"डिकेला वेड लागलंय"
एक मित्र म्हणाला आणि मला हसूच आले. मित्राचा चेहरा गंभीर राहिलेला पाहून मी क्षणात गंभीर झालो.
"म्हणजे?"
"म्हणजे वेडा झाला अरे तो"
"म्हणजे काय?"
"म्हणजे कोनाड्यात बसून राहतो, बाहेर येत नाही, तिथेच जेवतो, झोपतो, कोणाला ओळख देत नाही"
"कोनाड्यात?"
"त्याच्या घरात एक खूप मोठा कोनाडा आहे. त्या कोनाड्याला त्याने स्वतःची रूम बनवले आहे. त्यातच बसून राहतो. स्वतःशीच बडबडतो. म्हणतो आता मी स्वतंत्र आहे."
"हे, हे कधी झाले?"
"काल मी त्याला भेटायला सहज त्याच्या घरी गेलो तर नेहा सांगत होती. डिके नुसता बसला होता. मी हाय केले तर दुर्लक्ष केले आणि भिंतीकडे तोंड वळवून खदाखदा हसला"
"च्यायला"
"त्याचे आई वडील रडत होते"
"त्यांना भेटायला जायला पाहिजे राव"
"जायचं का?"
"चालेल. संध्याकाळी सहाला डॉमिनोजपाशी भेट! तिथून जाऊ"
"चालेल"
संध्याकाळी मित्र आणि मी डिकेच्या घरी गेलो. आम्हाला पाहून काकूंनी अबोलपणे दारातून सरकून आत येण्यास सुचवले. आम्ही आत गेल्यावर त्यांनी दार आतून लावून घेतले. त्या मागे वळल्या तर त्यांच्या भकास चेहर्यावर त्याही क्षणी आपुलकीच होती. भडभडून आले. ह्या माउलीचा हाताशी आलेला मुलगा वेडा झाला ही भावना काळजाला चरे पाडून गेली.
नेहा क्लासला गेली होती. काका आतून बाहेर आले. बसा म्हणाले. आम्ही आपले बसलो. डिके दिसत नव्हता.
"कसाय डिके?"
काकू पाणी घेऊन आल्यावर मी विचारले.
त्या घरात सगळेच डिके होते. पण डिकेला प्रकाश म्हणणे शक्यच नव्हते आम्हाला. काकूंनी निराश चेहरा करून हात नकारार्थी हलवत खूण केली की 'सगळे विपरीत झालेले आहे, तो काही समजण्याच्या पलीकडे गेलेला आहे'.
काका म्हणाले 'बघ तुला तरी ओळख देतोय का'!
मग आम्ही उठलो आणि आत गेलो. आतल्या तीन खोल्यांपैकी एक खोली डिकेची होती. पण तिथे आता काकाकूंचा वावर असावा असे दिसत होते. काकाकाकूंच्या खोलीत तो कोनाडा होता. आमचा मोर्चा तिकडे वळला. त्या खोलीत पाय टाकला आणि समोरचे दृश्य पाहिले.
एका भिंतीला भला मोठा कोनाडा होता. जमीनीपासून फक्त दोन फूट उंचीवर असलेला हा कोनाडा प्रचंड होता. एक सहा फुटी माणूस त्यात सहज झोपू शकेल इतका लांबलचक आणि चार साडे चार फूट उंच! कोनाड्याची खोलीसुद्धा चांगली अडीच तीन फूट होती.
त्या कोनाड्यात डिके बसला होता.
मस्त पाय पसरून बसला होता.
त्याचे आमच्याकडे लक्ष नव्हते.
आम्ही अनेकजण पहिलीत असताना त्या कोनाड्यात 'घर घर' खेळलो होतो. आमची एक सुवर्णा म्हणून मैत्रीण होती ती कोणाचीतरी बायको व्हायची. मी, अत्ल्या, सुमेध ह्यापैकी कोणीतरी मुलगा व्हायचो. कोणीतरी सुवर्णाचा नवरा व्हायचा. भातुकलीतील भांडी घेऊन सुवर्णा स्वयंपाक करायची. काकूंकडून चिंचा, गुळ वगैरे मागून घ्यायची. चिमूटभर तांदुळ आणि डाळ एका भांड्यात टाकून 'खिचडी टाकलीय, गप्प बसा' असे म्हणायची.
