महिला दिन

Submitted by मोहना on 7 March, 2015 - 09:29

"हा ॲडम समजतो कोण स्वत:ला? " मुलगी शिंग उगारुन घरात शिरली. शाळेतून आली होती.
"कोण ॲडम? "
"अगं इव्ह आणि ॲडम मधला. जगाच्या निर्मितीपासूनच जर असं असेल तर नो वंडर आई, नो वंडर... तमाम बायकांच्या अंतापर्यंत ही चळवळ चालूच राहणार की काय? " मी पाहतच राहिले. ही मुलगी एका क्षणात जगाची सुरुवात, अंत कुठे कुठे जाऊन पोचली होती. वर्षातला एक दिवस तुमच्या नावाने असला की हे असं होतं? तितक्यात ती म्हणाली,
"मला मुळी कळतच नाही इव्ह आणि ॲडम का नाही म्हणत. जिकडे तिकडे मुलगे आधी. तुम्ही सुद्धा घरात मुलगाच आणलात आधी. "
"अगं तू काय बोलतेयस? घरात मुलगा आधी आणला? तो काय रस्त्यावर ठेवलेला असतो? " म्हटलं आणि चपापले कारण दोन्ही मुलांना बरीच वर्ष आम्ही त्यांना रस्त्यावरून उचलून आणलंय असंच सांगितलं होतं. तेही अधूनमधून वाजलं की, मग तुमचा माल परत करून टाका रस्त्याला. जातो आम्ही आता रस्त्यावर असं म्हणायला लागले होते. गाडी तिकडे वळायला नको होती. ती तशी वळली नाही कारण लेकीच्या मनात बरंच काही खदखदत होतं. तडतड लाह्या फुटल्याच तेवढ्यात,
"आणि ती मालिका, माइक ॲड मॉली. मॉली आणि माइक का नाही? " आधी मला वाटलं होतं शाळेतल्या ॲडममुळे काही बिनसलं होतं पण इथे सरळ सरळ महिला दिन चढलेला दिसत होता, आवेशपूर्ण उद्गार निघत होते.
"पण एकदम आज लक्षात आलं तुझ्या हे? "
"आज महिला दिन आहे ना? आहोत कुठे आपण आई, आहोत कुठे? "
"मी सोफ्यावर. तू दप्तर टाकून, चप्पल भिरकावून, कापलेले केस आणखी विस्कटल्यासारखे करत माझ्यासमोर उभी. "
"आईऽऽऽ"
"बरं, बरं. तू काय विचारलंस, आहोत कुठे आपण? हो नं? आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहोत. आता तर झालं समाधान? "
"हेच, हेच चुकतं आई आपलं. इतकी वर्ष हेच चुकलं. " जन्मापासून पंधरा वर्ष. या पंधरा वर्षात झालेली तिची घुसमट बाहेर पडायला लागली. तरीदेखील तिच्या शब्दाने मी सुखावले. एरवी या घरात फक्त माझंच चुकतं पण इथे ती ’आपलं चुकलं’ म्हणाली होती. एकदम लोण्याचा गोळा झाले मी.
"खरं गं बाळे, कधी कधी होतं असं. चुकतं आपलं. "
"चुकतंच. तुझ्यासारख्या बायका हे असं बोलतात ना तिथूनच चुकेला सुरुवात होते. " घसरली गाडी पुन्हा.
"अगं बाई, काय केलं आम्ही बायकांनी? "
"केलं नाहीत तेच चुकलं. सारखं आपलं, आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावतो. कशाला लावायचा तो त्यांच्या खांद्याला खांदा? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावण्याची बिककूल गरज नाही. "
"अगं काहीतरीच काय बोलतेयस? आम्ही बायका - बायका नाही हो तुलना करत एकमेकींची. आम्ही समोरच्यापेक्षा तसूभरही कमी नाही, असलोच तर जास्तच पण कमी नाही हे दाखवून द्यायचं तर पुरुषच नको का? पुरुषांशी स्पर्धा केली तरच आमचं समानत्व कळतं. बाईशी केली तर द्वेष करतो असं होतं ना. मग पुरुषच बरा नाही का? आता हेच बघ, आपण नाही का म्हणत आता स्त्रिया उच्चपदावर आहेत, आमची कार्यक्षेत्र रुंदावली, उंचावली आहेत. जे काही पुरुष करतात ते ते आम्हीही करू शकतो. त्यानंतर मग उदाहरणंही देतो नेहमीची. मुळात महिला दिन साजरा करतो तेव्हा आपण पुरुषच आणत असतो की सारखा मध्येमध्ये. म्हणून मी म्हटलं की आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन उभे आहोत. "
"आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते आई. "
"खरंच? पण मग तू तर माझ्याशी वादविवाद स्पर्धेत भाग घेतल्यासारखी कचाकचा भांडत असतेस. स्वत:शीच कर ना स्पर्धा. "
"आईऽऽऽ"

