(व्याकरणातील चुकांबद्दल माफ करा, किशोरीताईंबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे, त्यांच्याप्रत्येक रागातल्या प्रत्येक श्रुतीवर, आणि प्रत्येक श्रुतीच्या लगावावर पी एच डी करता येईल इतकं अथांग समुद्रासारखं आहे ते. त्यात डुबकी मारण्याचा हा प्रयत्न! ऐकण्यासाठी http://play.raaga.com/hindustani/album/Live-Concert-Swarutsav-2000-Kisho... किंवा http://gaana.com/album/live-concert-swarutsav-2000-kishori-amonkar-vol-1 )
उतरी धैवत!
त्यादिवशी कधी नव्हे ते पहाटे जाग आली. दिवाळीचा पहिला दिवस होता. ! प्रसन्न वातावरण! एवढ्या लवकर काय करायचं हे कळेना म्हणून अंगणात आलो. आई रांगोळी काढत होती. मग माझं नेहमीचं काम सुरु केलं आणि ते म्हणजे गाणी ऐकणे! माझं शास्त्रीय संगीताच वेड आईला माहितीय आणि सुदैवाने त्याला वेड न समजता एक कला समजणारी अशी आई मला लाभल्याने "बघेल त्यावेळी हेडफोन कानात" वगैरे फालतू गोष्टी मला कधीही ऐकाव्या लागल्या नाहीत! असो! मोबाईलवर किशोरीताईंचा बिभास सुरु केला आणि कठड्याला टेकून डोळे मिटून ऐकत बसलो!
हे नरहर नारायण..... ताईनी "हे" म्हणताना अशी काही साद घातलीय की अंगावर सर्रकन काटा आला. तो धैवत आहे हे कळत होतं, पण तो असाही असू शकतो? ताईंच्या ह्या बिभासाबद्दल ऐकलं होतं, त्यांच्या "भिन्न षड्ज" ह्या माहितीपटात ताई त्याविषयी बोलल्यात पण ; पण त्यादिवशी तो बिभास मी अनुभवला! त्या धैवातासाठी काय सुरेख शब्द वापरलाय...उतरी धैवत! खरंच तो शुद्ध धैवतावरून धैवताच्या किंचित कोमल अशा श्रुतीवर अलगद उतरतो! आणि उतरत असताना पूर्ण बिभासालाच एक पवित्रता बहाल करतो. किती अचाट आहे हे! कारण मुळात धैवताचा भाव बीभत्स आहे. म्हणजे रुढार्थाने बीभत्स नव्हे, पण इतर स्वरांमध्ये जो एक प्रसन्न भाव आहे तो धैवतामध्ये तसा नाही. याचं सुंदर उदाहरण म्हणजे राग भूपेश्वरी किंवा प्रतीक्षा , भूपातला धैवत कोमल केला की हा राग मिळतो. एकच स्वर बदलला पण त्यासोबत पूर्ण भावविश्व बदललं. पंचमावरून येऊन या कोमल धैवतावर थांबल्यावर एक विचित्र भावावस्था तयार होते भूपेश्वरीत, तो भाव म्हणजे बीभत्स म्हणता येईल! पण अशा या दोन बीभत्स धैवतामध्ये बसलेली धैवताची ती पवित्र आणि तरल श्रुती शोधून काढायची म्हणजे साक्षात गानसरस्वतीच हवी तिथे!
