मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास .......
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥९८१||
सर्वसाधारणपणे संत म्हटले की अगदी गायीपेक्षा गरीब, समाजाकडून होणारा कुठलाही त्रास सहन करणारा असा एक समज असतो. पण बुवा मात्र वेगळेच रसायन. प्रत्यक्ष विठ्ठलालाही सुनवायला जे बुवा अजिबात कचरत नाहीत ते एखाद्या तिरकस व्यक्तिचे वागणे कसे बरे सहन करतील !!
अशा जबरदस्त बुवांचे वेगळेपण दर्शवणारा हा अगदी गाजलेला अभंग. मराठी जनतेला सगळ्यात जास्त माहित असलेला - सर्वांमुखी कायम येणारा, पण जणू अतिपरीचय झालेला अभंग. त्यामुळेच कोणाला वाटेल की काय आहे यात बुवांचे वेगळेपण - ते तर जशास तसे उत्तर देणारे होतेच की ...
तर या अभंगातून दिसणारे बुवा जरासे नाहीत तर पूर्णपणे वेगळेच आहेत हे आपल्याला नीट समजावून घ्यावे लागेल.
बुवा सांगताहेत आपणहून आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही पण जर का विनाकारण कोणी आमची खोडी काढू पहाल तर मग तुमची काही धडगत नाही हे नीट ध्यानात ठेवा.
पहा, बुवा कसे जोरकस बोलताहेत, आव्हान देताहेत - वेळ पडली तर आम्ही स्वतःची लंगोटीही देऊ (इतके आम्ही उदार आहोत) पण कोणी एखादा आम्हाला फारच नेभळट समजून आमच्या लंगोटीलाच हात घालू पाहेल तर खबरदार - आम्ही अशा नाठाळाचे टाळके सडकायलाही कमी करणार नाही.
आम्ही खरे तर मायबापाहून कृपाळु, दयाळु आहोत - पण या गोष्टीचा कोणी गैरफायदा घेऊ लागलात तर आम्ही शत्रूहूनही जास्त घातपात करु शकतो. आम्ही खरे तर अमृतापेक्षा गोड आहोत - पण वेळ पडली तर विषापेक्षाही कडू आहोत..
थोडक्यात आम्ही जरी मवाळ-मृदु (अंतर्बाह्य) असलो तरी वेळ पडलीच तर मात्र समोरच्याला त्याच्या भाषेत उत्तर देणे हे काही आम्हाला अवघड नाहीये.
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥
तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्त्रवतसे ॥४॥१५०५||
"भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं" - असे लिहिणारे बुवा असे का बरे बोलले असतील. या शरीर, मन -बुद्धीपासून स्वतःला वेगळे काढणारे (आत्मसिद्ध) बुवा असे काय बोलताहेत ? पण बुवांचा खाक्या या अभंगापुरता काही वेगळाच दिसतोय. ते म्हणतात आम्ही जितके मेणाहून मऊ आहोत तितकेच वज्रालाही भेदू शकणारे कठिण होऊ शकतो हां (बी अवेर ऑफ अवरसेल्फ)
असे म्हणतात की काही बुवा-विरोधकांनी बुवांच्या अंगावर अतिशय गरम पाणी ओतले होते, बुवांची गाढवावरुन धिंड काढली होती - पण त्यावेळेस बुवांनी ते सारे वैयक्तिक आघात सहनच केले - त्याचा प्रतिकार केला नाही. इतकेच काय पण त्यांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवाव्यात असे जेव्हा उच्चवर्णीयांकडून सुनावण्यात आले तेव्हाही त्यांना प्रतिकार न करता बुवांनी अन्नपाणी वर्ज्य करुन विठ्ठलचरणी धरणे धरले होते.
मात्र हेही लक्षात घ्यायला पाहिजे की बुवा स्वतः कीर्तनाचे व्रत सांभाळणारे एक महाभागवत. त्यामुळे त्यांचे अनेक शिष्यही (टाळकरी) होते. बुवांचे सारेच शिष्य काही बुवांसारखे तयार (खमके) नसणार. त्यांना समाजातील नाठाळ मंडळींनी त्रास द्यायला सुरुवात केल्यावर बुवांनी कीर्तनातून या अभंगाद्वारे या (नाठाळ) लोकांना चांगलाच दम दिला आहे.
ज्या मंडळींना एकदा आपले म्हटले त्यांच्यासाठी नाठाळांना जश्यास तसे उत्तर देण्याची बुवांची तयारी होती. तिथे मग तो मृदुपणा, अहिंसा वगैरे बाजूला सारून एखाद्या कसलेल्या योद्ध्यासारखे दिसणारे बुवांचे हे दर्शनही अतिशय विलोभनीयच ...
साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें॥१॥
तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥
बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥
तुका ह्मणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥ २०२८||
स्वतःबाबत असे घट्ट आणि कठोर होणारे बुवा आपल्या शिष्यांविरुद्ध कोणी ब्र काढल्यास मात्र इतकी टोकाची भाषा करु शकतात हे पाहून बुवांबद्दल असलेला आदर दुणावतच जातो.
