मेणबत्तीचे झाड

Submitted by sariva on 24 November, 2014 - 02:52

मेणबत्तीचे झाड

ऋतू पावसाळा.सप्टेंबरचे अखेरचे दिवस.आजूबाजूला हिरवळ आणि फुलांची रेलचेल.रस्ता आम्हा दोघांचा नेहमीचाच २६ वर्ष जाण्यायेण्याचा.पण त्यादिवशी एक नवल घडलं.अनपेक्षितपणे अपूर्व,अभूतपूर्व असे काहीतरी दृष्टीसमोरून ओझरते गेले.लगेचच गाडी थांबवून तिथपर्यंत गेलो.
रस्त्याच्या कडेला ते नवल आमची वाट बघत होते.अहाहा! अतिशय आकर्षक,चमकदार पिवळ्या रंगाचे अलौकिक पुष्पगुच्छ विराजमान झालेले ते झाड मी प्रथमच पहात होते.निसर्गाला अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटली.निव्वळ अप्रतिम!भान हरपून त्या फुलांकडे मी पहातच राहिले.मन एकदम प्रसन्न, शांत व समाधानी झाले.
मनात नाना प्रश्न उमटले.अगदी अचानकपणे हे झाड/ती फुले तेथे कशी आली?बरे ते झाडही तेथे एकुलते एक! आजूबाजूच्या ८-१० कि.मी.परिसरात वा इतरत्र कोठेही ते याआधी कधी पाहिल्याचे स्मरेना.मग दुसया दिवशी खास कॅमेरा नेऊन त्याचे फोटो काढले एकदाचे; तेव्हा कुठे बरे वाटले.
नि.ग.वर ते फोटो टाकून त्याचे नाव विचारावे असे एकदा मनात आले.म्हटलं कदाचित तुमच्यापैकी कुणाला याचा परिचय असेल!
पण का कुणास ठाऊक त्याचे वेगळेपण मनाला सतत जाणवत होते.मग मीच त्याची माहिती आंतरजालावर शोधून माझी जिज्ञासा पूर्ण केली.तेव्हा हे झुडूप आपल्याकडे भारतात दुर्मिळ आहे हे मला समजले. भारतात उत्तर प्रदेशात तराई प्रदेशात लखीमपूर खिरी जिल्हयात कस्ता येथे हे क्षुप २०१२ साली सापडल्याची भारतातील एकमेव नोंद कृष्ण कुमार मिश्र यांनी केलेली आढळली.शक्य आहे की हे क्षुप इतरत्र दिसलेही असेल पण नोंद केली नसेल.
फोटो माझे, आणि माहिती आंतरजालावरुन व विकिपिडीयावरून साभार खास तुमच्यासाठी!

शास्त्रीय नाव:
Senna alata, Cassia alata, Cassia bracteata etc.

इंग्लिश नावे:
Candle Bush, Empress Candle Plant, Candle tree, Candelabra Bush, Candlestick Cassia ,yellow candle
Seven Golden Candlesticks etc.
(याचा पुष्पगुच्छ कॅण्डलबार सारखा दिसतो व जणू पेटलेली पिवळी मेणबत्तीच वाटते म्हणून)
Ringworm Tree :Ringworm या त्वचाविकारातील याच्या उपयोगावरून.
craw-craw plant:कीटकांना उपयोगी म्हणून.

मराठी :
पीतांबर/पीतांबर कृष्ण
(साक्षात गुरुदेव बृहस्पती या मुगुटरूपी पुष्पगुच्छान्वर विराजमान झाले असावेत व स्वतः श्रीकृष्ण याच्या पीतवर्णातउपस्थित असावेत अशी कल्पना केली आहे. शिवाय पीतांबर -कृष्णाचे एक नाव)

Family: Subfamily:
Fabaceae (Leguminosae) caesalpinioideae

मूळ उत्पत्तिस्थान :मेक्सिको (द.अमेरिका) तेथे त्याच्या २६० पेक्षा अधिक जाती.

आढळ: विभिन्न उष्णकटिबंधीय प्रदेशात,विशेषतः दलदलीच्या प्रदेशात, सुमारे १२०० मी. उंचीवर आढळते.७-८ तास स्वच्छ सूर्यप्रकाशही लागतो.
मला आढळलेले झाड अशा थोड्याशा,पाणथळ पण पाण्याचा निचरा होईल अशा जागी होते.

स्वरूप: वर्षायू क्षुप(shrub). उंची -३ मी.पर्यंत
मोठाल्या पुष्पगुच्छात (inflorescence) दिसणाऱ्या सुवर्णसमान फुलांमुळे हे आकर्षणाचे केंद्र बनते.त्यामुळे सजावटी पुष्पांच्या श्रेणीत समावेश.
कुंपण म्हणून छान दिसेल.