हे अवघड अशासाठी की हा अमुक एक गंधार, हा म्हणजे रिषभ, यासारखं उतरी धैवत हा काही pinpoint करता येईल असा स्वर नव्हे, ती मींडही नव्हे आणि कणही! आणि नेमक्या याच गोष्टींमुळे तो नेहमी बरोबर लागेलच असं सांगता येत नाही! पण ताईन्च्या बिभासात तो फक्त तांत्रिकदृष्ट्या, किवा भावाच्या दृष्टीनेच नव्हे तर केवळ त्या रागाचा म्हणून तो उतरी धैवत वेगळा आणि नेमका असतो. "भिन्न षड्ज " मध्ये ताईनी स्वरमंडलावर बिभास जुळवलाय त्यामध्ये पहा, स्वर म्हणून एक षड्ज सोडला तर इतर कोणीच नेमका नाही पण बिभास मात्र तिथे नेमका ऐकू येतो! ही जादू आहे श्रुतीची आणि ताईनी केलेल्या जाणीवपूर्वक अभ्यासाची! पुन्हा ताई हा धैवत फक्त आलापातच संथ लयीतच घेतात असही नाही. पुढे बोल-आलाप, बोलतान, तान या सगळ्यात तो उतरी धैवत जसाच्या तसा येतो आणि आपण फक्त आ वासून बघत राहतो. माझे सर म्हणतात त्याप्रमाणे खरंच काय प्रचंड बाई आहे ही! खरंच प्रचंड! आणि हे करताना आता मी उतरी धैवत लावतेय असा आविर्भाव कुठेही नाही. सगळ अगदी स्वाभाविक, सहज आणि उत्स्फूर्त! बरेचजण शुद्ध धैवताचा बिभास गातात , त्याच्या ताना सुरु झाल्या की देसकाराचा आभास होतो. ताईनी देखील द्रुत शुद्ध धैवताची गायिलेय पण कुठेही उतरी धैवताने उभ्या केलेल्या बिभासाच्या भावविश्वाला तडा गेला नाही. असा ताईन्चा बिभास ऐकला की काही दुसरं ऐकू नये असं वाटत! हा बिभास म्हणजे ज्याप्रमाणे लालसर क्षितीज हे सूर्योदयाची नांदी देतं, तस असीम विश्वाच्या उत्पत्तीच्या आधीची शांतता दाखवत असावा!
ताईनी गायिलेला बिभास आणि बाकीच्यांचा बिभास यातला नेमका फरक हा फक्त स्वरात नाही तर त्या रागाच्या वातावरणनिर्मितीत पण आहे. ताईन्चा बिभास हा शांत,पवित्र आणि शुचित आहे, ...अगदी दिवाळी पहाटेसारखा! त्यामध्ये "हे नरहर" म्हणत देवाला साद जरूर घातलीय पण तोडीप्रमाणे अतिकरुण वगैरे असं काही नाही त्यात! ताइन्चा बिभास ऐकताना एखाद्या शांत डोहातल्या पाण्याप्रमाणे मनातल गढूळ असं सगळं तळाशी जात, आणि उरत ते नितळ मन! तेव्हा ताईपण बिभास होतात आणि ताईन्बरोबर आपणही!
जेव्हा समाधीतून बाहेर आलो तेव्हा क्षितीजावर प्रकाश नुकताच येत होता. आईची रांगोळी पूर्ण झालेली. दिव्यांच्या मंद प्रकाशात सारं अंगण उजळून निघालं होतं. सगळीकडे प्रसन्न पावित्र्य नांदत होतं, ते ताईन्च्या बिभासाचं. आणि आई माझ्याकडे एकटक पाहत होती, मी न सांगताच बिभासाचा तो भाव तिच्यापर्यंत पोहोचला असावा!
व्वा! सुरेखच खुप प्रसन्न
व्वा! सुरेखच
खुप प्रसन्न लिहिलंयस रे.
गाणं इतक्या बारकाईनं कसं ऐकावं हेसुद्धा शिकायला हवं आता. वातावरण खुप अप्रतिम उभं केलंस डोळ्यासमोर. तुझ्या नजरियातनं पोचणा-या किशोरीताई आणी बिभास खुपच प्रभावी आहेत. भुपेश्वरी/प्रतिक्षा ही नावं नवी आहेत माझ्यासाठी. तू नमूद केलेल्या ब-याचशा तांत्रिक बाबीही नव्याच आहेत. मोलाची माहिती देतोयस. ऐकत रहा आणि आमच्यासाठी लिहीत रहा
बादवे, 'कण' म्हणजे काय?
