झमाना बदल गया है

Submitted by बेफ़िकीर on 2 February, 2015 - 11:09

वृद्धापकाळ हे जणू दुसरे बालपण आहे, असे म्हणणार्‍या व्यक्तीच्या त्या मताला माझा तरी आक्षेप आहे.

बालपणी बालकाला काहीच समजत नसते. भले किंवा बुरे! त्याच्या शरीरात फक्त वाढत जाणारी उर्जा असते आणि त्याला त्याच्या पालकांकडून आपापल्या विचारांप्रमाणे घडवले जाते.

वृद्ध व्यक्ती मात्र अवघे आयुष्य कोळून प्यायलेली असते. तिच्यावर नवीन विचारांची पुटे म्हणा किंवा थर म्हणा, चढवता येत नाहीत. तिचे फक्त शरीर विकलांग असते, तेही असते/नसते, थोडे असते/थोडे नसते स्वरूपात! किंबहुना, त्या व्यक्तीचे विचार आमुलाग्र बदलवावे लागणार असतात आणि ते जवळपास अशक्य असते.

वृद्ध व्यक्ती वृद्ध केव्हापासून गणली जाते ह्याच्या व्याख्याही कुटुंबाकुटुंबाप्रमाणे बदलू शकतात. पण ज्येष्ठ नागरीक ह्या संज्ञेसाठी एक वयोमर्यादा सर्वमान्य झालेली आहे, जी काही शासकीय योजना विचारांत घेता योग्यच आहे.

पण वैयक्तीक अनुभवांनुसार ती वयोमर्यादा योग्य की अयोग्य असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असू शकते.

हे लिहिताना विचारांत घेतलेल्या बाबी:

१. आई वडील
२. सासू सासरे
३. दोन्हीकडील नात्यातील सर्व आधीच्या पिढीतील मंडळी
४. मित्रवर्तुळातील लोकांच्या घरचे 'ज्येष्ठ नागरीक'
५. तीन वृद्धाश्रम (तीनही पुण्यातील)
६. पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर ह्या जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन

मी तरी अश्या निष्कर्षाप्रत पोचलो आहे की 'मनावर दगड ठेवून ज्येष्ठांना काही बदल स्वीकारायला लावणे' ही फक्त काळाची गरज नसून एक माणूस म्हणून सर्वमान्य चौकटीत व्यवस्थित जगण्याच्या इच्छेचा एक छोटासा घटक आहे. हे विधान लिहिताना हे मी अजूनही स्वतः करू शकलेलो नाही हे मान्य करतो.

हेही मान्य करतो की समाजात कित्येक ज्येष्ठांची अवस्था वाईट असते. ह्याचे वाईट वाटते की त्यांच्यासाठी आपण नेमके काही करू शकत नाही किंवा केलेतरी ते फारच पुस्तकी स्वरुपाचे असते. म्हणजे वृद्धाश्रमाला जेवण दिले वगैरे, जिथे खरे तर आठवड्यातील चौदापैकी अनेकदा दहा जेवणे स्पॉन्सर्ड असतात. अश्यांचेही वाईट वाटते ज्यांचे पाल्य त्यांना सोडून दूर निघून गेलेले आहेत व एक कर्तव्य म्हणून वर्षाकाठी कधीतरी भेटतात किंवा बाळंतपणाला ज्येष्ठांना घेऊन जातात.

आपल्याला विचार 'शेअर' करायला मायबोली आहे, त्यांना कदाचित शेजारी-पाजारी, नातेवाईक किंवा 'कोणीच त्यांचे नसणे' असेल. पण आपले काय वेगळे होणार आहे? कोणाचे काही वेगळे झाले होते? फक्त 'आता ह्यांच्या विचारानुसार चालण्याची गरज नाही' हे विधान घरातील ज्येष्ठाच्या ज्या वयाला पुढची पिढी बोलत असेल ते वय बदललेले असेल.

'माझे झाले, आता तुमची इनिंग सुरू, आम्ही फक्त बघणार' ही अत्यंत अवघड भूमिका आपल्यालाही घेता येणार नाही. मान्य आहे. पण त्यांच्यावेळी शेजार होता, नाती होती, एकत्र कुटुंब होते, ते कुठे आपल्याला असणार आहे?

इसवीसन २०१५ रोजी भारतात असलेली ज्येष्ठ नागरिकांची पिढी ही खरे तर श्रेष्ठ नागरिकांची पिढी आहे असे म्हणायला वाव आहे. त्यांनी मुलांचे कंडिशनिंग केलेले आहे, स्वतः पैसे जमवून ठेवलेले आहेत, हक्कांची जाण आहे आणि चक्क चक्क पुढच्या पिढीपेक्षा 'हेल्थ स्टेटस' (टच वूड) चांगले आहे.

इतकेच नाही तर अनेक प्रगत शहरातील ज्येष्ठ नागरीक भरपूर ढवळाढवळ करत आहेत. त्यांची पुढच्या पिढीला असलेली गरज लक्षात घेता त्यांना ती ढवळाढवळ करायचा हक्कच आहे हे मर्यादीत स्वरुपात'च' मान्य आहे. त्यांच्या पाल्यांची काळजी घ्यायला त्यांचे पालक असायचे, आज तसे नसते किंवा असतेच असे नसते.

