...
भाग १ - http://www.maayboli.com/node/52461
...
पण हे सारे करताना मी एक गोष्ट विसरलो होतो...
जन्मपत्रिकेनुसार माझ्या नावाचे आद्याक्षर ‘ड’ आले होते. पण त्यावरून चांगले नाव न सुचल्याने ‘ऋन्मेष’ हे पर्यायी नाव ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी छापलेल्या "आर-के" या स्टॅंपला देवाने तथास्तु म्हटले असते तरी त्या ‘के’ चा ‘आर’ म्हणजे ‘राजकुमार’ कोणी दुसराच असणार होता...
...
पण नियती काही विसरत नाही. ना आपल्याला विसरू देते. वेळ आली की तेच घडते जे तिच्या मनात असते. खूप सेंटीमेंटल झाले ना. शक्यय. मी सुद्धा तेव्हा प्रेमात असाच सेंटी आणि मेंण्टल झालो होतो. चक्क कविता वगैरे सुचत होत्या. पण आयुष्यातील पहिली अन शेवटची कविता शेवटी कागदावरच राहिली. कोणाला वाचायला द्यायच्या आधीच एक खबर उडत उडत कानावर आली. "ती" कोणाची तरी वाट बघत कॉलेजच्या मागच्या गेटवर उभी आहे... पण कोणाची ??
तसे माझे कबूतर चारही दिशांनी पसरलेले होते. पण त्यांची गरज कधी भासायची नाही. तिचे सारे ठावठिकाणे आणि दिनक्रम मला पाठ झाले होते. पण संध्याकाळी पाच वाजता मागच्या गेटवर..?? हि तीच वेळ आणि तीच जागा होती जिथून आम्ही माझ्या पहिल्यावहिल्या कॉफी डेटला गेलो होतो. हो माझ्याच. कारण तिची ती कितवी खेप असावी तिलाच ठाऊक. पण पहिलीच नसावी हे त्या दिवशी मला समजले.
मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा ती एकटीच तिथे उभी होती. मी तिला दिसणार नाही अश्या बेताने एका आडोश्याला उभा राहिलो. माझ्यासोबत माझा एक सच्चा मित्र देखील होता. (पोरीच्या मागे आपल्यासोबत येणारे मित्र नेहमी सच्चेच वाटतात.) ईतक्यात अचानक ढग भरून यावेत तसे एक हट्टाकट्टा काळासावळा बलदंड ईसम तिथे आला. कोणाच्या रंगरुपावरून त्याला जोखू नये, बॅड मॅनर्स!, पण त्यावेळी तो मला कोणत्या साईड व्हिलनपेक्षा कमी नाही वाटला. गॉगलचष्मा, हातात कडे, अन गळ्यात चैना यामुळे थोडाफार आकर्षक दिसत असला तरी दिसायला त्याच्यापेक्षा मीच सरस होतो असे माझ्या मित्राचेही मत होते. पण कदाचित दिसणे हा एकच निकष नसावा!..
ते दोघे जेव्हा तिथून जोडीने जाऊ लागले, तेव्हा मला त्यांचा पाठलाग करायचा मोह झाला. पण माझ्या सच्च्या मित्राने मात्र इथे माझी साथ सोडली. त्याच्या मते हा शुद्ध हलकटपणा होता. पण एकतर्फी प्रेमात हलकटपणा माफ असतो, म्हणून मी एकटाच त्यांच्या पाठी निघालो. ते रमतगमत जात होते आणि मी भरभर पावले टाकून त्यांच्या पुढे निघून आलो. त्यांना पार होताना त्यांचे संभाषण ऐकायचा प्रयत्न केला. त्यात ‘दुबईचा जॉब’ एवढेच काय ते निसटते माझ्या कानावर पडले. दुबईचा जॉब?? सेटल व्हायच्या वार्ता?? लग्नाची मागणी तर घालत नव्हता ना पठ्ठ्या.. पहिल्यांदा मला ज्युनिअर असल्याची लाज वाटू लागली.. सोबत खंत देखील.. माझा जन्म जर ४-५ वर्षे आधी झाला असता तर कदाचित परीस्थिती वेगळी असती...
पुढे काही पावलांवरच त्या एका रस्त्याचे दोन रस्ते झाले. आता इथून पुढे ते कुठे जाणार याची कल्पना नसल्याने मी तिथेच थांबलो. संशय येऊ नये म्हणून त्यांना पाठमोरा राहतच, खाली वाकून बुटाची लेस सोडून, ती पुन्हा लावायचा चाळा करू लागलो. ते माझ्या पुढे निघून गेले. हळूच मान वर करत तिरप्या नजरेने तिला बघू लागलो. पटकन ती वळली तर ओशाळल्यासारखे होऊ नये म्हणून हि खबरदारी.. पण ती मात्र,.. अखेरपर्यंतच वळलीच नाही. पुढे पुढे जातच राहिली. आणि मी हरलेल्या योद्ध्यासारखा तिने निवडलेल्या रस्त्याकडे बघत राहिलो.. तो रस्ता सीसीडीच्या दिशेने जात होता!..
