वॊर्डरोबचे वरचे खण म्हणजे माझ्या मते स्टोरेज कमी आणि आठवणींचेच कप्पे जास्त असतात. ही जागा जेवढी मोठी, तितक्या जास्त आठवणी. साधारणत: तुम्ही वयाची चाळीशी गाठत आलात की हे कप्पे खचाखच साठून जातात.
अशाच एका निवांत दुपारी हे कप्पे घडीत लावताना सर्टीफिकेट्स ठेवलेली ती पिवळ्या रंगाची जुनी फाइल मिळाली. आजच्या मितीस, गुंतवणूकीच्या, शेअर्स, एलआयसी, म्युच्युअल फंडस पासून ते अग्रीमेन्टसच्या अनेक कडक करकरीत फाइल शेल्फमधे टेचात उभ्या आहेत. पण ज्यामुळे हे सारं शक्य झाले असेल ती मूळ शिक्षण आणि पदव्यांची फाइल मात्र कित्येक वर्ष तेच जुने कळकट पिवळे कपडे घालून वर कुठेतरी शांतशी पडून आहे. सुरुवातीला नोक-या बदलताना, मग साफसफाई, आणि आजच्या सारखं ’उगाच’ अशा अनेक कारणाने तिला कितीदा तरी चाचपून, उघडून पाहिलंय. पण तरीही नव्या फाइलच्या वेष्टनात तिला बांधावं असं मात्र कधीच वाटलं नाही. जणू त्या पिवळ्या फाटक्या फाइललाही माझ्या चारदोन आठवणी चिकटल्या असाव्यात, तसं काहीसं !
तर .. त्यादिवशी ’उगाच’ ती फाइल जमिनीवर उतरवली. अंss… उगाच तरी कसं म्हणू… कारणही आहे तसं… गेले काही दिवस फेसबुकवर रोज एकेक करुन शाळेतले जुने मित्र आणि मैत्रिणी भेटताहेत. काही पाच काही दहा तर काही तब्बल बावीस वर्षांनी !! मी तिला - मग ती त्याला- मग तो आणखी कुणाला असं करत, रोज कुणी ना कुणी नवा भेटतोच आहे.
फेसबुक प्रोफाइलवर काही चेहरे चौकटीत लावलेले… बदललेले.. थोडं प्रौढत्व चेह-यावर मिरवणारे..! काहींचे फोटो नाहीत ते कसे दिसत असतील अशी उत्सुकता जागवणारे… ! अशातच एकीने चौथीतला ग्रुप फोटो अपलोड केला, म्हणून आणखी कुणी सातवीतला.. त्या तीन चार वर्षातही चेहरे बदललेले.. मग आता बावीस वर्षांनी कसे असतील .. कसे दिसतील म्हणून अंदाज वर्तवण्याची ऒनलाइन स्पर्धा ! फोटोतले सर, फोटोतल्या बाई.. ओळखा पाहू कॊन्टेस्ट आणि किती किती विषयांचे ऒनलाइन चर्चासत्र.. !
मग आता मलाही जुना शाळेतला फोटो शोधायला नको का ? हं… ! हा काय मिळालाच… ! अनुराधा नार्वेकर, सहावी ब ! चला आताच स्कॆन करुन अपलोड करते आणि सगळ्यांना टॆगसुद्धा ! मग त्या क्लासटीचर असलेल्या सरांची आठवण ! त्याच का ?- मग प्रत्येक वर्षाचे क्लासटीचर सर आणि बाई आठवण्याची शर्यत !
अशा एकेक आठवणींची मालिका सुरु झाली की थांबत नाही. पण असे किती दिवस फोटो पहात ऒनलाइनच गप्पा मारणार आपण ? आता आपल्याला भेटायलाच हवंच दोस्तानो.. !
