साधारण ७-८ वर्षापूर्वी एका लेखात "ती"चे वर्णन वाचले आणि वाचताक्षणी "ति"च्या प्रेमात पडलो. पुढे आंतरजालावर "ती"चे फोटो पाहिले, अधिक माहिती मिळवली आणि "ति"च्याबद्दलचे आकर्षण आणि भेटायची उर्मी अधिकच दाट झाली. पुढे लेह लडाखवारीहुन परतताना "ति"चे ओझरते दर्शन झाले आणि "ति"च्या अवखळ, अल्लडपणाने मनाला अधिकच भुरळ घातली. खरंतर स्पितीव्हॅलीचा (माझा) हा बेत हा खास "तिच्या"साठीच होता. "ती"चं नाव "चंद्रा".
चंद्रा आणि भागा या दोन नद्या उत्तरेला सूरजतालजवळ बारालाच्याच्या खिंडीतून उगम पावतात. भागा पश्चिमेला पत्तन दरीत, तर चंद्रा दक्षिणेला लाहौल दरीत उतरून बातल येथून पश्चिमेला वळते. पुढे तंडी या गावी या एकमेकांत समरस होतात आणि मग जन्म घेते ती ‘चंद्रभागा’. हीच नदी पुढे काश्मिर आणि मग पाकिस्तानात ‘चिनाब’ या नावानं ओळखली जाते. गेल्यावर्षीची लेह-लडाख टूर संपल्यानंतर जेंव्हा सार्चु मार्गे मनालीला परतत होतो तेव्हा या अवखळ चंद्रभागा नदीच्या ओढीनेच लाहौल स्पितीचा बेत शिजला होता आणि वर्षभराच्या आत तो तडीसही गेला. याच "चंद्राने" मनाला भूल घातली म्हणुन हि "चांद्रभूल".
परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान."
लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजू लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना 'घर सोडा' असं सांगावं लागत नाही; त्यांची पावलं आपोआपच बाहेर वळतात आणि जर ही भटकंती हिमालयाच्या कुशीतली असेल, तर होणारा आनंद हा कॅमेर्याच्या मेमरी कार्डातही मावणारा नसतो. असं म्हणतात, की जंगलातून चालताना कधी कधी ‘रानभूल’ पडते. पायाखाली ठळक वाट असूनही 'चकवा' लागतो. पुन्हा फिरून फिरुन त्याच जागेवर येणं होतं. साधारण ४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाला भेट दिली होती, तेव्हा वाटलं नव्हतं, की हा 'चकवा' दरवर्षी पुन्हा पुन्हा लागणार आहे. उत्तराखंड, काश्मिर, लेह-लडाख आणि आता हिमाचल प्रदेश. हिमालयाची 'हिमभूल' पडते म्हणतात. पण इथं वाट चुकली जात नाही, तर खास वाट चुकवून इथे यावंस वाटतं. इथे निसर्गाचा रौद्र व महाकाय अविष्कार पाहून मनात वादळं निर्माण होतात. त्या रौद्र निसर्गात स्वतःला झोकून द्यावसं वाटतं. खरं तर सगळ्यांनाच हा अनुभव येतो असंही नाही. निसर्गाकडे पाहण्याची मनाची उत्कटता जितकी जास्त, तितकी अशा अनुभवांची तीव्रता जास्त! निसर्ग आपल्याला दोन प्रकारे भेटतो - एक म्हणजे स्वत:च्या उन्मुक्त आणि खर्या अवस्थेत आणि दुसरा म्हणजे साचेबद्ध, आखीव-रेखीव सौंदर्यखुणांच्या स्वरूपात. लाहौल स्पिती परिसरात आपल्याला भेटणारा निसर्ग हा पहिल्या प्रकारातला. कुठल्याही ऋतूत इथला निसर्ग आपल्याला उन्मुक्तपणेच भेटतो. निसर्गाचा समतोल आज जरी आपल्या कर्मामुळे बिघडत चालला असला, तरी तो स्वत: मात्र बेईमान होत नाही. इथला निसर्गही त्याला अपवाद नाही. इथे तुम्ही मानव म्हणून आलात तरीही तो देताना कुठेही डावं-उजवं करत नाही. इथून दूरचे डोंगरही साजिरे दिसतात आणि जवळचेही. फक्त निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याला सामोरं जाताना मनाची प्रांजळता हवी.
आपण हिमालयाच्या कुशीत शिरतो तेव्हा "अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने" ही उक्ती अगदी सार्थ ठरते. निसर्गाच्या सर्व छ्टांची मुक्त उधळण जिथे आपण अनुभवतो ती देवभूमी म्हणजेच हिमाच्छादित बर्फशिखरांनी सजलेलं, नटलेलं ‘हिमाचल प्रदेश’. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात शिमलामार्गे स्पिती व्हॅलीचा बेत ठरला. 'लाहौल स्पिती' म्हणजे हिमाचल प्रदेशमधील दुर्गम भागातील एक पर्यटनस्थळ. स्पितीचा अर्थ 'मध्यवर्ती भूभाग'. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग. सीमा कसली, हा सारा परीसर म्हणजे हिमालयातील रौद्रभीषण सौंदर्याची परिसीमाच! या स्वप्नभूमीत येण्यासाठी दोन प्रवेशद्वारं आहेत. पहिलं म्हणजे मनाली-रोहतांग पास-कुंझुमपास मार्गे काझा तर दुसरं शिमला, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमार्गे टाबो, काझा. आमची भटकंती शिमलामार्गे असल्याने आम्हाला ही दोन्ही प्रवेशद्वारं पाहता आली.
हा परीसर निवांत पहावयाचा झाला तर कमीत कमी ८-१० दिवस हाताशी असले पाहिजेत. इथे जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जुलै ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत. मात्र हा परीसर निव्वळ 'पिकनिक' करणार्यांसाठी नाही, तर निसर्गाचं रौद्र भीषण सौंदर्य बघणार्या आणि त्या निसर्गोत्सवाला कॅमेर्यात टिपणार्या अस्सल भटक्या लोकांसाठीच आहे. दहा दिवसांच्या या भटकंतीत आम्हाला निसर्गाची विविध रूपं बघायला मिळाली. हिमालयातल्या उंच हिमशिखरांच्या संगतीत मानवाचा क्षूद्रपणा प्रकर्षानं जाणवला. इथल्या निसर्गाची शुचिर्भूतता आपल्या मलीन, व्याधिग्रस्त मनाला टवटवीत करते. खरंतर हा हिमालय नव्हे, तर एक मायावी जादूगार आहे. त्याच्या कुशीत येणार्यांना तो असंच संमोहित करतो आणि इथे पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडतो. आपणही मग आपल्याच नकळत नतमस्तक होऊन त्याच्याकडे पाहत हात जोडतो आणि परत भेटण्याचं मनोमन वचन देतो.
(पूर्व प्रकाशितः "फ फोटोचा" दिवाळी अंक २०१४:
देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती:
याच भटकंतीतील हा पहिला भाग "स्पिती व्हॅली".
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
चला पुढच्या प्रवासाला.....
पुढिल भागः
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
(तटी: सध्या कामात चिक्कार व्यस्त असल्याने प्रतिसाद देण्यास/नविन भाग टाकण्यास थोडा उशीर होईल. तेंव्हा समजुन घ्यालच अशी आशा आहे. )
फोटो तर सुरेख आहेतच,
फोटो तर सुरेख आहेतच, लिखाणदेखील त्याच तोडीचं झालं आहे.
पुढील प्रवासास शुभेच्छा.
Pages