'हिरण्य रिसॉर्ट' च्या संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांची मुलाखत

Submitted by मो on 10 December, 2014 - 22:30

वेरूळ आणि दौलताबादच्या मध्यावर, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या 'हिरण्य रिसॉर्ट'च्या सहचालिका आणि संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांच्याशी गप्पा मारताना मुख्यत्वे जाणवतं ते त्यांचं आपल्या कामाविषयी असलेलं प्रेम आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद! कलाक्षेत्रातल्या व्यावसायिक सुरुवातीनंतर अगदी अनपेक्षितपणे आठल्ये दांपत्याने रिसॉर्ट व्यवसायात उडी घेतली. स्वतःसाठी घेतलेल्या छोट्या जागेचे रिसॉर्टमध्ये रूपांतर करताना केलेली सुरुवात, एकंदर प्रवास आणि कला क्षेत्र व रिसॉर्टच्या व्यवसायाची सांगड घालून उभरत्या आणि अनुभवी कलाकारांची कला लोकांसमोर आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याची धडपड याबद्दल त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांची मुलाखत खास मायबोलीच्या वाचकांसाठी!


तुमची व्यावसायिक पार्श्वभूमी काय आहे? आदरातिथ्य व्यवसायक्षेत्रातला (हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) तुम्हांला अगोदर काही अनुभव होता का?

मी व्यवसायाने कलाकार आहे. अप्लाईड आर्ट्सचं शिक्षण झाल्यावर मी थोडे दिवस नोकरी केली आणि मग स्वतःची एजन्सी काढली. मुलं लहान असताना थोडा ब्रेक घेतला पण त्या काळातही माझं पेंटिंग, शिवणकाम, भरतकाम, वाचन आणि भरपूर फिरणं चालू होतं. मला आणि माझ्या मिस्टरांना फिरण्याची खूप आवड आहे, त्यामुळे शनिवार, रविवारी भटकंती सुरू असायची. मिस्टरांचा स्वतःचा व्यवसाय होता पण तो या रिसॉर्ट व्यवसायाशी काहीही संबंधित नव्हता. मलाही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधला काहीही अनुभव नव्हता. किंबहुना या व्यवसायात उतरू असा विचारही कधी केला नव्हता.

मग काही अनुभव नसताना या व्यवसायात उडी कशी घेतली? सुरुवातीच्या काही दिवसांबद्दल आम्हांला थोडं सांगाल का?

आधी सांगितल्याप्रमाणे आम्हाला फिरण्याची खूप आवड! त्यामुळे औरंगाबादजवळ वेरूळ, अजिंठा, दौलताबादचा किल्ला, जवळपासची इतर ठिकाणं इथे नेहमी फिरणं व्हायचं. पुण्याला गेलो की पानशेत, सिंहगड इत्यादी ठिकाणी चक्कर व्हायचीच. पण या नेहमीच्या ठिकाणांना भेट देण्याबरोबरच आम्ही वेगळ्या वाटाही भटकायचो. त्यामुळे या नेहमीच्या ठिकाणांबरोबरच माहिती नसलेल्या, आडगावच्या ठिकाणांनाही भेट दिली जायची. पुण्याहून औरंगाबादला कधीकधी सकाळी ७ वाजता निघालेलो आम्ही रात्री १२ वाजता घरी पोहोचायचो, कारण रस्त्यात कुठल्या नदीवर, धरणावर, छोट्याशा गावाला, एखाद्या शांत ठिकाणी भेट द्यायला आम्हांला खूप आवडायचे. पावसाळ्यात खूप फिरायचो. हे करताना, आपलं अशा शांत, निसर्गरम्य ठिकाणी एखादं छोटंसं घर असावं असं वाटायला लागलं. पावसाळ्यात निसर्ग अतिशय सुंदर असतो, औरंगाबादच्या आसपासचा परिसरही त्याला अपवाद नाही. डोंगराजवळ एखादी जागा असावी असं आमच्या मनात यायला लागलं आणि त्या दृष्टीने आम्ही जमीन पाहायला सुरुवात केली. दौलताबादचा किल्ला आणि वेरूळ यांच्यामध्ये डोंगराच्या पायथ्याशी आम्ही दीड एकर जागा घेतली.