तितक्यात पुत्ररत्नाचा नाट्यमय प्रवेश. हातात पुष्पगुच्छ. डोळे वटारुन पाहणार्‍या बहिणीकडे दुर्लक्ष करत पुष्पगुच्छ माझ्याहाती सुपूर्द.
"अरे, माझा वाढदिवस मागच्या आठवड्यात झाला. "
"हॅपी विमेन्स डे आई. तुम्हा सर्व महिलांना वर्षानुवर्ष असेच महिला दिन साजरे करता येवोत ही सदिच्छा. तुला काय वाटतं ते सांग ना महिला दिनाबद्दल. आज मै तेरा इंटरव्ह्यू लेताच हू! "
"आता बोलताना तू ३ भाषा वापरल्यास. माझी मुलाखत तुला कोणत्या भाषेत पाहिजे? "
"बघ, हे तुझंच श्रेय आई. इतक्या भाषा तुझ्यामुळे शिकलो मी. " कसच, कसच म्हणत मी मुलाखत द्यायला सरसावले.
"विचार. "
"तुला एक महिला म्हणून महिला दिन कसा साजरा व्हावा असं वाटतं? "
"मुळात तो व्हावासा वाटतो का ते विचार ना. "
"मुलाखत कोण घेतंय? "
"बरं, बरं. मग घरी की बाहेर? कुठे कसा साजरा व्हायला हवा ते सांगू? "
"आधी घरी सांग मग बाहेर. "
"घराच्या बाबतीत महिलेच्या फार साध्या अपेक्षा असतात रे. तुमच्याच बाबतीत बोलायचं तर, तुम्ही दोघं बहीण भावंडांनी हमरीतुमरीवर न येता वागण्या, बोलण्यात आपण समान आहोत हे एकमेकांना दाखवावं. "
"पण आई, गर्ल्स आर मोअर पॉवरफुल. " माझ्या मुलाखतीत मुलगी मध्ये शिरली.
"सिद्ध कर. " आपल्या हातात खोटा का होईना माइक आहे हे बंधुराज विसरले आणि बहिणाबाईंचे केस ओढत तिचं विधान सिद्ध करायचं आवाहन केलं. महिला दिनच तो, असं काही अंगात संचारलं बहिणाबाईंच्या, की भाऊरायांचा धोबीपछाड. मी माझ्या होऊ घातलेल्या महिलेचं कर्तृत्व कौतुकाने पाहत राहिले. तिला कराटे शिकवल्याचं सार्थक घरातच होत होतं. मुलाने स्वत:ला सावरत पुन्हा माइक माझ्यासमोर धरला.
"हं, तर आपल्या घराबद्दल. घरात तसंही कुठलंही काम आपण मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता आपल्यापैकी कुणीही करतं याचं श्रेय मी माझ्याकडे घेऊ इच्छिते. इथूनच सुरुवात होते एकमेकांना कमी न लेखण्याची. ती प्रथा मी निदान आपल्या घरात तरी सुरू करू शकले हे ही नसे थोडके. "
"यात मी थोडी दुरुस्ती करू इच्छितो. "
"मी पण. " इथे बहीण, भाऊ एकत्र येतात. दोघं एकदम,
"घरात आपल्यापैकी कुणीही काम करतं असं तू म्हटलंस त्याऐवजी ’तुम्ही’ सगळे करता असं पाहिजे होतं. "
"तो ही स्त्री शक्तीचा विजय समज. आता आपण आणखी विधायक कामाकडे वळू. "
"म्हणजे कुठे? "
"घर सोडून बाहेर. "
"बरं. "
"मला असं वाटतं महिला दिन हा रोजच असायला हवा. तसा करण्याचा आमचा प्रयत्न आहेच. पण वर्षातून एकदा तुम्ही फक्त काही स्त्रियांचा उदो उदो करता आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायला सांगता. इथेच आमचा गोंधळ होतो. म्हणजे आमची झुंज कुणाशी आहे ते कळेनासं होतं. तुझ्यासारख्या भावी पुरुषगिरीशी की या आधी होऊन गेलेल्या कर्तृत्ववान बायकांशी हे कळेनासं होतं. "
"मॅन, व्हाय आर यू सो डिफिकल्ट? काय बोललीस ते कळलंच नाही. " तेवढ्यात मुलगी पुढे सरसावली. भावाच्या हातातला माइक ओढून करवादली.
"आला पुन्हा तुझा मॅन आधी. गॉऽऽऽड, हेल्प विमेन. " मी विधायक कामाकडे वळायच्या आधीच पुन्हा एकदा तुंबळ युद्ध सुरु होण्याची ही लक्षणं होती. मी कुठल्याही ’दिना’ च्या दिवशी शेवट करते तोच करायचा निर्णय घेतला.

"असं करू या. आपण महिला दिन आज बाहेर खाऊनच साजरा करू या. " दोघांनी त्यांच्या भांडणातून माझ्याकडे नजर टाकली. मी काय म्हणाले ते त्यांच्या अचानक लक्षात आलं. खुशीने दोघांनी मान डोलवली. आणि कुठे जेवायला जायचं हे ठरवण्याचा ’महिला दिनी’ बहीणीचा हक्क आहे की भावाचा या बद्दल दोघांचा वाद सुरु झाला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त!!

जोक्स अपार्ट...
>>>>"मला असं वाटतं महिला दिन हा रोजच असायला हवा. तसा करण्याचा आमचा प्रयत्न आहेच. पण वर्षातून एकदा तुम्ही फक्त काही स्त्रियांचा उदो उदो करता आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायला सांगता. इथेच आमचा गोंधळ होतो. म्हणजे आमची झुंज कुणाशी आहे ते कळेनासं होतं. तुझ्यासारख्या भावी पुरुषगिरीशी की या आधी होऊन गेलेल्या कर्तृत्ववान बायकांशी हे कळेनासं होतं. "<<<<
विचार करायला लावणारे वाक्य आहे!

I m big fan of yours....
नेहमीच तुमचं लिखाण एकदम ताजं तवानं करून टाकतं
God bless you
लिहित रहा

छान...

राधेकृष्ण, सियावर रामचंद्र, लैला मजनू, शिरी फरहाद, लक्ष्मीनारायण, रमामाधव, पार्वती पते हर हर महादेव Happy

छान! Happy
ताई ,तुमचे 2 3 धागे वाचले,भारी लिहिता तुम्ही Happy