अगं सई खुप धन्यवाद! अगं कण
अगं सई खुप धन्यवाद!
अगं कण म्हणजे असं की समज तु सा लावतीयेस पण त्यात तुला जरासा निषादाचा आभास हवाय. अगदी कणासारखा, त्याला कण म्हणायच. म्हणजे तुला सांगतो, तु मुलतानी ऐक कुणाचाही, त्यात कोमल रिषभाला षड्जाचा कण आहे. सगळया रागात हा कण प्रभावीपणे दाखवणारा राग आहे. अगदी स्पष्ट सांगायचं तर मुलतानी ऐकताना त्याचं मुलतानीपण म्हणुन जे जाणवत ते म्हणजे कण! https://www.youtube.com/watch?v=Xwj-1Hu01G8 हे ऐक निखिलदांचा मुलतानी, यामध्ये ९ व्या सेकंदाला ते रिषभावरुन षड्जाला येतायत तिथे आहे आहे बघ हा कण!
आणि भुपेश्वरी नवीन नाही गं, मालवुन टाक दीप ऐकलयस ना? तोच भुपेश्वरी! तुझ्याकडे काही असेल ना वाजवायला, अगदी मोबाईल मधला पियानो सुद्धा चालेल. त्यात "सा रे ग प ध(कोमल)" हे वाजवुन बघ. मालवुन टाक दीपच आठवेल!
काय लिहू? वाचता वाचता मीही
काय लिहू?
वाचता वाचता मीही गुंगून गेलो तुमच्या श्रवणसमाधीमध्ये. किशोरीताई म्हणजे legendच पण हा आत्मीयतेने लिहिलेला अनुभव वाचणे हाही
"देवतेपरी दिसतो कसा देखणा
भक्तितुनी सौंदर्याच्या उमटति खुणा"
याप्रकारची उत्कटता निर्माण करणारा लोभस लेखनाविष्कार आहे हे नक्की.
बढिया
"देवतेपरी दिसतो कसा
"देवतेपरी दिसतो कसा देखणा
भक्तितुनी सौंदर्याच्या उमटति खुणा">>>>>>>>>अमेयजी अनेक धन्यवाद! खरंच खुप आत्मीयता वाटते किशोरीताईंबद्दल!
घरी जाऊन ऐकते नक्की. पण कान
घरी जाऊन ऐकते नक्की. पण कान कमालीचा तयार लागेल तो कण टिपायला असं एकंदरीत वाटतंय. तुला मात्र विनम्र साष्टांग माझा
'भिन्न षड्ज'ही पाहिलेला नाही मी, आता शोधून तोही बघणे आले. कामाला लावतोस बाबा! 
अमेयशी अगदी सहमत!
अतिशय सुरेख विश्लेषण केले
अतिशय सुरेख विश्लेषण केले आहे...
शास्त्रीय संगीतामधलं इतकं
शास्त्रीय संगीतामधलं इतकं काहीच कळत नाही. पण हे जे काही लिहिलंय ते मनापासून आवडलं. अजून असेच सुंदर लेख लिहिलेत तर वाचायला आवडेल. आमचयसारख्या फिल्मी कानांवर काही थोडेफार वेगळे शास्त्रीय संस्कारदेखील घडतील असे लेख अवश्य लिहा ही विनंती.
मोबाईलवर तर नाही पण गुणगुणून
मोबाईलवर तर नाही पण गुणगुणून बघितलं.. अगदी सेम आहे रे! वॉव, खुपच आनंद झाला

असं काही सापडलं की जाम मजा येते
क्या बात है.. मस्तच..
क्या बात है.. मस्तच..
