"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे. जायचं का एकत्र?"
"कोण बोलतंय?" उल्हासने चढ्या आवाजात विचारलं.
"अरे, सीमा बोलतेय. मला वाटलं फोन कुणाचा ते पाहिलं असशील."
"नाही पाहिलं. बोल."
"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे त्याला जायचं का एकत्र?"
"कधी?" तिरसटल्यागत त्याने विचारलं.
"आहेत अजून दोन महीने. आणि तुझं काही बिनसलं आहे का? किती मग्रुरी आवाजात. बोलायचं नसेल मनात तर तसं सांग ना. ही कसली नाटकं."
"ए, आता तू नको सुरु करु बाई. तो सावंत एक डोकं खाऊन गेला. तो बाहेरचा. तुम्ही घरचे."
"काय झालं? भांडलास?"
"सोड गं ते. कधी आहे तुझं ते संमेलन? तारीख सांग."
"तेवीस डिंसेबर. आणि ते फक्त माझं नाही. सगळ्याचं आहे. कमालच करतोस तू. कसा बोलतोस." सीमाही आता वैतागली.
"मला माझ्या वर्गात कोण होतं तेही आठवत नाही."
"हेच उत्तर द्यायचं होतं तर तारीख कशाला विचारलीस. आणि वाट्टेल ते नको सांगू. केवढीशी शाळा होती. सगळीजण ओळखायची एकमेकांना. तुला तुझ्या वर्गातला महेश आठवत नाही? तो तर तुझा खास मित्र होता."
"असेल. पण ही असली संमेलनं म्हणजे फालतूपणा असतो. कर्तुत्व गाजवलेली पोरं येतात आवर्जून. आमच्यासारखी सामान्य माणसं नाही फिरकत. आणि कुणाला आठवायचा आहे तो काळ मुद्दामहून. आपल्या जखमेवर मीठ सालं आपलं आपणच कशाला चोळायचं? वाईट काळ होता तो माझा. फुकटचं दुखणं सालं. तू जा. एऽऽऽ, सीमा, अगं ऐकते आहेस ना? हॅलो हॅलो...."
उल्हासच्या बोलण्याने सीमाला धक्काच बसला. काय बोलतो आहे हा? हे असं काहीबाही मनात साठवून ठेवलं होतं याने इतकी वर्ष? आधी कसा बोलला नाही केव्हाच? का आज आधीच काही बिनसलं होतं त्यामुळे सगळं मनातलं बाहेर आलं. उल्हासचं हॅलो, हॅलो कानावर येत असूनही ती गप्प राहिली. सामान्य माणसं येत नाहीत म्हणे अशा संमेलनांना? इतका स्वत:ला कमी लेखतो हा? आणि वाईट काळ? आत्तापर्यंत कधीच ऐकलं नव्हतं असं काही उल्हासच्या तोंडून. आज अचानक काय झालं?
’वाईट काळ?’ आपल्या घरी उल्हास राहिला तो त्याच्या दृष्टीने वाईट काळ होता? मान्य की ते काही त्याचं घर नव्हतं. आनंदाने नव्हता आला तो रहायला पण इतके कटु शब्द? वाईट काळ म्हणायचं... आई, बाबांनी एवढं केलं त्यावर पाणीच पाडलं की उल्हासने असं बोलून. तसंही सीमा, अरुणाच्या मते उल्हास स्वार्थीच निघाला होता. मामा, मामीमुळे आजचा दिवस दिसतो आहे असं तो म्हणत असला तरी ते त्याच्या कृतीतून, वागण्यातून कुठे दिसत नव्हतं. ना मामा, मामीला आठवणीने कधी फोन केला की आग्रहाने त्या दोघांना आपल्याकडे नेलं. कधीतरी वर्षसहा महिन्यांनी त्या भागात आला तर भेटून जाणार. सीमा, अरुणाला वाटायचं, आपल्या आईला त्याने कौतुकाने एखादी साडी घ्यावी, बाबांना त्यांच्या आवडीचं काहीतरी द्यावं. पण हातून पैसा सुटेल कुणासाठी तर शपथ. किती वेगवेगळ्या तर्हेने त्यांनी ते बोलूनही दाखवलं होतं. पण अशावेळेस काही बोलायचंच नाही ही लहानपणीची ढाल तो मोठेपणीही वापरत होता. अगदीच काही नाही तर कधीतरी रहायला, विश्रांतीसाठी तरी न्यावं आपल्याकडे. आई, बाबांसमोर दोघी हे बोलूनही दाखवत. दोघंही गप्पच रहात अशावेळेस. बाबा कधीतरी म्हणत त्यांनी त्याचं कर्तव्य केलं. आपण कुणासाठी काही केलं तर अशी परतफेडीची अपेक्षा ठेवणं बरोबर नाही. त्याला जाणीव आहे ना हेच खूप झालं. पण कितीही पटलं तरी दोघींचं मन ते मानत नव्हतं. आणि आज इतक्या वर्षांनी उल्हासने असं बोलावं? सीमाला हृदयात कळ उठल्यासारखं वाटलं. तो घोलवडला आला त्याला पस्तीस वर्षाहून अधिक काळ लोटला होता. उल्हास घरी आला तो अचानकच. तो येणार हे माहीत नव्हतं किंवा कदाचित तसं होऊ शकतं याची पुसटशीही कल्पना कुणी दिली नव्हती. सगळं अचानक घडलं होतं. त्याच्या आगमनाने सीमा आणि अरुणा दोघीचं विश्व ढवळून निघालं. घरातलं वातावरण बदललं. सगळ्याच गोष्टींमध्ये एक वाटेकरी अवचित वाढला. आत्ता आत्तापर्यंत सतत आई, बाबांच्या आसपास घुटमळणार्या त्या दोघी थोड्याशा बाजूलाच पडल्यासारख्या झाल्या. उल्हास आई, बाबाचं केंद्रस्थान बनून गेला आणि तरीही त्याच्या दृष्टीने हा त्याचा वाईट काळ होता? आई, बाबांच्या कानावर हे पडायला नको. कोसळतील दोघं. सीमाला एकदम हसू आलं. उल्हासच्या दृष्टीने तो वाईट काळ होता? मग आमचं काय? अगदी याच शब्दात त्या दोघींनी त्यांना त्या काळाबद्दल काय वाटतं हे मांडलं नसतं तरी उल्हासचं आगमन ही सीमा, अरुणाच्या दृष्टीनेही वाईट काळ सुरु झाल्याचीच तर चाहूल होती.
"सीमा, उल्हास तुझ्याबरोबर येईल शाळेत आज. पहिलाच दिवस आहे त्याचा." बाबांनी सांगितलं तेव्हा झुरळ झटकल्यासारखं ती किंचाळली होती.
"इऽऽऽऽऽऽ तो मुलगा आहे. माझ्याबरोबर नको. माझ्या मैत्रिणी चिडवतील त्याला. मुलीत मुलगा लाडोंबा म्हणून."
"अरुणा?"
"माझ्याबरोबर पण नको." अरुणानेही हात झटकले. उल्हास हातात दप्तराचं धोपटं सांभाळत, या पायावरुन त्या पायावर करत, सारं संभाषण ऐकत नुसताच उभा होता. नवीन दप्तराचं, चपलांचं नाही म्हटलं तरी त्याला अप्रूप वाटत होतं. वर्षाच्या सुरुवातीला मिळणार्या या गोष्टी त्याला दुसर्यांदा मिळत होत्या एकाच वर्षात. आणि घरी आल्या आल्या त्याची बाबांबरोबर झालेली ही खरेदी सीमा, अरुणाला अस्वस्थ करुन टाकत होती. त्याच्या नवीन दप्तराकडे, चपलांकडे असूयेने नजर टाकून दोघींनी त्याला शाळेत घेऊन जायचं नाकारलंच.
