इंटरनेट विश्वात होणार्या चर्चा असोत किंवा लोकलमधल्या लेडिज डब्यातल्या चर्चा, ऑफिसमध्ये लंच टाईमला घडणार्या चर्चा असोत किंवा किटी पार्टीमधल्या चर्चा. हल्लीच्या स्त्रिया स्त्रीवाद, मुलांचे संगोपन, गर्भारपणातला आहार विहार, नोकरी-व्यवसाय, मेकअप, कपडे, साड्या, शूज, दागिने या व्यतिरिक्त स्वतःचे वाढते घटते वजन , व्यायाम, पोषक आहार अशा आरोग्याशी निगडित चर्चा करताना दिसतात. ही आरोग्य सजगता उल्लेखनीय आहे. मात्र अजूनही कित्येक घरांतील स्त्रिया घरातील सदस्यांच्या आहाराबद्दल, शुश्रुषेबद्दल काळजी करताना स्वतःच्या तब्येतीकडे बरेचदा दुर्लक्ष करतात, दुखणी अंगावर काढतात. काही लक्षणं दिसू लागली तरी घरगुती उपचार करून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही. स्वतःचे आरोग्य उत्तम राखण्याला प्राधान्य द्यायलाच हवं. वार्षिक चाचण्यांबद्दल आपण तेव्हढेच आग्रही असायला हवे. " सर सलामत तो पगडी पचास". काही आजार आपण टाळू शकत नाही पण ते आजार जर वेळीच लक्षात आले तर त्यावर उपचार घेऊन आटोक्यात आणता येऊ शकतात. त्यासाठी नियमित वार्षिक चाचण्या खूप महत्वाच्या ठरतात. आरोग्य सजगता आपल्या आधीच्या पिढीत निर्माण करणे आणि पुढच्या पिढीला या सजगतेचा वारसा देणे आपल्याच हातात आहे. आपल्या कुटुंबातील स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत नाहीत ना? त्यांच्या खालील चाचण्या करून घेतल्या आहेत का?
१.रूटीन ब्लड टेस्ट्स - रक्तातील साखर (Blood sugar), कोलेस्टेरॉल( Lipid Profile), हिमोग्लोबिन (Haemoglobin) लाल, पांढर्या पेशी, प्लेटलेट्स ( Complete blood count (CBC)), यकृत ( Liver Function Tests) आणि मूत्रपिंड ( Kidney function tests) आरोग्य तपासणी.
२.ब्लड प्रेशर.
३.वजन.
४.डोळ्यांची वार्षिक तपासणी.
५.दातांची वार्षिक तपासणी.
६.पॅप स्मिअर ( pap smear) - डॉक्टर आणि देशाप्रमाणे याची फ्रिक्वेन्सी बदलू शकते.
७.मॅमोग्राफी - तुमचे वय, फॅमिली हिस्टरी , डॉक्टर आणि देशाप्रमाणे याची फ्रिक्वेन्सी, पहिल्यांदा करण्याचे वय इ. बदलू शकते.
स्त्रियांच्या वयानुसार चाचण्यांची गरज बदलत असते , ती कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरकडून जाणून घ्या. तसेच देशागणिक तिथे प्रामुख्याने आढळणारे रोग यांत फरक दिसून येतो. त्यामुळे आपल्या फॅमिली डॉक्टरकडून आवश्यक चाचण्यांची माहिती करून घ्या. कुठला त्रास असो अथवा नसो पण या प्राथमिक चाचण्या नियमितपणे (साधारण वर्षातून एकदा) करून घेणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात झालेले बदल आणि रोग होण्याची शक्यता पडताळण्यासाठी त्याची खूप मदत होते. जर कुटुंबामध्ये एखाद्या आजाराचा इतिहास असेल तर त्या आजारासंबंधित तपासणी कुटुंबातील इतर निरोगी सदस्यांमध्ये नियमितपणे करत राहाणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रत्येक सदस्याच्या रिपोर्ट्सची एक स्वतंत्र फाईल बनवा. ज्यायोगे भविष्यात एखादा रोग / लक्षण निर्माण झाल्यास त्याची कारणमीमांसा करणे सोपे होईल. संगणक युगाच्या जलद संवादाच्या काळात आपल्याकडील महत्त्वाच्या आरोग्य चाचण्यांचे अहवाल सॉफ्ट कॉपीच्या रूपातही जवळ बाळगा. इमर्जन्सीच्या क्षणी, प्रवास करताना अहवाल कागदपत्रांच्या रूपात जरी जवळ नसले तरी सॉफ्ट कॉपी उपयोगी पडू शकते.