अत्यंत आत्मियतेने लिहिल्या
अत्यंत आत्मियतेने लिहिल्या गेलेल्या लिखाणाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून किशोरीताईंच्या भक्तीचा हा लेख दाखविता येईल. हे नावच इतके पवित्र झाले आहे की त्यांच्याविषयी वाचताना आजुबाजूला जणू काही मोगरा दरवळतोय की काय असा भास होतो. पहाटे फिरायला जाताना आर.के.नगर ज्यावेळी लागते त्यावेळी पूर्वेकडे क्षितिज लालसर होत जाते आणि मग एखाद्या घरासमोर अत्यंत आत्मियतेने रांगोळी काढणारी एखादी भगिनी दिसत्ये....तिच्या बोटातून हळुवारपणे झरझरणारी ती पांढरी रांगोळी कधीकधी पाहतो .....सूरांची ती एकप्रकारे सजावटच मी समजत असे....आता ती पाहताना ह्या लेखाची आणि पाठोपाठ किशोरीताईंच्या बिभासाचीही साथ असेल.... (ताईंच्या एका मुलाचेही नाव बिभास असेच आहे.)
....इतके सारे सुंदर झाले आहे.
खुप सुंदर लिहिले आहेस.. तू
खुप सुंदर लिहिले आहेस.. तू एकदा त्यांना भेटून बघ.
घरी आलास कि वहिनीला विचारून बघ, बहुतेक बिभास तिच्या ट्रेकिंग ग्रुप मधे होता.
मोरापजी, नंदीनीजी,
मोरापजी, नंदीनीजी, मुग्धटलीजी, खुप खुप धन्यवाद!
( काय वैताग येतो सगळ्यांच्या नावापुढे जी लावायचा
मला आपलं पटकन अरे तुरे केलेलं आवडतं )
पहाटे फिरायला जाताना आर.के.नगर ज्यावेळी लागते त्यावेळी पूर्वेकडे क्षितिज लालसर होत जाते>>>> अशोकमामा अगदी अगदी! मी माझ्या काकाकडे रहायला जायचो त्यावेळी सकाळी मुद्दाम लवकर उठुन खडीच्या गणपतीला जायचो आम्ही बच्चेमंडळी. आणि मग त्या समोरच्या टेकडीवर सुर्योदय बघायला जायचो! काय सुंदर वाटायचं! आमचे सगळे नातेवाईक कोल्हापुरातच, अगदी लांबच्या नात्यातलेपण. त्यामुळे सुट्टीत गावाला जाणे हा प्रकार नाहीच. त्यमुळे आम्ही सुट्टीत कधी आर के नगर कधी शिवाजी पुतळा कधी गंगावेश कधी जरग नगर असं सगळ्या नातेवाईकांची घरे धुंडाळत फिरायचो!
असं काही सापडलं की जाम मजा येते>>>>> हो खरय सई. मी पण पहिल्यांदा हे गवसलं त्यावेळी कितीतरी दिवस तेच गुणगुणत बसायचो. नेमके गाण्याचे सुर नाहीत सांगता येत पण त्या गाण्याच्या परिसरातच हिंडत आहोत त्याचाच आनंद वाटतो! आणि भिन्न षड्ज नक्की बघ
दिनेश खरंच सांगतोयस? नक्की विचारणार मी वहिनीला! त्याना भेटलो तर काय करीन काय माहित. म्हणजे माणुस भक्ती करतो पण देव प्रत्यक्ष भेटल्यावर काय करायचं हेच माहित नसतं. तसंच आहे काहीसं माझं.
अरेच्या कुलदीप....तू
अरेच्या कुलदीप....तू करवीरनगरीचा ? ग्रेट ! खडीच्या गणपतीपुढील चढ चढून गेल्यानंतर भारती विद्यापीठ परिसर लागतो....त्या दिशेने चालताना क्षितिजाकडे ध्यान जात असतेच.....फिरायला जाण्यासाठी अत्यंत आदर्श असे ठिकाण झाले आहे ते.....आता इथून पुढे तो भाग आला म्हणजे किशोरीताईंच्या बिभासासोबत तुझीही आठवण येत राहील.