आम्ही जिथे जागा घेतली त्या भागातली सगळी जमीन इनामी जमीन आहे. या सगळ्या जमिनीचा वापर माती काढून विटा बनवण्याकरता झाल्यामुळे सगळी जमीन अगदी नापीक झालेली होती. काटेरी दाट झाडं सगळीकडे पसरलेली होती. अशावेळी कोणी लोक येऊन ही जमीन विकत घेत आहेत ही गोष्ट तिथल्या लोकांकरता जरा आश्चर्याची आणि आशेचीही होती. त्यानंतर आजूबाजूच्या जमिनीचे मालकही त्यांची जमीन घ्या अशी गळ आम्हाला घालायला लागले आणि चार पैसे जोडीला असल्याने आम्हीही त्यांची जमीन विकत घेतली. असा पहिला तुकडा १९९५ साली घेतल्यानंतर पुढच्या २-४ वर्षांत आम्ही एका डोंगरापासून ते दुसर्‍या डोंगरापर्यंत पंधरा एकर जमीन विकत घेतली. आता जागा बरीच असल्याने या जमिनीचा उपयोग कशा प्रकारे करता येईल असा विचार मनात यायला लागला. वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्क, रिसॉर्ट, काही रिक्रिएशन अ‍ॅक्टीव्हीटीज करता येतील का, असे विचार मनात घोळायला लागले. त्या दृष्टीने मग आम्ही काही दौरे केले. वेगवेगळे वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्क ह्यांना भेटी देऊन, गुंतवणूक, नंतरचा पसारा, आवाका, ज्या भागात आहोत तिथली परिस्थिती, हवामान, राहणीमान या सर्वांचा अभ्यास करून शेवटी रिसॉर्टवर स्थिरावलो. सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात केली. पुढे रिसॉर्टमध्ये रूपांतर करावे असा विचार करून सुरुवातीला एक रेस्टॉरंट आणि टॉयलेट ब्लॉक एवढंच बांधलं आणि २००० साली आमचं रेस्टॉरंट सुरू झालं. त्यामुळे व्यवसायात एकदम उडी अशी घेतली नाही तर पुढे त्या दृष्टीने काही करता यावे म्हणून एक सुरुवात केली.

हळूहळू आम्ही लँडस्केपिंगवर काम करायला लागलो. झाडं लावायला सुरुवात केली. We are blessed with our land. दोन्ही बाजूला डोंगर आणि एका बाजूला आठशे वर्षं जुना तलाव, पावसाळ्यात सगळीकडे धबधबे. नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त असल्यामुळे लँडस्केपिंगमध्ये आम्ही त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला.



तुमच्या रिसॉर्टचं एक मोठं आकर्षण आहे 'हुरडा महोत्सव'! तसं पाहायला गेलं तर रिसॉर्टमध्ये हुरडा ही अगदी अनोखी कल्पना आहे. हिरण्यमध्ये हुरडा सुरू करण्यामागे काय विचार होता? ही कल्पना लोक एवढी उचलून धरतील असं वाटलं होतं का?

हो, हुरडा महोत्सव म्हणजे हिरण्यचं मोठं आकर्षण आहे. डिसेंबर जानेवारी हा हुरड्याचा सर्वोच्च खपाचा काळ असतो. त्या काळात प्रत्येक विकेंडला हजार बाराशे लोक हुरडा खाण्यासाठी येतात. फक्त ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सुट्टीत जवळपास दहा हजार लोक हिरण्यला भेट देतात.

२००० साली आम्ही जेव्हा अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात केली तेव्हा विचार केला की बदलत्या राहणीमानाप्रमाणे आपण कितीतरी गोष्टींपासून दूर गेलो आहोत, जसं की चूल, पाटा, वरवंटा, मिळून शेतात जेवण करणं, हुरडा खाणं वगैरे. जर आपण हुरडा हिरण्यला आणला तर? मग सुरुवातीला जवळपासच्या शेतकर्‍यांकडून हुरडा विकत आणून अगदी प्राथमिक स्तरावर हुरडा-विक्री सुरू केली. हुरडा + जेवण ६० रुपये. हाताने पोस्टर्स, कुपन्स करून जाहिरात केली. इथे मला कलाकार असल्याचा फायदा झाला. नवरात्रीत काही ठिकाणी ही जाहिरात केली. लोकांना हुरडा खायला आवडेल असं आम्हाला वाटलं पण प्रतिसाद कशा प्रमाणात मिळेल याची कल्पना नव्हती. सुरुवातीपासूनच लोकांचा प्रतिसाद खूप चांगला होता. प्रत्येक आठवड्यात गर्दी वाढत गेली. लोकांचा प्रतिसाद आणि पसंती आमच्यापर्यंत पोहोचत होती. आमचा हुरूप वाढला, मग आम्ही त्याकडे जास्त गंभीरपणे पाहायला लागलो. सुरुवातीला आम्ही १-२ शेतकर्‍यांकडून हुरडा घेतला होता, त्यानंतर बाकीचेही काही शेतकरी आमच्याकडे हुरडा देण्याकरता यायला लागले. हुरड्यात वेगवेगळे प्रकार असतात. त्याचा अभ्यास करून त्यातल्या काही जातींचा हुरडा आम्ही घ्यायला लागलो. जशी आमची गरज वाढायला लागली तसे आम्ही त्यातल्या ५-६ जणांकडून हुरडा घ्यायला सुरुवात केली. आता आमचे ठराविक पुरवठादार आहेत. जवळपास अडीच महिने हुरडा महोत्सव चालतो. शेतकरी थोड्या थोड्या पट्ट्यात पेरणी करत राहतात त्यामुळे आम्हाला पूर्ण सीझनभर उत्तम प्रतीचा, ताजा हुरडा सतत मिळत राहतो.