या झाडाची विशेष देखभाल करावी लागत नाही. अपवाद -तीव्र अवर्षणकाळ.
औषधी दृष्ट्या अत्यंत उपयुक्त.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्व:विविध कीटक-माश्या ,मुंग्या,फुलपाखरांच्या आळया यांचे आश्रयस्थान व भोजनस्थान.विशेषतः yellow sulphur butterflies च्या जीवनचक्रात महत्त्व.बटरफ्लाय gardens मधील हे एक महत्त्वाचे झुडूप आहे.
किटकान्द्वारे केलेल्या परागीभावानातून परस्पर सहकार्य होते.

१.पाने:

simple pinnate प्रकारची पाने.
लांबी ५० ते ८० सेमी

विशेष म्हणजे prayer plant प्रमाणे ही पाने रात्री मिटतात.ते बघण्यासारखे असते.

यावर वाढणाऱ्या फुलपाखरांच्या आळयांवर नियंत्रण ठेवता यावे म्हणून या झाडाला एक अनोखी देणगी लाभली आहे.एरवी नेक्टर फुलातून मिळतो.पण याच्या पानांच्या मुळाशी नेक्टर तयार करणाऱ्या necteries असतात.हा नेक्टर(मध) मुंग्यांना आकर्षित करतो आणि अशाप्रकारे त्या झाडासाठी आळयांविरुद्ध आपोआपच bodyguard/अंगरक्षकाचे काम मुंग्या करतात!

२. पुष्पगुच्छ

फुले येण्याचा काळ सप्टेंबर -अॉक्टोंबर.
सुमारे ६ ते २४ इंची लांब दांड्यावर चमकदार पिवळ्या रंगाच्या पुष्पकळ्या दाटीवाटीने असतात.कलिकावस्थेत त्यावर केशरी रंगाचे आवरण (bract)असते.फुले उमलली कि हे आवरण गळून पडते.प्रत्येक छोटे फूलसाधारण १ इंचाचे असते.या प्रत्येकात खूप परागकण असतात व त्याकडेच कीटकांच्या विविध प्रजाती आकर्षित होत असतात.

माझे निरीक्षण:सर्व पुष्पबहार मला एकदम एकाच वेळी आलेला दिसला.पुन्हा नाही.

३.शेंगा

शेंग सरळ,१५ ते २५ सेमी लांब,सुमारे १.५ सेमी रुंद असते.
रंग - काळा/डार्क ब्राउन
लांबीत शेंगेच्या दोन्ही बाजूस पंखांसारखी रचना.
जनावरे व पाण्याद्वारे वाहून जाण्यास या पंखांचा उपयोग.
शेंगा वाळल्यावर त्यातील बियांमुळे खुळखुळयासारख्या वाजतात.

माझे निरीक्षण: शेंगा सुमारे दीड महिन्यांनी झाडावर वाळलेल्या होत्या.

४. बिया

प्रत्येक शेंगेत चपट्या, त्रिकोणी आकाराच्या ५० ते ६० बिया असतात.त्यांच्यासाठी शेंगेत खास स्वतंत्र कप्पे असतात.

नैसर्गिक बीजप्रसार पाणी,जनावरे याद्वारे.याच्या आकर्षकतेमुळे मनुष्यही याच्या बिया एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतो. या बिया online विकतही मिळतात.लागवड वसंत ऋतूत करावी.याचे बी लावल्यावर थोड्याच दिवसात अंकुरते.
एकदा झुडूप तयार झाल्यावर प्रत्येक शेंगेत ५० -६० बिया असल्याने शेंगा वाळल्यावर मोठ्या प्रमाणावर बीजप्रसार होऊन एका वर्षातच ही प्रजाती त्या जमिनीवर आपले प्रभुत्व तयार करते.शेकडो झाडे एकाच वेळी येतात. म्हणून तिला आक्रमक प्रजाती म्हटले आहे.

मला हे झाड औरंगाबाद येथील कांचनवाडी नजीक आढळले ते मात्र एकांडेच! हे क्षुप तेथे कोठून, कुणामुळे आले असावे हे प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरीतच आहेत.

पुढच्या वर्षी तेथे अनेक झुडुपे उगवतील का? उत्सुकता आहे. लक्ष ठेवायला हवे!

औषधी उपयोग :

उपायुक्तांग :पाने,फुले,मूळ

जगात वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर वेगवेगळ्या आजारात करतात.श्रीलंकेत सिंहली पारंपारिक चिकित्सेत वापरतात.