त्या अख्ख्या घराचा एकमेव आणि खराखुरा वारस डिके, त्या कोनाड्यात पाहुणा म्हणून यायचा.
डिके आला तरी कोणाला सोयरसुतक नसायचे. डिकेलाही स्वतःच्या असण्याचे सोयर सुतक नव्हते. ते त्याने आजवर पाळलेले दिसत होते. त्या कोनाड्याच्या आत कुठे खुंटी आहे, कुठे खडबडीत जागा आहे, कुठे हाताला बोचते ह्या सर्व सूक्ष्म बाबी मला आत्ताही जाणवत होत्या. कोनाड्याला तेव्हा बाहेरून एक पडदा असायचा. तो आम्ही आतून लावून घ्यायचो. डिकेसाठी तेवढा पडदा किलकिला करून डिकेला आत घ्यायचो. घरातील अश्या वस्तू, ज्या काकूंना पुढचे काही तास अजिबात लागणार नाहीत, त्या कोनाड्यात जमवायचो. त्यात कुंकवाच्या कोयरीपासून डिकेच्या बाबांच्या शूजपर्यंत सगळे काही असायचे. सुवर्णा डिकेच्या हातावर चिमूटभर साखर ठेवत म्हणायची 'शिरा केलाय, तो घ्या'. एका घासात ती साखर घशात ढकलून डिके कितीतरी वेळ स्वतःचा तळहात चाटत राहायचा. आम्हाला किळस यायची पण डिकेच्यामते त्याला इतका भरपूर शिरा खायला लागलेला तो वेळ असायचा.
डिके कधीही नापास झाला नाही. डिकेने पहिल्या दहातील नंबर कधीही सोडला नाही. आणि एवढे करून डिकेला अभ्यासाबाबत, शिक्षकांबाबत, शाळेबाबत काहीही आदर वाटत नसे.
डिके केव्हापासूनच एक वाक्य बोलायचा. 'आपण सगळे फक्त थांबलेलो आहोत. गाडी आली की निघायचे'.
आम्ही हसायचो. सकाळी डिके दिसला की विचारायचो, 'डिक्या, गाडी येतीय का नाही?'
डिके असेल तिथे थुंकायचा आणि उजव्या पंज्याची चार बोटे दाखवायचा.
"चार तास लेट का?' असे आम्ही विचारायचो. त्यावर डिके होकारार्थी मान हलवून कामाला लागायचा.
दहावी झाली तेव्हा डिकेला ८९% पडले. आमच्या जमान्यात ८९%ला हवी तेथे अॅडमिशन मिळत असे. डिकेनेही अॅडमिशन घेतली. 'डॉ. मृत्यूराव फसवे पाटील कॉलेज ऑफ आयुष्य'मध्ये!
डिकेने वडिलांच्या हातचा मार खाल्ला! एक संपूर्ण दिवस त्याला काकूंनी उपाशी ठेवला. नेहा त्याच्याशी सलग तीन दिवस एक अक्षर बोलली नाही. पण डिके घरातून बाहेर पडला नाही प्रवेशाच्या फॉर्मवर सही करायला.
आम्हाला सगळ्यांना समजले. डिके वेडा झाला. संध्याकाळी मात्र पुलावर नियमीत यायचा. सगळ्यांची कॉलेजशी संबंधीत बडबड ऐकायचा. गप्प राहायचा. त्याला छेडण्याचे अनंत प्रयत्न केले. प्रत्येक प्रयत्नावर एकच उत्तर! 'तू कॉलेजला का जातोस हे मी कधी विचारले? नाही ना? मग तूही विचारू नकोस की मी कॉलेजला का जात नाही'!
त्यावर आम्ही ढोस पाजायचो.
"डिक्या लेका शिक्षणावर पुढचे सगळे आहे. काका-काकूंना काय वाटत असेल विचार कर. आणि कॉलेज नको आहे तर शाळेत कशाला आलास?"
डिके अबोल राहायचा. खूप पिडल्यावर म्हणायचा.
"भरूचाबाईंचे बॉल पाहायला शाळेत यायचो, बास?"
"अरे पण, जेव्हा तुला त्यातले काहीही कळत नव्हते तेव्हा का यायचास?"
"तेव्हा यायचो कारण तेव्हा मला त्यातले काहीही कळत नव्हते"
आम्ही वरवर हसायचो पण आतल्याआत निरुत्तर व्हायचो. तसेही, डिकेचे तसे असण्यामुळे आम्हाला काहीच फायदा-तोटा नव्हता. प्रश्न डिकेचा होता. आमचा नव्हता.