खानदेशी मांडे आणि हुरडा महोत्सव

रिसॉर्टचा पसारा बराच मोठा असणार. हिरण्यच्या संचालिका म्हणून तुमचा सहभाग यातल्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये असतो?

पदाने मी हिरण्यची संचालिका असले तरी मी बैठी संचालिका नाही. इथल्या अनेक गोष्टीमध्ये माझा जवळून सहभाग असतो.

लँडस्केपिंग, रोपवाटिका, रोपांची लागवड हे माझं राज्य आहे, ते मी पूर्णपणे सांभाळते. पावसाळ्यामध्ये वेगवेगळी झाडं आणणं, त्यांचा अभ्यास करणं, ती जगवण्यासाठी काय करायला पाहिजे हे पाहणं, गांडूळ खत तयार करणं वगैरे बाबींमध्ये मी लक्ष घालते. हुरडा पार्टीमध्ये आमच्याकडे हुरड्याचा भरपूर कचरा जमा होतो. तो वाया जाऊ देण्यापेक्षा आम्ही खतात त्याचा उपयोग करतो. हिरण्यवर डोंगर, धबधबे, तलाव या नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त आहे. नैसर्गिक गोष्टी तशाच ठेवण्याकडे आमचा कल आहे, परंतु धबधब्यांना थोडा आकार देणं, लाईट्स वगैरे टाकून स्पेशल इफेक्ट्स देणं, वेगवेगळी झाडे, हिरवळ लावणं या गोष्टी आम्ही करतो. प्रत्येक गोष्ट करण्यामागे बराच अभ्यास असतो. यावरून एक मजा आठवली. हिरण्यच्या सुरुवातीच्या दिवसांत वेगेवेगळ्या नर्सरीजना भेट देऊन मी बरीच झाडं आणली होती. सुंदर डोंगर, धबधबे यांना अजून सुशोभित करावं म्हणून मी काश्मीरमध्ये असतात तशी सुरुची झाडं आणली. माझं स्वप्न असं की इथे आलेल्या लोकांना या डोंगर, सुरुच्या झाडांच्या सान्निध्यात राहून अगदी काश्मीरला गेल्यासारखं वाटावं. पण कुठलं काय! काहीच महिन्यात सगळी झाडं मरून गेली. इथली हवा त्या झाडांना मुळीच मानवली नाही. नंतर मात्र मी अभ्यास करूनच रोपं, झाडं आणायला लागले.

आमच्याकडे शाळांच्या सहलीही बर्‍याच येतात. त्यांच्याबरोबर फिरणं, ट्रेकिंग करणं, या भागातल्या इतिहासाची माहिती देणं हे मी आनंदाने केलं आहे. जुन्या काळातली एक जलवाहिनी आमच्या इथून जाते ती दाखवायची, त्याचं महत्त्व सांगायचे, दौलताबादचा किल्ला दाखवायचा, सोप्या, रंजक भाषेत इतिहास सांगायचा या सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टी! खूपदा ही शाळकरी मुलं म्हणायची की तुम्हीच आमच्या शाळेत इतिहास शिकवायला या ना!

सुरुवातीला प्रसिद्धी, जाहिरात यांमध्ये मी खूप लक्ष घातलं होतं. आता वेगळी जाहिरात करण्याची गरज पडत नाही. माउथ पब्लिसिटीमुळे लोक येत राहतात.

वेगवेगळ्या कल्पनांवर विचार करून त्या अमलात आणण्यातही माझा खूप सहभाग असतो. एखादी कल्पना क्लिक झाली तर तिथेच थांबणं आम्हांला रुचत नाही. नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आमचा नेहमीच भर असतो.

