रेहान- नंदिनी देसाई

Submitted by मी कल्याणी on 2 March, 2015 - 06:05

'रेहान'
176fe5514f8f4a069f62b97114e57880.jpg
मला कायमच समुद्राबद्दल प्रचंड आकर्षण वाटतं.. अथांग, खळखळता तरीही गूढ असा समुद्र! समुद्राची वेगवेगळी रूपं, किनार्‍यावरचा खारा वास, लाटांचा-वाळूचा पायाला होणारा स्पर्श.... सगळी समुद्राची मोहकता..! याच समुद्राच्या साक्षीने घडत-उलगडत जातो 'रेहान'.. रेहान.. मनस्वी, मनमौजी, आपल्या माणसांसाठी जीवही झोकून देणारा रेहान! अन अशा रेहानची सखी प्रिया! अथांग अन जिच्या मनाचा तळ गाठणं अशक्य.. अशी प्रिया! खरतर शब्दातून उलगडणार्‍या या कथेत आपण कधी हरवतो, कळंतच नाही.

'रेहान'ची लेखिका नंदिनी देसाई म्हणजे मायबोलीकरांची खास लाडकी लेखिका! कथानकाची सुबक गुंफण आणि उत्तम संवादशैली ही नंदिनीची खासियत. रेहान अन प्रियाबरोबरच सरबानी, फैझल्, जय, प्राजक्ता.. सगळेच आपल्या अवतीभवती वावरतात. या सगळ्यांना स्वतःची अशी कथा आहे आणि ही सगळी मंडळी स्वतंत्रपणे आपल्याशी संवाद साधतात.

कथेतील संवाद, वातावरण निर्मिती अन त्याचबरोबर खास 'कोळी' लोकांची बोलीभाषा वाचण्याची खुमारी वाढवते. त्याच बरोबर जेट्टीवरचे वातावरण, मच्छीमारी व्यवसायातील बारकावे अन त्यांच समुद्राशी असलेलं नातं वाचकाला खिळवून ठेवतं.. अन हे सारं घडताना.. 'समुद्रा'चं अस्तित्व सतत जाणवत रहातं! मासेमारी व्यवसायातील तपशील वाचताना त्यामागे लेखिकेने घेतलेली मेहनत दिसून येते.

समुद्राच्या साक्षीने रेहानची कथा घडत जाते. पुस्तकाचा शेवट मात्र थोडासा अपूर्ण वाटतो..

पुस्तकाचं मुखपृष्ठ विशेष उल्लेखनीय! एक चित्र हजार शब्दांची जागा घेतं, याची प्रचिती हे पृष्ठ बघुन येते!

सगळ्यांनी नक्की वाचावं असं 'रेहान'!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'रेहान'चा अर्धाकच्चा रिव्ह्यू नंदिनीला व्हॉट्सअ‍ॅपवर कळवला होता. कच्चा रिव्ह्यू मायबोलीवर टाकण्यासाठी लिहून ठेवला होता. तोच आता इथे लिहिते.

'रेहान' कथा आपण मायबोलीवर वाचलेली आहे. तीच कथा अधिक तपशीलात, अधिक पात्रांसोबत, अधिक प्रसंगांतून कादंबरीरुपात प्रकाशित झालेली आहे. कादंबरीचा शेवट मात्र वेगळा आहे. आणि मायबोलीवर वाचायला न मिळालेले रत्नांग्री भाषेमधले अस्सल मुसलमानी-कोकणी संवाद कादंबरीची खुमारी वाढवतात.
विवेक कुलकर्णी आणि हमीदचाचा हे दोघे बिझनेस पार्टनर. धंद्यांतील डावपेचांमध्ये धंद्याचं पारडं हमीदचाचांकडे झुकलेलं आणि त्यामुळे गर्तेत गेलेले, दारूचं व्यसन लागलेले विवेक कुलकर्णी. वडिलांची बरबादी डोळसपणे पाहणारी प्रिया, वडिलांच्या मृत्युनंतर आईची, भावंडांची, घराची जबाबदारी शिरावर घेते ते काहीएक ठाम उद्देश मनात ठेवूनच. हा उद्देश काय याचा उलगडा नकळतपणे आपल्याला कादंबरीच्या शेवटाकडे होतो.
या कथानकाला जोड आहे ती मैत्रीची, प्रेमाची आणि सूडभावनेची. सुप्त इच्छेचा महत्त्वाकांक्षेकडे आणि महत्त्वाकांक्षेचा इर्ष्येकडे होणारा प्रवास नंदिनीने 'रेहान'मध्ये रेखाटला आहे. संपूर्ण कथा प्रियाचीच आहे, त्यामुळे कादंबरीचं शीर्षक 'रेहान' का असा प्रश्न उभा राहतो.

संपूर्ण कथा प्रियाचीच आहे, त्यामुळे कादंबरीचं शीर्षक 'रेहान' का असा प्रश्न उभा राहतो. >>> सिनेमाचा हिरो आमिर असूनही सिनेमाचं नाव 'गजनी' होतं. तेच लॉजिक असावं Happy

नाही... प्रिया आणि रेहान यांच्यातल नातं खुप जगावेगळं आहे. जरीकथा प्रिया पुढे नेत असली तरीही गाभा रेहान भोवतीच फिरतो. प्रिया जशी आहे, जे काही करते त्या सगळ्यामागे फक्त रेहान आहे.
मी म्हटलंय ना की संपूर्ण कथेत समुद्राचं अस्तित्व सतत जाणावतं, बॅकड्रॉपला. तसंच काहीसं आहे रेहान अन प्रियाचं! त्यामुळे मला तरी हे नाव समर्पक वाटलं.

'hero is the one who carries the story ahead' यानुसार रेहान हाच हिरो ठरतो. जरी कथा प्रिया पुढे नेते तरीही सगळं रेहान्च्याच अनुशंगाने घडतं.

मला शेवट मात्र थोडा अपूर्ण वाटला.