भरूचाबाईंचे बॉल!
त्या बाई भुगोल शिकवत ह्यात एक काव्य होते. पण डिके त्या बाईंच्या पिरियडलाही शेवटच्याच बाकावर असायचा. किंबहुना त्याचे कुठेही लक्ष नसायचे......फळ्याशिवाय!
आत्ता डिके कोनाड्यात होता. उघडा! खाली एक जीन्स! शरीर तंदुरुस्त! छातीवर उगवलेले केस मुठीने ओढत बसला होता. नजर रोखललेली होती कोनाड्यातील एका बिंदूवर! अचानक किंचाळला. स्वतःच्याच चेहर्यावर दोन्ही हातांचे तळवे ठेवून! काकू धावल्या. पाठोपाठ काका, मागून आम्ही!
डिके कर्णकटू किंचाळत राहिला. थोड्या वेळाने शांत झाला. तो ओरडत असताना काकू त्याच्या अंगावरून मायेने हात फिरवत होत्या. तो शांत झाल्यावर त्याने काकूंना झिडकारले. म्हणाला......
"लाज वाटत नाही का? एका लहान वयाच्या पुरुषाच्या अंगावरून बिनदिक्कत हात फिरवायला?"
काकू सरसरून मागे झाल्या. काकांचा हात डिकेच्या कानफटीत वाजवण्यासाठी उत्सुक होता हे पाहून मी काकांना सावरले.
काकू रडत रडत किचनमध्ये गेल्या. तेवढ्यात नेहा आली. आम्हाला पाहून शरमली. मला म्हणाली......
"तुम्हाला कधीच हा राँग वाटला नाही का रे? सांगितले का नाहीत?"
आमच्याकडे उत्तर नव्हते. पण......
......पण डिकेकडे उत्तर होते. बाहेरच्या खोलीत चाललेला हा संवाद ऐकून तो नेहाला उद्देशून आतूनच म्हणाला......
"बाळी, सगळे मरणार आहेत. जो आधी मरेल तो सुखी"
नेहाला हुंदका फुटला.
मी डिकेकडे गेलो.
डिके मला पाहून म्हणाला.
"कट्या? लेका तू? ये बस, सुवर्णाने चहा केलाय"
डिके दशके मागे होता. मी कोनाड्यात बसलो. त्याला म्हणालो.
"डिक्या, आम्ही कॉलेजला जाऊन काळ झाला लेका! तू मागे पडू नकोस."
डिके अविश्वासाने काही क्षण माझ्याकडे बघत राहिला. नंतर म्हणाला......
"पी इज इक्वल टू टू पाय एन टी अपॉन सिक्स्टी! ह्यापलीकडे काही आहे का?"
ह्यापलीकडे काहीही नव्हते.
आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती ह्यांच्या गुणाकाराला 'टू पाय' म्हणजे नशिबाने मल्टिप्लाय करून 'सिक्स्टी' म्हणजे दुर्दैवाने भागले तर माणसाचे प्राक्तन काय ते समजते. हे डिकेचेच वाक्य होते. फॉर डिके, पी वॉज नॉट पॉवर, इट वॉज प्राक्तन! 'टू पाय' वॉज सुदैव आणि सिक्स्टी वॉज दुर्दैव!
कोनाड्यात ऐसपैस बसलेला डिके कोनाड्यात कसेबसे मावलेल्या माझ्यापेक्षा सूज्ञ होता.
कोनाडा हे जणू विश्वाचे प्रोटोटाईपच होते.
डिके कशाच्यातरी पलीकडे पोचलेला होता. प्रश्न इतकाच होता की तो नेमका 'कशाच्या पलीकडे' पोचला आहे?
"काळाबरोबर बदलायचे नसते कट्या! हे जर जमले तर माणूस अमर होतो."
डिके शून्यात बरळला.
काळाबरोबर माझे शरीर बदलले, भावना बदलल्या, मी तारुण्य उपभोगत राहिलो. माझ्यातील प्रत्येक बदल मला कोणत्या ना कोणत्या अर्थाने समृद्ध करत राहिला. डिके कुठेतरीच राहिला होता.
काकांनी पुढे होऊन डिकेला गदागदा हलवले खांद्याला धरून! म्हणाले......