"काय गं तुम्ही मुली? जरा विचार करुन बोलावं. उल्हास मध्येच आला आहे इथे. कुणी ओळखीचं नाही त्याच्या. शिक्षक, मुलं सगळंच नवीन अशा वेळेस तुम्ही नाही तर कोण मदत करणार त्याला?" आईने समजावून सांगायचा प्रयत्न केला पण दोघी बधल्या नाहीत. दोघींना वाटलं होतं आपण नाही म्हटल्यावर पाठवतील त्याला एकटाच शाळेत. पण बाबाच बरोबर निघालेले पाहिल्यावर त्यांना माघार घ्यावीशी वाटत होती. प्रत्यक्षात मात्र काही न बोलता लाल रिबिनींनी करकचून बांधलेल्या वेण्या रागारागाने उडवत दोघी आपली दप्तरं उचलून तिथून चालत्या झाल्या.
त्यांच्या शाळेत नव्यानं आलेल्या प्रत्येक मुलाची चर्चा होत असे तशी ती यावेळीही झाली. सीमा, अरुणाच्या दृष्टीने अभिमानाने तो आपला भाऊ आहे हे सांगावं असं उल्हासकडे विशेष काही नव्हतं. त्यात घरात त्याला त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष मिळत होतं त्यामुळे रागच यायला लागला होता त्यांना त्याचा. शाळेत मान खाली घालून, गंभीर चेहरा करुन उल्हास वावरायचा. त्याच्या एकमेव मित्राबरोबर, महेश बरोबर दिसायचा तो सतत. कुणी अगदी मुद्दाम त्याच्याशी असलेल्या नात्याबद्दल विचारलं तर त्या मान डोलवायच्या. उल्हासही त्यांच्या आल्यागेल्यात नव्हता. शाळेत एकमेकांना ओळख दाखवायची नाही असा अलिखित नियमच झाला होता तिघांचा. त्या दिवशी मात्र उल्हासच्या वर्गातून कुणीतरी बोलवायला आलं तसं सीमाच्या काळजात धडधडलं. तिने घाईघाईत त्याचा वर्ग गाठला. भिरभिरत्या नजरेने वर्गातल्या बाकांवरुन नजर टाकली. मधल्या कुठल्या तरी बाकावर मान खाली घालून वहीत काहीतरी खरडत बसला होता उल्हास. शिकवणं थांबल्यामुळे दारात उभ्या असलेल्या सीमाकडे वर्गातली सगळी मुलं बघत होती. अभ्यासातून मोकळीक मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहर्यावर होता. सीमाला ओळखणार्या मुली हात हलवून तिचं लक्ष वेधून घेत होत्या.
"उल्हास तुझा आतेभाऊ ना?" तिने मान डोलवली.
"ही चिठ्ठी दे तुझ्या बाबांकडे." बाईंनी हाताने आत येण्याची खूण केल्यावर उल्हासकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकत तिने चिठ्ठी घेतली.
"आणि बाबांच्याच हातात द्यायची. उघडून पहायची नाही." गावडे बाईंच्या घोगरट आवाजाला घाबरुन तिने नुसतीच मान डोलवली. स्कर्टच्या खिशात चिठ्ठी जपून ठेवली.
"काय आहे त्या चिठ्ठीत?" शाळेच्या आवारातून बाहेर पडून रस्त्याला लागलेल्या सीमा आणि अरुणाला उल्हासने गाठलं.
"आम्हाला काय माहीत. उघडायची नाही म्हणून सांगितलं आहे तुझ्या बाईंनी." सीमाने चिठ्ठी मुद्दामच त्याच्यासमोर उलटसुलट केली.
"तू काय केलंस? ती गावडीण खडूस आहे एकदम. एकदा तिच्या हातात सापडलास की संपलं." अरुणाने सीमाच्या हातातून चिठ्ठी घेत विचारलं.
"पण मी काहीसुद्धा केलेलं नाही. बघू ना काय लिहलं आहे ते."
"ह्यॅ... आणि तू काही केलं नाहीस तर मग चिठ्ठी का दिली? ती सुद्धा ताईला बोलवून. तुझ्याकडे का नाही दिली? काय केलंस सांग ना? बघ हं आत्या आली की तिला सांगू. मग तुझी रवानगी बाबा तिच्याबरोबर करुन टाकतील. सांग ना काय केलस ते?" अरुणाच्या एकामागून एक प्रश्नांना उत्तर न देता उल्हासने तिच्या हातातून ती चिठ्ठी हिसकावली आणि तो पळत सुटला. सीमा, अरुणाही त्याचा पाठलाग करत घरी पोचल्या. बाबा आले की बघतील काय ते म्हणत आईने चिठ्ठी स्वत:कडे ठेवून दिली. संध्याकाळी बाबा आल्या आल्या आईला चिठ्ठी द्यायला अरुणाने भाग पाडलं. तिघंही आज्ञाधारकासारखे त्यांच्यासमोर उभे राहिले. शांतपणे बाबांनी चिठ्ठी काढून वाचली, आईच्या हातात दिली. दोघं काही बोलले नाहीत तसं कुणालाच काही सुचेना. सीमा, अरुणा नाईलाजाने खेळायला बाहेर निघून गेल्या. एक दोन वेळा पाळीपाळीने घरात डोकावून गेल्या. पण आत गेलं रे गेलं की आई पाठवायची तिथून बाहेर. दोन्ही वेळेला उल्हासला डोळे पुसताना पाहिल्यावर मात्र दोघींना आनंद झाला.
"ओरडले वाटतं बाबा एकदाचे." अरुणा बाहेर येऊन सीमाच्या कानात कुजबुजली.
"रडत होता ना? बरं झालं बाईनीच चिठ्ठी पाठवली. काय प्रताप गाजवले कोण जाणे. बाबा ओरडले बहुधा त्याला. तो इथे आल्यापासून पहिल्यांदा." दोघींनी खुशीत एकमेकींना टाळी दिली. बाबा उल्हासला ओरडल्याच्या आनंदात त्या खेळत राहिल्या ते उल्हासला बाबांबरोबर खुललेल्या चेहर्याने बाहेर पडलेलं बघेपर्यंत. सीमा, अरुणा त्यांच्यामागे धावल्याच.
"आम्ही पण येतो ना. कुठे जाताय? उल्हासच का फक्त बरोबर येतोय तुमच्या?" बाबांची मान नकारार्थी हलली आणि जीभ बाहेर काढून उल्हासने वेडावलं तशा पाय आपटत त्या लगोरीच्या खेळाकडे परत वळल्या. पण उल्हास, चिठ्ठी हा विषय काही दोघींच्या मनातून निघता निघत नव्हता. उल्हासही विचारलं तर दाद देत नव्हता. दोघींनी बरंच डोकं चालवलं आणि तीन चार दिवसांनी बाबांसमोर उभं रहावं लागलंच. दबकतच त्या दोघी समोर गेल्या.
"काय खोडी काढलीत?" सीमाने बाबांच्या प्रश्नावर साळसूद चेहरा केला.
"छे. मी नाही कुणाची खोडी काढली."
"अरुणा"
"मी पण नाही काही केलेलं."
"खोटारड्या. माझी कंपासपेटी लपवून ठेवली आहे दोघींनी."
"खोटारड्या काय म्हणतोस? आम्ही नाही कधी खोटं बोलत. आणि कंपासपेटी कुठली? आम्ही कशाला लपवू. आम्हाला तर माहीतही नाही तुझ्याकडे कंपासपेटी आहे."