नोकरदार स्त्रियांना अनेकदा नोकरीचे ठिकाणी ठराविक वार्षिक आरोग्य चाचण्या करून घेणे अनिवार्य असते व त्याबरहुकूम त्या अशा चाचण्या करून घेतात. परंतु त्यांच्याच वयाच्या नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या स्त्रिया आपल्या नियमित चाचण्यांविषयी म्हणाव्या तितक्या दक्ष नसतात हेही वास्तव आहे. घराच्या वार्षिक आर्थिक अंदाजपत्रकात या चाचण्यांसाठीची आर्थिक तरतूद जरूर असू द्यावी. वेगवेगळ्या इस्पितळांमधून या चाचण्यांची पॅकेजेस उपलब्ध असतात, त्यांची माहिती करून घ्यावी. कुटुंबातील इतर सदस्यांनीही आपल्या घरातील स्त्रिया या चाचण्या करून घेत आहेत ना, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
चला तर मग, आपण स्वतः आरोग्य सजग बनूया. तुम्ही कोणत्या चाचण्या करून घेता? किती नियमितपणे करून घेता? तुमच्या घरातील स्त्री सदस्यांना तुम्ही कसे जागरूक बनवता? कसे उद्युक्त करता?
तळटीप - धागा संयुक्तात असल्याने आपण स्त्रियांच्या आरोग्य विषयक चाचण्यांबद्दल चर्चा करणार आहोत.
संपदा, मस्त धागा! अनेक भारतीय
संपदा, मस्त धागा!
अनेक भारतीय महिला व्हेजीटेरियन अस्तात त्यांना बी जीवनसत्त्व तपासणी पण वार्षिक तपासणी म्हणून सुचवतात.
थायरॉईड चाचणी पण अत्यंत
थायरॉईड चाचणी पण अत्यंत महत्वाची.
भारतात अनेक स्त्रिया शाकाहारी
भारतात अनेक स्त्रिया शाकाहारी असतात आणि उपवास करण्याची सवय असते. शरीरात अशानी बी-१२ ह्या जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होतो. तसेच ड-जीवनसत्त्व हे देखील खूप कमी पाहिल्या जात.युरिक अॅसिडची चाचणी, कॅल्शियमची चाचणी आवश्यक आहे. मी माझ्या आईच्या आणि पुतणीच्या चाचण्या दर ६ महिन्यांनी करतो आणि शक्यतोवर कमतरता आढळली तर ती बाह्य गोळ्या न घेता जेवनातून ही कमतरता कशी भरुन निघेल असे बघतो.
हल्ली बर्याच पॅथॉलॉजीतून पीडीएफ फाईलसुद्धा मिळते. मी तीही मागवतो.
संपदा विषय फार छान आहे.
चांगला व उपयुक्त धागा, संपदा!
चांगला व उपयुक्त धागा, संपदा! धन्यवाद माहितीबद्दल.
छान ! lung test ही महत्वाची !
छान ! lung test ही महत्वाची !
उपयुक्त धागा संपदा!
उपयुक्त धागा संपदा!
खूप चांगली आणि उपयोगी माहिती!
खूप चांगली आणि उपयोगी माहिती! ह्या साऱ्या शारीरिक आजारांच्या चाचण्यांबरोबर मानसिक आजारांकडे (विशेषतः डिप्रेशन) देखील लक्ष ठेवले पाहीजे. माझ्या ओळखीतली एक जवळची व्यक्ती ह्यातून गेली आहे. लोकसत्तेत गेल्या चतुरंग पुरवणी मध्ये आलेल्या लेखानुसार डिप्रेशन हा ह्या शतकातला स्त्रियांमधला प्रथम क्रमांकाचा आजार आहे.
http://www.loksatta.com/chaturang-news/depression-and-anxiety-1069175/