"हा तुझा मित्र आलाय बघ! बघ तो कसा शिकतोय! बाहेर ये!"
डिके बापाच्या चेहर्यावर पच्चकन् थुंकला. काका मागे झाले. मला ते सहन झाले नाही. कोणाच्या थोबाडात मारणे हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी डिकेचा हात पिरगाळला आणि संतापात म्हणालो......
"ते तुझे वडील आहेत डिके! वडील! थुंकतोस तू?"
वेदनेने पिळवटलेला चेहरा तसाच ठेवत डिके म्हणाला
"त्याला आईची थुंकी तोंडात गेलेली चालते, माझी का नाही?"
मनुष्यप्राण्याचे इतके नग्न स्वरूप माझ्या पाहण्यात नव्हते.
आम्ही हताश झालो. बाहेर आलो. काकूंनी केलेला चहा कसाबसा नरड्यात ढकलला. निघालो. निघताना अजिबात सुसंगत नसलेला धीर देऊन निघालो.
नंतर काहीबाही समजू लागले डिके कोनाड्यात बसून लिहू लागला.
त्याने लिहिलेले कागद घरातल्या सगळ्यांनी वाचले. त्याचे लिहिणे थांबेचना!
लोकांच्या वाचनाचा वेग कमी पडेल इतके तो लिहीत असे.
माझी उंची इतकीच का? मी मुलगाच का? मी डिकेच का?
कुणी मेल्याचे समजले की डिके चेकाळून हसायचा. कोणी जन्माला आल्याचे समजले की गंभीर व्हायचा.
नेहाचे लग्न ठरले. मोठे धामधुमीत लग्न झाले. आम्ही सगळे होतो. डिकेला उचलून वधूपक्षात ठेवलेले होते. डिके 'तसा' आहे म्हणून नेहाच्या सासरच्यांना डिकेच्या वडिलांनी खूप काही दिले होते. मोठा भाऊ म्हणून नेहा आणि नेहाचा नवरा चक्क डिकेच्या पाया पडायला गेले तेव्हा सर्वांदेखत डिके त्या नवर्याला म्हणाला......
"जायदाद समजू नकोस माझ्या बहिणीला!जिवंत जाळेन"
काय पण आशीर्वाद!
भांडणे झाली. मिटवताना सगळे मेटाकुटीला आले. नेहा त्या प्रसंगी रडली तितकी ती आजवर एकुण रडली नसेल.
नेहा सासरी गेली. डिके कोनाड्यात बसून राहिला. घर सुने सुने झाले. एक अपत्य परक्या घरी गेलेले! एक अपत्य डोळ्यासमोर असून आपले नसलेले!
डिके आता कोनाड्यात बसताना जीन्सही घालत नव्हता. अंडरवेअरवर बसत असे. कोणी विचारले तर सांगत असे. लाज वाटावी अशी फक्त एक व्यक्ती घरात राहिलेली आहे, ती म्हणजे आई!
डिके खलास झालेला होता. अन्नपाणी सोडून तो कधी मरेल ह्याची प्रतिक्षा सुरू होती.
आम्हाला बातम्या समजत होत्या. कोणाकडून? तर डिकेच्या आईकडून! काकू आठवड्याला दोनदा तरी फोन करायच्या.
एकदा बातमी आली. नेहा माहेरपणाला आली.
आम्ही वाय झेड मित्र उगाच तिला आणि तिच्या निमित्ताने डिकेला भेटायला गेलो. तर विरळाच प्रकार!
नेहा भग्नहृदयी माणसासारखी पलंगावर बसलेली! काका आणि काकू अश्रू गाळत आहेत. आणि डिके खदाखदा हासत आहे.
नेहाच्या सासरच्यांनी डिझायर कारची डिझायर एक्स्प्रेस केली होती. डिकेच्या बापाची ती हैसियत नव्हती. काका रडत होते. काकू रडत होत्या. नेहा विषण्णपणे बसून त्यांना सांगत होती की ह्यानंतर घरचे काही मागणार नाहीत ह्याची हमी मी घेते.
आणि डिके?
डिके खदाखदा हसत होता.