हुरड्याच्या काळात अगदी काउंटर सांभाळण्यापासून, जेवणाच्या स्टॉलवर उभं राहणं, लोकांना काय हवं नको ते पाहणं, काही गोंधळ झाला तर हजर राहून तो सोडवणं यात मी असते.

वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणं, मुलाखती, प्रसिद्धी यांच्यात पुढं असल्याने तुम्ही I am the face of Hiranya असं म्हणू शकता.


अशा कुठल्या नवनवीन गोष्टी तुम्ही हिरण्यमध्ये आणल्या ज्या लोकप्रिय झाल्या? किंवा हिरण्यमध्ये असं काय आहे जे लोकांना आवडतं?

हिरण्यची सुरुवात आम्ही रेस्टॉरंटपासून केली. पण ते अजून कसं वाढवता येईल, चांगलं करता येईल, वेगळं काही करता येईल का, यावर सतत विचार केला जायचा. त्या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायचो. कोणी कृषीपर्यटन (agrotourism) केलंय, कोणी तंबू उभारले आहेत, कोणी साहसपर्यटन (adventure tourism) करतंय असं कळलं की भेटी द्यायचो. मग आपल्याला काय करता येईल, आपल्या लोकांची नस ओळखून काय करायला हवं यावर विचार व्हायचा. मराठवाड्यात तंबूंची (टेंट्स) संकल्पना नव्हती आणि तो प्रयोग करून पाहावा असा आम्ही विचार केला. आम्ही रिसॉर्टमध्ये तंबूंची सुरुवात केल्यावर छान प्रतिसाद मिळाला. खाटांवर झोपून चांदण्या रात्रीचा आस्वाद घेण्यास लोकांनी पसंती दिली. त्यामुळे आम्ही तंबू अजून वाढवले. पण त्यात असुरक्षित वाटणारे लोकही होते. अशा लोकांसाठी पर्याय म्हणून कॉटेजेसही बांधली. आता हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन मुलगाही आमच्या जोडीला या व्यवसायात सामील झाला आहे. आता त्याच्या नवनवीन कल्पनांवर आम्ही काम करत आहोत. अजून भर म्हणजे जास्त खोल्या, प्रशिक्षण केंद्रे, स्विस क्वार्टर्स, पब, जलतरण तलाव, लग्नांसाठी लॉन्स वगैरे यांच्यावर काम करत आहोत.

हिरण्यमध्ये होळी, गणपती, नवरात्र, कोजागिरी असे वेगवेगळे सण आम्ही साजरे करतो. दिवसभराच्या सहलीकरता जे लोक येतात त्यांच्याकरता आम्ही खेळण्यांचे स्टॉल्स ठेवले आहेत. पतंग, बॅडमिंटन, रिंग, फ्रिस्बी, फुटबॉल, भोवरे आणि इतर अनेक खेळ लोक खेळू शकतात. आम्ही रिव्हर क्रॉसिंग, व्हॅली क्रॉसिंग हे साहसी खेळही ठेवले आहेत. त्यासाठी प्रशिक्षक आणले.

हिरण्यचा परिसर खूप सुंदर आहे. एका बाजूला ८०० वर्ष जुना तलाव, दोन बाजूला डोंगर, घाटातला रस्ता आहे. त्यामुळे जेवणाबरोबरच निसर्गाचा आस्वाद घ्यायला लोक इथे येतात. आमच्याकडे येणार्‍या लोकांशी आम्ही संवाद साधतो. त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांना आजूबाजूच्या परिसराची माहिती देतो. फक्त जेवणखाणंच नाही तर बाकीच्याही अनेक गोष्टी लोक हिरण्यमध्ये अनुभवतात. लोक भरभरून बोलतात, आठवणींची देवाणघेवाण करतात आणि त्या छान स्मृती घेऊन परत जातात.

सर्वांना माहिती असलेल्या लोकांबद्दल सांगायचं म्हटलं तर हिरण्यला ना. धों. महानोर येत असतात. आमच्याकडे सी.आय.डी. मालिकेचं शूटिंग झालं होतं. २०१२मध्ये आलेल्या प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूरवर चित्रित झालेल्या 'तेरी मेरी कहानी' या चित्रपटाचं हिरण्यला शूटिंग झालं होतं. मिलिंद गुणाजी महाराष्ट्रातल्या विविध किल्ल्यांना भेटी द्यायचा तेव्हा दौलताबादच्या भेटीत तो हिरण्यला येऊन गेला. या परिसराबद्दल, इतिहासाबद्दल, किल्ल्याबद्दल आमची चर्चा झाली.

