता घेतला तो रात्री एक पर्यंत घरी पोहोचलो.

दुसरे दिवशी शनिवार, रेसचा दिवस, पाणी भरणे, चूल पेटवून पाणी तापविणे इत्यादी आन्हिके उरकून, सकाळी १०.३० नंतर सायकल तयार करण्याची सुरुवात केली.

विकतचे दिवे वाटेत पडू शकतात हे इथे वाचलेले असल्याने, स्पेअर दिवे/बॅटरीलाईट बसवले. बाटल्या अडकवायला तारेचे स्टॅन्ड असतात ते बसवले. मधल्या बारवर दोन पर्स लटकवल्या. हे बसविण्याकरताच्या प्लॅस्टिक स्ट्रीप्स व लाल जिलेटीन आदले रात्रीच आणले होते. गाडीची (सायकलची) परिस्थिती बघता यच्चयावत नटबोल्टना बसणारे स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, पंक्चरचे पाने, ठ्यूब, व्हॉल्वट्यूब, हवा भरायचा भलाथोरला पंप, वगैरे घेतले. हे सामान इतके होते, की मी जर रेसच्या वाटेत सायकल दुरुस्तीचे दुकान टाकून बसलो असतो तरी चालले असते. Proud
त्याचवेळेस सायकलला पुढेमागे लावण्यासाठी वहीच्या पुठ्ठ्यांवर रायडर नंबरची दोन कार्ड्स तयार केली नाईट रिफ्लेक्टीव चिकटपट्टीने. ती लटकवली.

शनिवारी सर्व कामातुन/पाहुण्यांमधुन वेळ काढून एक क्षणभरही झोपता आले नाही. आदले दिवशी चंडीयागामुळे दुपारचे जेवण नाही, रात्री मुलिकडे जाऊन आलो, तेव्हाही जेवण नाही, व आज शनिवारी दुपारी केवळ एक पोळी खाल्लेली. या इतक्याच आहारावर मी दुपारी पावणेपाचला घरुन निघालो अन् वेळेत युनिव्हर्सिटीपाशी पोहोचलो. सोडवायला मुलगा आलेला.

तिथे यथावकाश सर्वजण गोळा झाले. मायबोलीकर केदार जोशीही भेटला. त्याचा पहिला प्रश्न होता, लिम्ब्या सराव काय केला आहेस? मी म्हणले अरे काहीच नाहीरे सराव  मग जमले नाही तर सोडून द्यायचा प्रयत्न या बोलीवर तो विषय संपला.

तिथे माझे कुणि फोटो काढले नाहीत, अगदी मुलानेही सजल्याधजल्या लिम्ब्याचा एकही फोटू काढला नाही, पण बरेच जणांनी माझ्या सायकलचे मात्र फोटो काढले. Proud

रेस सुरु होण्या आधी पाऊस झाला थोडासा, पण मुसळधार पाऊस होईल असे वातावरण होते. सबब, रेस सुरु होताना मी रेनसुटचा वरचा भाग अंगात चढवला. डोईचे हेल्मेट रस्त्यावर मिळते त्यातिल होते. त्यास व्हेन्टिलेशनची सुविधा (भोके असणे) नव्हती, व काल व आजच्या दिवसात मला भोके पाडणे जमले नव्हते. रेसला सुरुवात झाल्यावर मी तसाच निघालो, व पुढे दोन जण चालले होते त्यांना माझ्याही नकळत मीच फॉलो करू लागलो, व माझ्या नैसर्गिक ताकदीच्या कितीतरी पुढे जाऊन सायकल त्यांचेबरोबरीने वेगात दामटली. खरे तर मला श्वासाचा त्रास तेव्हा होत नव्हता, पण अंग घामाने निथळते आहे हे जाणवू लागले. थोड्या वेळाने पुढील सर्वजण दिसेनासे झाले व तोवर माझ्या शिंपीमधे जाम दुखायला लागलो, चढ सुरू झाला होता, तेव्हा श्वासही जोरजोरात होऊ लागला. हेल्मेट नजरेआड येते म्हणुन वर करावे लागायचे, तेव्हा आतिल स्पंजाला बोट लागल्यावर त्यातुन घामाची धार खाली पडू लागली. कपाळावरून ओघळून घाम डोळ्यात जाऊ लागला होता. इथेवर येईस्तोवरच पहिल्या साताठ किमीमधेच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. चक्कर येऊन तोल जाऊन पडतो की काय असे वाटू लागले. मागिल गिअर बदलायला डावी की उजवी लिव्हर वापरायची हे आठवेना, आठवले तर लिव्हर हाताला सापडेना. शेवटी चांदणी चौकाचा टॉप नजरेत् आला, पण मी इतका बधीर “एक्झॉस्टेड” झालो होतो की चक्क सायकलवरून उतरून तो पन्नास फुटांवरचा टॉप गाठला.

तिथे दम खात थांबलो. मुलाला फोन केला की अरे मला खूप त्रास होतोय. याची अपेक्षा नव्हती. पण त्रास तर होतोय, काय करू? मला नाही वाटत मी पुढे जाऊ शकेन. मुलगा म्हणाला, थोडा दम खा, अन् प्रयत्न करा, नाहीच जमले तर बाहेर पडा अन् मला फोन करा, मी आत्ता निगडीच्या वाटेतच आहे आहे.
मग मी थोडे पाणी प्यायलो, ते पितानाही एकदम पिऊन चालत नव्हते, अजुनच त्रास झाला असता.. अजुनही मला असे का होते आहे याचे कारण कळत नव्हते, कारण श्वास जोरजोरात फुलला तरी तो “दम्याचा” ऍटॅक नव्हता, दमाही नव्हता तेव्हा, पण हातपाय गळून गेले होते. इतकुश्श्या अंतरातच माझे असे का व्हावे याचा विचार करीत मी परत सायकल पुढ चांदणीचौकाच्या उतारावरून बायपासकडे काढली. तिथेन पुढे सिंहगडरोडवरील उड्डाण्णपुलापर्यंत उतार असल्याने झकासपैकी गेलो, मनात वाटले की आपण उगीच घाबरलो, हे काय, हां हां म्हणता पार करू अंतर….

