साहेबराव

Submitted by बेफ़िकीर on 16 February, 2015 - 11:10

साहेबराव मनात रुतला तो रुतलाच! आजदिनी बरोब्बर तीस वर्षे झाली साहेब्याला पाहून! पण अजून मनातून जात नाही तो!

कर्वेरोडवर नळस्टॉपला एक चहाचे हॉटेल आहे. हे एक असे हॉटेल आहे जे पहाटे तीनला उघडते आणि रात्री साडे आठला बंद होते. पहाटे तेथे पेपरवाले आणि 'अभ्यासासाठी किंवा सबमिशनसाठी' नाईट मारणारे विद्यार्थी ह्यांची तुंबळ गर्दी असते. ह्या हॉटेलचे सर्वेसर्वा अप्पा हे आता साठीच्या पुढचे आहेत. त्यांची चारही मुले ह्या हॉटेलात राब राब राबली आणि अजूनही राबतात. इंजिनियरिंगला असलेल्यांसाठी विशेषतः हे हॉटेल म्हणजे सबकुछ असायचे, अजूनही असते.

मात्र आता समोर समुद्र हॉटेल शेजारी एक स्पर्धक निर्माण झाला आहे आणि गर्दी विभागली जाते.

पण १९८४ आणि १९८५ ह्या साली, जेव्हा सिगारेट ओढणे हा विषय दिवस दिवस पुरायचा तेव्हा आम्ही त्या हॉटेलात जाऊ लागलो.

चाळीस पैश्यांचा चहा आणि साठ पैश्यांची विल्स!

एक रुपयात तेव्हा खूप खूप मोठे झाल्यासारखे वाटायचे.

चुकून चहाचे रेट वाढलेच तर मोठे झाल्यासारखे वाटायला एक रुपया दहा पैसे द्यावे लागायचे.

त्यावेळी तिथे काही कर्मचारी होते. स्वतः अप्पा गल्ल्यावर बसायचे आणि सगळा कारभार सांभाळायचे. आतील एका कोणालाही नीट न दिसू शकणार्‍या अंधार्‍या खोलीत तेलाच्या तुडुंब वासात डवरलेला एक आचारी असायचा! एक मध्यमवयीन गृहस्थ होता जो उष्टे ग्लासेस, ताटल्या उचलून आतल्या काऊंटरवर ठेवायचा आणि अधूनमधून स्वतःच ते सगळे एका बादलीत बुडवून धुतल्यासारखे करून पुन्हा वापरायला बाहेर आणायचा.

आणि एक होता साहेबराव!

साहेबराव हे त्या अमृततूल्यचे युनिक सेलिंग प्रपोझिशन होते.

कोणीही हे मान्य केले नसेल, आजवरसुद्धा. की एकेकाळी त्या हॉटेलमध्ये विकले गेलेल्या चहामधील किमान पंचवीस टक्के चहा निव्वळ साहेबरावच्या असण्यावर विकला गेलेला होता.

आम्ही तेव्हा चौदा, पंधरा वर्षांचे होतो.

साहेबराव आमच्यापेक्षा खूप खूप मोठ्ठा होता.

साहेबराव बारा वर्षांचा होता.

प्लीज, चौदा वर्षाखालील मुलांना नोकरीला ठेवणे बेकायदेशीर आणि अन्याय्य असण्याचा तो काळ नव्हता, गरीब अनाथ मुलांना प्रेमाने ठेवून घेऊन त्यांना मायेने स्वतंत्र बनवण्याचा तो काळ होता.

साहेबराव हे त्याचे नांव होते. त्याचा उल्लेख 'मॅनेजमेन्ट' साहेब्या असा करायची. मी मात्र त्याला पहिल्या दिवसापासून साहेबराव म्हणत आलो ते आजवर त्याची आठवण आली तरी साहेबरावच म्हणतो.

साहेबराव स्वत:ला सुमारे पंचावन्न वर्षांचा समजायचा. म्हणजे अप्पांपेक्षा एखाददोनच वर्षे अधिक!

आमच्या टेबलवर चहाचे ग्लासेस आदळताना सहा ते अकरा टक्के क्वॉन्टिटी टेबलला प्यायला मिळते ह्याचे वैषम्य तर त्याच्या नजरेत नसायचेच, वर आम्हालाच म्हणायचा......

"सतरांदा उकळलाय च्या! अन् तुम्ही गल्ला भरताय हितला"

वय वर्षे बारा! कान्ट बिलीव्ह?

मूर्ती लहान आणि कीर्ती महान ही म्हण थोडी बदलायला हवी.

कीर्ती अजिबात नाही पण मूर्ती मात्र फारच लहान!

अंगठ्याएवढा होता तो! त्याच्याशी बोलत बोलत आणि हसत हसत चहा पिणे किंवा झुरके मारणे ह्यात काव्य होते.

एकदा म्हणाला......