आमच्याकडचा खानदेशी मांड्यांचा स्टॉलही अतिशय लोकप्रिय आहे. इथे छोट्यांबरोबर, वृद्धही वेगवेगळे खेळ खेळतात, पतंग उडवतात, काटाकाटी करतात, चूल पाहून भूतकाळात रमतात, खानदेशी मांडे बनवलेले पाहताना, खाताना आजीची आठवण काढतात.

येणार्‍या सर्वांनाच हिरण्य खूप आवडतं आणि ते परत येण्याची इच्छा व्यक्त करतात हेच आम्हाला आमचं यश वाटतं.


तुम्ही शून्यातून सुरुवात केली आणि आता हिरण्यचा पसारा खूप वाढला आहे. या प्रवासात तुम्ही बरेच चढ-उतार, फायदे-तोटे पाहिले असतील ना?

व्यवसाय म्हटलं की चढ-उतार, फायदे-तोटे आलेच. अजूनही तोटा होतो. काही कल्पना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, किंवा पसंतीत उतरत नाहीत. मग त्यातून होणार्‍या तोट्यातून सावरता सावरता नवीन संकल्पनांवर सतत विचार केला जातो. कोणती गोष्ट लोकांना आवडू शकेल, कशाकरता हिरण्यला लोक येतील यावर विचारमंथन, चर्चा ही घरी घडतंच असते. वर्षातील सगळे महिने लोक हिरण्याला कसे येतील यावर विचार चालतो.

दहा वर्षांपूर्वी 'हिरण्य धुवांधार' ही संकल्पना आम्ही आणली. पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी या, पावसात, धबधब्यांमध्ये भिजा, खा प्या आणि निसर्गाच्या सानिध्यात दिवस घालवा ही ती कल्पना होती. सुरुवातीला ही कल्पना लोकांनी उचलून धरली, पण अगोदर चांगला प्रतिसाद मिळालेला हा उपक्रम पुढे मात्र आमच्या अपेक्षेएवढा तितकासा चालला नाही.

आपल्याकडे शाळेच्या सहली सहसा हिवाळ्यात निघतात. आम्ही शाळांच्या सहली पावसाळ्यात आणायला उत्तेजन दिलं. निसर्ग पावसाळ्यात सुंदर असतो, त्यामुळे तेव्हा बोलावलं. निसर्गसहल काढली. मीही त्यांच्याबरोबर जायचे. हिरण्यने उन्हाळी शिबिरं भरवली, सगळं आम्हीच मॅनेज करायचो. पण त्यात बर्‍याच कटकटी होत्या. थोड्या अनुभवानंतर मात्र हिरण्यच्या जागेत आम्ही शाळांना/संस्थांना अ‍ॅरेंज करायला सांगितलं. म्हणजे जागा आम्ही देतो, शिबिर तुम्ही भरवा.

हा सगळा प्रवास आम्हांला खूप शिकवून जातो. त्यातून विचारमंथन केलं जातं, नवनवीन कल्पना येतात. घरचे सगळे यात सहभागी होतात. प्रत्येक गोष्टीतून फायदा होणं, प्रत्येक कल्पना क्लिक होणं हे शक्य नसतं याची पूर्ण कल्पना असल्यामुळे वेगवेगळ्या अंगाने, दृष्टीने विचार करून लोकांपर्यंत त्यांना आवडणारी, भिडणारी गोष्ट कशी पोहोचवता येईल यावर भर दिला जातो. लोकांपर्यंत न पोचलेल्या/पसंतीस न उतरलेल्या कल्पनांमधून, तोट्यामधूनही आम्ही सगळेच खूप काही शिकलो/शिकतो.

माझी दोन्हीही मुलं हिरण्यवर वाढली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. साप, विंचू, बेडूक, माकड, वेगवेगळे पक्षी हे त्यांच्या आयुष्याचा भाग होते. आमच्या हुरड्याच्या अतिशय व्यग्र काळात दोन्हीही मुलं खेळण्याची, पाण्याची काउंटर्स सांभाळायची. हिरण्यवर ती वेगवेगळे अनुभव घ्यायला, माणसं ओळखायला शिकली. दोघंही खूप धाडसी आहेत आणि त्यात हिरण्यचा खूप मोठा वाटा आहे.

एक व्यवसाय म्हणून कशा प्रकारे नियोजन करता, किती वेळ द्यावा लागतो?