माझे मित्र मला रिशी कपूर म्हणायचे. म्हणून आम्ही तिलाही नीतू सिंग नाव ठेवले होते. दिसायची मात्र ती परवीन बाबी सारखी.. पण रणजीतबरोबर कशी निघून गेली हे मात्र समजले नाही..
मित्र म्हणाले, रडतोयस काय येड्या.. ते तुझे प्रेम नव्हते.. ती तुझे क्रश होती..
बरोबरच बोलत असावेत,.. हार्ट’ डिस्क क्रॅश झाल्यासारखी वाटत तर होते!..
पण दुसर्याच दिवशी... कॅंटीनमध्ये येताजाता ती सहज सामोरी आली आणि अशी काही हसून गेली की सारे वायरस साफ झाले. पुढचे चार-आठ दिवस पुन्हा सुखात गेले. हो, चाराठ दिवसच!.. कारण मेन व्हिलनची एंट्री अजून बाकी होती.
सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध, एका वेड्या आशेवर अजूनही तिच्या प्रेमात होतो. जोपर्यंत ती अधिकृतरीत्या इतर कोणाची होत नाही तोपर्यंत माझा क्लेम तिच्यावर बाकी होता. पण हा दिलासाही फार काळ टिकला नाही.
पाऊस !.. येताना जो मनात प्रेमाचे अंकुर रुजवत आला होता, तो जाताना चेहरा अश्रूंनी सजवत जाणार होता..
त्या पावसाळी संध्याकाळी पुन्हा एक खबर उडत उडत कानावर आली. ती पुन्हा कोणाची तरी वाट बघतेय!.. यावेळी जरा जास्तच आतुरतेने.
या खबरी माझ्या मित्रांना लागतात तरी कश्या, हा विचार करायला वेळ नव्हता. तडक मी त्यांनी सांगितलेल्या जागी भिजत भिजत पोहोचलो. छत्री बॅगेत असूनही भिजलो, कारण ती काढावी, उघडावी इतपत शुद्ध नव्हती. पाहिले तर ती आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर एकटीच आडोश्याला उभी होती. छपरांवरून निथळणार्या पाण्यापासून स्वत:ला सावरत, ती नक्कीच तिथे कोणा खास माणसाचीच वाट बघत होती. तिथेच जवळपास थांबायचा बहाणा म्हणून मी एक कटींग चहा मागवला आणि न पिताच शांतपणे तिला न्याहाळत उभा राहिलो.
ईतक्यात समोरच्या रस्त्याकडेला एक बाईक येऊन थांबली. माझ्या हे तेव्हा लक्षात आले जेव्हा मी तिची नजर त्या दिशेने खिळलेली पाहिली. पुन्हा एकदा काळा चष्मा धारी, पण यावेळचा मुलगा देखणा होता. त्याची नजरही तिच्यावरच लागलेली. हे काळ्या चष्म्याआड लपलेले त्याचे डोळे दिसत नसूनही मला समजले. याचबरोबर आणखी एक गोष्ट समजली.... ती म्हणजे, मी यात कुठेच नव्हतो.
मला वाटले आता तो तिला न्यायला पुढे येईल. आपल्या अंगातले जॅकेट तिच्याभोवती लपेटून तिला घेऊन जाईल. मी असतो तर नक्कीच असा वागलो असतो. पण तो मात्र धूर उडवत तिथेच थांबला होता. मग तीच पळत जाऊन बाईकवर त्याच्या मागे बसली. ओढणी डोक्यावर घेत, अर्धे भिजलेल्या अवस्थेत, फारच मोहक दिसत होती. पण माझ्यापासून मात्र दूर निघून जात होती. बघता बघता बाईकही भुर्र निघून गेली.. नजरेच्या पार पलीकडे,. अन मध्ये पावसाचा पडदा!..
हृदय मन म्हणतात ते नक्कीच छातीच्या बरगड्यांमध्ये कुठेतरी वसत असावे. तिथूनच काहीतरी तुटत खालच्या बाजूने जात होते.
वर आकाशाकडे पाहिले,.. तो अजूनही कोसळत होता.. अन् त्याच्यासोबत मी !..
सावरत होतो..,
सावरत होतो..
...
..
अगदी कालपर्यंत ते आठवायचो, तेव्हा आजही त्यातून सावरतच आहे, असेच वाटायचे..