झाले , सिंहगडरोडवरील/कॅनॉलवरील उड्डाण पुल सुरु झाला, अन् मला परत त्यापुलाचा चढही पार करवेना, सर्वात उंचावर जाऊन परत थांबलो, थोडे पाणी प्यायलो. पाणि प्यायचीही भिती वाटत होती कारण एकदम पाणि प्यायल्यास नळ भरु शकतात व पोटात दुखू लागते. शिंपीतील दुखणे आता थांबले होते पण श्वास ताब्यात येत नव्हता. नाकाने श्वास घेऊन तोंडाने भसाभसा सोडीत होतो. परत एकदा जीव धरुन पुढे निघालो. शिंदेवाडीचा पुल लागला, तिथुन उजवीकडे वळण घेऊन नविन कात्रज बोगद्यांकडे जायचे होते. तो पुलही मला निभावेना, त्यावरही थांबायला लागले. अतिशय निराश झालो. परत थोडे पाणी पिऊन तसाच पुढे निघालो तर लक्षात आले की आता तर पुलाच्या उतारावरही मला वेग घेता येत नाही इतका शक्तिपात झालाय. मला असे का होतय काहीही कळत नव्हते. पुढे कात्रज बोगद्याकडचा चढ सुरू झाला. व एका विशिष्ट वेळेस मी सायकल थांबवली. मेंदु कलकलला होता. चक्कर येऊन पडण्यापेक्षा स्वत:च थांबणे हा चांगला उपाय सुचण्याइतकी बुद्धी शाबूत होती.
थांबल्यावर पहिल्यांदा लिंबीला फोन लावला व परिस्थिती सांगितली. सुरवातीला विरोध करणारी लिंबी तेव्हा फोनवर मात्र म्हणाली, की तू घाबरलेला आहेस, थकलेला आहेस, तरीही पंधरावीस मिनिटे अर्धातास विश्रांती घे, अन पुढे हो, तू जाऊ शकशील”. तिच्या म्हणण्यात बरेच तथ्य होते. पण मी त्या मन:स्थितीत नव्हतो, सबब तिला सांगितले की मी क्विट करतोय, मला पुढे जाऊन रिस्क घ्यायची नाही, जरी त्यांचि पिक अप् व्हॅन वगैरे असली तरीही. लिंबी बरे म्हणाली.

मग संयोजकांना फोन करुन सांगितले की मला क्विट करावे लागत आहे, तसदी बद्दल सॉरी, मुलाला बोलावतो आहे, माझे मी मॅनेज करेन.

मग मुलाला फोन करुन सांगितले, तेव्हा तो पिंपरीपाशी ट्रॅफिकजाम मधे अडकला होता. निगडीला घरी जाऊन मग येतो म्हणाला….
यथावकाश दोनअडिच तासांनी मुलगा आला, तोवर मी शिंदेवाडीपुलाचे खाली येऊन उभाच्या उभा. दरम्यान दीडेक लिटर पाणी रिचवले अन मग वाटू लागले की अरे उगीच सोडली, घाई केली सोडण्यात.
लक्षात आले की टेललॅम्प पडून गेलाय.

मग मुलाने सायकल चालवित घरी नेली, त्याचे मागोमाग स्कूटीवरुन मी गेलो.
BRM200 मधिल सहभागाचा माझा पहिलाच प्रयत्न सपशेल फसला होताच, तो देखिल केवळ एक तासाचे आत, वीसेक किमीमधेच. 

नंतर विचार करता यास अनेक बाबी कारणीभूत झाल्या होत्या असे जाणवले, त्या पुढील प्रमाणे.

१. अजिबात सराव न करता / अपुऱ्या सरावानिशी रेसला उतरणे
२. शेवटच्या क्षणापर्यंत सायकलची डागडुजी करावी लागणे व त्यामुळे तिच्याशी वापरण्याबाबत/ हाताळण्याबाबत जवळीक निर्माण झालेली नसणे. अगदि सीटची उंची किती हे देखिल शेवटपर्यंत निश्चित झालेले नव्हते.
३. पावसाळी हवा म्हणुन घातलेले रेनसुटचे जाकिट व व्हेन्टिलेशन नसलेले हेल्मेट महाघातक ठरले. यामुळे अंगात निर्माण होत असलेली उष्णता आतच साठून राहून शरिराने घामाद्वारे त्याचा प्रतिकार केला, व एरवी अगदी क्वचितच घामाघुम होणारा मी त्यावेळेस मात्र नखशिखांत ओला झालो.
४. स्वत:च्या नैसर्गिक कमी गतिने न जाता पुढिल वेगवान एक्स्पर्ट लोकांना फॉलो करणे ही घोडचूक होती. त्यामुळेही एक्झर्शन वाढले.
५. आधिचे तिनचार दिवस अतिश्रम व अपुरा आहार, अगदी रेसच्या दिवशीही आहाराबाबत दुर्लक्ष,
६. रात्रीची रेस असुनही आधिच्या तिनचार दिवसात दिवसाची काय, रात्रीचीही पुरेशी झोप/विश्रांती नाहीच नाही.
७. चाराठ दिवस आधीपासून आईच्या पायावर सूज आलेली, तेव्हा त्या काळजीने मन चिंताग्रस्त, द्विधा मन:स्थितीत.
८. रेसकरता स्वत:स कुठल्याच पद्धतीने शारिरीक/मानसिक दृष्ट्या तयार करू न शकणे, अन् तरीही भाग घेणे.
९. “होय, तू मनात आणलेस तर ही रेस करू शकशील” अशा आशयाचे वाक्य नि:शंकपणे सांगणारी एकही व्यक्ति आजुबाजुला नाही. येऊनजाऊन मुलगा म्हणाला, “करा हो बाबा, जमेल तुम्हाला, नै जमले तर बाहेर पडा!” पण त्यात तितका जोर नव्हता हे त्याला अन् मलाही ठाऊक होते.

तर इतके असताना या प्रयत्नातून साध्य काय झाले? आत्मविश्वास कमावला की गमावला ? होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का? परत सुयोग्य प्रयत्न करणार का?

तर इतके असताना या फसलेल्या प्रयत्नातून साध्य काय झाले?
रेसची, रेसमधिल सहभागी, त्यांच्या सायकली, हत्यारे इत्यादी अनेक बाबींची ओळख जवळून झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण किती बारकाईने विचार करुन उतरायला हवे, किती प्लॅनिंग हवे, किती सराव हवा, किती तयारी हवी याचा अंदाज आला. एका चांगल्या ग्रुपबरोबर ओळख झाली. शिवाय केदारजोशीचे प्रत्यक्ष दर्शन झाले.

आत्मविश्वास कमावला की गमावला ?
डिस्अपॉइंट नक्कीच झालो, उदास झालो, पण नाऊमेद नक्कीच नाही झालो. इतक्या कमी अंतरात मी बाहेर पडेन घरच्या कुणालाच अपेक्षित नव्हते. किमान कापुरहोळ करुन तरी येईल असे त्यांनाही वाटत होते.
मी आधी प्रेडिक्ट केले होते की जर मी अमुक वेळेपर्यंत कापुरहोळहून परत वारजे/चांदणीचौकापर्यंत आलो, अन् तेव्हा सुस्थितीत असलो, तरच पुढे जाऊ शकेन.
अन् मी रेस करीनच वा नाही याचा निर्णय बहुधा त्या आधीच शिंदेवाडी ओव्हरब्रीजपर्यंतच कदाचित लागलेला असेल. हेच भविष्य खरे ठरले.

होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का?
माहित नाही, कदाचित असेलही, मला पहिल्या पन्नास किमीची कात्रज चढ धरुन खात्री होती. पण ते शक्य झाले नाही.
सहभाग घेणे हा वेडेपणाही असेल. पण असे वेड लागल्याखेरीज हातुन काहीच होत नाही. यामुळे मी परत परत असे वेडेपणे करीत रहाणार हे नक्की.

परत सुयोग्य प्रयत्न करणार का?
अर्थातच होय. अधिकाधिक तयारी व पूर्वीच्या चूका टाळून परत परत प्रयत्न करणार.

याव्यतिरिक्तही एक गोष्ट साध्य झाली.... अन एक बाप म्हणुन ती साध्य होण्याला अपरिमित महत्व आहे.
काय झाले? की एकुणात त्या दिवशी माझ्या मुलानेच माझ्यापेक्षा जास्त किमी अंतर सायकल चालविली, ते देखिल आधी न ठरविता. त्यामुळे मग तोच म्हणाला, की मी एक सायकल बघितली आहे, ती घेणार अन मीच उतरणार रेसला.
मी त्याला म्हणालो, की अरे मी तरी हे का करतो? माझे बघुन तुम्हाला निदान थोडीजरी इच्छा झालि, अन त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न केलेत तर किती चांगले? माझे बघुन तुम्हाला इतके जरी कळले की असाही वेडेपणा करता येतो, व केलाच तर अशाप्रकारचे वेडेपणेच करायचे असतात, तरी खूप झाले.
यामुळे झालय इतकेच, की इथुन पुढे माझ्या साथीला माझा मुलगा असेल. त्याचा मोरल सपोर्ट असेल.

माझा एक मित्र आहे, तो देखिल हेच म्हणाला, की नोव्हे/डिसेम्बरचे सुमारास आपण उतरू. आता पाहुया पुढे काय काय होते ते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ११० किमी सायकलिन्ग केले. निगडी ते नसरापुर व परत.
या प्रवासाचा "फज्जा नंबर २" असे शीर्षक देऊन वृत्तान्त टाकावा का या विचारात आहे. Proud
नसरापुरच्या बाजाराला गेलो होतो. काळी सुट्टी तंबाखु व बॅटर्‍या विकत घेतल्या. पूर्वी कसे? आठवडे बाजाराला गवळणी वगैरे यायच्या... हल्ली तसले काही नस्ते... Wink (हा पण एक फज्जाच, नै?)

आताशा ताकद खूपच कमी पडते. परत येताना जीव निघाला. पण मजा आली.

सायकल अन माझा, दोघांचाही परफॉर्मन्स भिक्कारडा होता. माझे अ‍ॅवरेज फक्त १४ पडले. मॅक्स स्पीड ४९.

पायात, पोटरीत/मांड्यात गोळे/भरुन येणे वगैरे झाले. मग काय? एक पेडल मारता येईना. सगळे स्टीफ चढ सायकल हातात धरुन चालवत चढवले.
या अनुभवावर खरे तर दीडदोन हात लाम्ब वृत्तान्त पाडता येईल.
सायकलची गिअर सिस्टीम टाकाऊ आहे. चढावर चेन मागल्या स्प्रोकेटवरुन सटकत होती काड काड आवाज करीत. मोशन जायची. लिटरली मी पुढचे सिंगल एकेरी ५२ चे व्हील अन मागचे सर्वात छोटे व्हिल या कॉम्बिनेशनवर प्रवास केला.... ताकदीने पेडल मारुन मारुन मांड्या भरून आल्या. आता ती सिस्टीम बदलायला हवि. फर्स्ट प्रायोरिटी. मग ब्रेक बदलायचे.... पाऊस झाला तर अजिबात लागत नाहीत. मग पेडल्स बदलायची.... जरा बुटाचा तळवा ओला झाला की रप्पारप्प सटकतो पाय.
पण कात्रज बोगदा ते वारजे वार्‍याच्या वेगाने येताना कष्टाचे सार्थक झाले. तिथेही हेडविन्ड्स इतकी होती की ४२ पर्यंत उतारावर गेलेला स्पीड मधल्या एका स्पॉटवर उलटसुलट वार्‍यांमुळे ३० पर्यंत उतरला.
आज अंग अगदी दुखून आलय. हाताचे व पायाचे तळवे हुळहुळे झालेत. जीना उतरताना होलपटायला होतय मांडीत दुखल्यावर. तरी बर, काल पाऊस अजिबात नव्हता.
पण थोडक्यात काय? तर आशुचॅम्पच्या वडीलांनी सुचविल्याप्रमाणे जोरबैठकांचा व्यायाम खरेच नियमित करायला हवा तरच हातापायातील ताकद परत जागविता येईल.

पुपुवरील चर्चा:

कांदापोहे | 29 June, 2015 - 11:48
लिंब्या या उतारवयात ११० किमी सायकल चढावर चालवणे म्हणजे कमालच आहेस रे. गियर, पँडल, ब्रेक असे बद्लत बसण्यापेक्षा साय्कल का बदलत नाहीस. असो. जबरीच रे. ठेव ते वर. तब्येतीची काळजी घे. सोबत संपर्काकरता पत्ता फोन नंबरची एक चिठ्ठी सोबत ठेवत जा. देव करो आणी अशी वेळ न येतो पण तरीही.

हिम्सकूल | 29 June, 2015 - 11:50
लिंबू.. ग्रेट गोईंग... एखादी सेकंड हँड चांगली गियरची सायकल मिळाली तर घे.. त्यामुळे बरेच श्रम वाचतील आणि बर्‍यापैकी चालवायला मज्जा येईल.. आणि तुझ्या गिअरच्या संदर्भात तुला एक नंबर कळवतो... तो सायकल दुरुस्त करतो त्याच्या बोलून घे एकदा.. तो काही बदल सुचवू शकेल..