कुठल्याही व्यवसायात जम बसेपर्यंत अगदी झोकून देऊन काम करावं लागतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालावं लागतं. मग जम बसल्यानंतर तुम्ही त्यातल्या तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये जरा जास्त लक्ष घालू शकता. त्याचप्रमाणे वेळेचं जरा योग्य प्रकारे नियोजन करू शकता. आमचा हा व्यवसाय हा फक्त माझ्या एकटीचा नाही. मी आणि मिस्टरांनी मिळून तो नावारूपाला आणला आहे. त्यामुळे कामं विभागली जायची. मी आधी म्हटल्याप्रमाणे रोपांची लागवड, जाहिरात, नवनवीन कल्पनांवर विचार, त्यांची अंमलबजावणी आणि हुरड्याच्या काळात सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग यामध्ये खूप वेळ द्यावा लागायचा, वेळेचं फारसं नियोजन नसायचं. पण आता मात्र मी बर्‍याच गोष्टींमधून लक्ष कमी केलं आहे आणि माझ्या आवडत्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालायला सुरुवात केली आहे. डिसेंबर जानेवारी (आणि खास करून त्यातले विकेंड्स) मात्र यासाठी अपवाद असतो. तेव्हा दिवसातला संपूर्ण वेळ हिरण्यसाठी द्यावा लागतो.


तुम्ही स्वतः कलाकार आहात, हिरण्यमध्ये याचा उपयोग तुम्ही करून घेता का, किंवा घ्यायचा विचार आहे का?

औरंगाबादला खूप मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे. पण तसं पाहिलं तर इथे फार सांस्कृतिक कार्यक्रम किंवा उपक्रम होत नाहीत. माझ्या मनात हिरण्य हे नुसतंच रिसॉर्ट नव्हे तर मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं असं माहिती देणारं सांस्कृतिक केंद्र बनवायचं आहे. औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, दौलताबादला येणार्‍या लोकांसाठी हिरण्यमध्ये वाचनालय, संग्रहालय बनवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही मागे हिरण्यला गायन आणि वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र दिन साजरा केला होता. त्या निमित्ताने बर्‍याच कलाकारांना भेटलो, स्थानिक कलाकारांनाही संधी दिली. पुढेही कलाकारांना वाव देता यावा म्हणून आम्ही 'हिरण्य फाऊंडेशन' ह्या संस्थेची स्थापना केली, आणि त्याद्वारे स्थानिक आणि बाहेरच्या विविध कलाकारांना त्यांच्य कला सादर करण्याकरता एक व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कलेशी निगडीत ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रामुख्याने माझा सहभाग असतो.

हिरण्यमध्ये मला कलादालन भरवायचं आहे. मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स केले आहे, आणि आता पी एच. डी.ला प्रवेश घेतला आहे. माझ्या संशोधनाचा विषयही मी वेरूळ अजिंठ्याचे शिल्प, चित्र यांच्याशी संबंधित घेतला आहे. सखोल अभ्यास करावा, त्याविषयी पुस्तक लिहावं हा माझा मानस आहे. कला क्षेत्र माझे पॅशन आहे आणि त्या दृष्टीने मी हिरण्यमधून काय करू शकते यावर माझा विचार सुरू असतो. ख्रिसमसच्या सुट्टीत हिरण्यला जवळपास १०,००० लोक भेट देतात, त्या काळात स्थानिक कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन भरवण्याबद्दल आमचा विचार चालू आहे. हिरण्यला भरवलेल्या कलादालनात काही कायमस्वरुपी तर काही फिरते कलाविष्कार ठेवण्याबद्दल काम चालू आहे. त्या दृष्टीने मी कलाकारांच्या भेटी घेत असते. त्यानिमित्ताने विविध कलाकारांची चित्रे, कला इथल्या लोकांना, या भागाला भेट देणार्‍या पर्यटकांना पाहायला मिळतील.

वेरूळ, अजिंठ्याला जगभरातून लोक भेट देतात, पण त्यांना अधिक माहिती हवी असेल, स्थानिक चित्रकार, शिल्पकारांशी या कलाकृतींबद्दल चर्चा करायची असेल तर तसा एकही ग्रुप औरंगाबादमध्ये नाही. ही खदखद फार वर्षं माझ्या मनामध्ये होती. स्थानिक कलाकार, विद्वान, गाईड्सना भेटायचं, प्रसिद्धी करायची, महिन्यातून एकदा तरी भेटायचं, समविचारी लोकांबरोबर चर्चा करायची हा एक फार संपन्न करणारा अनुभव आहे. तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये आम्ही एक कला-प्रदर्शन भरवलं होतं. माझी चित्रंही त्यात मांडली होती. पुढच्या वर्षीचा जहांगिरचा शो मला मिळाला आहे. तर आपल्या या अनुभवाचा, ओळखीचा आणि हिरण्यसारखी जागा असण्याचा फायदा कलाक्षेत्रात असलेल्या लोकांना करुन देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहेत.