"मामाने घेऊन दिली होती. नवीन." उल्हास बोलून गेला आणि काय बोलून गेलो त्याची कल्पना आल्यासारखी त्याने जीभ चावली. मामा बरोबर बाहेर जाऊन काय आणलं ते त्याला दोघींना मुळ्ळीच सांगायचं नव्हतं.
"अय्या होऽऽऽ? बाबानी दिली. नवीन. कधी? दाखव ना आम्हाला." अरुणाने भलामोठा होऽऽऽऽ लावत आश्चर्य व्यक्त केलं.
"जास्त शहाणपणा करु नकोस. तुम्हीच लपविली आहे. मामा सांग ना परत द्यायला."
"सीमा, अरुणा कंपासपेटी लपवलीत ना तुम्हीच? द्या मग ती माझ्यासमोर त्याच्या हातात. आणि लपवली नसली हे खरं असलं तरी मदत करा त्याला शोधायला. सापडली नाही तर शिक्षा तिघांनाही होईल एवढं लक्षात ठेवा." दोघींनी मान डोलवली. चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते कळल्यावरच उल्हासची कंपासपेटी त्याच्या हातात पडली.
हा प्रसंग कारणीभूत झाला असेल उल्हासच्या दृष्टीने वाईट काळ सुरु झाला त्याला? की अशा आणखी घडलेल्या गोष्टी? सीमा विचारात बुडून गेली.
आपल्या बोलण्यावर सीमा एकदम गप्पच झाली हे लक्षात आलं आणि क्षणभर आपण काय बोलून गेलो या कल्पनेने उल्हास दचकला. च्यायला, त्या सावंत काकांनी येऊन डोकं भडकवलं त्यामुळे झालं असं. फुकट कामं करुन मागतात ती मागतात वर आमच्यासारख्यांच्या मदतीवरच मोठा झालास हे ऐकवायचं. झोळी घेऊनच फिरत होतो ना मी दारोदार. सगळ्यांनी साले उपकारच केले. करा परतफेड एकेकाची कामं फुकट करुन. पण मामा, मामी काय किंवा सीमा, अरुणा काय कुणी असं त्याबद्दल बोलून दाखवलं नव्हतं त्यामुळे आत्तापर्यंत त्याच्या घोलवडच्या दिवसांबद्दलच्या भावनांबद्दल तो कधीच बोलला नव्हता. अरुणा, सीमा भावुकतेने तिथल्या दिवसांबद्दल बोलायला लागल्या की तो विषय टाळता येत नाही म्हणून हसून मान डोलवायचा. त्यावेळच्या भांडणाबद्दलही त्यांना काय अपूर्वाई होती कुणास ठाऊक. पण पूर्व आयुष्य पुसून काढता आलं असतं तर उल्हासने घासून पुसून ते स्वच्छ केलं असतं कधीच. उपकार केलेल्या माणसांना तर भेटावंसंही वाटत नव्हतं त्याला. पण आज काय बोलून गेला तो. इतरांच्या बाबतीत ठीक आहे पण मामा, मामीच्या कानावर गेलं तर? आणि सीमा, अरुणालाही काहीही कल्पना नसणार याबद्दल. पण कटु असलं तरी तेच सत्य नव्हतं का?
परिस्थितीने त्याला घोलवडला पोचवलं. बाबा गेले, म्हटलं तर दीर्घ आजारपणाने. ते बरे होतील असा आई विश्वास देत होती. अगदी शेवटपर्यंत. ती म्हणते आहे म्हणजे बाबा बरे होणार यावर केवढा विश्वास ठेवला त्याने. पण तसं झालं नाही. गेलेच ते. बाबांना पोटाच्या दुखण्याचा काहीतरी त्रास होता एवढंच ठाऊक होतं. आधी घरगुती उपचार होत राहिले. मग अधूनमधून तालुक्याच्या गावी, कणकवलीला जाणं सुरु झालं. वैभववाडी ते कणकवलीच्या फेर्या वाढायला लागल्या. बाबांना कणकवलीला जायला लागलं की बांद्याचे आजी, आजोबा वैभववाडीला उल्हासच्या सोबतीसाठी रहात. मुंबईचे, घोलवडचे मामा पैसे पाठवत. अधूनमधून मामा, मामी येऊन भेटून जात. म्हटलं तर सुरळीत चालू होतं सर्व. उल्हासला पैशाची चणचण असेल याची कल्पना येण्याइतका तो मोठा नव्हता आणि कुणी कधी तसं त्याला जाणवूही दिलं नाही. जवळजवळ वर्षभर हे असंच चालू राहिलं.
दिवाळीच्या सुट्टीत सगळे बांद्याला जमले आणि त्याचवेळेला बाबा गेले. फराळावर ताव मारुन दुपारी सगळी भावडं ओसरीवर सतरंज्या टाकून पडली होती. गप्पा गोष्टी, खिदळणं चालू होतं. बेडं उघडल्याचा आवाज झाला म्हणून सगळ्यांनी अंगणाच्या दिशेने पाहिलं. खाली मान घालून कणकवलीला गेलेला मुंबईचा मामा पायर्या उतरत होता. मुलांबरोबर तिथेच टेकलेली आजी गुडघ्यांवर जोर देत उठली. गूळ दाणे आणि पाणी आणायला उल्हास आणि अरुणाला तिने आत पिटाळलं. स्वयंपाकघरातल्या फडताळांमधून खुडबूड करत अरुणाने गूळ दाणे शोधून काढले. पितळेच्या तांब्यात पाणी आणि वाटीत गूळ, दाणे घेऊन ती दोघं बाहेर आली तेव्हा सगळं चिडीचूप होतं. आजोबांनी त्याला जवळ घेतलं. मुंबईचा मामा खाली मान घालून बसून होता.
"आजोबा, सोडा नं मला. मामाला पाणी देऊ दे." बावचळलेल्या उल्हासने स्वत:ला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मामाने पुढे होऊन त्याच्या हातातला तांब्या घेतला. त्याला स्वत:च्या जवळ बसवलं.
"उल्हास, तुला ठाऊक आहे ना, तुझे बाबा खूप आजारी होते?"
"हो." घशात शब्द अडकल्यासारखं तो म्हणाला.
"तुझे बाबा वारले राजा." तो तसाच बसून राहिला. बाबा वारले? मग आता काय करायचं? त्या क्षणी त्याला आई हवी होती. आजी पुढे झाली तसं उल्हासने तिच्या पातळात डोकं खुपसलं. त्याला एकदम गदगदून रडायला आलं. तो मुसमुसून रडत राहिला. बराचवेळ. अरुणा, सीमा, त्याची इतर मावस, मामेभावंडं सगळी मूक होऊन त्यालाच न्याहाळत बसली होती. प्रसंगाचं गांभीर्य प्रत्येकालाच कळलं होतं पण आपण आता काय करायचं ते कुणालाच कळत नव्हतं. भेदरलेल्या सशासारखी प्रत्येकाची गत झाली होती. आजीच्या पातळात खुपसलेला चेहरा बाहेर काढून तो तसाच बसून राहिला. भावंडांच्या नजरेची जाणीव झाल्यावर गंजीफ्रॉक पुढे ओढत आपली मान त्याने त्यात खुपसली. गंजीफ्रॉकने बराचवेळ तो डोळे कोरडे करत राहिला. मान वर करुन त्याने मुंबईच्या मामाकडे पाहिलं तेव्हा तो त्याच्याकडेच पहात होता.
