एका गज़लेची गोष्ट!

Submitted by जिज्ञासा on 29 January, 2015 - 15:13

स्थळ: मुलुंड वेळ: रात्रीची काळ: पावसाळा T.Y.B.Sc.
नुकतीच सुरु झालेली मुंबईतली एफएम रेडीओ स्टेशन्स आणि त्यांनी लावलेली जुन्या हिंदी गाण्यांची अवीट गोडी. माझा मेड इन चायना एफएम रेडीओ आणि स्वरांच्या राज्यातून स्वप्नांच्या राज्यात प्रवेश करणारी मी. कानात जगजितसिंग यांचा तलम मुलायम आवाज ऐकू येतो आणि निद्रेच्या दिशेला निघालेली माझी पावलं थबकतात.
मैं कैसे कहूँ जानेमन
तेरा दिल सुने मेरी बात|
ये आँखोकी सियाही ये होठों का उजाला
यहीं है मेरे दिनरात|
“ह्या ओळी लक्षात ठेवायच्या बरं का!” मी मनाला बजावते आणि सुरांच्या साथीने झोपी जाते! आधीच माझी स्मरणशक्ती दिव्य! त्यात अर्धवट झोपेत ऐकलेल्या गज़लेच्या ओळी कुठून लक्षात रहायला! दिवस गेले महिने गेले आणि ती गज़ल हळूहळू मनाच्या नजरेआड गेली.
पुन्हा अशीच एक रात्र
स्थळ: खोपोली (घर) काळ: T.Y.B.Sc. बहुतेक जानेवारी महिना.
त्यावेळी मी दर शनिवार रविवार खोपोलीला जायचे. ही आठवण मात्र माझ्या मनात काल घडल्याइतकी ताजी आहे. का, कसे माहिती नाही पण कधीकधी आपल्या मनात दोन अगदी भिन्न गोष्टींचे धागे एकाच आठवणीभोवती गुंफलेले असतात. एखादा वास आपल्याला स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून पार तिसरीकडे घेऊन जातो तशी एखादी आठवण आपल्याला अनेक unrelated गोष्टी एकत्र आठवायला भाग पाडते. (आता ह्याला विषयांतर म्हणू की प्रास्ताविक?)
असो..तर पुन्हा एकदा खोपोलीच्या घरातील ती रात्र. मी आपल्या उद्योगात दंग, आई-बाबा त्यांच्या त्यांच्या. नेहमीप्रमाणे रात्रीचा रेडिओ चालू. अचानक कानांवर त्याच गज़लेचे सूर! Recognize व्हायला दोन सेकंद जातात आणि मग माझी हातातली कामं सोडून कागद पेन शोधण्याची धावपळ. आयत्या वेळी कधीही न सापडणाऱ्या दोन वस्तू म्हणजे चालणारं पेन आणि कोरा किंवा निदान पाठकोरा कागद! मी रेडीओशेजारच्या बॉक्स मधून हाताला लागेल ते उपसत असते. शेवटी एक चालणारं पेन हाती लागतं. समोर कुठल्याश्या तारखेचा पेपर पडलेला असतो तो उचलते आणि त्या गज़लेचा मुखडा खरडते. चला! आता मात्र ही गज़ल नक्की शोधायची! त्या आनंदात गज़लेचा मुखडा गुणगुणते. बाप रे! किती पसारा केलाय आपण! आता हे सगळं आवरलं पाहिजे नाहीतर आई उगीच चिडचिड करेल! बॉक्समधल्या गोष्टी आत टाकताना हातात येतं एक earbuds चं न उघडलेलं पाकीट..मीच आणलेलं..साधारण महिन्याभरापूर्वी..आजीसाठी..आजी...त्या पाकिटाकडे पाहताना “आता आजी नाही” ही क्रूर वास्तवाची जाणीव कुठेतरी खोल काळीज चिरत जाते आणि मी ढसाढसा रडायला लागते. जरा वेळाने आपोआप स्वतःच शांत होते. एका हातात गज़लेच्या ओळी खरडलेला जुना पेपर, दुसऱ्या हातात earbuds चं पाकीट आणि मनात कुठेतरी गज़लेचे सूर आणि आजीच्या आठवणी एकत्र दाटून आलेल्या..!
पिक्चरमध्ये दाखवतात ना तसा जाणारा काळ लिहिण्यातून दाखवता आला असता तर किती छान झालं असतं! त्या रात्रीनंतर जवळपास चार वर्षं सरली. मधल्या काळात गज़लेचा मुखडा माझ्या ओठांवर रुळला होता. मला जे जे संगीतप्रेमी/गज़लप्रेमी लोक भेटले त्यांना मी माझ्या “सुमधुर” आवाजात या दोन ओळी ऐकवून “आपण यांना पाहिलंत का?” च्या चालीवर या गज़लेची चौकशी करत होते! ही जगजितसिंग यांनी गायलेली गज़ल आहे आणि कधीकाळी मुंबईच्या एफएम रेडीओ स्टेशन्सवर अधूनमधून लागायची यापलीकडे माझ्याकडे काहीही माहिती नव्हती.
आता पुन्हा एक रात्र!
स्थळ: ऑस्टिन वेळ: रविवार रात्र
अतिशय आळसात घालवलेला रविवारचा दिवस संपताना लागणारी हुरहूर आणि त्याचवेळी ठरवलेली कामं न केल्याबद्दल छळणारा आपला conscience अशा मूडमध्ये मी! लॅपटॉप पुढ्यात घेऊन इकडच्या तिकडच्या साईट्स बघतेय. कशी काय कोण जाणे पण मी cooltoad वर गज़लच्या विभागात शिरले आणि अचानक आठवली ती ही गज़ल! अरेच्चा! इतके दिवस आपल्याला ही गज़ल शोधायचं कसं नाही सुचलं? मनात येताक्षणी मी गुगलोबांना कामाला लावलं आणि पुढच्या पाच मिनिटात ती गज़ल माझ्या लॅपटॉपवर वाजत होती! जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा डोळ्यांतून साऱ्या आठवणी दाटल्या!
गेले दोन/तीन दिवस माझ्या IPod वर हीच गज़ल वाजते आहे! “ये आँखोकी स्याही ये होठोंका उजाला” पेक्षा ये होठोंकी स्याही ये आँखोका उजाला” कसं जास्ती अर्थपूर्ण वाटतं या निरर्थक वादात मनाला न अडकवता मी आता केवळ आनंदासाठी ही गज़ल ऐकतेय!
अशी आहे या गज़लेची गोष्ट! सुफळ पण संपूर्ण नव्हे! कारण इतके दिवस या गज़लेच्या केवळ आठवणी माझ्यासोबत होत्या पण आता आहे ती गज़ल आणि काही स्वप्नं..या गज़लेच्या साथीनेच खरी व्हावीत अशी!
ही गज़ल ऐकण्यासाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=zjQt40Wutrc