इतिहास हा माझा आवडता विषय. हिरण्यमुळे या परिसराबद्दल खूप वाचन, अभ्यास झाला. मला जुन्या, पुरातन वस्तू जमवण्याचंही वेड आहे. सध्या मी वेगवेगळ्या धातूंच्या, आकाराच्या जुन्या वस्तू गोळा करते. त्यासाठी अगदी छोट्या छोट्या गावांना भेटी देते. यात मला सगळ्यात कोणाची मदत होत असेल तर भांड्यांची दुकाने असणारे दुकानदार! या लोकांकडे कधी कधी अगदी जुन्या, मौल्यवान वस्तूंचं भांडार निघतं. त्यांना कळलं की मी जुन्या वस्तू शोधतेय तर मला जुनी नाणी, वडिलोपार्जित असलेल्या अतिशय जुन्या वस्तू मला दाखवतात. मध्ये मी एकदा अशीच जुन्या वस्तू शोधत फिरत होते तेव्हा एक भांडीवाला म्हटला मी तुम्हाला मिनिएअचर पेंटिंग दाखवतो. मी अवाक झाले! बर्‍याच दुकानदारांकडे अश्या चकीत करणार्‍या गोष्टी सापडतात.

आपल्या या पारंपरिक वस्तूंच्यामागे फार अभ्यास आहे. भांड्यांचे विविध आकार, त्याकरता वापरले जाणारे धातू यांमागे त्या भागातले हवामान, धातूचे गुणधर्म आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यास असतो. मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून, लोकांशी बोलून, वाचन करून या सगळ्या गोष्टींचं दस्तावेजीकरण करत आहे. या वस्तू, माहिती मला हिरण्यमध्ये कायमस्वरूपी प्रदर्शनात मांडायची इच्छा आहे.


मेधा पाध्ये-आठल्ये ह्यांच्या काही कलाकृती

सगळ्यात शेवटी, हिरण्यचा ह्या वाटचालीबद्दल तुमच्या भावना कशा व्यक्त कराल?

हिरण्यचा हा सर्व प्रवास फार सुंदर झाला आहे. निसर्ग, कला यांची मला मनापासून आवड असल्याने माझ्यासाठी हा प्रवास अतिशय अनुभवसंपन्न करणारा झाला. माझी आणि माझ्या मिस्टरांची याबाबतची दृष्टीही एक असल्याने दोघांनी मिळून सर्व गोष्टी केल्या. सेटबॅक्स, कटकटी यांचा सामनाही मिळून केला. मुलांचाही हिरण्यच्या वाटचालीत मोठा सहभाग आहे. आता तर मुलगा त्यात पूर्णपणे उतरला आहे. हिरण्यला लोकांचं खूप प्रेम मिळालं, अजूनही मिळतय, आपलं काम लोक पसंत करतात ह्याचा आनंद आहे.

मला विविध कलांची आवड आहे, आणि हिरण्यद्वारे मला त्या लोकांसमोर आणण्याची इच्छा आहे. हिरण्यमुळे माझे काम आणि माझी पॅशन मी एकत्र आणू शकतेय. मी जे करतेय त्यात मला फार आनंद, समाधान मिळतं त्यामुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते.

मुशो सहाय्यः अरुंधती कुलकर्णी, संपदा, बिल्वा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मो..........खूप छान आहे मुलाखत! एकदा जायला हवं. आणि त्यांच्या कलाकृतीही सुंदरच !