"तू मला आईकडे घेऊन चल ना. आत्ता लगेच. ने ना रे मला आईकडे. आत्ताच्या आता. ने ना. चल जाऊ आपण कणकवलीला." हाताला धरुन उल्हासने मामाला ओढायला सुरुवात केली तसं आवेगाने मामाने त्याला कुशीत ओढलं. स्वत:चे अश्रु पुसत तो उल्हासला थोपटत राहिला.
"घोलवडचा मामा आणि तुझी आई बाबाना घेऊन येतील संध्याकाळपर्यंत. आता नाही जाता येणार आपल्याला तिकडे. आणि आई आली की रडू नकोस रे बाळा. आता तूच तिला सावरायला हवं. आहे कोण दुसरं तिला."
उल्हास नुसताच मामाकडे पहात राहिला. आई आली की रडायचं नाही? का? आणि बाबा कुठे जातील आता? सदानंदचे, त्याच्या मित्राचे बाबा वारले होते गेल्या वर्षी अपघात होऊन त्यानंतर किती चर्चा केली होती मित्रांनी एकत्र. मृत्यू, स्वर्ग, नरक, भूत....तो ते सगळं आठवत राहिला. आता बाबांचं काय होईल या विचारानेच त्याला थकवा आला. मामाच्या थोपटण्यानेही त्याला पेंग आल्यासारखं झालं. रडून, थकून झोपलाच तो.
जाग आली ती दारात थांबलेल्या गाडीच्या आवाजाने. वार्याच्या वेगाने ओसरीच्या पायर्या उतरुन, अंगणातलं बेडं ओलांडून तो गाडीपाशी पोचला. दार उघडून खाली उतरलेल्या आईला त्याने घट्ट मिठी मारली. घोलवडचा मामा आणि गाडीचा चालक उतरला. गाडीचं मागचं दार त्यांनी उघडलं. धडधडत्या हृदयाने बाबांच्या अचेतन देहाकडे उल्हासने पाहिलं न पाहिल्यासारखं करत नजर वळवली. काय करावं ते न सुचून मान खाली घालून तो तिथेच उभा राहिला. डोळ्यातलं पाणी आतल्या आत परतवण्याचा प्रयत्न करीत.
"त्यांना खाली घेतलं की नमस्कार कर रे उल्हास." घोलवडचा मामा भरल्या गळ्याने म्हणाला तसा त्याला हुंदका फुटला. घरातली सगळीच बाहेर आली. आजोबांच्या गळ्यात पडून आईने तोंडात कोंबलेला पदर पाहिला तसं उल्हासने तिला मिठी मारली. आजीने पुढे होत तिच्या लेकीला जवळ घेतलं. आजोबांनी उल्हासला बाजूला घेत, त्याचा हात धरुन त्याला पायरीवर बसवलं. काठी टेकत तेही त्याच्या बाजूला बसले. शेजारी शेजारी बसलेल्या आजोबा आणि नातवांच्या मनातल्या विचाराचं वादळ समांतर दिशेने घोंघावत होतं. लेकीच्या भवितव्याच्या कल्पनेने तिचे बाबा व्याकुळ झाले होते तर बाबांच्या आठवणीने उल्हास उन्मळून पडला होता.
त्यानंतरच्या घडामोडी इतक्या पटापट झाल्या की आयुष्याचं बदललेलं ते वळण म्हणजे परावलंबनाचा प्रारंभ होता हे उल्हासला कळायला मध्ये कितीतरी वर्ष जावी लागली. त्यावेळेला मात्र पुढच्या तेरा दिवसात तो आईचा पदर धरुन मागे पुढे फिरत होता. बाबांच्या आठवणीने आलेलं रडू आईला दिसू नये म्हणून धडपडत होता. आईला जपायचं होतं त्याला. त्याच्याशिवाय होतंच कोण दुसरं तिला. सगळी भावंडं अजाणता गरीब बिच्चारा म्हणून त्याला वागवत होते ते टाळण्यासाठी गावातल्या देवळात जाऊन तास न तास बसत होता. दहावा, तेरावा अशा दिवसांच्या गडबडीत मध्येच कुणाला तरी उल्हासची आठवण झाली की घरातलं कुणीतरी थेट देवळाकडे येई. काही न बोलता मुकाट तो घराच्या दिशेने वळे. तेराव्यानंतर नातेवाईक हळुहळू पांगले आणि आईने जवळ बसवलं.
"उल्हास, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी." आईच्या आवाजातल्या दु:खाने, निराशेने त्याचा जीव एवढा एवढा होऊन गेला.
"बाबा गेले. आता घोलवडचा मामा तुला घेऊन जाईल त्याच्या घरी."
"तू पण येशील ना माझ्याबरोबर?"
"नाही."
"मग सुट्टी संपली की मामा वैभववाडीला आणून सोडेल परत मला?"
आई काही न बोलता बसून राहिली. तोच प्रश्न त्याने पुन्हा विचारला.
"नाही. तू आता मामाकडेच राहशील."
"काऽऽऽय?" तो किंचाळलाच.
"हो आणि मी इथे बांद्याला."
"पण मग माझी शाळा? वैभववाडीचं घर?"
"मामा घालेल तुला शाळेत. वैभववाडीच्या घरातलं सामान आणावं लागेल. पण ते पुढचं पुढे. बघू त्याचं काय आणि कसं करायचं ते."
"तू चल ना मामाकडे."
"नको, तू जा. सुट्टीत येशील तेव्हा भेटू. नाहीतर मी कधीतरी येईन भेटायला. पत्र मात्र टाकत जा दर आठवड्याला." वैभववाडी सोडायचं दु:ख विसरुन कितीतरी वेळ आईने घोलवडला यावं म्हणून त्याने हट्ट धरला. मामाच्या आग्रहाला सुद्धा ती बळी पडली नाही. आता आज इतका कालावधी गेल्यावर त्याला कळत होतं तिला मामावर दोघाचं ओझं लादायचं नव्हतं. त्यासाठी तिचा अट्टाहास होता तो. तेव्हा मात्र तो तिच्यावर रागावून बसला होता.
मामा, मामी, अरुणा आणि सीमाबरोबर तो घोलवडला आला. हातात एक कापडी पिशवी. बांद्याहून तो थेट इथे आला होता. बांदा ते मुंबई एस टी ने, नंतर रेल्वे. पुस्तकं, वह्या सगळं वैभववाडीलाच राहिलं होतं. प्रवासभर त्याचे मित्र आता कसे भेटणार, त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा याच चिंतेने त्याला घेरलं होतं. आईने दर आठवड्याला पत्र पाठवायचं कबूल करुन घेतलं होतं. तसं मित्रांना पाठवायचं? पण पत्ता? खूप विचार करुन आईच्या पत्रात मित्रांना पत्र लिहायचं त्याने मनात पक्क केलं. आई जाईल वैभववाडीला तेव्हा देईल त्यांना हे ठरवलं आणि त्याचं मन उल्हासित झालं. घोलवडला पुस्तकं, वह्या, दप्तर, कपडे...मामा सगळं घेऊन देणार होता. आईने बजावलं होतं, मामा, मामीला धरुन रहा. त्याचं ऐक. सीमा, अरुणाशी गोडीने वाग. मनातल्या मनात त्याची उजळणी करत बर्याचवेळाने त्या रात्री कधीतरी तो झोपला.