फारएण्ड | 29 June, 2015 - 12:28
लिंबू _/\_. ४९ म्हणजे जबरी आहे.१४ अ‍ॅव्हरेज चांगले आहे की. जुन्या काळ्या सायकलने आम्ही जायचो तेव्हा नॉर्मल म्हणजे १२ व फास्ट म्हणजे १८ पडायचे.

limbutimbu | 29 June, 2015 - 12:39
>>> सोबत संपर्काकरता पत्ता फोन नंबरची एक चिठ्ठी सोबत ठेवत जा. <<<<
कान्द्या.... हो रे. काल निघतानाही कंपनीचे आयकार्ड, पत्त्याचा/इमर्जन्सी फोन नम्बरचा कागद असे खिशात ठेवले होते. शिवाय ड्रायव्हिंग लायसन वगैरे असतेच. ते पाकिट सायकलनी जातानाही बाळगतोच. आवश्यक आहे. च्यामारी मधेच कुठे तंगड्यावर करून उताणा पडायची वेळ आली तर ओळख तरी पटावी म्हणुन ठेवतो.
आता लिंबीच म्हणते, की रोज सकाळी उठून सायकल दहा/पंधरा किमी तरी चालवुन येत जा...
सायकल बदलणे वगैरे मला आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. आहे हीच सायकल लिम्बीच्या भावाने मुलाला घेऊन दिलेली आहे. आता मुलानेच मनावर घेऊन येत्या मार्चपर्यंत नविन घेतलन १५/१६ हजारापर्यंत तर ठीके. तो डेकेथलॉनच्या दुकानात जाऊन मॉडेल पाहून आलाय म्हणे.
हिम्या, नंबर देऊन ठेव, इथे दिलास तरी चालेल. मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करेन, माझा इंटरेस्ट हवा तो पार्ट ओरिजिनल व बेस्ट क्वालिटीचा मिळणे हा आहे. सध्याचे ५२ चे व्हिलही आउट आहे, आधीची पुढली स्प्रोकेटही आउट होतीच. मधला अ‍ॅक्सल व स्प्रोकेट प्रॉपर मिळाले तर मी ते बदलणार आहे. त्याच्यामुळे मला स्पेअरपार्ट्स खात्रीने मिळतील असे वाटते.
अश्विनी, विक्रमसिंह, अ‍ॅडव्हेन्चर्स, धन्यवाद.
तब्येतीची काळजी करतोच आहे, अन म्हणूनच तर परिस्थितीने लादलेले सायकलिंग मी एक "स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हीटी" मधे बदलतोय, व तसे करण्यास माबोकर सायकलिंग एक्स्पर्ट सभासदांच्या लेखातून त्यांच्या अनुभवांचे पाठबळ लाभले नेमक्या वेळेस. पुढील वीस वर्षे धडधाकट व स्वावलंबनात जगायचे असेल तर मला हे केलेच पाहिजे.
अन असे करताना मी "नशिबाचीही" थट्टा उडवू पहातो... फोरव्हीलर मधुन फिरणार्‍या मला, टू व्हिलरच नाही तर नशिबाने डायरेक्ट सायकल/पायी फिरवणे आले, तर मी त्या गोष्टीतही उपयोगमूल्य शोधुन नशिबालाच म्हणतो, की बरे झाले नशीबा, ही वेळ आणलीस, नैतर व्यायाम करून शरिर संपदा कमवायची बाब मी आळशीपणात कधीच केली नसती. नशीब हसते मग गालातल्या गालात.
मी अंथरुणावर पडून असलेल्या परावलंबी म्हातारपणाचा तीव्र तिरस्कार करतो. तसे परावलंबित्व अजिबात नको.

limbutimbu | 29 June, 2015 - 12:48 नवीन
फारेण्ड, मॅक्स स्पीड उताराला ४९ पेक्षाही जास्त जात होता, मीच घाबरलो, गाडी डुगडुगायला लागली म्हणुन, ब्रेकिंग केले. मला चिमटा तुटायची भिती वाटायला लागली.
नववीमधे असताना भावेस्कूलसमोरच चिमटा तुटून कसा घोळ होतो तो अनुभव आहे. ते सर्वात रिस्की. मी त्याचे स्पेअर बार्स असतात ते बसवणारे. म्हणजे चिमटा तुटला तरी एकदम धराशाई व्हायला होत नाही.

तस म्हणशील तर १४ वाईट नाही, पण बीआरएम वगैरेमधे उतरायची स्वप्ने बघायची तर किमान २० चे अ‍ॅवरेज राखता आले पाहिजे, त्यातुलनेत कालचे १५ पेक्षाही कमी म्हणुन वाईट म्हणालो. अर्थात काल निघतानाच ठरवले होते की जमेल तेव्हडे वेळेचे गणित सांभाळायचे, न जमल्यास निव्वळ "अंतर कापून" काढायचे. जाताना शिंदेवाडीपुलापर्यंत मी २०+ चे अ‍ॅव्हरेज मेंटेन केले होते. घाटात ते उतरुन १४ झाले, ते पुन्हा सुधरवुन नसरापुर पर्यंत पोहोचेस्तोवर १५+ केले होते. नंतर मात्र मीच गठाळलो. तेव्हा नाद सोडला. म्हणले की आता घरापर्यंत सुखरुप पोहोचलो तरी मिळवली... उगाच ह्याला त्याला बोलावुन मला/माझ्या सायकलला उचलुन न्या असे सांगावे लागले तर किति शरमेचे ते! नक्कोच ते.

ही आहे माझी सायकल, चार चौघींसारखीच दिसते.... अगदीच रुपवती, लावण्यवती वगैरे नाहीये, पण कामसू आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ती माझी आहे. Happy
28-06-2015 Cycle s.jpg