कोल्हापूरला आल्यानंतर जरूर भेटू आपण....मी शिवाजी पेठ, टिंबर मार्केट झोन इथे राहतो.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
काय वैताग येतो सगळ्यांच्या
काय वैताग येतो सगळ्यांच्या नावापुढे जी लावायचा अरेरे मला आपलं पटकन अरे तुरे केलेलं आवडतं )>> जी लावायला हवा असा काय नियम आहे का? बिन्धास्त अरेतुरे म्हटलंत तरी चालेल.
अशोकमामा नक्की भेटु
अशोकमामा नक्की भेटु कोल्हापुरला आलो की. मी देवकर पाणंद मध्ये राहतो!
धन्यवाद सुमेधाजी!
नंदिनी, अगं नियम नाही तसा. पण मागे एकदा एका धाग्यावर प्रतिसादातुन बरीच वादावादी दिसली की लोकाना अरे तुरे कशाला बोलवायच वगैरे. म्हणुन मी सेफ साईड सगळ्याना जी लावत सुटतो पहिल्या भेटीत
पण खरंच वैताग येतो बर त्या जी प्रकरणाचा!
ग्रेट कुलदीप योगायोगाने आजच
ग्रेट कुलदीप
योगायोगाने आजच देवकर पाणंदला जाणे झाले, सध्या कोल्हापुरात आहे.
त्याना भेटलो तर काय करीन काय
त्याना भेटलो तर काय करीन काय माहित. म्हणजे माणुस भक्ती करतो पण देव प्रत्यक्ष भेटल्यावर काय करायचं हेच माहित नसतं. तसंच आहे काहीसं माझं.>> किती नेमकं बोललास! आशा भोसलेंना भेटल्यावर असं झालेलं मला आणि हेच माझ्या आत्याला लताबाईंना भेटल्यावर!
बादवे, औपचारीकतेत अडकू नकोस. नंदिनीही तेच सांगतेय. तुला कंफर्टेबल होईल तशी हाक मार.
मामा, अमेय, माझा जुना शेजारी आहे कुलदीप. त्याचं आजोळ गंजी गल्ली आणि आम्ही शिवाजी रोडवर
कुलदीप, तुला संगिताच्या समजेइतकीच लिहिण्याचीही कळा अवगत आहे, तेव्हा स्वतंत्र लेखनाचाही गांभिर्याने विचार कर.
लेख आवडला.. आम्हाला एकच
लेख आवडला..
आम्हाला एकच शास्त्र माहीत आहे की, कुठल्याही शास्त्रातले आम्हाला काहीच कळत नाही. पण ह्या लेखामागचे टवटवीत मन मात्र आवडले.
ही अशी निरागस मने पाहीली, की माबोवर यायचे समाधान मिळते.
बाद्वे,
मला नावाने हाक मारलेली आवडते. जी च्या मागोमाग हांजी येतो...त्याचे आणि आमचे पटत नाही....
फार मस्त लिहीलय! तुझा आधीचा
फार मस्त लिहीलय!
तुझा आधीचा लेखही वाचला होता. लिहीत रहा आमच्यासारख्या शास्त्रीय संगीताचा गंध नसणाऱ्या लोकांना खुप फायदा होईल.
(मला वत्सला च म्हण)
कुलदीप, सावलीच्या अंकामुळे
कुलदीप, सावलीच्या अंकामुळे अनपेक्षितपणे ही बिभास आमोणकरांची ओळख मिळाली..
http://fotocirclesociety.com/diwali-ank-14/lekh30/indexe.html
ही अशी निरागस मने पाहीली, की
ही अशी निरागस मने पाहीली, की माबोवर यायचे समाधान मिळते.>>>>> हे वाचताना खुप भारी वाटलं
जयंत खुप खुप धन्यवाद अरे!
