आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद हा लेख मी काही दिवसापूर्वी लिहिला होता. त्यावर स्त्रियांच्या एक छोट्या समस्येबद्दल लिहिले होते. त्या लेखावर प्रतिसाद देणाऱ्या बऱ्याच लोकांच्या मते हा लख अपूर्ण होता. मलाही तसेच जाणवले आणि थोडा व्यापक विषय घेऊन काहीतरी लिहावे असे वाटायला लागले म्हणून सर्वसामान्य स्त्रियांना (विशेषत: भारतीय) साधारणपणे भेडसाविणाऱ्या मूलभूत समस्यांबद्दल लिहायचे ठरविले. हा लेख आकाराला येण्यासाठी आधीच्या लेखावरचे प्रतिसाद खूप मदत करून गेले.
ह्या लेखात नमूद केलेल्यापैकी बऱ्याच समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही जाणविणाऱ्या असतील पण मूळ लेखाचा विषय स्त्रियांच्या समस्या हा असल्याने पुरुषांच्या समस्यांबद्दल अधिक लिहिले गेलेले नाही. माझ्या परीने मी वर्गीकरण करायचा प्रयत्न केला आहे आहे. खूप खोलात जाऊन चर्चा केलेली नाही कारण नाहीतर लेखाऐवजी लेखमालिका सुरु करायला लागेल. मला वाटणारी महत्वाची कारणे मात्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसादांमधून ह्या विषयांवर चर्चा घडली तर आवडेल. ह्यापूर्वी अशा प्रकारचा धागा मायबोलीवर निघाला असेल पुन्हा असा धागा काढल्याबद्दल क्षमस्व.
--> माझ्या मते स्त्रियांची सर्वात गंभीर समस्या आहे "असुरक्षितता" ह्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, बलात्कार, घरातील हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, रस्त्यावरून जाताना केलेली छेडछाड ह्या सर्वांचा समावेश आहे. मुळातच समाजात स्त्रीला असलेले दुय्यम स्थान हे ह्या सर्व समस्यांच्या मुळाशी आहे. हुंडा द्यावा लागेल, लग्नाचा खर्च करावा लागेल, मुलगी "वंशाचा दिवा" नाही म्हणून मुलीला जन्मालाच येऊ द्यायचे नाही आणि मुलगी जन्माला आलीच तर लगेचच तिची हत्या करून टाकणे. आणि त्याबद्दल य:किंचितही दोषी न वाटणे हे सगळे अत्यंत भयंकर आहे. पण तितकेच भयंकर आहे: मुलगी झाली म्हणून नाराज होणे, पहिली मुलगी झाली आता दुसरा मुलगा पाहिजे म्हणून दुसरा अगदी तिसरासुद्धा "चान्स" घेणे, आणि तरीही मुलगीच झाली तर "मुलीसुद्दा चांगल्या असतात" म्हणून स्वत:च्या मनाची समजूत घालणे. कोणाला मुलगी झाली तर "पहली बेटी धन की पेटी" असे काहीतरी म्हणून त्यांची समजूत काढणे. मुलगा झाला तर कोणी "पहला बेटा धन का पेटारा" असे नाही बरे कोणी म्हणत!!! कारण मुलगा झाल्यावर "सांत्वन" करायची आवश्यकताच काय?? शिकल्यासवरलेल्या शहरी आणि स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या लोकांच्या घरातसुद्धा ही वृत्ती सर्रासपणे आढळते. मग खेडोपाडी आणि अशिक्षित घरांमध्ये मुलगा हवा म्हणून स्त्रियांचा किती छळ होत असेल ह्याची कल्पना करून पाहिली की अंगावर काटा येतो. "बेटी बचाओ" सारख्या योजना सरकारला सुरु कराव्या लागतात तेव्हा समाज म्हणून आपण किती अपयशी आणि मागासलेले आहोत ह्याची जाणीव होते.