कात्रज बोगद्यासमोर सेल्फी....
28-06-2015 selfy in front of Katraj bogada.jpg

दमल्यानंतर हे असे रस्त्यावर बसणे...
28-06-2015 selfy on road with cycle s.jpg

थॅन्क्यू अश्विनी..प
या अन मागच्या थेऊरच्या ९३ किमीच्या प्रवासात मला लक्षात आलेल्या गोष्टी ज्या मी आवर्जुन बरोबर घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे,
१) एखादे फोल्डींगचे स्टूल/खुर्ची म्हणा, कैतरी असे की झट्टदिशी रस्त्याकडेला मांडून त्यावर निवांतपणे बसता येईल.
२) ट्रेकिंगवाले वापरतात ती मॅटची गुंडाळी, कुठेही सावली दिसली अन पडावेसे वाटले, पाठ टेकवाविशी वाटली तर हवीच हवी. कालही मला जरा पाठ टेकवायला मिळाली असती तर बरे झाले असते. Happy
तसा मी आळशी आहे, दिवसाच्या कोणत्याही वेळेस पाठ टेकवली तरी झोप लागते छानपैकी. Happy त्यामुळे ही मॅट हविच.
३) ट्रक/कारना नै का त्या कॅनव्हासच्या पांढर्‍या वॉटर बॅग अडकवतात, तशी एक पाच लिटरची बॅग अडकवायचे बघितले पाहिजे. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी तासाभरात उन्हाने गरम होते. ती पिशवी खरेदी करणे, किंवा स्वतःला हवी तशी सायकलला सुयोग्य जागी अडकवता येईल अशी शिवणे हे दोन पर्याय आहेत. शिवायची म्हणली तर भोअरी आळीत जाऊन त्याची बुचे आणायला हवीत. ती नै मिळाली तर जुन्या कोणत्याही माझा/पेप्सी वा तत्सम कोल्ड्रीन्कच्या बाटलीचा वरचा पोर्शन कापुन घेऊन तो कापडात बसवायला हवा. जमेल ते. Happy
४) सायकलचा शेवटच पंक्चर काढला त्याला तीसाहून जास्त वर्षे झाली असतील. पंक्चरचा अनुभव नाही. पंक्चर काढण्याकरता असाच रिकाम्या बाटलीला उभी फाडून पाण्याचा ट्रे करावा की कसे या विचारात आहे. शिवाय सायकल पंक्चरच होऊ नये म्हणून एक/दोन उपाय आहेत, म्हणजे असे की टारच्या आत जुना झिजलेला टायर बसवुन त्यात ट्यूब बसविणे (हा प्रयोग मी यशस्वीरित्या लुनाच्या पुढच्या चाकाला केला होता) किंवा मग टायरच्या आत विशिष्ट पॅकिंग मटेरिअलचे शीट बसवणे व त्यात ट्यूब घालणे. काय बिशाद आहे पंक्चर होण्याची? अन पंक्चर झाली तरी तशीच रेटत नेता येईल काही अंतर तरी.
५) मला की नै, एक आरसा बसवायचा आहे, मागिल बघायचा बसवलाय, पुढील बघायचा बसवायचा आहे. हसू नका प्लिज, पण मुंडी खाली घातली तर पुढचे दिसत नाही, अन पुढचे बघायला मुंडी सतत वर करुन धरली तर मानेला मागे रग लागुन दुखू लागते. तेव्हा पुढील चाकाच्या मडगार्डवर अशा काही पद्धतीने आरसा बसवायचा आहे की पुढे झुकुन त्यात बघितले तरी समोरील रस्ता कामापुरता दिसत राहिला पाहिजे.
६) झालच तर मला ना, मारुती वगैरे गाड्यांचा अल्टरनेटर कुठे मिळाला तर तो ही बसवायचा आहे सायकलला, अन त्यावर चार्ज होणारी १२ वोल्टची बॅटरी... अन ते जमत असेल, जमले तर लगेच टूव्हिलर/कारचे पॉवरफुल दिवे, हॉर्न वगैरे बसवायचे.
७) दोन स्टील प्लेटीन्गवाल्या चकाकत्या साईड पेट्याही बसवायच्या आहेत, मोटरसायकलला असतात ना तशा. त्याला लॉक असते. बॅटरी वगैरे बाबी त्यात बसतील.
८) यू विल नॉट बिलिव्ह, पण काल माझ्याकडे रेनसुट होताच. तरीही एक फोल्डिंगची छत्रीही बरोबर घेतली होती. का माहिते? हसाल तुम्ही, पण सांगतो. जर वाटेत पाऊस लागला, तर रेनसुट आहे, पण गारपीट सुरू झाली तर? त्याकरता छत्री वा छप्परासारखे तत्सम बरोबर हवेच. गम्मत नाहीये ही. खूप खूप पूर्वी मी अनुभव घेतलाय खुल्या आकाशातून होणार्‍या गारपिटीचा व आजुबाजुला आडोसा नाही. तेव्हा लॅम्ब्रेटा होती आमच्याजवळ, तर सरळ स्कूटरशेजारी खाली बसुन साईडची पॅनेल काढून डोईवर धरल्याचे आठवते आहे. पुढे मागे मला शक्य झालेच तर पीव्हीसी शीटचे एअर डायनॅमिक छपर्रच बसवीन. फार काही अवघड नाही ते.

विजय, धन्यवाद.
अहो, मध्यंतरि मी बेंगलोरला गेलेलो तेव्हा बस सकाळी कोणत्याश्या धाब्यावर थांबली तिथे एक ट्रक वगैरेचे स्पेअर मिळणारे टपरी दुकान होते, तिथे ३ LOD च्या १२ वोल्टवर चालणार्‍या वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्या मिळाल्या, प्रत्येकी ४० रुपये, मी घेतल्या, पोरगा ओरडत होता कशाला हव्यात म्हणुन.
घरी आल्यावर स्कूटीच्या जुन्या बॅटरी चार्ज करुन आणल्यात. त्यावर पांढरी व लाल पट्टी मस्त लागते ती सायकलला बसवायची आहे. फक्त बॅटरि बसवायला साईड बॉक्स नाही म्हणून थांबलोय. एक हिरव्या रंगाचीही पट्टी आहे. सध्या पुशस्वीचच्या शोधात आहे जे हँडलवर कमित कमी जागा खाऊन बसवता येतील. त्याच मधे ब्लिंकिंग पट्ट्या मिळतात त्याचे साईड इंडीकेटर बनवायचे मनात आहे. बघु कसे काय जमेल तसे.
बॅटरी बसविण्याचा एक फायदा असाही होऊ शकेल की हवा भरण्याचा बॅटरीवर चालणारा पंप मिळतो दीडदोन हजारात. तो वापरता येईल. वजनाला हलका. सध्या शेखचिल्ली स्वप्ने आहेत, पण बघू तर खरी.

सशा, जरुर..... whatsapp वर आहेस ना?
पावसाचा जोर जरा कमी झाली की जुलै किंवा ऑगस्टमधे पहिल्या/तिसर्‍या शनिवारला धरुन, सातार्‍याला जायचा विचार आहे. शनिवारी पहाटे निघुन सातार्‍याला जायचे, माझ्या मावशीकडे मुक्काम करायचा अन रविवारी पहाटे परत फिरायचे. (अर्थात सोमवारी हातीपायी धडपणे ऑफिसला जाऊन डुलक्या काढायच्या हे वेगळे सांगायला नकोच! Proud )
तुला कोणते शनिवार/इतर दिवस सुट्टी असते?
या पेक्षा कोणता वेगळा जवळपासचा बेत असेल तर तुला कळविन.

_/\_

भारी. एवढे गेलात हेच कौतुक आहे. नहीतर आम्ही नवीन सायकल घेतली पण ५० किमी सुद्धा चालवली नाहीये. आणि आमचे मित्र १००, २००, ३००, ४००, ६००, १००० आणि ४८०० (दोघंजण) किमी तेही एकावेळी जातायत.