वत्सला धन्यवाद अगं
आणि शास्त्रीय संगीताचा गंध नसतो अस काही नसतं गं आपल्याकडे. गंध असतोच, फक्त तो शास्त्रीय संगीताचा गंध आहे हे आपल्या चटकन लक्ष्यात येत नाही. म्हणजे अचानक शास्त्रीय संगीत ऐकताना ओळखीच्या खुणा सापडतात. ते राग प्रतिक्षा तल्या मालवुन टाक प्रमाणे!
सई अगं हो बिभास खुप भारी फोटोग्राफर आहेत. कधीतरी भेटायचय पण खरच किशोरीताईना, केव्हढ काय काय विचारायचं आहे. आणि महत्वाच म्हणजे एकदा त्यांच्या पायावर मस्तक टेकवायचं आहे.
नशीबवान आहेस!
आशाताईना भेटल्याचं का सांगितलीस मला जळवायला?
अगं मी लिहितो गं खुप, पण सगळं हे असं संगीतावरच असतं, आणि मुळात ते इथे टाकताना खुप भिती वाटत असते कि माझ्यामुळे कलाक्रुतीचा कुठे अपमान नको व्हायला. म्हणजे मला असा बिभास भावला तो प्रत्येकाला तसाच भावेल असं नाही ना गं. माझ्यामुळे भावाच्या इतर शक्यता मास्क नकोत व्हायला असं वाटतं!
अमेय पण कोल्हापुरचा हे माहित नव्हतं. तो कुठेशी कोल्हापुरात? मामा कोल्हापुरचे हे माहित होतं. बाकी आमच्या गल्लीच नाव गंजी गल्ली का हे अजुन माहित नाही मला!
सगळ्यानी अरे तुरे वर यायला परवानगी दिली आणि सुटल्यासारखं वाटलं!
बाळ फोंडके यांच्या एका
बाळ फोंडके यांच्या एका पुस्तकात वाचल्याप्रमाणे बुद्धीमत्ता ही एकंदर सात प्रकारची असते.
स्मरणशक्ती, रिझनींग.. या दोन प्रकारच्या बुद्धीमत्तांचेच आपल्याकडच्या परीक्षांमधून मूल्यमापन होते, पण त्याशिवाय शरीराचा तोल साधणे, स्वरज्ञान असणे ( आणखी इतरही आहेत ) या देखील बुद्धीमत्ताच आहेत. आपण त्यांना महत्व देत नाही आणि त्या सहजसाध्यही नाहीत.
कुलुकडे नैसर्गिक रित्याच आहे ही बुद्धीमत्ता. त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतेय आणि यापुढेही मिळेलच.
आणि त्या शिवाय ते शब्दात मांडण्याची कुवत देखील आहे. हे मला व्यक्तीश: फार महत्वाचे वाटते. गाणी आपल्याला आवडतातच पण त्यातले नेमके सौंदर्य खुलवून दाखवायला असे लेखन गरजेचे असते. ( लोकसत्तामधील मृदुला दाढे जोशी यांची लेखमालिका पण् याचेच उदाहरण आहे.
मस्त लेख... हे असलं
मस्त लेख... हे असलं विश्लेषणात्मक लिहायला जमणं महा मुश्किल आहे.. ते सहज जमतय तर लिहीत रहा.. आणि कशाचीही पर्वा न करता लिही.. माबोवर काही चुकलेच तर दुरुस्ती करायला भरपूर जण आहेत..
विभासची लिंक दिल्याबद्दल फारच धन्यवाद.. खूप शोध घेतला होता विभास ऑनलाईन कुठे मिळतो आहे का त्याचा.. मोजून तीन चार लिंक्स मिळाल्या त्यात ही नव्हतीच... मुलाच्या बारश्याच्या वेळी हवी होती. त्याचं नाव विभास ठेवलय..
आईशप्पथ ! दिनेश केवढं कौतुक
आईशप्पथ ! दिनेश केवढं कौतुक करतोस अरे. तुझी एकेक ओळ वाचताना माझं वजन पण एकेक किलोने वाढत होतं
खरं सतार ट्युन करताना माझी बुद्धिमत्ता कुठे जाते काय माहित. किती दिवस झाले भीमपलास ट्युन करतोय, अजुन काही त्याचा कोमल गंधार सापडला नाही! 