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलय. कशातून मनाला काय आठवेल आणि त्याचा पाठपुरावा करताना आपण कशात अडकू आणि हे सगळं झाल्यावर याचा रिव्हर्स विचार केला की अमेझ व्हायला होतं. साधं नेटवर एक पान वाचतना आपण किती आणि कशा उड्या मारतो. ईअरबड आणि आजी काय संबंध पण मेंदू काय फेच करेल, मस्त उतरलय. आवडलं.

छान लिहिले आहे. मीही अशा अवस्थेतून गेलो होतो त्याची आठवण झाली. पस्तीस वर्षांपूर्वी एका औषध कंपनीने first choice नावाची एक क्यासेट दिली होती जीमध्ये काही निवडक गजल संग्रहित केल्या होत्या. त्यातील फामिदा खातून यांनी गायिलेली "आज जानेकी जिद ना करो " हि गजल खूप आवडलेली ! हि क्यासेट कोठेतरी हरवली. त्यावेळी इंटरनेट नव्हते. खूप शोधूनही सापडेना. मन आपल्यासारखच विषण्ण झाले. अनेक वर्षांनी एका पार्टीमध्ये माधुरीच्या एका मैत्रिणीने हि गझल गायली. आणी मग तुम्हाला झाली तशीच अनुभूती !
आठवणींच्या राज्यात पुन्हा नेल्याबद्दल धन्यवाद !

डॉ साहेब ,
फामिदा खातून यांनी गायिलेली "आज जानेकी जिद ना करो " हि गजल माझि पण खूप आवड्ती गझल आहे.

खूप आभार आठ्वण करून दिल्याबद्दल.

<<कधीकधी आपल्या मनात दोन अगदी भिन्न गोष्टींचे धागे एकाच आठवणीभोवती गुंफलेले असतात. एखादा वास आपल्याला स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून पार तिसरीकडे घेऊन जातो तशी एखादी आठवण आपल्याला अनेक unrelated गोष्टी एकत्र आठवायला भाग पाडते. (आता ह्याला विषयांतर म्हणू की प्रास्ताविक?)>>

अगदी अगदी! आम्ही फार पूर्वी रोड ट्रिपला कारच्या डेकमध्ये रंगिलाची कॅसेट खूप ऐकली होती. आता कधीही 'प्यार ये जाने कैसा है' 'हाय रामा ये क्या हुआ' किंवा 'तनहा तनहा' वगैरे ऐकलं की आपण कारमधून भारतातल्या रस्त्यांवर जात असल्याचं फीलिंग येतं.

बाकी लेख खूपच छान जमलाय...सुंदरच!

सुंदर लेख जिज्ञासा.

ह्या डेमियन राइसच्या गाण्याबाबत माझे असे झाले आहे. दरवेळी ऐकून पहिल्यांदा ऐकले तेव्हाच्या (परिस्थितीजन्य) अस्वस्थतेत परतायला होते.

वाह! छान लिहिलेय ..

काही आठवणीतली विस्मरणात गेलेली गाणी आठवायला लागलीत हे वाचून ..

टेपच्य जमान्यात कॅसेट्च्या रुपात ही गजल माझ्याकडे होती. आज खुप वर्षाने पुन्हा ऐकली जुन्या आठवनी ताज्या झाल्या.
धन्यवाद.

Mast

सुरेख लिहिलंयस. लेख वाचता वाचताच ऐकली.

आशाताईंची गजल - ''यूं सजा चांद के झलका तेरे अंदाज का रंग" - आणि या गजलेची सुरवातीची चाल सारखीच वाटली.

दोस्त बन बन के मिले मुझको मिटाने वाले .. हि गझल पन खुप आवडते मला ...
हर एक गझल मधे काही ना काही रिलेट करणारं सापडूनचं जातं ना !