तुम्हीसुद्धा लवकरच brm कराल. खूप खूप शुभेच्छा.

लिंबुदा...तुमची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. इतका त्रास होऊनही तुम्ही अजून सायकल चालवण्याची उमेद बाळगून आहात त्याबद्दल सलाम....

पण काही गोष्टी सांगाव्याश्या वाटतात. सायकलींगमधले फार कळते असा काही भाग नाही. मी देखील चुकत माकतच अाहे. पण

चढावर चेन मागल्या स्प्रोकेटवरुन सटकत होती काड काड आवाज करीत. मोशन जायची. लिटरली मी पुढचे सिंगल एकेरी ५२ चे व्हील अन मागचे सर्वात छोटे व्हिल या कॉम्बिनेशनवर प्रवास केला.... ताकदीने पेडल मारुन मारुन मांड्या भरून आल्या. आता ती सिस्टीम बदलायला हवि. फर्स्ट प्रायोरिटी. मग ब्रेक बदलायचे.... पाऊस झाला तर अजिबात लागत नाहीत. मग पेडल्स बदलायची.... जरा बुटाचा तळवा ओला झाला की रप्पारप्प सटकतो पाय.
>>>>

हे वाचून काटा आला अंगावर...जीव किती धोक्यात घालताय याचा बहुदा अंदाज आला नसावा तुम्हाला. इतक्या बिझी हायवे वर असे काही करणे म्हणजे अतिशय चुकीचे आहे. देवकृपेने काही झाले नाही.

तुमच्या सायकलला तातडीने बऱ्याच बदलांची आवश्यकता आहे.

आणि तुमच्या बसवायच्या किंवा बरोबर घ्यायच्या गोष्टी वाचूनच दम लागला.

मी म्हणतो आहे तेच सामान भरपूर आहे आणि सायकलचे आहे तेच वजन पण. अजून साबुदाण्याची गोळी पण बरोबर घेऊ नका.

मला तर सायकलिंग मधले काहीच कळत नाही पण लिंबुरावांनी अशी रिस्क घेउ नये असे मला वाटते. केदार सारखे दर्दी लोक आहेत त्यांच्या सल्ल्याने नवीनच सायकल घ्यावी .

एखादे फोल्डींगचे स्टूल/खुर्ची म्हणा, कैतरी असे की झट्टदिशी रस्त्याकडेला मांडून त्यावर निवांतपणे बसता येईल.

- २) ट्रेकिंगवाले वापरतात ती मॅटची गुंडाळी, कुठेही सावली दिसली अन पडावेसे वाटले, पाठ टेकवाविशी वाटली तर हवीच हवी. कालही मला जरा पाठ टेकवायला मिळाली असती तर बरे झाले असते.

- ट्रेकची मॅट बरीच लांबुळकी असते आणि त्याची घडी होत नाही. त्याला बरीच जागा पण लागते. ती ठेवणार कशी आणि कुठे. फोल्डींग स्टूल आणि मॅट पेक्षा एक जुना प्लॅस्टिकचा तुकडा ठेवा बरोबर. तो कुठेही आंथरून बसायचीे किंवा झोपायचे. जागा आणि वजन दोन्ही नाही आणि बर्याच गोष्टीत उपयोगी.

३) ट्रक/कारना नै का त्या कॅनव्हासच्या पांढर्‍या वॉटर बॅग अडकवतात, तशी एक पाच लिटरची बॅग अडकवायचे बघितले पाहिजे. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी तासाभरात उन्हाने गरम होते. ती पिशवी खरेदी करणे, किंवा स्वतःला हवी तशी सायकलला सुयोग्य जागी अडकवता येईल अशी शिवणे हे दोन पर्याय आहेत. शिवायची म्हणली तर भोअरी आळीत जाऊन त्याची बुचे आणायला हवीत. ती नै मिळाली तर जुन्या कोणत्याही माझा/पेप्सी वा तत्सम कोल्ड्रीन्कच्या बाटलीचा वरचा पोर्शन कापुन घेऊन तो कापडात बसवायला हवा. जमेल ते.

- असले काही नका करू हो. पाच लिटरची पिशवी सायकलला अडकव्ल्यावर त्याचे वजन किती होईल. आणि कितीही लांबचा प्रवास असला तरी पाच लिटर पाणी लई जास्त झाले. एक एक लिटरच्या दोन बाटल्या. बास्स. संपले की वाटेत कुठल्याही हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबायचे आणि बाटल्या भरून घ्यायच्या. किंवा नुसत्याच दिल्या तरी मिळतील. पाण्यााला कोण नाही म्हणत नाही. बिसलेरी नाही साधे कुलरचे पाणी.

४) सायकलचा शेवटच पंक्चर काढला त्याला तीसाहून जास्त वर्षे झाली असतील. पंक्चरचा अनुभव नाही. पंक्चर काढण्याकरता असाच रिकाम्या बाटलीला उभी फाडून पाण्याचा ट्रे करावा की कसे या विचारात आहे. शिवाय सायकल पंक्चरच होऊ नये म्हणून एक/दोन उपाय आहेत, म्हणजे असे की टारच्या आत जुना झिजलेला टायर बसवुन त्यात ट्यूब बसविणे (हा प्रयोग मी यशस्वीरित्या लुनाच्या पुढच्या चाकाला केला होता) किंवा मग टायरच्या आत विशिष्ट पॅकिंग मटेरिअलचे शीट बसवणे व त्यात ट्यूब घालणे. काय बिशाद आहे पंक्चर होण्याची? अन पंक्चर झाली तरी तशीच रेटत नेता येईल काही अंतर तरी.

- एक सायकल पंक्चर किट १०० रुपयात येते. खिशात मावेल एवढेच असते.

५) मला की नै, एक आरसा बसवायचा आहे, मागिल बघायचा बसवलाय, पुढील बघायचा बसवायचा आहे. हसू नका प्लिज, पण मुंडी खाली घातली तर पुढचे दिसत नाही, अन पुढचे बघायला मुंडी सतत वर करुन धरली तर मानेला मागे रग लागुन दुखू लागते. तेव्हा पुढील चाकाच्या मडगार्डवर अशा काही पद्धतीने आरसा बसवायचा आहे की पुढे झुकुन त्यात बघितले तरी समोरील रस्ता कामापुरता दिसत राहिला पाहिजे.

- अॅग्रीड. हे करायला हरकत नाही.