हुंडाबळी किंवा हुंड्यावरून छळ होणे ह्याचे प्रमुख कारण आहे हुंडा घेणे आणि देणेसुद्धा कित्येकांना चूक वाटतच नाही. शहरांमध्ये परिस्थिती बदलते आहे असे मला वाटत होते. पण परवाच आमच्या ओळखीतल्या एक उच्चशिक्षित मुलीचे ठरलेले लग्न ह्याच कारणास्तव मोडले. तिच्या आई-वडिलांनी लग्न मोडून तिला पाठींबा दिला पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही. कारण हुंडा मागणारे दुसऱ्यांदा लग्न ठरवितानासुद्धा हुंडा मागणार तो त्यांना देणारे दुसरे कोणीतरी भेटणार!! घरातील हिंसाचाराचे एक प्रमुख कारण हुंडा आहे. पण तरीही domestic violence ही समस्या निर्माण होण्याचे कारण सत्ता गाजवणे वर्चस्व प्रस्थपित करणे किंवा ते करू न देणे. स्त्री आपल्यापेक्षा दुय्यम आहे, अबल आहे (ती आपले काय वाकडे करणार?) आणि तिचा मानसन्मान तितकासा महत्वाचा नाही, ती आपली मालमत्ता आहे असल्या मानसिकतेमधून हिंसाचार बळावतो. घरातील हिंसाचाराची कित्येक उदाहरणे अगदी अत्याधुनिक घरातसुद्धा दिसतात. मानसिक छळ हा सुद्धा खरेतर एक प्रकारे domestic violence आहे. सतत घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे, कट कारस्थाने रचणे, अपमान करणे, त्या स्त्रीचे घरात राहणे/जगणे असह्य करणे हे तर अगदीच कॉमन आहे. एखादी खंबीर स्त्री ह्या सगळ्याचा सामना अगदी धैर्याने करेल अथवा घर सोडून सरळ निघून जाईल. पण गरीब (स्वभावाने आणि पैशानेसुद्धा) स्त्री मग अशा प्रसंगी डीप्रेशनमध्ये जाईल, क्वचितप्रसंगी आत्महत्येचासुद्धा प्रयत्न करेल. हा हिंसाचार फक्त घरातील पुरुषच करतात का? तर असे काहीच नाही घरातील इतर स्त्रियासुद्धा पुरुषांना सामील असतातच!! म्हणजे ह्या बाबतीत स्त्रियासुद्धा स्त्रियांना पाण्यात पाहतात, स्त्रियासुद्धा स्त्रियांचे जगणे मुश्किल करतात किंवा कोणी एखाद्या स्त्रीचे जगणे मुश्किल करत असेल तर बघ्याची भूमिका घेतात. अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी स्त्रीने स्वत: खंबीर असायला हवे आणि पुरुषांनी स्त्रीला स्वत:च्या बरोरीने दर्जा दिला पाहिजे हे जितके खरे आहे तितकेच घरातील इतर स्त्रियांनी हिंसाचाराला/मानसिक छळाला विरोध करायला हवा. प्रत्येक स्त्री जोपर्यंत स्वत:च्या आणि इतर स्त्रियांच्या स्त्रीत्वाचा सन्मान करायला शिकत नाही तोवर हे असे प्रसंग घडतच राहणार. (टीप: घरातील हिंसाचार ही समस्या पुरुषांनासुद्धा भेडसावते. त्याचप्रमाणे हुंडाविरोधी कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या स्त्रियासुद्धा आजकाल खूप दिसतात. अर्थात त्याची कारणे पूर्णपणे वेगळी असू शकतात)