आणि……… असं नुसतं बोलूनच गप्प न राहता... आम्ही चक्क पंधरा दिवसांत भेटलोसुद्धा !! ती शनिवार संध्याकाळ.. फक्त दोन-तीन तास.. आणि आमच्या बॆचचे तीसेक चेहरे.. जितक्यापर्यंत पोहोचता आलं तितकेच ! काही मुद्दाम पुण्याहून तर एक नागपूरहून आलेली आणि काही मुंबईतल्या मुंबईत असूनही येऊ न शकलेले !
ओळख बघू मी कोंण ? … एsssss चेहरा जाम ओळखीचा वाटतोय.. ए आठवलं.. अरे तू तो हा ! करेक्ट.. ? बरोब्बर. ! ओळखलं म्हणजे काय ? अजून तसाच आहे मस्तीखोर.. मग ओळखणार नाही का.. अग… तू तर अजून उंचीने तितकीच आहेस की.. पुन्हा शाळेत बसशील.. काय करतोस- कुठे रहातेस.. आताच आडनाव काय ग ? आणि तुझी तीsss ती ग गोरी गोरी मैत्रिण, हं तीच ! ती कुठे असते आता ? ए गेल्या वर्षी अमके सर भेटले होते मला.. खूप थकलेत आता ! तू त्या सरांचं रोजचं गि-हाइक होतास ना.. ! तुला किती मुलं ग.. ! आईशप्पथ.. तू लव्हमॆरेज केलंस ? लग्नाला किती वर्ष झाली.. ? ओह.. मुलगा दहावीत आहे ? वाटत नाही ग तुझ्याकडे पाहून ... ह्या सगळ्या प्रश्नोत्तराच्या तासानंतर, मग आम्ही सातवी असतानाचं त्यावेळंचं गाजलेलं गाणं.. ते त्या वेळेसारखंचं आजही तितकंचं अफलातून गाणारा आमचा शाळकरी मित्र.. उगाच माझ्याही चारदोन कविता.. किती किती किती म्हणून गंमती सांगू..??
बावीस वर्षापूर्वींचे तेच चेहरे… फक्त घट्ट वेण्यातल्या मुलींच्या बाया झालेल्या आणि खाकी हाफचड्डीतल्या मुलांचे बापे.. पण ते दोन तीन तास… आम्ही त्या कॆन्डललाइटच्या मंद प्रकाशातल्या रेस्तरांमधे नव्हतोच. आम्ही होतो आमच्या दहावीच्या वर्गातच.. ! घंटा वाजून शाळेतला पहिला तास सुरु होण्याआधी, वर्गशिक्षिका येण्याआधी चाललेला तो चिवचिवाट ! ! जणू काही कधीही शिपाई घंटा वाजवेल, तास सुरु होईल, आणि थांबावं लागेल, अशा घाईच्या आविर्भावातल्या त्या गप्पा संपता संपत नव्हत्या.
ती मामलेतदार रोडच्या गल्लीतली आमची "उत्कर्ष मंदिर, मालाड (पश्चिम), ते मैदान, दुस-या माळ्यावरला कोप-यातला आमचा वर्ग, आमचा क्रिडामहोत्सव, वार्षिक शुक्रवार, परिक्षा, आमच्या बाई, आमचे सर, आणि वर्षाकाठी शाळेच्या छोट्या मैदानातला तो "ग्रुप फोटो" … ! आम्ही त्या दोन तासात शाळेच्या दहाही इयत्तात पाय ठेवून आलो.. आमच्या शाळेत जाऊन आलो.
शिपाई घंटा वाजवणार नसला.. तरी घड्याळाची, घरुन येणा-या मोबाइलची घंटा वाजत होतीच ! आता निघायला हवं होतं.. ! पण तरी दोन तासात ती दहा वर्ष नाही मावली.. आता भेटायचं, पुन्हा भेटायचं आणि तेही शाळेतच !! आम्ही पुन्हा एक ग्रुप फोटो काढत.. नंबर इमेलची देवघेव करत एकमेकांचा निरोप घेतला. त्यावेळी खरंच शाळा सुटल्यासारखे वेगळे होताना पावलं मात्र जड झाली होती.