हिम्सकूल, धन्यवाद! http://www.rdio.com/ पण आहे. तिथे तुम्ही साईन इन करायचं. फ्री. खुप ऐकायला आहे तिथे पण!
विभास नाव फार छान आहे!
खूप सुंदर लिहिलेय कुलु ! असं
खूप सुंदर लिहिलेय कुलु ! असं काही वाचलं की शास्त्रोक्त कळत नाही याची खंत वाटते एकीकडे, अजूनही वेळ गेली नाही अशी भाबडी आशाही उगीचच.पण ते अनेकस्तरी स्वरविलास ऐकले की चांदण्यात कोरीव पाषाणलेण्यांमधून फिरत असल्यासारखे हुरहुरते भाव मात्र जागतात . बिभास हे त्यांच्या एका मुलाचं नाव आहे त्याअर्थी त्यांचाही हा आवडता राग असणारच .
आहाहा, काय सुरेल लिहिलय मला
आहाहा, काय सुरेल लिहिलय
मला त्यातलं शास्त्र नाही कळत याचं वाईट वाटतं, पण त्या जागा मनात काहीतरी हलवून जातात हे नक्की. तुमच्या लिखाणातून थोडं काहीतरी कळल्यासारखं वाटलं. खूप खूप धन्यवाद __/\__
विभास की बिभास ? फाटकबुवा !
विभास की बिभास ?
फाटकबुवा ! चार पाच वर्षापुर्वी डोंबोलित म - नि वर्जित राग अशी एक मैफिल झाली होती.. त्यात भुप , भुपकली , बिभास , रेवा , शिवरंजिनी व भुपाल तोडी हे राग ऐकायला मिळाले होते. तुम्ही होते का त्यात ?
हा आमचा लाडका बिभास ..
http://m.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g
अनेकस्तरी स्वरविलास ऐकले की
अनेकस्तरी स्वरविलास ऐकले की चांदण्यात कोरीव पाषाणलेण्यांमधून फिरत असल्यासारखे हुरहुरते भाव मात्र जागतात >>>> किती सुंदर वर्णन भारतीताई
आणि वेळ खरंच नाही हो गेली. मला तरी कविता कुठे कळतात पण म्हणुनच त्या समजुन घेण्यासाठी तुम्हाला त्रास देत असतोच की मी!
अवल खुप खुप धन्यवाद!
एकसारखं तेच तेच ऐकत गेलं की त्यातल शास्त्र कसं खुलुन येतं आपल्यासमोर! आणि शास्त्र नाही कळलं तरी आपल्या आनंदात काही कमी पडत नाही.
विभास की बिभास ?>>>>काऊ, विभास बिभास बिहास अशी नावे आहेत, पण स्वतः ताई तरी बिभास म्हणतात. आणि भाग्यदाच्या लिंक साठी खुप खुप आभार.
त्याची चालच इतकी आकर्षक आहे की त्यातल्या बिभासाकडे कधी लक्ष्यच नाही गेलं. आज तुझ्यामुळे लक्ष्यात आलं. खुप खुप आभार! सुरूवातीचा आलाप किती हळुवार सुंदर घेतलाय पंडितजींनी!
">>>>अनेकस्तरी स्वरविलास ऐकले
">>>>अनेकस्तरी स्वरविलास ऐकले की चांदण्यात कोरीव पाषाणलेण्यांमधून फिरत असल्यासारखे हुरहुरते भाव मात्र जागतात ...."
~ ही खास भारतीशैली !!! एकीकडे किशोरीताईंच्या स्वरजादूची उलगडणी कुलू तितक्याच हळुवारपणे करतोय तर दुसरीकडे भारतीसारखी शब्दवैभवी कवयित्री अशी मुलायम पखरण करत जाते.
वाचक वेडा होईलच.
Pages