"काय काम वगैरे हाय का? हिते फकत सातशे मिळतात"

"साहेबराव, अरे डिप्लोमाला आठशे मिळतात भोसरीत, डिग्रीला बाराशे"

"होय???? म्हन्जे वाईटे तुम्चं"

"फार फार वाईट आहे बाबा?"

"टपरी का नाय टाकत मंग?"

"कसली?"

"हेच! च्या, आंडा आम्लेट वगैरे?"

"तूच का नाही टाकत? आम्हाला ठेव कामाला"

अचानक साहेबरावच्या चेहर्‍यावर औदासीन्य पसरले. आपण कोणाशी काय बोलून 'र्‍हायलो' ह्याचे! ते औदासीन्य पाहून मला वाईट वाटले. हा टपरी टाकू शकत नाही हे नक्की माहीत असल्यामुळे आपण त्याची उडवलेली खिल्ली त्याच्या जिव्हारी लागणे हे आपल्या आनंदाचे कारण असता कामा नये ही जाणीव जागृत झाली.

एक दिवस साहेबराव म्हणाला......

"राम तेरी फैला का?"

"नाही पाहिला. का रे?"

:हिते नटराजला तं लाग्लाय"

"अरे लेका साडे तीन रुपये तिकीट आहे"

"होय??????"

"मग?"

"मी फैला"

आम्ही गार! साहेबरावने राम तेरी पाहिलेला होता.

"तू?"

"मंग?"

"कसा काय?"

"हित्ले सगळे गेलेवते. गायकवाडला कळ्ळाच नै! मी सांगितली इस्टोरी त्याला "

"हो का? आम्हाला सांग की?"

साहेबरावने काय वाक्य टाकावे?

"आत्ता टैम नाय! तुम्हीबी आत्ता बघू नका. हॅडल्टे"

पिक्चर फक्त प्रौढांसाठी आहे हे ज्ञानामृत आम्हाला साहेबरावने गरज नसताना पाजले.

अनेक महिन्यांनी एकदा गेलो तेव्हा साहेबराव दिसला नाही.

कोपरा अन् कोपरा तपासला तेव्हा एका कोपर्‍यात खाली बसून मुसमुसत होता बिचारा. ढवळून आले मला. आप्पांची भीडभाड न बाळगता मी विचारले.

"काय रे साहेबराव? रडतोयस कशाला?"

बिचारा काहीच बोलला नाही.

नंतर कळले. स्टाफपैकी कोणीतरी त्याच्या कानसुलात वाजवली होती. त्याला वेदना झाल्यामुळे रडत नव्हता तो! आपण इतरांपेक्षा वयाने लहान आहोत हे सगळ्यांना मान्य असूनही आपल्याला आजवर एक खोटे स्थान सगळ्यांनी दिलेले होते आणि कोणाच्यातरी खर्‍या वागण्याने ते स्थान क्षणार्धात नष्ट झाले ह्या अपमानाने रडत होता तो.

त्या क्षणी अगदी लहान मुलगा होता तो!

आणि त्याचमुळे त्याक्षणी मला देव अजिबात आवडला नव्हता.

जो स्वतःला जे समजतो आणि ते समजायला इतर त्याला सहाय्य करतात ते तो नाही आहे हे देवाने स्वतःहून का सांगावे?

माझे वय विसरून त्या दिवशी मी साहेबरावच्या डोक्यावरून आणि पाठीवरून मायेने हात फिरवला.

मला एक लहान भाऊ हवा होता असे मला पहिल्यांदाच वाटले असावे.

साहेबरावला मात्र तो स्पर्श एक्झॅक्टली आवडलेला नसावा. त्याला सांत्वन नको होते. त्याला मोकळे व्हायचे होते आणि नंतर जगावर चढायचे होते.

ज्याच्या कपाळावर सर्वात अशक्त रेषा असतात त्याला सर्वात सशक्त जिगर देण्याचा विरोधाभास साले दैवच करू शकते.

"गायकवाड लै घोरतो रात्री"

दुसर्‍या दिवशी साहेबरावने नेहमीच्या स्टाईलमध्ये सांगितले तेव्हा आम्हाला कळले की तो रात्री तिथेच झोपतो.

"उठतोस किती वाजता?"

"हे आप्पा आले की उठतो"

आप्पा पहाटे अडीचला यायचे.

पहाटे अडीच ते रात्री साडे आठ साहेबराव चहा सर्व्ह करत असायचा. मी त्या काळी सुट्टी असेल तर सकाळी साडे सातला उठायचो.

मधे अनेक वर्षे गेली असावीत. किंवा कदाचित दोन, तीनच वर्षे! नक्की आठवत नाही खरंच! मी एका रेप्युटेड कंपनीत लागून दोन वर्षे झालेली होती. आपोआपच माझ्या व्यक्तिमत्त्वावर त्या कंपनीत असण्याचा अप्रत्यक्ष प्रभाव पडलेला होता किंवा असावा.

मी एकटाच चहा-बिडी मारायला त्या हॉटेलमध्ये गेलो.