घरी आले आणि शाळेतून आल्यावर माझी मुलं शाळेतल्या गमती जमती सांगतात, तशी नव-याला अथक तासभर गमती सांगत राहिले.
दुस-या दिवशी माझ्या मुलाचा शाळेचा ग्रुप फोटो होता.. त्याला शाळेसाठी तयार करताना त्याचे केस दोनदा विंचरले. तो म्हणाला, अग मम्मा ग्रुप फोटो आहे.. कितीदा विंचरशील ? त्याला म्हटलं, तुला नाही रे कळणार आता.. अजून वीस वर्षांनी कळेल.
अरेच्चा हे काय…! आज माझा नवरा चक्क काम सोडून फेसबुकवर.. ? म्हटलं काय रे ? तर म्हणे, शोधतोय, पाटकर हायस्कूल, वेंगुर्ल्याचं कुणी दिसतय का ?
- अनुराधा म्हापणकर
amhapankar@gmail.com
लोकसत्ता : चतुरंग ९/२/१३
http://www.loksatta.com/chaturang-news/back-to-school-57443/
<< कितीदा विंचरशील ? त्याला
<< कितीदा विंचरशील ? त्याला म्हटलं, तुला नाही रे कळणार आता.. अजून वीस वर्षांनी कळेल. >>
असं होईल खरंच? आपल्या वेळी मोबाईल नव्हतेच, घरचे फोन सुद्धा प्रत्येकापाशी कुठे होते? आजच्या पिढीचं तसं नाहीये. त्यांच्याकडे संपर्काची कितीतरी साधने आहेत. रोज त्यात नव्याने अजुनच भर पडत आहेत. त्यामुळे ते कायमच एकमेकांच्या संपर्कात राहतील. प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत तरी रोजच एकमेकांची तोंडे फेसबुकावर, व्हॉट्सअपावर, विडीओ कॉलींगवर पाहतच राहतील. त्यामुळे वीस वर्षानंतर ते आपल्यासारखे हळवे होतील असं निदान मला तरी वाटत नाही.
खुप मस्त
खुप मस्त
आवडलं ! सुयोग्य शब्दात लिहिलय
आवडलं ! सुयोग्य शब्दात लिहिलय !
चेतन, आताही फेस बुक ऑर्कुट
चेतन, आताही फेस बुक ऑर्कुट माध्यमातून आम्ही शोधलंच की प्रत्येकाला... पण शाळेतला ग्रुप फोटो ही एक आठवण असते.. व्हर्च्युअल जगापेक्षा वेगळी... आपण त्या प्रत्येक चेह-याशी संपर्क ठेवून नसतो. तो फोटो पाहूनच अनेक जण आठवतात. थोड्या अधिक प्रमाणात तसं आपल्या मुलांचंही होईल. फोटो पाहून ते चेहरे मग सोशल नेटवर्कींग साइट वर शोधले जातील.
<< फोटो पाहून ते चेहरे मग
<< फोटो पाहून ते चेहरे मग सोशल नेटवर्कींग साइट वर शोधले जातील. >>
नाही मला असं म्हणायचंय की शोधण्याची वेळच येणार नाही त्यांच्यावर ते कायमच एकमेकांच्या संपर्कात राहतील.
आपल्या वेळी आपण अनेक वर्षे संपर्कात नव्हतो. शाळा / कॉलेजातून नव्वदीच्या दशकात वेगळे झालो. फोन नव्हता, पत्ता बदलला. मोबाईल फोन २००० च्या आसपास त्यानंतर पाचेक वर्षांनी ऑर्कूट आणि त्यानंतर फेसबुकने आपल्याला एकत्र आणलं. आताची मंडळी कायमच एकत्र असतील... व्हर्चुअली.
लोक कितीका असेनात सोशल साईटवर
लोक कितीका असेनात सोशल साईटवर .....शेवटी मिलने में जो मजा है वो और कहा??????? अनुराधा, तुम्ही खरच फार जीव्ह्याल्याच्या विषयाबद्दल अगदी अचूक लिहिलात.