पण आज हक्काची कायमस्वरूपी ग’फ्रेंड आहे, त्यामुळे त्या सावरण्याच्या प्रक्रियेतून मी सावरलो आहे. बस्स मग एके दिवशी असेच तिला फेसबूकवर शोधायला घेतले. हल्ली मुली लग्नानंतरही फेसबूकावर आधीचे आडनाव लावतात त्यामुळे हा शोध फार कठीण जाऊ नये अशी अपेक्षा होती, पण कॉलेजच्या नावाने बनलेल्या ग्रूपमध्येच ती सापडल्याने काम आणखी सोपे झाले. पण तिचे नाव बघून हलकासा धक्का बसला. ते आजही तेच होते. त्यापुढे कुठलेही नवीन आडनाव जोडले गेले नव्हते. जेवढे मी तिला ओळखत होतो, ती एवढी काही करीअर अॅम्बिशिअस नव्हती की त्यासाठी ३० वर्षे होईस्तोवर लग्नाची थांबावी. तसेच तिच्यासारख्या मुलीला आंधळ्यानेही होकार द्यावा इतपत सुंदर होती. पण मग तरीही तिचे लग्न अजून कसे राहिले होते...??
कसे? कसे?? कसे???
एनी गेसेस .. !!
...
...
येस्स, यू आर्र राईट ...
तोच तो!, वरचा शिर्षकातला मंगळ, तिच्या पत्रिकेत ठाण मांडून बसला होता !
ऋन्मेष:
पुढचा भाग अंतिम राहील, ज्यात
पुढचा भाग अंतिम राहील, ज्यात दोन ट्विस्ट आणि एक सामाजिक संदेश असेल.
रुणमेश, तुमची समाजशेवा लय
रुणमेश, तुमची समाजशेवा लय आवडली बगा. आमास्नी बी कराया आवडंल.
आ.न.,
-गा.पै.
गापै समाजसेवा आणि सामाजिक
गापै
समाजसेवा आणि सामाजिक संदेश पुढच्या भागात..
आवो रुणमेश,त्ये म्होरल्या
आवो रुणमेश,त्ये म्होरल्या भागाचं जावद्यात. आपुन ह्याच भागातली समाजशेवा करूयात.
आ.न.,
-गा.पै.
मागचा भाग वाचला हा पण वाचला
मागचा भाग वाचला हा पण वाचला आता पुढच्याची प्रतिक्षा.
गापै, या भागात नेमके कश्याला
गापै,
या भागात नेमके कश्याला तुम्ही समाजसेवा म्हणत आहात ते नाही समजले.. पण असो, जे झाले ते माझा भूतकाळ होता
अरे देवा! समाजसेवा म्हणजे काय
अरे देवा! समाजसेवा म्हणजे काय तेही मीच सांगायचं!
-गा.पै.
खरेच नाही समजले तुम्ही हवे
खरेच नाही समजले
तुम्ही हवे तर सांगा, इथे किंवा विपुमध्ये, किंवा कुठेच नको, पण माझा हा इथला या विषयावरचा शेवटचा पोस्ट. उगाच एकच मुद्दा पकडत प्रतिसाद देत धागा वर आणत असल्याचा घिनौना आरोप मला नकोय
पूर्ण कधी करणार?
पूर्ण कधी करणार?
अईई ग्ग, हे मी विसरूनच गेलेलो
अईई ग्ग, हे मी विसरूनच गेलेलो ..
आता माझा विकेंड सुरू होतोय जो बरेपैकी हॅपनिंग आहे, लॅपटॉप मांडीवर घ्यायला वेळ मिळाला तर ठिक अन्यथा सोमवारी रात्री नक्की . संपेल पण याच आकाराच्या एका भागात ....
कोणत्या सोमवारी संपवणार? <<
कोणत्या सोमवारी संपवणार?
<< प्रेम, बीअर आणि मंगळ ! >>
प्रेम चायनीज वस्तुंप्रमाणे असतं - टिकलं तर अनंत काळ नाहीतर क्षणभंगूर.
बीअर चा हँगओव्हर काही तास राहू शकतो.
मंगळावर पोचायला किमान सात वर्षे लागतात.
तुमची कथा पूर्ण व्हायला किती काळ लागणार?
ज्याची भिती होती तेच झाले,
ज्याची भिती होती तेच झाले, आपण आठवणीने हा धागा वर काढलात..
प्रामाणिकपणे सांगायचे तर एका कोंडीत सापडलो आहे, तिसर्या भागात जे येणार आहे ते वर्तमान आहे आणि शेवट कदाचित भविष्य.. माझे नसून तिचे.. कदाचित ते येत्या काही महिन्यात उज्ज्वल होऊ शकते, कदाचित मीच त्याला कारणीभूत होऊ शकतो.. मग त्या शेवटाला एक अर्थ असेल, आणि म्हणून थांबायचे ठरवलेय.. पण शब्द देतो, लिहिणार नक्की.. कदाचित ३-४ महिने थांबावे लागेल वा कोण जाणे वर्षही जाईल पण प्रत्यक्ष आयुष्यात घडणार्या या नाट्यातील शेवटचा अंक संपल्यावर लिहिणार नक्की.. आणि जेव्हा ते लिहेन तुम्हाला लिंक विपु नक्की करेन.. तोपर्यंत खरेच अंतःकरणापासून क्षमस्व !