बलात्कार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, रस्त्यावरून जाताना केलेली छेडछाड हा तर सध्याचा ऐरणीवरचा प्रश्न!! स्त्रीला भोगवस्तू समजणे आणि स्त्रीचे स्थान दुय्यम आहे असे मानणे ह्या भावनेतून ह्या प्रश्नाचा उगम झालेला आहे. ह्यामध्ये किती हात घरातील संस्कारांचा आहे आणि किती हात चित्रपट आणि त्यातील अचकट-विचकट गाणी ह्यांचा आहे हा संशोधनाचा विषय आहे. मुलीला घरामध्ये आणि घराबाहेर वावरताना जेवढी बंधने घातली जातात, "सुशील" वागायला शिकवले जाते तितके मुलाला जबाबदारीने वागायला शिकवले जात नाही. "तो मुलगा आहे" च्या नावाखाली त्याला सगळेच स्वातंत्र्य मिळते पण "तू बाहेर काय करतोस? तुझे मित्र कोण?" असे प्रश्न विचारणारे कोणीच नसते. मग एखादा मुलगा त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा कधी घ्यायला लागतो हे पालकांनाही कळत नाही. पुष्कळ वेळा मुलाचे बेताल वागणे पालकच पाठीशी घालताना दिसतात. आणि मग त्यातूनच असे बलात्कारी राक्षस जन्माला येतात. गेल्याच आठवड्यामध्ये निर्भयावर केलेली डॉक्युमेंटरी बीबीसी ने जगभर प्रदर्शित केली. भारतात त्या डॉक्युमेंटरी वर बंदी आणण्यात आली. आणि आपण बीबीसी ने ती डॉक्युमेंटरी करायला हवी होती की नाही, भारतात बंदी आणायला हवी होती की नाही ह्यावर चर्चा करित बसलो आहोत. मुळ प्रश्न बलात्कार आणि बलात्कार्यांना न झालेली शिक्षा आहे, ह्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? पण मुळ प्रश्नाला बगल देउन आपण भलतेच काहीतरी बोलत बसलो आहोत.
हल्लीच्या चित्रपटांतसुद्धा अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल तसे शब्द लिहून त्यावर वाट्टेल ते कपडे घालून स्त्रियाच नाचताना दिसतात. लिहायलासुद्धा लाज वाटेल अशा नावांनी एखाद्या स्त्रीने स्वत:लाच संबोधणे आणि आपण भोगवस्तू आहोत हे स्वत:च अधोरेखित करणे ह्यासारखा स्त्रीत्वाचा दुसरा अपमान नसेल. अर्थात ह्या स्त्रिया अशा नाचतात म्हणून पुरुषांनी इतर स्त्रियांवर बलात्कार करावा असा अर्थ अजिबात होत नाही. पण ह्या सगळ्याचा समाजावर नकळत का होईना विपरीत परिणाम होतच असतो हे नाकारून चालणार नाही. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीसुद्धा येते ह्याची जाणीव प्रत्येक स्त्रीपुरुषाने ठेवायला हवी. आपण घेतलेल्या स्वातंत्र्याचा समाजावर काय परिणाम होत असेल ह्याचे मूल्यमापन सर्वांनीच करणे आवश्यक आहे. (टीप: लैंगिक छळाचा सामना अनेक पुरुषांनाही करावा लागतो.)