माझी पहिलि ते सातवी शाळा घराजवळ होती आणि वर्ग मित्र मैत्रिणी हेही शेजारी किंवा नगरात (आसपास) राहणारे. म्हणून अगदी लग्न होईपर्यंत सगळे दृष्टीपथातातच होते जाता येता हाक मारता यायची एकत्र खेळणेहि होई. सातवीनंतर शाळा बदलावी लागली आणि नवीन शाळेचे आणखी मित्र मैत्रिणी ओळखीचे झाले (आठवीपासून मी पार्ले टिळक -विलेपार्ले येथे शिकले) तिथून पुढे पार्ले (साठ्ये) कोलेज आणि अगदी स्थिरस्थावर होईतो केलेल्या नोकरीच्या ठिकाणचे सहकारी............आता या सगळ्या नाहीत पण प्रत्येक टप्प्यातील थोडे थोडे दोस्तलोक आहेत संपर्कात. मी माझ्या मुलीचे (आता २रित आहे) जुनिअर/सिनिअर केजीतले फोटो जपून ठेवलेत, आणि हो माझ्याकडेही आहे अगदी पाचवी का सातवीतला माझा ग्रुप फोटो .
खूप आवडला तुमचा लेख.:)
अनुराधा तुम्ही खूप छान
अनुराधा तुम्ही खूप छान लिहिता. तुमचे सगळेच लेख फार आवडले मला!!
चेतन, असं काही नाही माझ्या
चेतन, असं काही नाही


माझ्या घरापासून काही अंतरावर रहाणार्या माझ्या मित्रिणीला मी शेवटचा फोन कधी केलेला, कधी भेटलेले ते मला आठवत नाहीये.
आता हे सगळं वाचून तिची आठवण आली म्हणुन तिला फोन करत होते तर नंबर चेंज झालाय तिचा
आज घरी जायला रात्र होणार म्हणजे उद्याच तिच्या घरी जाऊन भेटावं लागणार. त्यातही उद्या परवा काही काम आलं तर राहुनच जाईल
मला लेख आवडला. याला झब्बू म्हणुन काही लिहावसं वाटतंय खरंतर
दुस-या दिवशी माझ्या मुलाचा शाळेचा ग्रुप फोटो होता.. त्याला शाळेसाठी तयार करताना त्याचे केस दोनदा विंचरले. तो म्हणाला, अग मम्मा ग्रुप फोटो आहे.. कितीदा विंचरशील ? त्याला म्हटलं, तुला नाही रे कळणार आता.. अजून वीस वर्षांनी कळेल.
>>>
थोड्या अधिक प्रमाणात तसं
थोड्या अधिक प्रमाणात तसं आपल्या मुलांचंही होईल. फोटो पाहून ते चेहरे मग सोशल नेटवर्कींग साइट वर शोधले जातील.>>>अनुमोदन.
छान लिहिलयं , शाळेच्या आठवणी
छान लिहिलयं , शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.
स्कॅन ( skEn) असं लिहायचं. नाहीतर ते गुज्जु धाटणीचं वाटतं.
" स्कॅन " लिहून पाहिलं...
" स्कॅन "
लिहून पाहिलं... धन्यवाद बाजिंदा
(No subject)
छान लिहलयं.. चेतन,असं काही
छान लिहलयं..
चेतन,असं काही नसत >> +१
एकाच गावात राहत असुनही, एकाच कॉलेजमधे.. नंतर मी पुण्यात, मित्र मुंबईत असुनही आम्ही ६ वर्षानंतर युएसमधे भेट्लो.. पुर्ण दिवस कॉलेज, गाव नि सोबतचे यांचा इतिहास्,भुगोल काढण्यात गेला..
अजुन एक अशीच मैत्रिण २ वर्ष नाही भेट्लीय..
छान! आठवण करुन दिलीत आत
छान!
आठवण करुन दिलीत आत पुन्हा एकदा गटग करावं लागणार मला
छान लिहीलय . आवडल माझ्या या
छान लिहीलय . आवडल
माझ्या या लिखाणाची आठ्वण झाली