पुढचा आठवडा चांगला गेला. मामाने शाळेची तयारी करुन दिली. मामी त्याला विचारुन विचारुन त्याच्या आवडीच्या गोष्टी करत होती. अरुणा, सीमाने त्याच्या शेजारपाजारच्या मुलांशी ओळखी करुन दिल्या. सुट्टी असल्याने दिवसभर बाहेर उंडारण्यात जायचा. सकाळ झाली की तिघं सुटायचेच. सायकल दामटव, लगोरी, विटी दांडू असले खेळ नाहीतर गप्पांचा अड्डा. दुपारी जेवणापुरतं घरात. हातावर पाणी पडलं की पुन्हा बाहेर. संध्याकाळी घरात आलं की हात पाय धुऊन परवचा म्हणायची आणि जेवायला बसायचं. दिवस कसा संपे तेही कळत नव्हतं. पण रात्री फरशीवर पसरलेल्या गादीवर पडलं की आई, बाबांच्या आठवणीने जीव कासावीस व्हायचा. मध्यरात्री कधीतरी जाग आली की डोळ्याच्या कडांनी ओघळलेल्या पाण्याने त्याचं त्यालाच तो झोपेत रडत असल्याचं जाणवायचं. उल्हास उठून बसायचा. बाजूलाच झोपलेल्या सगळ्यांकडे नजर टाकून कुणाला कळलं तर नाही ना याची खात्री करुन घ्यायचा. दिवाळीची सुटी संपली आणि शाळेत जायच्या आदल्या रात्री त्याच्या पोटात गोळा आला. शाळेच्या पहिल्या दिवशी वैभववाडीला दरवर्षी आई, बाबा बरोबर यायचे. इथे मामा येईल शाळेत बरोबर? निदान सीमा, अरुणा?
धडधडत्या अंतःकरणाने लवकर उठून तयार होऊन शाळेत जाण्यासाठी तो सीमा, अरुणाच्या बाजूला उभा राहिला. नवीन दप्तर, चप्पल. खूश होता तो अगदी. मामा, मामी येतील बरोबर शाळेत असं वाटत होतं तेवढ्यात मामाने दोघींना उल्हासला शाळेत सोबत करा, वर्ग दाखवा त्याचा म्हणून सांगितलं. दोघींनी अनपेक्षितपणे ठाम नकार दिला. दात ओठ खात तो दोघींकडे पहात राहिला. आल्यापासून इतके दिवस तर चांगल्या वागत होत्या. आता का हा आडमुठेपणा? दोघींशी बोलायचं नाही असं मनाशी ठरवून टाकलं त्याने. मामाचा हात घट्ट धरुन तो शाळेसाठी बाहेर पडला. घरी खेळतात नीट पण शाळेत एकत्र जायचं नाही. ठीक आहे. रागारागाने सीमा, अरुणाशी शाळेत ओळख दाखवणंसुद्धा त्याने बंद करुन टाकलं ते एक दिवस गावडेबाईंनी मामाला बोलवू का विचारेपर्यंत. त्या दिवशी बाई काय शिकवत होत्या तेच कळत नव्हतं. काही केल्या लक्षच लागत नव्हतं. बाबांची आठवण येत होती. आईशी बोलावंसं वाटत होतं. बाकड्यावर मान टेकवून तो अश्रू दडवत होता. गावडेबाईंचा आवाज कानावर पडत होता पण शब्द मनापर्यंत पोचत नव्हते.
"उल्हास काय झालं?" त्याच्या पाठीवर थोपटत गावडेबाईंनी विचारलं तेव्हा गडबडून त्याने मान वर केली.
"अं? काही नाही."
"काही नाही कसं. रडतो आहेस त्याला काहीतरी कारण असणार ना?" तो काहीच न बोलता डोळे पुसत राहिला. शेवटी गावडेबाईंनी सीमाला बोलवून घेतलं. तिच्या हातात चिठ्ठी दिली. काय लिहिलं असेल बाईंनी याचाच विचार उल्हास शाळा सुटेपर्यंत करत राहिला.
तीच सुरुवात असेल उल्हासची बाबांच्या मागे मागे करण्याच्या सुरुवातीची? त्याला शाळेत घेऊन जायला नकार दिला तेव्हापासून तर तो शाळेत ओळखही दाखवायचा नाही. नंतर ते चिठ्ठीचं. कंपासपेटी लपवून ठेवल्यानंतरच गावडे बाईंनी चिठ्ठी का दिली ते कळलं होतं. तिथून झालं असेल हे सुरु? सीमा मनातल्या मनात माझा वाईट काळ होता तो... या उल्हासच्या वाक्याचा प्रत्येक प्रसंगाशी संबंध लावून ताडून पहात होती. कदाचित शाळेत जमलं नसेल त्याचं, सहामाही परीक्षेनंतर आला होता तो घोलवडला त्यामुळे वर्गातही पटकन रुळणं जमलं नसावं, नाहीतर घरी त्याच्या मनालाच जपण्याचा प्रयत्न चालू होता आई, बाबांचा. तिच्या डोळ्यासमोरुन एक प्रसंग सरकून गेला. छान गप्पा रंगल्या होत्या. सगळे चहाचे घोट रिचवत इकडचं तिकडचं बोलत होते. अरुणाने खुर्ची आत सरकवली आणि आपला चहाचा कप उचलला. सीमानेही तेच केलं. इतक्यात उल्हासला शेजारच्या घरातून कुणीतरी हाक मारली तशी तो पटकन उठून गेलाच.
"उल्हास" सीमाच्या आवाजाने तो थबकला.
"तुझा कप उचल ना आणि धुऊन पण ठेव. तू तसाच का ठेवतोस?" उल्हास काही न बोलता मागे वळला. आपली कपबशी उचलून धुऊन ठेवून तो बाहेर गेला.
"अगं, धुतला असतास त्याचाही कप तर काय झालं असतं?" आईने तिच्याकडे पहात म्हटलं.
"का? मी का धुवायचा? रोज तसाच टाकून उठतो तो. आम्हाला देता का असं करु?"
"नवीन आहे तो या घरात." बाबांनी तिला समजावयाचा प्रयत्न केला तेवढ्यात अरुणा तणतणली.
"किती दिवस राहणार तो नवीन? आता आपल्याकडेच राहणार आहे तर त्याला पण सांगा आपली कामं आपणच करायची म्हणून." अरुणाच्या बोलण्यावर बाबांनी नुसतीच मान डोलवली. पण ठिणगी पडली होती. उल्हास इथे आल्यापासून सगळं घरदार त्याच्याच मागे असं वाटायला लागलं होतं दोघींना. त्याला हे घर परकं वाटू नये याचा आटोकाट प्रयत्न करत होते आई, बाबा आणि तो मात्र तिर्हाईतासारखा वावरणार सतत. आपलं झालं की झालं असं वागणार. त्याच्या वागण्याचा त्यांच्यापरीने निषेध करायचे मार्ग त्या दोघी शोधत होत्या. सुरुवातीला व्यवस्थित वागणार्या दोघींचं वागणं अचानक बदललंच. उल्हासला शाळेत घेऊन जायला नकार दिल्यानंतर तर सतत काही ना काही चालूच झालं. कोणत्या ना कोणत्या कारणाने तिघांमध्ये सतत धुसफुस चालू असे. एकमेकांना त्रास देण्याची एकही संधी कुणीच वाया घालवत नव्हतं. आई, बाबा पोरखेळ म्हणून दुर्लक्ष करत होते. पण त्याचा इतका गंभीर परिणाम झाला उल्हासवर? वाईट काळ वाटावं असा? मामा, मामीने कौतुकाने, प्रेमाने केलं तेही नगण्य ठरावं इतका? म्हटलं तर हे प्रसंग साधे, कुणाच्याही घरी सख्ख्या भावंडांमध्येही घडू शकणारे. मग काय चुकलं? कुणाचं?