--> दुसरी समस्या आहे न मिळणारे व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा घेतला जाणारा संकुचित अर्थ. अगदी आधुनिक वाटणाऱ्या शहरी स्त्रियांसाठीसुद्धा निर्णय त्यांच्या घरातील पुरुष घेताना दिसतात. कोणते शिक्षण घ्यायचे, किती शिक्षण घ्यायचे, नोकरी करायची की नाही, केली तर कोणती नोकरी करायची असे बरेच निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य बऱ्याच स्त्रियांना नसते. मी खूप प्रसंगी "ही नोकरी बायकांसाठी बरी असते" अशा प्रकारचे विधान करणारे लोक पहिले आहेत. त्यामध्ये स्वत: स्त्रियाही आहेत. अशाप्रकारच्या विधानातून स्त्रीने घरचे सगळे सांभाळून नोकरीसुद्धा करावी अशी अपेक्षा व्यक्त होते. स्त्रियांनी करियर करणे हे तर मग खूपच लांब राहिले. ह्याउलट खूप ठिकाणी नोकरी करणाऱ्या किंवा आवडीचे शिक्षण घेणाऱ्या स्त्रीला घरातून भरभक्कम आधार असतो असेही पहिले आहे. घरगुती पातळीवर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येसुद्धा कित्येक लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या घराच्या लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करत तारेवरची कसरत करीत असतात . नाव-आडनाव बदलणे, साडी किंवा पंजाबी ड्रेस घालणे, कुंकू लावणे, मंगळसूत्र, बांगड्या घालणे, स्वयंपाक करणे, घरातील सर्व कामे करून जिथे नोकरी करता येईल तिथेच नोकरी करणे, किंवा नोकरी न करणे आणि घर बघणे ह्या अपेक्षा तर अगदी कॉमन आहेत. ह्याहीपेक्षा पुढे जाऊन लिहायचे तर मोठीच यादी होईल. कित्येक वेळेला स्त्रियांनाच ह्यात काही गैर वाटत नाही. पण स्त्रीला खरेच काय हवे आहे, तिला काय आवडते असे कोण विचारते? समाजाने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीतच आमच्या अपेक्षा बसतात. ह्या काही अवास्तव अपेक्षा नाहीत असे म्हटले तरी प्रश्न सुटत नाही. एखाद्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आपल्यामुळे हिरावले जात असेल अशी पुसटशी सुद्धा कल्पना नसणे किंवा त्यात काही विशेष नाही असे वाटणे हेच किती भयंकर आहे!! ह्यातसुद्धा दोष फक्त पुरुषांचा नाहीच. पुष्कळ वेळा स्त्रियाच आपल्या अपेक्षांचे ओझे दुसऱ्या स्त्रीवर लादत असतात. (अर्थात स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीसुद्धा येते ह्याची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला हवी ह्यातही काही दुमत नाही. मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणाऱ्या स्त्रियासुद्धा असतीलच.)
हवे तसे कपडे घालायला मिळणे, हवे ते खायप्यायला मिळणे, वेळेचे बंधन नसणे, घरातील कामे करण्याची सक्ती नसणे केवळ एवढ्याच गोष्टी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य असा विचार करणाऱ्या आणि तरीही स्वत:ला आधुनिक समजणाऱ्यासुद्धा खूप स्त्रिया (आणि पुरुषसुद्धा) आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या कोणत्या असायला हव्यात? ह्याबद्दल खूप विविध मते आणि संभ्रम आढळतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या अधिकारांची पायमल्ली होत असेल की नाही ह्याबद्दल असंवेदनशीलतासुद्धा दिसून येते. माझ्या मते निर्णय घेण्यासाठी सक्षम असणे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे, स्वत:च्या निर्णयांच्या बऱ्यावाईट परिणामांचे मूल्यमापन करता येणे, स्वत: घेतलेल्या निर्णयाची (मग तो चुकीचा असला तरीही) जबाबदारी स्वत:चीच असते ही जाणीव असणे, ती जबाबदारी घेता येणे आणि स्वत:चा निर्णय घेताना इतरांच्या अधिकारांची दखल घेणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य.
--> तिसरी अतिमहत्वाची समस्या म्हणजे न मिळणाऱ्या (समान) संधी. सर्व स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाच्या, नोकरीच्या आणि इतर संधी दिल्या गेल्या पाहिजेत ह्याबद्दल काहीच दुमत नसले पाहिजे. पूर्वी वैज्ञानिक किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुली कमी खूप कमी होत्या. मुलींना कलाशाखा बरी अशीच विचारसरणी होती. आणि वैज्ञानिक शिक्षण घेतले तरी शाळा कॉलेज मधील नोकरीच स्त्रियांसाठी चांगली असा विचार करणारे लोक होते. हळू हळू काळ बदलत गेला आणि मुलींच्या शिक्षणालासुद्धा महत्व येऊ लागले. पण अगदी १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत मेकॅनिकल इंजिनियरींग केलेल्या मुलीला उत्पादन क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. आज परिस्थिती काय आहे ठाऊक नाही पण तरीही उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमीच असावे असे वाटते. आज वरवर वाटताना आपल्याला वाटत असते कि स्त्रिया खूप शिकल्या पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या परंतु अजूनही एका ठराविक मर्यादेनंतर स्त्रियांना ग्लास-सिलिंगचा सामना करावा लागतो. आज अत्युच्च स्थानावर महत्वाची पदे भूषविणाऱ्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत.