१. त्वचा विकारात उपयुक्त: हे आधुनिक शास्त्रीय अभ्यासात सिद्ध झाले आहे.यातील chrysophanic acid मुळे antifungal म्हणून याचा वापर होतो.फिलिपाईन्स मध्ये antifungal साबण,शाम्पू,lotions यात वापरतात.
Ringworm,eczema,सोरायसिस,सिफिलीस,गनोरिया,त्वचेची खाज,व्रण यात वापरतात.विषारी कीटकांचे दंश,सर्पदंश यातही उपयुक्त.याच्या वापराने त्वचेची आभाही सुधारते.याची पाने वाटून समभाग वनस्पती तेलात मिसळून दिवसातून २-३ वेळा लावतात.

2 : Saponin मुळे यात विरेचक (laxative) गुणधर्म येतो. आंत्रकृमिनाशक आहे. दक्षिण अमेरिकेत anemia,यकृत विकार,जठरदाह,छातीतील जळजळ यात वापर.
gram+ve bacteria, E-coliयावर याचा वापर सिद्ध झाला आहे.म्हणून अतिसार, कॉलरा यात उपयोगी.

३. रक्तशर्करा कमी करण्यास वापरतात.

४. आफ्रिकेत पाने उकळून रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वापरतात.

५. मूत्रवर्धक असल्याने मुत्राविकारात वापरतात.

6.याशिवाय ताप,अस्थमा,bronchitis यासारख्या श्वसन विकारात वापरतात.

७.Anti tumor तत्वही यात आहे.

अशा प्रकारे हे क्षुप नक्कीच उपयुक्त आहे.

पण ही विदेशी आक्रमक प्रजाती असल्याने पर्यावरणाला हानिकारक ठरेल का? त्याची लागवड मी करून बघावी का नाही? तुम्हाला काय वाटते?
याच्या फुलांनी मला अगदी भुरळच घातली आणि उत्सुकतेपोटी मी ही माहिती आंतरजालावरून मिळवली . ती तुमच्याशी share करावीशी वाटली म्हणून खरे तर हा लेखनप्रपंच!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नक्की आठवत नाहि पण अशीच फुलांचि झाडे गावाकडे आढळतात नवरात्रात त्याची माळ करायचो...एकदम छोटे,बसके झाड असते...तेच आहे असे वाटते बहुतेक तरवड म्हणतात गावाकडे याला.तेच आहे का?

मेणबत्तीचे झाड>> नावावरुनच कलप्ना आली. Happy
हे झुडूप आपल्याकडे भारतात दुर्मिळ आहे हे मला समजले.>> ?? इथे मुंबईत तर रेल्वे रुळाच्या आजु बाजुला बरीच दिसतात पावसाळ्यत. त्यामुळे मी पण साशंक झालेय.
जाणकार प्रकाश टाका. का ही एकसारखी दिसणारी दोन वेगवेगळी झाडे आहेत?

नावा पासुन सगळेच अप्रतिम...
झाड मी प्रथमच पहात होते.निसर्गाला अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटली.निव्वळ अप्रतिम!भान हरपून त्या फुलांकडे मी पहातच राहिले.मन एकदम प्रसन्न, शांत व समाधानी झाले.+++ खुप छान लिहिलत.. भावना पोचल्यात...

काहीसा बहावाचाच प्रकार वाटतोय.. रात्री पाने मिटतात, काय मस्त ना!

सरिवा............छान माहिती. फुलं आणि झाड तर सुंदर आहेच. पण शेंगा आणि बीयाही अप्रतीम आहेत. निसर्गाची सिमेट्रिकल कलाकारी!

वा, एखाद्या झाडाचा ध्यास घ्यावा तर असा... तसे हे झाड रस्त्याच्या कडेला उगवलेले अनेकदा दिसते. ( खास करून गोव्यात. )

वा!! सरिवा तुम्ही अगदी पद्धतशीर अभ्यासच केलाय या झुडपाचा!! Happy खूप आवडलं लिखाण. शिवाय तुम्ही या झुडपाचे सर्व फोटोज पण अगदी छान दिलेत. पानं, शेंगा, बिया आणि लेखन - सर्व अगदी प्रोफेशनल बोटॅनिस्ट सारखं!
हे झुडुप पुण्यात मात्र दुर्मिळ नाही. बर्‍याच मोकळवणात दिसतं. शंकरशेठ रोडवर मीरा सोसायटीच्या अलिकडे एका पडीक जमिनीवर (हा अगदी छोटा जमिनीचा तुकडा आहे) तिथे उगवतं.