६) झालच तर मला ना, मारुती वगैरे गाड्यांचा अल्टरनेटर कुठे मिळाला तर तो ही बसवायचा आहे सायकलला, अन त्यावर चार्ज होणारी १२ वोल्टची बॅटरी... अन ते जमत असेल, जमले तर लगेच टूव्हिलर/कारचे पॉवरफुल दिवे, हॉर्न वगैरे बसवायचे.

- इतक्या मोठ्या लाईटचा काय करणार.


७) दोन स्टील प्लेटीन्गवाल्या चकाकत्या साईड पेट्याही बसवायच्या आहेत, मोटरसायकलला असतात ना तशा. त्याला लॉक असते. बॅटरी वगैरे बाबी त्यात बसतील.

- पुन्हा जोरदार वजनी गोष्ट

८) यू विल नॉट बिलिव्ह, पण काल माझ्याकडे रेनसुट होताच. तरीही एक फोल्डिंगची छत्रीही बरोबर घेतली होती. का माहिते? हसाल तुम्ही, पण सांगतो. जर वाटेत पाऊस लागला, तर रेनसुट आहे, पण गारपीट सुरू झाली तर? त्याकरता छत्री वा छप्परासारखे तत्सम बरोबर हवेच. गम्मत नाहीये ही. खूप खूप पूर्वी मी अनुभव घेतलाय खुल्या आकाशातून होणार्‍या गारपिटीचा व आजुबाजुला आडोसा नाही. तेव्हा लॅम्ब्रेटा होती आमच्याजवळ, तर सरळ स्कूटरशेजारी खाली बसुन साईडची पॅनेल काढून डोईवर धरल्याचे आठवते आहे. पुढे मागे मला शक्य झालेच तर पीव्हीसी शीटचे एअर डायनॅमिक छपर्रच बसवीन. फार काही अवघड नाही ते.

- नो कॉमेंटस

हा हा हा लिंबूभौ हे सगळे डिटेल प्लान ऐकुन एन्डुरंस सायकलिस्ट सुद्धा भोवळ येऊन पडतील. ४०० / ६०० किमी जाऊन सुद्धा मी ह्यातील काहीही बरोबर नेले नाही. गरजच पडत नसते.

फक्त खालील गोष्टी आवश्यक आहेत.

१. पाणी ( जे रस्त्यावर मिळते)
२. पंक्चर साठी किट मिळतो तो आणि एक स्पेअर ट्युब असणे आवश्यक आहे.
३. पंप ( फोल्डिंग ८० रू ला मिळतो डिकॅथलॉन मध्ये.) एवढा मोठा न्यायची गरज नाही. तो खिशात मावतो.
४. खाण्यासाठी काहीतरी.
५. ओळखपत्र आणि पैसे

बाकी सगळे अनावश्यक.

१०० / १२५ किमी राईड पर्यंत अगदी लाईटही अनावश्यक. आणि स्पिड असेल तर २०० किमीला तो ही अनावश्यक. त्यापुढे मात्र जरूरी.

आशुचॅम्प, केदार, तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. थोडा वेळ मिळाला की लिहीतो. Happy
ललिता-प्रिती, शैलजा, जाई, मित, सुलु, वेल, मो, विकु, टण्या... शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

लिंबूभौ,
तुमच्या आयडियाच पेटंट फाइइल करा, पुढे मागे उपयोग होईल.
मस्त जिद्द व परिश्रम.
प्रकृतीची काळजी घेउन हे सगळे उद्योग करत चला. लिंबीच ऐका.
खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या जिद्दीला खरंच सलाम.. आणि लवकरच तुम्ही २००/४०० किमी करणार हे नक्की, तुमची इच्छाशक्तीच इतकी दांडगी आहे! मला सायकलिंग मधलं जास्त काही कळत नाही पण त्यामुळे तुमच्या लिस्ट वर नो कमेंट, पण मला तुमचं हेल्मेट इतकं सेफ असेल असं नाही वाटत. जर तसं असेल तर बाकी काहीही न घेता कृपया आधी हेल्मेट बदला.. चूभूद्याघ्या

>>>> अजून साबुदाण्याची गोळी पण बरोबर घेऊ नका. <<<< Lol Lol Lol अगदी अगदी....
पण माझी सवयच विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर वाहुन न्यायची, ती अशीतशी जाणार नाही. तरी तुझ्या सूचना लक्षात घेतोय.
१) मॅट ऐवजी प्लॅस्टीक कागदाची कल्पना छान आहे. सुटेबल कागद पैदा करतो.
२) वॉटरबॅग अगदी पाच लिटर नाही तरी थंड पाण्याच्या चैनीकरता दोनेक लिटरची तरी बघणारच. बाजारात तयार मिळतात, शोध घ्यावा लागेल.
३) पंक्चर कीट आहे. म्हणजे टायर उचकटायची पट्टी, चकत्या, पेट्रोलगम, घासणि, शिवाय व्हॉलट्युब इत्यादी.
४) अल्टरनेटर/बॅटरी/साईडबॉक्स वगैरे बाबी फक्त विचाराधीन आहेत, निर्णय घेतलेला नाही. अल्टरनेटर/बॅटरी तसे गरजेचेही नाही. पण भविष्यात कधी काळी किमान कोकणातली/डोंगरदर्‍यातील सहल काढली तर या बाबी कदाचित आवश्यक ठरतील. त्यावर अजुन विचार करतोय, इमॅजिन करू पहातोय.
५) बाकी गारपीट/छप्पर वगैरे बाबी अशाच शेखचिल्ली स्वप्नाच्या... पुरे करण्याची शक्यता केवळ १०%.

केदार, अरे तुमच्याच कुणाच्या त्या २८ मार्चच्या नाईट बीआरेम मधे वाचलय, पाण्याची बोम्ब झालेली. अन रस्त्यावर मिळू शकते हे माहित असले तरी आधीच्या अनुभवातुन माझा या "योगायोगावर" विश्वास नाहीरे Sad

पंक्चरचे कीट आहे, एक स्पेअर ट्युबही आहे. अजुन एक ट्युब घेउन ठेवण्याचा बेत आहे. पण माझा प्रयत्न असा राहील की पंक्चरच व्हायला नाही पाहिजे. त्यादृष्टीने विचार करतोय.

फोल्डिंगचा पंप फक्त ८० रू? डिकॅथलॉन मध्ये जायलाच हवे. मी एक हॅन्डपंप घेतला फडके हौदापासून, २५० ला मिळाला Sad , पण त्याने हवा भरली जात नाही.... म्हणुन पूर्वीचा मोठा बरोबर ठेवावा लागतोय. बघु, प्रयोग करुन बघायला हवेत.