स्त्रियांना समान संधी मिळावी म्हणून सरकारने महिला-आरक्षण चालू केले पण आरक्षणाची खरोखरच गरज असणाऱ्या किती स्त्रियांना (ग्रामीण अथवा गरीब) ह्या सोयीचा फायदा झाला हा प्रश्नच आहे. उगीचच आमच्यासारख्या स्त्रियांना गरज नसताना आरक्षण घ्यावे लागते. पण ते आरक्षण खरोखरच्या गरजूंना मिळेल ह्याकडे कोण लक्ष देते? बऱ्याच आधुनिक स्त्रियांना (गुणवत्ता नसली तरीही) आरक्षण हा स्वत:चा हक्क वाटायला लागला आहे. खरेतर समान संधी आरक्षणाच्या आधारावर मिळण्यापेक्षा गुणवत्तेच्या आधारावर मिळाल्या तर त्यामध्ये अधिक समाधान आणि यश आहे. मी स्त्री आहे म्हणून माझ्यात गुणवत्ता नसली तरीही मला समान संधी मिळायला हवी अशी वृत्ती चुकीचीच आहे. त्यापेक्षा माझ्यात गुणवत्ता आहे म्हणून समान संधी मिळायला हवी असा विचार स्त्रियांनी करायला हवा. माझ्यात गुणवत्ता असूनही मी स्त्री आहे म्हणून मला कोणतीही संधी नाकारली जाऊ नये असा आग्रह असायला हवा.
समान संधीचा अत्यंत संकुचित अर्थ घेणारे लोकही काही कमी नाहीत. मध्यंतरी एका नावाजलेल्या नटीने म्हटले होते कि डॉक्टर बाई असो व पुरुष आपण त्यांना डॉक्टर म्हणतो मग स्त्री कलाकाराला actress का बर म्हटले जाते तिला female actor म्हणायला हवे आणि अनेक स्त्रीवाद्यांनी ही भूमिका उचलून धरली. कदाचित ही भूमिका योग्यही असेल पण स्त्री कलाकाराला female actor म्हटल्याने चित्रपटसृष्टीत स्त्रियांसाठी सबस्टन्स असणारे चित्रपट लिहिले गेले का? कास्टिंग काउच सारखा गलिच्छ प्रकार थांबला का? नुसता शब्द बदलल्याने स्त्रियांना समान दर्जा मिळाला का? हा विचार कोणीच केला नाही आणि अजूनही करताना दिसत नाहीत. अर्थात सन्माननीय अपवाद असतीलच. पण अजूनही "Most awaited award of the evening" हा "Best Actor Male" हाच असतो. चित्रपटक्षेत्र असो उत्पादनक्षेत्र असो, सॉफ्ट्वेयर असो, शिक्षणक्षेत्र किंवा अजून कोणतेही क्षेत्र असो स्त्रियांचे स्थान अजूनही दुय्यमच आहे.