साहेबराव तिथेच होता. त्याचे कोणत्यातरी नव्या स्टाफ मेंबरशी वाजलेले असावे. त्याला पाहून पुटपुटतच त्याने माझ्यापुढे चहा आदळला. चहा आदळताना हा माणूस बरेच वर्षांनी आलेला आहे ही भावनाही त्याच्या चेहर्‍यावर नव्हती. पण मी डोळे रोखून त्याला पाहत होतो. माझ्यासाठी तो विस्मरणात जाण्याइतकाही महत्वाचा नव्हता पण अचानक समोर आला होता. त्याला पाहून मी म्हणालो......

"काय साहेबराव? कसे काय चालले आहे?"

हॉटेलमधला यच्चयावत स्टाफ माझ्याकडे बघतच बसला. साहेब्याची कळी जी खुलली, काय सांगू याराहो!

सगळ्यांकडे बघत साहेबराव म्हणाला,

"फाईले का? कस्ले मोठमोठे लोक मला ओळखतात?"

साहेबरावची आणि माझी ती शेवटची भेट! तो तेव्हाही खुजाच होता. त्याच्या खुजेपणातून सामोरे येणारे त्याचे बिनधास्तपण किती लोकांना जगायची उमेद देऊन गेले असेल माहीत नाही.

साहेबराव कोण होता, तिथे का होता, आता कुठे असतो, मला काहीही माहीत नाही.

पण जसे व्हायचे आहे तसे आपण आहोतच ह्या आविर्भावात जगण्याचे कौशल्य अंगी बाणवलेला तो एकमेव माणूस मी पाहिला.

कदाचित त्या वृत्तीस त्याचे लहान वय कारणीभूत असावे, पण हॅट्स ऑफ!

साहेबरावच्या तुटपुंज्या जगण्यात जी नशा होती ती लौकीकार्थाने सर्वमान्य असलेली यशाची शक्य ती सर्व शिखरे सर करूनही मला अंगी बाणवता आलेली नाही.

आज जर एखाद्या बारमध्ये मला पेग सर्व्ह करताना साहेबराव दिसला आणि मी म्हणालो की काय साहेबराव, कसे काय चालले आहे, तर तो म्हणेल "तुम्ही अजून दुसर्‍यालाच साहेबराव म्हन्ता काय?"

आणि जर चुकूनमाकून एखाद्या बारमध्ये समोरच्या टेबलवर साहेबराव बसलेला असेल आणि त्याने मला हात केलाच तर मी माझ्या सोबत्यांना सांगेन......

"बघा, किती मोठमोठ्ठी माणसे मला ओळखतात"

================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

>>ज्याच्या कपाळावर सर्वात अशक्त रेषा असतात त्याला सर्वात सशक्त जिगर देण्याचा विरोधाभास साले दैवच करू शकते.<<

व्वा !! खास बेफी स्टाईल चे वाक्य Wink
व्यक्तिचित्रण खास च जमलयं....तुमच्या लेखनाचा एक निस्सीम चाहता म्हणुन एक आगंतुक प्रश्न विचारु काय....तुमच्या ह्या समस्त व्यक्तिचित्रणाचे एक पुस्तक का नाही हो काढत.....जाम आवडेल वाचायला. बघा विचार करुन Happy

<<ज्याच्या कपाळावर सर्वात अशक्त रेषा असतात त्याला सर्वात सशक्त जिगर देण्याचा विरोधाभास साले दैवच करू शकते.>>
भयंकर आवडलं

<<ज्याच्या कपाळावर सर्वात अशक्त रेषा असतात त्याला सर्वात सशक्त जिगर देण्याचा विरोधाभास साले दैवच करू शकते.>>
>
हे वाक्य छानच,

पण एकंदरीत व्यक्तीचित्रण आपल्याच इतर व्यक्तीचित्रणाच्या मानाने थोडे डावे वाटले, किंबहुना अपुर्ण वाटले असे म्हणू शकतो. माझ्याही आयुष्यातील असेच एक पात्र डोळ्यासमोर आले, पण अजूनही बरेच पैलू उलगडायचे राहिले असे वाटले. अन्यथा आपली बरीच व्यक्तीचित्रणे परिपूर्ण वाटतात.

किंवा असेही असेल कदाचित माझ्या डोळ्यासमोर आलेल्या बारक्याला मी यात शोधताना त्याच्यातील एखादा पैलू मला इथे मिसिंग भासल्यानेही असे झाले असावे.

असो, पण वर आलेला व्यक्तीचित्रणाच्या पुस्तकाचा सल्ला सूचना विनंती सिरीअसली घेऊ शकता.

फारच सुरेख लिखाण.
रोज आपल्याला लोक भेटत असतात आणि निघून जातात. पण त्यांच्यात अशी एखादी व्यक्तिरेखा हुडकून ती शब्दात रंगवणं सोपं काम नव्हे.

साहेबराव आवडलाच एकदम.

>>ज्याच्या कपाळावर सर्वात अशक्त रेषा असतात त्याला सर्वात सशक्त जिगर देण्याचा विरोधाभास साले दैवच करू शकते.<<
जबरदस्त....!!!