गॅप

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कधीकधी मनाच्या अस्वस्थ पाखराला
नको असते कवेत घेणारे आकाश
क्षितिजावरुन ओघळणारा ओलावा
चांदण्यांची दुर...दुरवरुन येणारी हाक
आपल्या सोबत सोबत चालणारा चंद्र
नको असतो कुठलाच उदय आणि कुठलाच अस्त!

...मनाच्या अस्वस्थ पाखराला
नको असते चिऊकाऊची वेल्हाळ चिवचिव
कोकीळेचा आर्त पंचम
खोप्यातील बाळांची फडफड
बगळ्यांची घनश्यामल माळ
नको असतो राऊ आणि नको असते मैना!

मनाच्या अस्वस्थ पाखराला...
नको असते कुणाची छाया, कुणाची माया आणि कुणाचीही दया!
नको असते शब्दाची फुंकर
नको असतात भरवलेले चार घास
नको असतात कुणाचे पुण्य आणि कुणाचेही उपकार!

मनाच्या अस्वस्थ पाखराला
हवा असतो एक कोपरा
कुणालाही न दिसणारा;
हवा असतो एक श्वास
कणकण दु:ख बाहेर टाकणारा;
हवी असते एक झुळुक
स्वतःला जाळणार्‍या काळज्या..चिंता विझवणारी;
हवा असतो आश्वासक अंधार
सगळे काही आपल्या पोटात गुडुप करणारा
कुणाशीही न बोलणारा.. कुणालाही न सांगणारा!!!

मनाचं अस्वस्थपण भोगणारं पाखरू
गप्प गप्प निपचित पडून
एक दिवस अंग झटकते
एक गिरकी घेते ...
आपले आकाश रेखते
आपले रंग आपणच भरते..
आणि स्वतःशीच गप्पा मारत मारत
एका मैफीलीत येते...

-- बी

विषय: 
प्रकार: 

मनाच्या अस्वस्थ पाखराला
हवा असतो एक कोपरा
कुणालाही न दिसणारा
हवा असतो एक श्वास
कणकण दु:ख बाहेर टाकणारा
हवी असते एक झुळुक
स्वतःला जाळणार्‍या काळज्या..चिता विझवणारी
हवा असतो आश्वासक अंधार
सगळे काही आपल्या पोटात गुडुप करणारा
कुणाशीही न बोलणारा.. कुणालाही न सांगणारा!!
Sad

शेवट मस्त पण! एकदम लख्ख !:)

छान लिहीले आहे. परवा मी पहाटे पाच वाजता उठून चंद्रास्त पाहिला तेव्हा अशीच छान गॅप अनुभवली.
चंद्रास्ताला आपल्या संस्क्रूतीत/ धर्मात कुठलेही काहीही लेबल लावलेले नाही त्यामुळे असा एक काही
संदर्भ नसलेला नैसर्गिक क्षण आणि मनःस्थितीही तशीच कवितेत लिहील्या प्रमाणे होती असे हे आता कविता वाचल्यावर कळते आहे.

अतिशयच सुंदर.
अप्रतिम.

बी , फक्तं एक काम करशील का उदय ऐवजी उद्य झालंय ते बघ(मला तरी मोबाईलवर तसंच दिसतंय)
आणि पाखरू 'ते' असतं 'तो' नसतं.
त्यामुळे
मनाचं अस्वस्थपण भोगणारं पाखरू
गप्प गप्प निपचित पडून
एक दिवस अंग झटकतं
एक गिरकी घेतं...
आपले आकाश रेखतं
आपले रंग आपणच भरतं..
आणि स्वतःशीच गप्पा मारत मारत
एक मैफीलीत येतं..

असं बदल किंवा प्रमाण मराठीत झटकते,गिरकी घेते, रेखते, भरते, येते असं कर.

फक्तं एक काम करशील का उदय ऐवजी उद्य झालंय ते बघ(मला तरी मोबाईलवर तसंच दिसतंय)
आणि पाखरू 'ते' असतं 'तो' नसतं.
त्यामुळे>> मला वाटतं त्या लाइन्स एक दिवस ह्या नामाबद्दल आहेत. एक दिवस संपतो. अंग झटकतो आणि परत कामाला लागतो. असे कवींच्या मनात असावे.

सर्व सर्व काव्यप्रेमींचे मनापासून आभार.

सामि, मी बदल केला आहे.

अमा, मी लिहिताना इतका विचार केला नाही. मराठी भाषेतून लिहिताना मी बोलीभाषेतील व्याकरण लावतो. मला एक दिवस मी हे करतो ते करतो अशा प्रकारची ओळ लिहायची होती ती मी लिहिली. पण सामिने सुचवलेला बदल केला. अजून माहिती नाही कोण बरोबर आहे.

कविता सुंदरच बी.. पाखरू आवडलं तुझं. सगळंच नकोसं झालेलं असताना ते बाजूला सारून स्वतःच उठून पंख झटकून भरारीला सज्ज होण्याची पाखराची तयारी सुखद!

हवा असतो आश्वासक अंधार
सगळे काही आपल्या पोटात गुडुप करणारा
कुणाशीही न बोलणारा.. कुणालाही न सांगणारा!!!>> हे खुप आवडलं.

वॉव बी!! खूप आवडली कविता.. विशेषतः ह्या ओळी..

आपले आकाश रेखते
आपले रंग आपणच भरते..
आणि स्वतःशीच गप्पा मारत मारत
एका मैफीलीत येते...

सुपर्ब!!