--> आजवर फारसे गंभीरतेने न घेतली गेलेली पण माझ्यामते अतिशय नाजूक समस्या म्हणजे सामाजिक वंचना (social exclusion). ह्याच्यावर मी माझ्या आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद ह्या लेखात लिहायचा प्रयत्न केला होता. आता वेगळ्या शब्दात पुन्हा लिहिते. साचेबद्ध विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे खूप स्त्रियांना सामाजिक वंचनेचा सामना करावा लागतो. आणि तो पुरुषांकडून नव्हे तर स्त्रियांकडूनच करावा लागतो. आपल्यासारख्या नसणाऱ्या स्त्रियांना कमी लेखणे, आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि देहबोलीतून सतत ते जाणवून देणे. ह्यासारख्या गोष्टी सर्रास सुशिक्षित आणि आधुनिक स्त्रियासुद्धा करत असतात. शिक्षण, नोकरी, लग्न झालेले असणे/नसणे, मुल झालेले असणे/नसणे, कपडे घालण्याची पद्धत, वजन, इत्यादी वरून स्त्रियाच इतर स्त्रियांना सामाजिक वंचनेचा सामना करायला लावतात. उदाहरणार्थ समजा आमचा एक गट आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया आहेत पण मधेच एखादी स्त्री उठून उच्चशिक्षित स्त्रियांचा एक वेगळा गट तयार करते. आता ह्यात वरवर पाहता चूक काहीच नाही. पण उच्चशिक्षित स्त्रियांचा जो वेगळा गट तो काही वेगळे कार्य करतो का? इतर संधी न मिळालेल्या पण शिक्षणाची आवड असलेल्या स्त्रियांना मदत करतो का? तसे असेल तर अशा स्त्रियांना त्या गटातून वगळण्याचे काही कारणच नाही. खरेतर जे "गॉसिप" आधीच्या गटात चालत होते तेच इथे पण चालत असेल तर मग हा उच्चशिक्षित नसलेल्या स्त्रियांना मुद्दाम वगळण्याचा प्रकार होत नाही का? तुम्ही उच्चशिक्षित आहात तुम्हाला संधी मिळाली किंवा ती तुमची निवड होती म्हणून ज्या स्त्रीला संधी मिळाली नाही किंवा ज्या स्त्रीची निवड वेगळी होती ती तुमच्यापेक्षा हीन ठरते का? पूर्वी जसे सवाष्णींच्या हळदीकुंकवांमध्ये विधवा स्त्रियांना वगळले जात होते तसेच इथे आहे. फक्त आता धोरण थोडेसे बदलले आहे. स्त्रीने वंचना होऊ नये अशी अपेक्षा ठेवणे पूर्णपणे चूकच आहे असे म्हणता येईल का? नक्कीच नाही!!
अशासारख्या प्रसंगांना वेगेवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच स्त्रियांना सामोरे जावे लागते. आणि त्यासाठी बहुतांश आम्ही स्त्रियाच जबाबदार असतो. खरेतर पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्त्रियांनी आपापसातली तेढ मिटविणे अधिक गरजेचे आहे. मी खूप शिकलेली आहे, मी काम करून पैसे कमावते, मी उत्तम स्वयंपाक करते, मी आधुनिक आहे, मी स्वतंत्र आहे, हे म्हणताना इतर स्त्रिया कमी आहेत असे का म्हणावेसे वाटते? स्वत:च्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगताना इतर स्त्रिया कशा कर्तुत्ववान नाहीत हे सिद्ध का करावेसे वाटते? खरोखरच्या कर्तुत्ववान स्त्रियांमध्ये (आणि पुरुषांमध्येही) परमावाधीचा आत्मविश्वास असतो त्यांना इतर स्त्रियांना (किंवा पुरुषांना) कमी लेखण्याची अथवा त्यांची वंचना करण्याची गरज पडत नाही. आपल्या कोणत्याही वागण्याबोलाण्यामुळे आपण कोणाचा उपहास तर करीत नाही ना आणि कोणाला भेदभावाची वागणूक देऊन दुखावत तर नाही ना हे