नेमके सांगता येणार नाही, पण मनाचा एक बर्‍यापैकी मोठा कोपरा 'आई किंवा बाबा' काय म्हणतील ह्या विचाराने व्यापलेला असतो आणि जे करताना तो व्यापलेला असतो ते कृत्य अजिबात वाईट नसते.

दाराला लॅच लावू नका, आम्हाला समजले पाहिजे तुम्ही किती वाजता परत आलात!

गॅस खालून बंद केला नाहीत रात्रीचा!

आज बाहेर जाऊ नका

वगैरे वगैरे!

उत्तररंगमध्ये हा धागा मुद्दाम काढला आहे. तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कोणाला असे वाटते का की वृद्धांची अगदी पुरेपूर काळजी, तीही स्वेच्छेने आणि प्रेमाने, घेतल्यानंतरही त्यांचा हस्तक्षेप असह्यतेच्या मर्यादा ओलांडतो?

मला असे वाटते की अतिशय नम्रपणे, आपुलकीने पण स्पष्टपणे हे सांगायची वेळ आली आहे की आम्हाला तुमच्याबद्दल खराखुरा आदर आहे, प्रेम आहे आणि त्यानंतर आमच्यासमोर एक बदललेला काळ आहे. हा बदललेला काळ आम्हाला 'तुम्हाला अपेक्षित असलेल्या शैलीपेक्षा खूप वेगळ्या शैलीने' वागण्यास प्रवृत्त करतो. इतका मोठा बदल तुम्ही आणि तुमच्या आधीची पिढी किंवा तसेच तुमच्या आधीची पिढी आणि त्याही आधीची पिढी ह्यांच्यात झालेला नव्हता.

कोणाचे काय म्हणणे?

=======================

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की अजूनही समजले नाही इथे नेमके काय लिहिणे अपेक्षित आहे.. हा माझ्या अल्पबुद्धीचा दोष असेल.. पण जे लिहावेसे वाटते ते लिहितो..

मी माझ्या ऑफिसमध्ये असे कित्येक विवाहीत पाहिलेत ज्यांना लहान मुले बाळे आहेत, पण त्या जोडप्यापैकी दोघांचेही आईवडील त्यांच्याबरोबर काही कारणाने राहत नसल्याने त्यांनी घरी मावशी ठेवलीय किंवा पाळणाघर बेबीसिटींग वगैरेचा पर्याय निवडलाय.. अन खरे सांगायचे तर या ओढाताणीत ते खूश नाहीयेत.. आय नो, हा विषय बालसंगोपनाचा नाही, पण आजच्या पिढीला मागची पिढी आपल्या सोबत ढवळाढवळ करायला नकोय आणि त्यासाठी ते अशी एखादी किंमत मोजायला तयार आहेत..

मला स्वताला लग्नानंतर आमच्या दोघांपैकी एकाचे तरी आईवडील सोबत असलेले हवेच आहेत, जेणेकरून घराबाहेर पडताना घराची काळजी नाही राहणार.. आणि घरी आल्यावर त्यांना घराचा पर्यायाने आयुष्याचा भाग समजूनच वेळ देता येईल..

जेव्हा मी स्वता वृद्ध होईल तेव्हा सारेच काही चॉईस माझ्या हातात नसतील.. पण एक मात्र असेल, त्या काळात मायबोली असेल तर उत्तमच (बोलो आमीन) अन्यथा अश्याच एखाद्या संकेतस्थळावर मोकळा होत असेन.. सो, मला माझ्या म्हातारपणाची जराही काळजी नाही ..

सोबती / सोबतीण (कंपॅनिअन) ठेवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. परदेशात तर अनेक वर्षांपासून प्रचलित आहे (आठवा रिबेका कादंबरीतली निनावी नायिका). आता भारतात देखील हा पर्याय मूळ धरु पाहतोय.

आजच्या सकाळ मधली ही जाहिरात पाहा.

companion.jpg

वृद्धांची अगदी पुरेपूर काळजी, तीही स्वेच्छेने आणि प्रेमाने, घेतल्यानंतरही त्यांचा हस्तक्षेप असह्यतेच्या मर्यादा ओलांडतो? >>>>>>>> हो. कधी कधी.

ऋ, तुम्ही बाहेर पडल्यावर तुमच्या मुलांची आणि तुमच्या घराची काळजी घेण्यासाठी आई- वडीलांची गरज आहे हे वाचुन खुप्पच्च आनंद झाला.

सस्मित, ते शब्दखेळ करत उपरोधाने लिहिलेय का, म्हणजे याला आईवडील फकस्त मुलांची अन घरदाराची काळजी घेण्यासाठीच हवेयत वगैरे टाईप .. अर्थात तसे लिहिले असल्यासही काही हरकत नाही, फक्त त्या अनुषंगाने चर्चा पुढे नेता येईल. Happy

मला स्वताला लग्नानंतर आमच्या दोघांपैकी एकाचे तरी आईवडील सोबत असलेले हवेच आहेत, जेणेकरून घराबाहेर पडताना घराची काळजी नाही राहणार.. >>>>>

ॠंमेशभाऊ - जे काही आठवते आहे त्या प्रमाणे तुम्हीच अजुन कुकुल बाळ आहात ज्याचे सर्व त्याच्या आई ला बघावे लागते. तुमच्या आई वर तुमच्या बरोबर तुमच्या मुलांना सांभाळायची जबाबदारी नका टाकू.