आम्ही डिकेला थोबाडले, ते पाहून कोनाड्यातच बसून डिकेने माझी गचांडी धरली. अचानक माझ्या चेहर्याकडे पाहून त्याने हात सोडला आणि मंग्याची गचांडी धरली. मी कधीकाळी फार चांगला वागणारा माणूस होतो हे डिकेच्या लक्षात आहे हे पाहून मला तेव्हाही रडू आले. मंग्याला उलटे थोबाडत डिके म्हणाला......
"भाडखाऊंनो इथे मजा काय बघताय?"
नेहाच्या सासरी जाऊन जाब विचारण्याची ना आमची हिम्मत होती ना आम्हाला तितका वेळ होता ना ते आमचे प्राधान्य होते.
आम्ही घरी निघून आलो.
डिके कुटुंबियांना त्याच अवस्थेत सोडून निघून आलो.
तीन दिवसांनी पेपरमध्ये बातमी वाचली.
'डिके नावाच्या वेडसर तरुणाने बहिणीच्या नवर्याला भर रस्त्यात सर्वांदेखत लाथाबुक्क्यांनी बडवले व हुंडा नाकारला'
जो डिके कोनाड्याबाहेरही येत नव्हता, तो क्षणार्धात प्रत्येक बहिणीच्या गळ्यातील ताईत बनला.
आम्ही अक्षरशः भारावून त्याच्या घरी गेलो तेव्हा भरूचा मॅडम तिथे होत्या. त्या काकूंना जवळ घेत म्हणत होत्या.
"तुमच्या मुलाचे नुकसान होण्यास मीही थोडीशी कारणीभूत आहे"
त्या कश्या कारणीभूत होत्या हे काही कोणाला समजले नाही.
डिके आता शासकीय इंतमामात आपले वेड घालवण्याच्या प्रयत्नात आहे.
अगदी खरेच सांगायचे झाले तर, डिकेच्या माध्यमातून शासन स्वतःचे वेड घालवण्याच्या प्रयत्नात आहे.
आम्ही आता डिकेला भेटू शकत नाही.
डिकेच्या मते डिके केव्हाच मेलेला होता. खरे तर सगळे जगच डिकेच्या मते मेलेले आहे. डिके चा डीके झालेला आहे हे डिकेचे फारा वर्षांपूर्वीचे मत येथे चपखल लागू होते.
डिके नाही समजला मला!
आणि काहीतरी न समजणे हे समजण्यापेक्षा चांगले असते हे पहिल्यांदाच समजले. आणि ते डिकेमुळे समजले.
डिके!
एक कोनाड्यातील पाहुणा!
=======================
-'बेफिकीर'!
छे, उगीच वाचली...एकतर दिवस
छे, उगीच वाचली...एकतर दिवस बेकार गेलाय त्यात अशी गोष्ट, प्रत्येकजण मनातून कुठेतरी वेडाच असतो असे ऐकले होते मागे...तसेच काहीसे वाटतेय....वेड्यासारखे!
कथा आवडली असे तरी कसे म्हणावे
कथा आवडली असे तरी कसे म्हणावे बेफि.....
>>आणि काहीतरी न समजणे हे समजण्यापेक्षा चांगले असते हे पहिल्यांदाच समजले. आणि ते डिकेमुळे समजले.<< ह्म्म्म डिके सुन्न करून गेला....
-प्रसन्न
निशब्द
निशब्द
कथा मनाला भिडून गेली...सुन्न
कथा मनाला भिडून गेली...सुन्न करुन गेली..
कथा वाचल्यानंतर सखाराम
कथा वाचल्यानंतर सखाराम बाईन्डर, गिधाडे, वासूनाका अशा अति-वास्तववादी पण बीभत्सरसयुक्त साहित्याची प्रकर्षाने आठवण झाली. आपल्यासारख्या दमदार लेखकाकडून पुल अथवा वपु सारख्या दर्जेदार साहित्याची अपेक्षा आहे. आपणास शुभेच्छा !
सुन्न ...
सुन्न ...
आपल्यासारख्या दमदार लेखकाकडून
आपल्यासारख्या दमदार लेखकाकडून पुल अथवा वपु सारख्या दर्जेदार साहित्याची अपेक्षा आहे. >>>>>>>>++१०००००
सुन्न. छान लिहिलय तरी कसं
सुन्न. छान लिहिलय तरी कसं म्हणावं.
आपल्यासारख्या दमदार लेखकाकडून पुल अथवा वपु सारख्या दर्जेदार साहित्याची अपेक्षा आहे. >>>>>>>> +१ छान प्रतिसाद डॉक्टरसाहेब.