वारंवार तपासायला हवे. अर्थात ज्या स्त्रीला वगळले जाते तिला आत्मविश्वास असणेही तितकेच महत्वाचे आहे!! साचेबद्ध विचारसरणीची पर्वा न करता स्वत:वर आणि स्वत:च्या कुवतीवर प्रचंड विश्वास हवा. मेहनत करण्याची, झगडण्याची, संघर्ष करण्याची पूर्ण तयारी असायला हवी. परंतु त्यासाठी समाजाने अशा स्त्रियांना सकारात्मक वातावरण देणे हेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. समाज म्हणून संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मग ती स्त्री असो की पुरुष असो, सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
सामाजिक वंचनेसारखे प्रश्न साचेबद्ध विचारसरणीमुळे उद्भवतात. अशा विचारसरणीचा परिणाम पुरुषांवरही होतच असतो. अमुक शिक्षण घेतले म्हणजे हुशार, अमुक एक पैसा मिळालाच पाहिजे, अमुक वर्षी लग्न झाले पाहिजे, लग्न होऊन अमुक वर्षे झाली की मुल झालेच पाहिजे, अमुक रंगाचे कपडे स्त्रियांनी आणि अमुक रंगांचे कपडे पुरुषांनी घालावेत, पुरुषांनी रडू नये, स्त्रियांनी रडले तर चालते, पुरुषांनी जिममध्ये वजने उचलावीत पण स्त्रियांनी वजने उचलण्याचा व्यायाम करू नये, मैदानी खेळ पुरुषांनी खेळावेत, स्त्रियांनी कलाकुसरीच्या गोष्टी शिकाव्यात अशासारखे विचार आपल्या मनात इतके घट्ट बसले आहेत की विणकाम करणारा पुरुष आणि फूटबॉल खेळणारी स्त्री अशा कल्पनाच आपल्याला करता येत नाहीत. ही साचेबद्ध विचारसरणी मोडून काढून एखादी व्यक्ती वेगळे काही करू पाहत असेल तर तिची वंचना न करता तिला मदत केली पाहिजे, तिला आत्मविश्वास दिला पाहिजे, त्या व्यक्तीचा संघर्ष कसा कमी करता येईल किंवा निदान आपल्यामुळे तो वाढत तर नाही ना हे पहिले पाहिजे.
--> स्त्रियांची स्वत:ची मानसिकता हा अजून एक विशेष मुद्दा आहे. मध्यंतरी मी एकदा एक लेख वाचला त्यात "मला स्त्री असण्याचा अभिमान आहे, नवरऱ्याचे कुंकु लावण्यातच स्त्रियांना कशी धन्यता वाटते, स्त्री कशी स्वत:चे अस्तित्व विसरून नवऱ्याला आधार देते त्याच्या परिवाराला आपलेसे करते, वेगवेगळ्या भूमिका कशा निभावाते (मुलगी, सून, बायको, आई, इ)" असे काहीतरी लिहिले होते. मुळात स्वत:च स्त्रीत्वाचा अभिमान असण्यासाठी स्वत:चे अस्तित्व विसरण्याची गरज नसते हे डोक्यात पक्के बसायला हवे. नवऱ्याला आधार देण्यासाठी आणि त्याच्या परिवाराला आपलेसे करण्यासाठी स्वत:च्या आशा आकांक्षांचा बळी द्यायची गरज नसते. मुलगी, सून, बायको, आई, इ भूमिका निभविताना स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचे बलिदान देण्याची काहीच गरज नाही. पुरुष ह्या बाबतीत स्त्रियांची बरोबरी करू शकत नाहीन कारण स्त्रियांची क्षमता उच्च प्रतीची असते हे विचार पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहेत. तुम्ही काहीतरी खूप महान करता आहात असे सांगितले कि स्त्रियांच्या प्रगतीला खीळ बसविणे सोपे पडते. आणि सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे आजकालच्या तरुण, शिकल्यासवरलेल्या, आधुनिक आणि शहरी मुलीच असा विचार करतात. आणि त्याउपर आम्ही कशा त्यागाच्या मूर्ती आहोत असा अविर्भाव आणतात. स्त्रियांनीच जर स्वत:ची मानसिकता बदलली नाही तर वेगळे काहीतरी करू पाहणाऱ्या स्त्रिया कायम खलनायिकाच होतील. त्यामुळे स्वत:ची मानसिकता बदलणे आणि इतर स्त्रियांना त्यांची मानसिकता बदलण्यासाठी मदत करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे
ह्या सगळ्या केवळ मूलभूत समस्या आहेत. ह्याहीपेक्षा अनेक वेगवेगळ्या समस्यांना स्त्रियांना दररोज सामोरे जावे लागते. पण मूलभूत समस्याच सोडविता येत नसतील तर इतर समस्या आपण कसे काय सोडविणार आहोत ह्याबद्दल खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे. ह्यातील सर्वच समस्यांवर आजवर वेगवेगळ्या मंचावरून भरपूर चर्चा झालेली आहे, पण कृती करणारे लोक खूपच कमी आहेत. त्यामुळे समस्या सुटलेल्या तर नाहीतच पण समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक वातावरणसुद्धा निर्माण झालेले नाही!!! समाजातील प्रत्येक व्यक्तीने हे ठरवायला हवे की कोणत्याही स्त्रीच्या (किंवा पुरुषाच्या) असुरक्षिततेचे आणि सामाजिक वंचनेचे मी कारण बनणार नाही. एखादी स्त्री (किंवा पुरुष) ह्या समस्यांचा सामना करत असेल तर बघ्याची भूमिका घेणार नाही. तिच्या संघर्षात तिची जमेल तशी पाठराखण करेन. माझ्यामुळे एखाद्या गुणवान स्त्रीला मिळणारी चांगली संधी केवळ ती स्त्री आहे म्हणून हुकणार नाही (नोकरीच्या मुलाखतीत/महाविद्यालय प्रवेशच्या वेळी जेव्हा स्त्रिया इतर स्त्रियांशी स्पर्धा करीत असतात तिथे हे विधान निश्चितच लागू पडत नाही कारण एक स्त्रीला नोकरी/प्रवेश मिळाली(ला) तर इतर स्त्रियांची संधी हुकणारच असते). संघर्ष करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला (खरेतर प्रत्येक व्यक्तीला) मी मदत करेन. जर मदत जमत नसेल तर माझ्यामुळे त्या व्यक्तीचा संघर्ष वाढणार नाही इतकी काळजी नक्कीच घेईन. समाज म्हणून हे आपले सगळ्यांचेच कर्तव्य असले तरी स्त्रियांच्या समस्या स्त्रियांनाच अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतात. त्या समस्या सोडविण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांचे योगदान अधिक महत्वाचे आहे हे स्त्रियांनी समजून घ्यायला हवे.
समाज म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी सुरक्षित, सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोणालाही सततची असुरक्षितता (शारीरिक अथवा मानसिक) जाणवणे, सामाजिक वंचनेचा सामना करावा लागणे, कोणाचेही व्यक्तीस्वातंत्र्य हिरावले जाणे हे सामाजिक अपयश आहे. समाजातील एक जरी स्त्री (अथवा पुरुष) अशा समस्यांचा सामना करीत असेल तरीही हे अप्रगत समाजाचे लक्षण आहे. समाज म्हणून प्रगत म्हणवून घ्यायचे असेल तर प्रथम आपल्या समाजातील (आणि समाजातील एक व्यक्ती म्हणून स्वत:मधीलसुद्धा) उणीवांची जाणीव हवी. नकारात्मक भावना ठेवून किंवा एखाद्या समस्येकडे डोळेझाक करून चालणार नाही. प्रत्येक ठिकाणी स्त्री-पुरुष तुलना करण्यापेक्षा ह्या समस्या कशा सोडविता येतील हा विचार करणे अधिक महत्वाचे आहे. सुरक्षितता, गुणवत्तेच्या आधारावर संधी आणि सामाजिक समावेश ह्या सर्वांवर समाजातील प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, मग ती स्त्री असो वा पुरुष!!