खाण्याच्या बाबतीत मात्र मला माझ्याच तब्येतीचा अभ्यास करावा लागेल की काय किती घ्यावे. डॉक्टरनाही विचारून घेणारे. आतापर्यंतच्या दोनतिन वेळचा अनुभव असा की ग्लुकोज म्हणा/शुगर म्हणा, झपाट्याने उतरत असावी म्हणुन अशक्तपणा जाणवतो. क्रीमबिस्कीट खाल्ल्यावर परत गाडी रुळावर. तर नेमके काय घ्यावे हे ठरवावे लागेल. (तरी परवाच्या ट्रीपमधे "गाढवपणा" केलाच, चक्क मॅन्गो मस्तानी हाणली, अन मग काय होणार? पोटात खळबळ... जाऊदे ते... त्यापेक्षा जाळ काढणारि मिसळ, गेला बाजार वडापाव खाल्ला असता तरी चालले असते.)

ओळखपत्र आणि थोडेफार पैसे ठेवतो. तरी मला तुमच्यासारखे जमणे अवघड वाटते. सगळे कसे साग्रसंगित हवे. पूर्वीची स्कूटर/कार मधील भटकंतीची सवय लागलीये सगळा संसार बरोबर वागवायची. त्याशिवाय सुरक्षितच वाटत नाही. मी तर रस्त्यावर बाजुला बसून कमीतकमी सामानात चहा नाष्टा कसा तयार करता येईल याचाही विचार करतोय.
म्हणजे छोटा पेट्रोल स्टोव्ह, पातेले वगैरे ठेवायचे बरोबर.
हे बघा, हसू नका प्लिजच, पण कायेना, सायकलिंगची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली तर स्पर्धा, पण माझ्यासारख्याला जमणारच नसले तरी त्याच सायकलिंगची किमान छानशी "सहल" तरी व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे.
मी तुमच्या सर्वांच्या सूचना लक्षात ठेवतो आहे.

मी तर रस्त्यावर बाजुला बसून कमीतकमी सामानात चहा नाष्टा कसा तयार करता येईल याचाही विचार करतोय.
म्हणजे छोटा पेट्रोल स्टोव्ह, पातेले वगैरे ठेवायचे बरोबर.

हे भारीये...खरेच असे काही करणार आहात..मी १०० टक्के येतो...खरेच आपण एक सायकल कम सहल करू या...माझ्याकडे टेन्ट आहे. तो घेतो आणि कुठल्यातरी पवना वगैरे बॅकवॉटरच्या काठाशी मुक्काम करून मस्त स्वयंपाक करून ऐश करूया....

चेष्टा नाही. मी नक्की येईन तुमच्याबरोबर....

टेन्ट आहे तुझ्याकडे? अरे मग कधी सांगायचे? असे असेल तर मग लिंबीच्या शेतावर जाऊन राहु....
फक्त ऑगस्टनंतर जावे लागेल, सध्या धुंवाँधार पाऊस अस्तो तिकडे.
लिंबीचे गाव निगडीहून ८५/८७ किमी वर, पुण्याहून थोडे कमी. पहाटे निघालो तर दुपारी पोहोचू आरामशीर. तंबू वगैरे टाकू. तिथेच स्वैंपाक(?) पिठलभाकरी(?) करु. तसे असेल तर लिम्बीही स्कूटीवरुन येईल. धाकटी व पोरगा सायकलने येऊ शकतील. अगदीच टेण्टचे नै जमले तर लिंबीच्या बाबांचे घर आहे रात्रीच्या मुक्कामाला, झाडुन पुसुन घ्यावे लागेल, पण आपल्याला चालू शकेल. ऑगस्ट-सप्टेंबर मधिल हवामान बघुन ठरवूयात. चालेल?
(आधी बघितली नसल्यास) ही लिंक बघ... http://www.maayboli.com/node/2458?page=4 लिंबीच्या शेताची आहे. तिथे मी ऑलरेडी तंबु टाकुन राहिलेलो आहे आठवडाभर. जवळच पाझरतलावही आहे.

(मी जर चुकुनमाकुन तुमच्या कन्याकुमारीट्रीप मधे असतो, तर माझ्याबरोबर नक्कीच एकवेळचा वरणभात करण्यायेवढी सामुग्री सायकलवरही असती. अरे माझ्या आईवडिलांनी आख्खे भारत भ्रमण केले, जिथे तिथे धर्मशाळेत रहायचे, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करुन रहायचे, दोघांच्या हातात दोन दोन पिशव्या, त्यात तिखटमीठगुळापासुन ते रॉकेलच्या फोल्डींग स्टोव्ह पर्यंत सगळे अत्यावश्यक, पण कमीत कमी सामान. आवडले तर मुक्काम वाढवायचा, नै आवडले तर पुढे सरकायचे! तिन तिन महिने ते बाहेर असायचे. अन् तेव्हा तर आतासारखे मोबाईल राहुदेच, फोनही नव्हते. ते तिकडे तिन महिने बाहेर, इकडे घरात आमचे दोघांचे [मी व थोरला भाउ] राज्य... )

>>> पण मला तुमचं हेल्मेट इतकं सेफ असेल असं नाही वाटत. <<<
डीडी, तुमचा मुद्दा बरोबर आहे. हेल्मेटबाबत पुढेमागे काहीतरी करावेच लागेल.
फक्त अडचण इतकीच आहे की चांगले हेल्मेट दीडदोन हजाराखाली मिळत नाही, व हजाराच्या आत हेल्मेट म्हणून जे मिळते, त्याच्या क्षमतेबद्दल मलाच शंका आहे. अन त्या पेक्षा तात्पुरते का होईना, हे इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्मेट बरे वाटले.
इंडस्ट्रीमधे (उंचावरील कामे, डोक्यावर काही पडणे अशा जागी) हे सर्रास वापरले जाते. त्याचा एक फायदा म्हणजे त्याला आतुन डोके व आतिल कड यामधे गॅप आहे जीमधुन हवा खेळती रहाते व डोके गरम/उष्ण होत नाही. माझ्यामते, मी जोवर सायकलिंगचा रिस्की "स्पीडगेम" खेळत नाही, तोवर हे हेल्मेट चालु शकेल. मी हातोडा वगैरे मारुन बघितले आहे. फक्त ऐन्शी रुपयांचे आहे म्हणुन तोही प्रयोग बिन्धास्तपणे केला.
तरीही, तुमची सूचना लक्षात ठेवतोच आहे. योग्यवेळ येताच हेल्मेट बदलिन.

चला मग आपण दोघेच कशाला..एक माबोकरांचे सायकल गटग होऊन जाऊ द्या...फुल टू धमाल करू सगळे....

तुम्हीच एक धागा काढून आमंत्रित करा.

Pages