कशाला वाचली मी
कशाला वाचली मी
<<<आणि काहीतरी न समजणे हे
<<<आणि काहीतरी न समजणे हे समजण्यापेक्षा चांगले असते हे पहिल्यांदाच समजले>>> सुन्न करुन गेले हे वाक्य.
आवडली आणि सुन्न करून
आवडली आणि सुन्न करून गेली.....
<<<<आणि काहीतरी न समजणे हे समजण्यापेक्षा चांगले असते हे पहिल्यांदाच समजले >>>>
या वाक्याला टाळ्या टाळ्या आणि टाळ्याच....
ही कथा वाचली आणि सुन्न
ही कथा वाचली आणि सुन्न झालो..........
डॉक्टरसाहेब, १. >> कथा
डॉक्टरसाहेब,
१.
>> कथा वाचल्यानंतर सखाराम बाईन्डर, गिधाडे, वासूनाका अशा अति-वास्तववादी पण बीभत्सरसयुक्त साहित्याची
>> प्रकर्षाने आठवण झाली.
ह्या कादंबऱ्या मी वाचल्या नाहीयेत. त्यामुळे तुमच्या विधानाशी सहमत वा असहमत होऊ शकत नाही. मात्र बीभत्स रस केवळ बीभत्सतेसाठीच वापरलाय का त्यातून इतर काही बोध घेता येतो ते पाहायला हवं. उपरोक्त कथेतून विचारप्रक्रिया सुरू होते ती मला अधिक आकर्षक वाटते.
डिकेसारखा एक माणूस मला माहितीये. तोही असाच चक्क वेडा झाला. त्याच्यासारख्या माणसावर कथा लिहिता येईल अशी कल्पनाही करता येणार नाही. बेफिकीर यांनी हाताळलेली जगावेगळी पात्र माझ्याच अवतीभवती होती असं माझं निरीक्षण आहे. माझंच त्यांच्याकडे लक्ष नसतं. आणि गेलं तरी मी त्यांना झटकून टाकायचो. केवळ मीच नाही तर आजूबाजूचे सगळेच.
अशा विषयाला हात घातल्याने बीभत्सपणा तितकासा जाणवत नाही. हे माझं वैयक्तिक मत.
२.
>> आपल्यासारख्या दमदार लेखकाकडून पुल अथवा वपु सारख्या दर्जेदार साहित्याची अपेक्षा आहे.
सहमत. जरी माझं फारसं वाचन नसलं तरीही सहमत. बेफिकीरांच्या साहित्याचा आढावा घेतल्यास बीभत्सरस फार कमी आहे. त्यामुळे एक ना एक दिवस त्यांचं नाव आपल्याला अपेक्षित असलेल्या पंक्तीत जाऊन बसणारच!
आ.न.,
-गा.पै.
दुर्दैवी पण उत्तम
दुर्दैवी पण उत्तम व्यक्तिचित्रण.
"मी कधीकाळी फार चांगला वागणारा माणूस होतो हे डिकेच्या लक्षात आहे हे पाहून मला तेव्हाही रडू आले."
अत्यंत करुण परिस्थितीत पण माणसाचा अहंकार कसा सोबत करतो हे एकदम अचुक निरीक्षण . स्वतःची इच्छा नसतानाही विचित्र परिस्थितीत कधी कधी अहंकार सुखावुन / दुखावुन जातो.
आयुष्यातले काही अनुभव जे
आयुष्यातले काही अनुभव जे आपल्याला काहीही शिकवत नाहीत उलट प्रश्नांच्या खोल गर्तेत ढकलून देतात अशापैकी एक वाटला हा.
काल्पनिक आहे की सत्य ते माहित नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने लिहिलाय त्यावरून नक्की सत्य असेल असं वाटतंय. श्रेय अर्थातच दमदार लेखणीला.
पुलेशु!
Ky bolav hech suchat nahiy
Ky bolav hech suchat nahiy ....
च्च! जीव हळहळला.
च्च! जीव हळहळला.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार
प्रत्येक प्रतिसाद काहीतरी शिकवून गेला.
ह्याबद्दल खासकरून धन्यवाद म्हणतो.
खुपच प्रभावी कथा.....
खुपच प्रभावी कथा.....
न सांगताच खुप काही सांगितलंत
न सांगताच खुप काही सांगितलंत कथेत..
खुप छान आहे.