भय

Submitted by भुईकमळ on 26 November, 2014 - 08:44

अलीकडे फार भिती वाटू लागलीय
या शहराबद्दल,भोवतालाबद्दल
अगदी स्वत:बद्दलही
जसे माझे अस्तित्व
प्रत्यारोपण केलेल्या अवयवासारखे
अचानक बगावत करेल
या शहराच्या देहसंस्थेशी
आणि माझ्याही नसानसातून
वाहत राहील
एक अनोळखी काळपट रक्तप्रवाह
अद्रूष्टाचा करपट वास घेऊन...
भिती स्वप्नातूनही रस्ता ओलांडतानाही
की रोरावत येईल कुठूनही
मानवी लाटेचा एक विकृत लोंढा नी
मलापण वहावत रहाव लागेल अनिच्छेनेच
त्यांच्या धर्माच्या कालविसंगत
पाखंडी सनातन व्याख्येतून ...
अलिकडे मात्र एक विचित्रच भिती
भिनू लागलीय शहराच्या श्वासातून
चेर्नोबिलच्या भट्टीतून पाझरणारया
सूक्ष्म किरणोत्सारासारखी
की वाढत जातील शहरातून
आभाळाच्या दिशेने भराभर जायंट वेली
झेपावेल ..धावेल सारी तरूणाई त्यांच्यावरुन
सोन्याचं अंड देणारी कोंबडी पळवण्यास्तव
ह्लदय जमीनीत पुरुन ,
शांतीसमाधानाचे सूर पाझरवणारे
जादुई हार्प फेकून ...
घराघरातून उरलेले वार्धक्य दीर्घायुषी
करत असेल याचना यमदुताची
बेडला जखडलेल्या अरुणा शानभागसारखी
मात्र भय वाटेल त्यांनाही याचेच की
जिहादच्या आत्मघातकी खेळात रमलेले बाल्य
घाबरणार नाही कशालाच
त्यांच्या कोरड्याटक्क डोळ्यात
उरणार नाही एकही शुभ्र थेंब आपुलकीचा
दिसत राहील कधीमधी फक्त
काळाकुट्ट रासायनिक पाऊस
स्फोट होऊन गेल्यानंतरचा...
आजकाल रात्री बेरात्री
दचकून उडतो शांतीदूतांचा थवा
करपल्या पंखांचा फडफडाट करीत
कुणीतरी ठिणग्यांची मुठ
समोर उधळल्या सारखा....
...........................................भुईकमळ......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यासाठी खूप दुर्मिळ असलेली तुमची दाद मिळाली .
मनापासून धन्यवाद! मायबोलीकरांना मुक्तछंद आवडत नाहीत काय?....

आमच्यापासून जवळच घडलेल्या साखळी बाँबस्फोट मालिकेनंतरची कविता.त्या काळात भिती मानगुटी वरच
सतत बसलेली.

कालचे पेशावरमधील ते कोवळ्या जीवांचे हत्याकांड पाहिले/ऐकल्या क्षणापासून सुन्न करून टाकणारे जे वातावरण अनुभवत आहे....त्या संदर्भातील विविध ठिकाणांवरील वाचन समोर येत आहे, त्या कोवळ्या कळ्यांच्या आईवडिलांचा धरणी फाटून जाईल असा आक्रोश....मानवातील संवेदनाच नाहीशी करणारी ती घटना....आणि पुतळ्यागतची ती अवस्था....सारे असह्य...अशा अवस्थेत भुईकमळ तुमची ही "भय" कविता समोर आली....मागील महिन्यात लिहिलेली असली तर ताज्या घटनेचा संदर्भ इतका पुरता भरला आहे की असे जाणवत गेले "अलीकडे फार भिती वाटू लागलीय या शहराबद्दल,भोवतालाबद्दल...." ही ओळ तर पेशावरबद्दलचीच आहे की काय !

अतिशय अर्थपूर्ण आणि सत्यच सारे सांगणारी ही रचना प्रभावी झाली आहे.

अगदी अंत:करणपुर्वक लिहीलेल्या या शब्दांजलीबद्दल अशोकजी, धन्यवाद !
तूम्ही लिहल्याप्रमाणे मनस्थिती झालीय अगदी सून्न.
लहानपणी आम्ही गावालगतच्या दरयांखोरयातून बिनधास्त उंडारत असायचो .आई सांगायची भूतं ,राक्षस असल काही नसतच मुळी....आज आईला सांगायल हवं , ..हो असतात भूतं ,राक्षस माणसांत सुघ्दा असतात इतके क्रूर ,अघोरी...

भुईकमळ....

"...भूतं ,राक्षस माणसांत सुघ्दा असतात इतके क्रूर ,अघोरी......" असं तू म्हणाली आहेस....पण मी तर आता भूतांना राक्षसांना अघोरी विशेषणाने पुकारावे असे म्हणू शकत नाही. लहान मुलांना भूत आणि राक्षससुद्धा हात लावत नसतील; ते फक्त भीती दाखवतील, मारणार नाहीत थेट.....इतकी माणुसकी असणारच त्यांच्यात. नरराक्षस ते लोक ज्याना त्या मुलांचे आक्रोश ऐकू गेले नाहीत.

व्याख्याच बदलत चालल्या आहेत सार्‍या.

कशी मिस झाली ही कविता ? अगदी प्रभावी मुक्तछ्न्द आहे हा ! सुन्न करणारे वास्तव कवितामूल्य न गमावता शब्दात उतरले आहे.

जिगीषा, कविता फार आवडल्याचं कळवलत अगदी मनापासून धन्यवाद !
भारतीताई, तुम्हालाही कवितेला दाद द्यावी वाटली म्हणजे
कविता खरच नीट जमुन आली वाटतं...
मनाने नवी उभारी घेतलीय तुमच्या प्रतिसादाने .
खुप खूप धन्यवाद!!!