दरवर्षी हिवाळ्याच्या सुट्टीत औरंगाबादला गेल्यावर हिरण्यला हुरडा खायला जावून नाही आलं तर सुट्टी अपुर्ण असल्यासारखं वाटतं. खूप मस्त जागा आहे ही. दौलताबादच्या किल्ल्यापासून अगदी पायी जाण्याइतकी जवळ. आजूबाजूला डोंगर, त्यांच्यामध्ये एक तळं आणि त्याच्याबाजूला हा रिसॉर्टचा परिसर.
तिथे गेल्यावर आधी हुरड्याचीच आठवण येते. गरम गरम कोवळा हुरडा, त्यासोबत शेंगदाणा, तीळ, खोबरं अश्या चटण्या,गुळाचे खडे, दही आणि दही ओरपायला/चोखायला ज्वारीच्या कणसाचे तुकडे (काय म्हणतात त्याला? मला नाव आठवत नाहीये) सोबत उकडलेली मक्याची कणसं, बोरं, पेरू, डहाळे असा रानमेवा. तुडूंब खावून मग रिसॉर्टच्या परिसरात तास-दोन तास भटकायचं, जर मोठ्ठा ग्रूप असेल तर थोडेफार खेळ, अगदी काहीच नाही तर गाण्याच्या भेंड्या तरी हुरडा खाताखाता होतातच. भटकून लेकरांचे पाय थकले, थोडी भुक लागली की जेवायला जायचं. मांडे,ज्वारी-बाजरीच्या भाकर्‍या, पोळ्या, वांग्याचं भरीत, एखादी काळ्यामसाल्याची भन्नाट भाजी, दाल-बाटी,फोडणीचं वरण, भात, गोडाला अजून काही (जिलेब्या असल्या तर त्या अगदी मस्त कुरकुरीत असतात), पापड, लोणची, चटण्या, ठेचा.. असं जेवण करुन परत थोडावेळ फिरून घरी वापस.
सकाळी लवकर निघालं तर दौलताबादचा किल्ला चढून १०-११ वाजेपर्यंत हिरण्यला जायचं आणि मग उरलेला दिवस तिथेच घालवायचा.. संध्याकाळी घरी परत...

यावेळी गेले की मेधाताईंना भेटेन मी. त्यांची चित्र, आर्ट गॅलरी या सगळ्यांबद्दल गेल्या वर्षभरातच कळलंय. मुलाखत खूप मस्त झालीये मो. सगळे फोटो मस्त. Happy

मस्त मुलाखत! फोटोंवरून व वर्णनावरून नक्केच भेट दिली पाहीजे अशी जागा वाटली!
त्या कलाक्रुती पण सुपर्ब आहेत!!

अरे वा! अल्पनाने इतकी छान अ‍ॅडिशन केलीये की आता हुरडा यायला लागलाय तोपर्यंत मुद्दामच जाऊन यायला हवंसं वाटायला लागलंय. इथून २ तास.

सवडीने लिहीन म्हटलं... माझ्या मनातलं सगळं अल्पनाने लिहीलंय सो .. मम .. .. आम्ही गेलो होतो तेव्हा जातीने लक्ष देत होत्या! अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व ... मुलाखत मस्त!

अतिशय आवडली मुलाखत. सौ. पाध्ये यांच खरच कौतुक आहे.

मो प्लिज त्यांचा अ‍ॅडरेसही टाकून ठेव. आता कधी औरंगाबादला गेलो की इथे जाणे नक्की. किंवा खास इथे जाण्यासाठी औरंगाबादला जायचे नक्की करावे लागेल. :स्मितः

अतिशय सुरेख मुलाखत.
ह्या बाई किती ऑलराऊंडर आणि धडाडिच्या आहेत ते या मुलाखतीतून कळतंय. अपार कष्ट घेतले असणार यांनी. अश्या माणसांबद्दल वाचलं की आपण किती खुजे आहोत याची जाणिव होते.

मस्त झाली आहे मुलाखत, मो! हिरण्य रिसॉर्टची संकल्पनाच खूप आवडली. त्यांचे प्रयत्न, कष्ट, कल्पकता व धडपड त्यांच्या शब्दांमधून पदोपदी जाणवते आहे. हिरण्यला एकदातरी भेट द्यायला हवीच! Happy
फोटोग्राफ्स अतिशय देखणे आहेत.

मो, अग मस्त झालीये मुलाखत..२ वर्षा पुर्वी आम्ही गेलो होतो.. काय मस्त थाट होता.. गेल्या गेल्या गरम गरम हुरडा, सोबत लसणा ची चट णी, आणि बर्याच चटण्या.. बोर, भाजलेले / उकडलेले कणीस , भाजलेल्या/ उ कडले ल्या शेंगा .. व्वा !! आणि नंतर दाल बाटी, मांडे च जेवण...
ऑलमोस्ट पुर्ण दिवस तिथे घालवला.. आणि खुप जण होतो त्यामुळे मजा आली..

आई-बाबा आणि तिथल्या नातेवाईकांना तर बस कारण च पाहिजे तिथे जायला Happy

ह्या डिसेंबर मध्ये पण एक गेट टुगेदर आहे ते पण तिथेच करायचा प्लान आहे...
बाकी मेधाताईं बद्दल ची माहिती खुप छान.. सुंदर फोटोज..

मला वेध लागले आता औ'बाद ला जायचे Happy
अल्पना च्या पोस्टी ला मम..

ज्वारीच्या कणसाचे तुकडे (काय म्हणतात त्याला? >> ओंब्या का ग??

मस्त झालीय मुलाखत.
हिरण्यबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे मो ला विशेष धन्यवाद Happy

Pages