हे झाले नाठाळांना बजावणे. पण असे बुवा त्यांच्या शिष्यांना काय उपदेश करीत असतील असे जेव्हा मनात आले तेव्हा कधीतरी ऐकलेली एक अतिशय गमतीशीर पण मार्मिक गोष्ट आठवते.
- एका गावाबाहेर असलेला एक अतिशय विषारी सर्प - त्याच्या विषबाधेने अनेकांना मरण आलेले त्यामुळे सर्व गावकरी त्याला घाबरून असतात, त्याबाजूला जातही नसत - एक साधु जेव्हा तिथून चाललेला असतो तेव्हा तो सर्प त्याच्यावर चालून जातो - साधु त्या सर्पाला समजावतो - हे बरे नाही, का लोकांचे प्राण घेतोस तू ? तो साधु आत्मज्ञानी असल्याने तो साप पूर्ण बदलतो आणि त्या साधुचा अनुग्रह घेतो आणि त्याने दिलेला गुरुमंत्र घेऊन अगदी शांत होऊन जातो. हळुहळु तिथे वावरणार्या गुराखी पोरांना ते लक्षात येते - की हा महाभयंकर साप अगदी गांडुळासारखा वावरतोय - तेव्हा ते गुराखी त्या सापाला चांगलेच बडवतात -साप बिचारा अर्धमेला, जखमी होऊन बिळात परततो. काही दिवसातच तो साधु त्या सापाची चौकशी करण्यासाठी त्या गावात परत येतो - गुराखी पोरे सांगतात - इतके दिवस आम्हाला सतावत होता म्हणून आम्ही त्याला चांगलाच धडा शिकवलाय, आतापर्यंत तो मेलाही असेल - साधु म्हणतो हे कदापीही शक्य नाही आणि म्हणून तो एकटाच त्या परिसरात त्या सापाचा शोध घेऊ लागतो तेव्हा त्या आसन्नमरण सापाला पहातो - साधु विचारतो - असे कसे झाले - साप म्हणतो - तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अगदी अहिंसक झालो - कोणालाही इजा न करता वावरु लागलो - पण त्या बिचार्या गुराखी पोरांना काय कळणार हे - त्यांनी माझी ही अवस्था केली आहे - साधु हसायला लागतो - म्हणतो - हात् लेका, इतका कसा रे तू मूर्ख आणि नेभळट - तुझे स्वतःचे रक्षणही तुला करता येत नाही - मी तुला कोणालाही चावू नको म्हणून सांगितलेले पण तुला कोणी मारायला आले तर तुला साधे फुस्स करुन त्याला घाबरवण्याचेही शिकवावे लागते काय ?
अतिशय मृदू स्वभावाच्या बुवांचा हा अभंग म्हणजे समाजात जे कोणी नाठाळ असतात त्यांना केवळ जाणीव देण्यापुरता असावा असे माझे एक बालमत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
वाह, शशांकजी सुंदर निरूपण !
वाह, शशांकजी सुंदर निरूपण !
नेहमी आंधळेपणाने उदाहरण देत
नेहमी आंधळेपणाने उदाहरण देत असे मी... आज सुंदर अर्थ कळला !
छान लिहीत आहात, व्यवस्थित
छान लिहीत आहात, व्यवस्थित लेखमालिका करा पाहू
अहिंसेचा खरा अर्थ कळला
अहिंसेचा खरा अर्थ कळला त्यांना. स्वतःचे, देशाचे, समाजाचे रक्षण करायला समर्थ होऊन तसे रक्षण करणे हे प्रथम कर्तव्य मानून मग अहिंसेच्या नादी लागावे.
निरुपण आवडले!
निरुपण आवडले!
लेखन आवडले हे वेगळे सांगायला
लेखन आवडले हे वेगळे सांगायला नकोच.
व्वा ! दिवसाची सुरेख सुरुवात झाली !!
किती सोप्या भाषेत निरुपण
किती सोप्या भाषेत निरुपण केलंत शशांकजी. या जमान्यातही बुवान्चे विचार पुन्हा सारासार बुद्धीने विचार करायला मदत करतात. तसेच अहिंसावाद म्हणजे नेभळटपणॅ वागणॅ नव्हे हेही खरच .
खूप सुंदर. शशांक तुमचे लेखन
खूप सुंदर. शशांक तुमचे लेखन झोपण्यापूर्वी वाचलं की मन शांत होऊन खूप छान झोप लागते.
छान वाटले निरुपण.
छान वाटले निरुपण.
बुवांची मला खूपच आवडणारी रचना
बुवांची मला खूपच आवडणारी रचना आणि त्यावरचे हे अतिशय सुंदर निरूपण... माझ्या निवडक १०त नेहमी राहिल..
फक्त एक विचारावसं वाटलं.. (लहानतोंडी मोठा घास... क्षमस्व..)
>>अतिशय मृदू स्वभावाच्या बुवांचा हा अभंग म्हणजे समाजात जे कोणी नाठाळ असतात त्यांना केवळ जाणीव देण्यापुरता असावा असे माझे एक बालमत.>>> यातील 'जाणीव' म्हणजे हुल म्हणायची का?
की इशारा (warning)?