हातात फोन तसाच धरुन उल्हासही तसाच उभा होता. त्याच्या डोळ्यासमोरुनही तेच प्रसंग चलतचित्रासारखे सरकत होते. मामा शाळेत आले तरी सीमा, अरुणाने त्याला त्यांच्या बरोबर येऊ दिलं नाही त्यामुळे संतापलाच होता तो त्यादिवशी. वाटोळ्ळं केलं होतं त्या दिवशीच्या त्याच्या आनंदाचं त्यांनी. सूड म्हणून बोलणंच बंद केलं त्याने दोघींशी. काही दिवसांनी त्याचा राग निवळला पण त्या सांगतील त्या विरुद्ध करायचं, भांडण उकरून काढायचं ह्याची त्याला गंमत वाटायला लागली. वेळही छान जायचा. विचार करायला सवडच रहायची नाही. सहा महिने असंच चालू होतं. मे महिन्याच्या सुट्टीत आई आली आणि सगळं बदललं. काय करु नी काय नको असं होऊन गेलं होतं त्याला. मामा, मामी, आई सगळ्यांकडून कौतुकच चालू होतं त्यामुळे सीमा, अरुणाचा त्रासही त्याला तितकासा जाणवत नव्हता. किती भराभर दिवस संपले ते. एक महिना राहिली ती. परत जायच्या आदल्या दिवशी मागच्या अंगणात उभी होती झाडापाशी. एकटीच, विचारात हरवलेली.
"इथे का उभी आहेस?" तोही तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"विचार करते आहे."
"कसला?"
"असाच रे. आपलं भविष्य काय याचा."
"म्हणजे?"
"अरे, आता काही तू इतकाही लहान नाहीस की परिस्थितीची जाणीवच नसावी."
"स्पष्ट सांग ना. मला कळलं नाही तू काय म्हणते आहेस ते." उल्हास गोंधळला.
"अरे, कसा वागतोस सीमा, अरुणाशी. दोघी तुझ्या वयाच्या आहेत. पण आपल्या आणि त्यांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचं अंतर पडलं आहे आता. पड खाऊन वागायला कधी जमणार तुला? मुलांची भांडणं म्हणून मामा, मामी दुर्लक्ष करतात. पण अती झालं तर पाठवून देतील तुला बांद्याला."
"त्या दोघी भांडकुदळ आहेत. मला काहीही मिळालेलं चालत नाही त्यांना. पेन्सिली मोडून टाकतात, माझी पुस्तकं लपवून ठेवतात."
"आणि तू नाही त्यांना त्रास देत? मुद्दाम जोरजोरात कर्कश्य स्वरात गाणी म्हणायची. खेळताना ढकलून द्यायचं. त्यांनी काही विचारलं की उत्तरच द्यायचं नाही. पहाते आहे मी महिनाभर काय चालू आहे ते."
"आई, मी येतो बांद्याला तुझ्याबरोबर. मला नाही रहायचं इथे."
"अरे एकदम काय हे?"
"तुझी आणि बाबांची खूप आठवण येते गं. मी येतो ना तुझ्याबरोबर."
"म्हणून असा वागतोस दोघींशी? किती बदलला आहेस रे तू. पूर्वीचा खेळकर उल्हास मला शोधूनही सापडत नाहीये तुझ्यात. बाबा गेले त्यामुळे इतका बदललास की घर सोडून रहावं लागतं आहे म्हणून?"
"मला नाही ठाऊक. पण मला आता इथे रहायचंच नाही. मी तुझ्याबरोबर येतो ना बांद्याला."
"काय रे हे तुझं? तिकडून येताना तू घोलवडला चल म्हणून मागे लागला होतास. आता मी बांद्याला येतो म्हणून. सारखा काहीतरी हट्ट चालूच. लहान का आहेस तू असं हटून बसायला."
"तेच तेच नको गं सांगू. मी येऊ का तुझ्याबरोबर ते सांग आधी."
"थोडं बस्तान बसू दे रे बाबा माझं आधी. सुखासुखी नाही ठेवलेलं मी तुला इतकं दूर माझ्यापासून. आजी, आजोबांनी निवांत दिवस घालवायचे तर माझी जबाबदारी आली आहे त्यांच्यावर. आता इथे मुलात मूल म्हणून होऊन जातं आहे तुझं. कळ काढ काही दिवस. मामा, मामी प्रेमाने करता आहेत तर त्रास नको देऊ त्यांना. सीमा, अरुणाशी पडतं घे बाबा. शेवटी दुसर्याकडे रहातो आहेस हे विसरुन नाही चालणार. बांदा छोटं गाव आहे पण आजोबा मला कुठे काम मिळेल का ते बघतायत. तसं झालं तर लगेच घेऊन जाईन मी तुला."
आईच्या त्या एका भेटीने उल्हास अकाली प्रौढ झाला. त्याचं वागणं बदललं. तो अधिकाअधिक घुमा होत गेला. प्रत्येकाशीच फटकून वागायला लागला. चांगलं वागायचं या विचाराचं मनावर सतत दडपण यायला लागलं तसा सीमा, अरुणाच्या वार्यालाही फिरकेनासा झाला. दर आठवड्याला आईला लिहिलेल्या पत्रात तिच्या नोकरीबद्दल तिला विचारत राहिला. त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. कसाबसा शाळेचा अभ्यास उरकायचा आणि निरुद्देश भटकत रहायचं. निष्काळजी, बेफिकीर होत गेला. आपलं झालं की झालं ही वृत्ती बळावली. येऊन जाऊन सारखी आईला पत्र लिहायची. नोकरी शोध म्हणून मागे लागायचं. पत्रातलं अक्षर न अक्षर त्याला आठवलं आणि क्षणभर स्वत:ची शरम वाटली. जेमतेम दहावी पास झालेल्या आईला कुठे नोकरी मिळणार होती? आईच्या मनावरचा ताण वाढवायलाच कारणीभूत झाला होता तो. आईची सातत्याने एकाच प्रकारचा मजकूर असलेली पत्रही त्याला पाठ झाली होती.
प्रिय उल्हास,
माझा दिनक्रम व्यवस्थित चालू आहे. तू स्वत:ची काळजी घे. मामा, मामींना त्रास देऊ नकोस. सीमा, अरुणाशी भांडू नकोस. आता तीच सगळी तुझा आधार आहेत. आणि मामा, मामी किती प्रेमाने करतात ते पाहिलं आहे मी. अरुणा, सीमाशी भांडून तू त्यांचा त्रास वाढवू नकोस. तू प्रत्येक पत्रात माझ्या नोकरीची आठवण करुन देतोस, तुला बांद्याला यायचं आहे असं लिहितोस. मला कळत का नाही? तुझ्यापासून लांब रहाणं मलाही नको वाटतं पण दैवाने आपल्यावर परिस्थितीच अशी लादली आहे की यातून मार्ग कसा काढायचा या विचाराने रात्र रात्र झोप लागत नाही. अरे, माझं शिक्षण ते किती. कोण देणार बाबा मला नोकरी? पण तुझे आजोबा बोलले आहेत एक दोघांशी. हिशोबाचं काम मिळेल असं वाटतं आहे. ते जमलं तर ये तू इकडे. काय चार घास खायचे ते खाऊ एकत्र. तुझं सगळं मार्गी लागलं की झालं - तुझी आई."
अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि शिक्षणासाठीच तर मामानं ठेवलं होतं. मग परत जायचं बांद्याला की अभ्यास करुन हुशारी दाखवायची? स्वत:ला सिद्ध करायचं? पण अभ्यासात लक्ष घालून करायचं काय? कुणी डॉक्टर, इंजिनिअर करणार नव्हतं. कुणाला परवडणार तो खर्च? मग फुकटचा डोक्याला ताप कशाला अभ्यासाचा? उल्हासचं वागणं बेतालपणाकडे झुकायला लागलं. मामी बहुधा मामाच्या कानावर घालत असावी त्याचं वागणं, बोलणं, तास न तास घराबाहेर रहाणं. अधूनमधून मामा उपदेशपर बोलायचा. एका कानातून ऐकायचं आणि दुसर्या कानांनी सोडून द्यायचं हे तंत्र त्याने वापरलं ते आईचं पत्र येईपर्यंत.
उल्हास,
आनंदाची बातमी कळवायला पत्र लिहिते आहे. मला छोटीशी नोकरी मिळाली आहे. आपण आजी आजोबांकडे राहू त्यामुळे तो खर्च नाही. बाकी तुझी पुस्तकं, गणवेश सारं काही माझ्या पगारात भागेल. मदतीला तुझे दोन्ही मामा आहेतच. आता मुद्दयाचं लिहिते. काय चालू आहे तुझं? का असं वागतो आहेस? बाबा गेले हे दु:ख आता कायमचंच पण म्हणून तुझं उभं आयुष्य असं झाकोळून गेलेलं बाबांनी पाहिलं तर त्यांना तरी आवडेल का हा विचार कर. तू काही परक्याच्या घरी नाहीस किंवा तुला कुणी त्रास देतं आहे असंही नाही. कुठून कुठे पोचलास तू. हरहुन्नरी, खेळांमध्ये अट्टल, अभ्यासात प्रवीण म्हणून वैभववाडीला ओळखायचे सारे तुला. मामा कंटाळतो रे तुझ्या वागण्याला. फार झालं तेव्हा पत्र पाठवलं आहे त्याने. अभ्यास करत नाहीस. जेमतेम पास होतोस. दिवसच्या दिवस बाहेर उंडारत असतोस. भविष्यकाळाच्या भयाण चित्राने छाती दडपते माझी. तू लवकरात लवकर पोटापाण्याला लागावंस हेच आहे डोक्यात पण त्यासाठी शिक्षण नको का? लहान वयात तुझ्यावर जबाबदारीचं ओझं पडणार आहे. पण आयुष्य असंच असतं. घरातला कर्ता पुरुष गेला ना अकाली की मुलांवर भार पडतो मोठं होण्याचा. इलाज नाही. त्यातून कसं सावरायचं ते पहायला हवं ना? पण तुझं बघावं तर काही तरी तिसरंच. वार्षिक परीक्षा झाली की मामा तुला बांद्याला सोडतो आहे. रागावून नाही. काळजीने. त्याला वाटतं आहे मी जवळ असले तर तू जबाबदारीने वागशील. समजुतीने घे. - तुझी आई.
मामाचा राग आला तरी बांद्याला आईजवळ रहाता येणार या कल्पनेने सुखावला उल्हास. उरलेले दिवस, महिने फार काही न घडता पार पडले आणि उल्हास बांद्याला आला. घोलवडचं दीड वर्ष पहाता पहाता मागे पडलं. चूक कुणाची होती? परिस्थितीची? अजाणत्या वयाची? सीमा, अरुणाची? मामा, मामीची? आईची की परिस्थितीमुळे बदलत गेलेल्या, काहीवेळा फुकट गेला म्हणण्याइतपत पातळी गाठलेल्या, आक्रमक झालेल्या स्वत:चीच? उल्हास विचार करत राहिला. पण काही झालं तरी सीमाला अशा शब्दात नको होतं जाणवून द्यायला घोलवडच्या दिवसांबद्दल. त्याचं त्यालाच हे जाणवलं आणि त्याने सीमाचा नंबर फिरवला.
तसा दिड वर्षच होता उल्हास घोलवडला. पण त्या दिड वर्षात उल्हासच्या वागण्याच्या किती वेगवेगळ्या तर्हा अनुभवल्या. सीमा अजूनही वर्षावर्षांचे हिशोब मांडत होती. कुणाचं आणि काय चुकलं हे कोडं सोडविण्याचा चंगच बांधला होता तिच्या मनाने. उल्हास आल्या आल्या त्याच्याबद्दल वाटणार्या कुतूहलाचं रुपांतर द्वेषात व्हायला त्याला मिळणार्या सोयी सवलतींमुळे फार वेळ लागला नाही. सुरुवातीला एकमेकांशी जमवून घेणारी, मैत्रीच्या दिशेने आपसूकच वळलेली पावलं कधी तिरकी पडायला लागली हे समजलंच नाही. एकमेकांना त्रास देणं हे एकच ध्येय होऊन गेलं मग तिघांचं काही काळ. कितीतरी वेळा आई, बाबा भांडणं सोडवून कंटाळायचे. तिघांनाही उपदेशाचे डोस पाजायचे. आत्या येऊन गेल्यावर मात्र उल्हासचं वागणं एकदम बदललंच. पण तो बदलही सुखावह नव्हताच. घरातलाच असूनही तो तिर्हाईत झाला. विचित्र दुरावा आला त्याच्या वागण्याबोलण्यात. उल्हासच्या वागण्याने आई, बाबा किती कंटाळले होते तरी समजुतीने घ्यायचा प्रयत्न करत होते ते सीमा, अरुणाला दिसत होतं, उल्हासशी बोलून ते त्याला दाखवून द्यावं असं दोघींना वाटत होतं. पण तो दोघींच्या आसपास फिरकतच नव्हता फारसा. त्याच्याशी निवांतपणे बोलण्याची संधी मिळेपर्यत उल्हास जसा टोळधाडीसारखा अचानक त्यांच्या आयुष्यात आला तसा गेलाही. पार बांद्याला पोचला. मग अधूनमधून होणार्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या भेटी. तेव्हा सगळीच भावंडं असायची. धम्माल करायची. दोघी घोलवडच्या त्याच्याबरोबरच्या दिवसांबद्दल आठवणी काढायच्या, भांडणाबद्दल बोलायच्या. ते वयंच तसं होतं. सगळेच अजाण होतो असं म्हणत तो दोघींच्या सुरात सूर मिसळायचा.
पहाता पहाता वर्ष लोटली. उल्हासने शिक्षण सोडलंच बारावीनंतर. अल्प मुदतीचे तांत्रिक अभ्यासक्रम करत तो मोठा झाला. कुणाकुणाकडे छोटी मोठी कामं करत राहिला. जीवनाच्या शाळेत घडत गेला. एकेक अनुभव घेत पैसे आणि अनुभवाची पुंजी गाठीशी बांधून बांद्यामध्येच त्याने यंत्र दुरुस्तीचं दुकान काढलं. कोणतंही यंत्र दुरुस्त करण्यात त्याचा हात धरणारं अख्ख्या पंचक्रोशीत कुणी नाही असं आत्या कौतुकाने सांगायला लागली. आई, बाबांना उल्हास मार्गी लागल्याचा किती आनंद झाला होता. बांद्याला अजूनही जात होतेच सगळे सुटीत. बांद्यातच उल्हासनेही स्वतंत्र घर घेतलं होतं. मामा, मामी बांद्याला आले की येऊन भेटून जायचा. पण माझ्या घरी या असं काही तोंडून निघायचं नाही. आत्याला फार वाईट वाटायचं. ती सुद्धा सुरुवातीला उल्हास बरोबर रहात होती. त्याचं लग्न झाल्यावर अपुरी जागा, आजी, आजोबांबरोबर कुणी हवं म्हणून पुन्हा ती आजोबांकडेच रहायला आली. खरं कारण काय होतं ते तिचं तिच जाणे. आल्या गेल्याचं कौतुकाने करण्याच्या बाबतीत तिचा हात कुणी धरु शकत नव्हतं. आणि तिचाच मुलगा असलेल्या उल्हासला मामा, मामी बांद्याला आल्यावर साधं घरी बोलावणंही जड जात होतं. उल्हास भेटायला आला की आईच स्वयंपाकघरात शिरुन त्याच्या आवडीचे पदार्थ करणार. उल्हास तिच्या मागे जाऊन मामी, मामी म्हणत स्वयंपाकघरात गप्पा मारणार याचं आई, बाबांना कोण कौतुक. सीमा, अरुणाला मात्र याची प्रचंड चीड येई. वय झालेल्या मामा, मामीसाठी आता त्याने काही करायचं की त्याचेच लाड अजूनही आई बाबांनी पुरवायचे?