सरिवा............छान माहिती. फुलं आणि झाड तर सुंदर आहेच. पण शेंगा आणि बीयाही अप्रतीम आहेत. निसर्गाची सिमेट्रिकल कलाकारी!+ १ रंग अगदी बहाव्यासारखा!

वा! सुंदर फोटो आणि माहिती.

>>>>मला नक्की आठवत नाहि पण अशीच फुलांचि झाडे गावाकडे आढळतात नवरात्रात त्याची माळ करायचो...एकदम छोटे,बसके झाड असते...तेच आहे असे वाटते बहुतेक तरवड म्हणतात गावाकडे याला.तेच आहे का?<<<<

Seema२७६,
तरवडाची फुले थोडी वेगळी असतात. असे तुरे नाहीत येत. पण दोघांची फॅमिली एकच आहे (caesalpiniaceae) त्यामुळे बरेचसे साधर्म्य आहे.

तरवडाची फुले थोडी वेगळी असतात. असे तुरे नाहीत येत. पण दोघांची फॅमिली एकच आहे (caesalpiniaceae) त्यामुळे बरेचसे साधर्म्य आहे
>>>
ओके प्रथमदर्शनी तेच वाटले..

वा!! सरिवा तुम्ही अगदी पद्धतशीर अभ्यासच केलाय या झुडपाचा!! स्मित खूप आवडलं लिखाण. शिवाय तुम्ही या झुडपाचे सर्व फोटोज पण अगदी छान दिलेत. पानं, शेंगा, बिया आणि लेखन - सर्व अगदी प्रोफेशनल बोटॅनिस्ट सारखं! >>>>> मम् ..... Happy Wink (सर्व धार्मिक विधींमधे जसे बायको नवर्‍याच्या हाताला हात लावते तसे इथे नवर्‍याने बायकोच्या हाताला हात लावला आहे असे समजावे )

माझे लेखन वाचून मला प्रोत्साहन दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

सरिवा तुम्ही अगदी पद्धतशीर अभ्यासच केलाय या झुडपाचा!!+१

सर्व धार्मिक विधींमधे जसे बायको नवर्‍याच्या हाताला हात लावते तसे इथे नवर्‍याने बायकोच्या हाताला हात लावला आहे असे समजावे ) :):)

सरिवा, वाह खूप छान माहिती दिलीस आणी इतक्या डीटेल मधे फोटोज..

हो, आणी तुझी शेवटची कमेंट हायलाईट आहे Lol

छान माहिती!
>> ही विदेशी आक्रमक प्रजाती असल्याने पर्यावरणाला हानिकारक ठरेल का? त्याची लागवड मी करून बघावी का नाही? तुम्हाला काय वाटते?>>
हा विचार फार आवडला.

दिनेशदा,शांकली तुम्ही लिहिले आहे त्यानुसार गोवा, पुणे येथे ही झाडे आढळतात,हे समजले.मराठी विश्वकोशात मात्र मला त्याबद्दल काहीच माहिती सापडली नाही! एरवी नेहमी दिसणाऱ्या सर्व वनस्पतींची नोंद बहुधा सापडते.त्यामुळे मी जरा संभ्रमात पडले आहे. फक्त पाश्चात्य लोकांनीच याची नोंद केलेली मला आढळली. मात्र भारतातून फक्त एकच,याचे आश्चर्य वाटते आहे.

>>>पण ही विदेशी आक्रमक प्रजाती असल्याने पर्यावरणाला हानिकारक ठरेल का? त्याची लागवड मी करून बघावी का नाही? तुम्हाला काय वाटते?<<<<

फ्लॉवर्स ऑफ इंडिया च्या वेबसाईट्वर ही प्रजाती देशी आहे अशी नोंद आहे. लिंक देते आहे:
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Candle%20Bush.html

efloraofindia वरही याच्या बर्‍याच नोंदी आहेत:
https://groups.google.com/forum/?fromgroups#!searchin/indiantreepix/cassia$20alata$20senna$20alata

देशी असल्यामुळे, याचा बीजप्रसार जरी मोठ्या प्रमाणावर होत असेल तरी त्याला काही रोखणारे घटकही नक्कीच असणार. त्यामुळे ते बागेत वगैरे लावायला हरकत नाही असे वाटते. नैसर्गिकरीत्याही याची वाढ आपल्याकडे होतेच.

अदीजो ,खूप खूप धन्यवाद माझ्या शंकांचे निरसन केल्याबद्दल.flowersofindia वरील नोंद पाहिली.efloraofindia वर खरेच भरपूर नोंदी आहेत! थोड्या वाचल्या,बाकी सर्व नक्की वाचेन.आवर्जून या साईट्स share केल्याचा आनंद वाटला.efloraofindia site मला माहित नव्हती.छान आहे.