आणि आज त्याने म्हणावं, घोलवडचे दिवस हा माझा वाईट काळ होता.... बोलायला हवं मोकळेपणाने त्याच्याशी. विचारायला हवं, सांगायला हवं आपल्याला काय वाटत होतं, वाटतं. काय चुकत गेलं दोघींचं. काही गोष्टीत तो चुकला होता, चुकतो आहेच अजूनही. तो काळच असा होता की आडनिडी वयं आणि अवघड परिस्थिती सांगड घालून एकत्र उभ्या होत्या. प्रत्येक गोष्टीचा परिणाम जसा त्याच्यावर होत होता तसं त्याच्या परिस्थितीशी जुळवून घेणं आमच्यावरही होतंच की. जवळ असूनही अंतर वाढत गेलं मनातलं. सुरुवातीला हक्काने घोलवडला स्वत:चं घर समजणार्या उल्हासने नंतर त्याचा तिर्हाईतपणा कायमचाच जपला पण का ते कधीच कळलं नव्हतं. आणि आज अचानक ते असं पोचलं होतं. त्याच्या मनातलं बाहेर आलं. समज, गैरसमज बोललं तरच दूर होतील. खरंच त्याच्या अशा बोलण्यावर रागावून उत्तर नाही सापडणार. शांतपणे बोलायचा प्रयत्न करायला हवा, नाही जमलं ते तर कधीतरी सोक्षमोक्ष लावायलाच हवा. या कारणाने एक घाव दोन तुकडे झाले तरी चालतील पण बोलून मोकळं व्हायला हवं. सीमाने फोन उचलला पण हातात तसाच धरुन ठेवून ती बसून राहिली. विचारात हरवली. तितक्यात फोन वाजला. कंटाळल्यासारखा तिने कुणाचा आहे ते पाहिलं आणि चेहर्यावर स्मितहास्य उमटलं सीमाच्या.
"उल्हास! अरे, बोल. अरे मी तुला फोन करायच्याच विचारात होते....." आता कुठे त्या दोघांमध्ये खरा संवाद सुरु होत होता. समज गैरसमजाचे पडदे विरळ व्हावेत, मनं स्वच्छ व्हावीत आणि उल्हासचं वेगळं रुप आत्या, आई, बाबांना या बोलण्यानंतर दिसावं अशी मनोमन प्रार्थना करतच ती उल्हासशी बोलायला लागली.
(पूर्वप्रसिद्धी - श्री. व सौ. दिवाळी अंक २०१४)
.
.
छान आहे कथा ,मोहना.. वेरी
छान आहे कथा ,मोहना.. वेरी सेंसिटिव
उत्तम कथा. खूपच सुरेख
उत्तम कथा.
खूपच सुरेख लिहिलीय.
छान आहे..
छान आहे..
छान आहे कथा . आवडली .
छान आहे कथा . आवडली . कुठल्याही एका पात्राला नायक अथवा खलनायक बनवल नाहीत ते आवडल. माणसामध्ये प्रत्येकाचे असे गुणदोष असतात . त्यांच अस गुणदोषासकट रेखाटन तुमच्या कथेत दिसत .
आवडली
आवडली
खूप आवडली. मानवी स्वभावातले
खूप आवडली. मानवी स्वभावातले बारीक बारीक पैलू फार सुंदर रित्या सादर केलेत.
छान लिहिलं आहेस मोहना
छान लिहिलं आहेस मोहना
छान
छान
खूप आवडली. मानवी स्वभावातले
खूप आवडली. मानवी स्वभावातले बारीक बारीक पैलू फार सुंदर रित्या सादर केलेत. >>>>>> +१००.
मुलांच्या अडनिड्या वयातल्या स्वभावाचे जे बारीक पैलू रेखाटलेत ते तर अतिशय अप्रतिम ....
आवडली कथा
आवडली कथा
छान आहे . आवडली.
छान आहे . आवडली.
आवडली
आवडली
आवडली पात्रं एकदम Black
आवडली
पात्रं एकदम Black किंवा white रंगवली नाहीत हे छान वाटलं.
अजून वाचायला नक्कीच आवडेल
आवडली.
आवडली.
खूप मस्त कथा माणूस वाईट नसतो
खूप मस्त कथा
माणूस वाईट नसतो तर परिस्थिती त्याला तस वागायला भाग पाडते
कथा आवडली
कथा आवडली
कथा फार आवडली.
कथा फार आवडली.
छान उतरली आहे.
छान उतरली आहे.
आवडेश... पुलेशु.
आवडेश...
पुलेशु.
चांगली लिहिलीय. दोन्ही माणसं
चांगली लिहिलीय.
दोन्ही माणसं कशी एकाच वेळी, विचारात गुंफतात आणि आपापल्या कृतीचं समर्थन करतात.
चूक कोणाचीच नसते आणि असतेही.
प्रत्येक जण फक्त आपापल्या दृष्टीनेच आपल्या बाजूचाच विचार करतो हेच एक खरं असतं.
त्यामुळे,
ह्या वाक्याला
>>प्रत्येक गोष्टीचा परिणाम जसा त्याच्यावर होत होता तसं त्याच्या परिस्थितीशी जुळवून घेणं आमच्यावरही होतंच की>><< +१०००
पण कधी कधी ह्या गैरसमजाची पाळं मुळं इतकी खूल रुजतात की, ती अशी सहजासहजी खुली नाहि होत.
दोन्ही पात्रांचे मनोव्यापार
दोन्ही पात्रांचे मनोव्यापार मस्त रेखाटले आहेत. सुंदर जमली आहे कथा!
सुरेख लिहिले आहे... उत्तम..
सुरेख लिहिले आहे... उत्तम..
सर्वांना धन्यवाद. झंपी <<,पण
सर्वांना धन्यवाद. झंपी <<,पण कधी कधी ह्या गैरसमजाची पाळं मुळं इतकी खूल रुजतात की, ती अशी सहजासहजी खुली नाहि होत.>>> अगदी खरं पण ती तशी व्हावीत म्हणून सकारात्मक शेवट केला
कथा आवडली.
कथा आवडली.
मोहना, सुरेख जमलीये कथा.
मोहना, सुरेख जमलीये कथा. नकळत्या वयातल्या घटनांची पाळमुळं किती खोलवर रुजतात... परिस्थिती कशी मानसिकता घडवते- बि'घडवते...
खूप आवडली
मस्त...
मस्त...
कथा आवडली.
कथा आवडली.
<< कुठल्याही एका पात्राला
<< कुठल्याही एका पात्राला नायक अथवा खलनायक बनवलं नाहीत ते आवडलं.>> +1
शेवटी दोघांच्याही विचारसरणीत झालेला सकारात्मक बदल आवडला.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
Pages