राधे ... 3. हे माझ्यास्तव (व्हिडिओ लिंक सह)

Submitted by अवल on 12 November, 2014 - 23:21

आणि तो ही दिवस, छे तो ब्राह्ममूहूर्त आठवतो मला...

संध्याकाळ होत आलेली. आपण यमुनातीरी बसलेलो. अचानक तू म्हणाली होतीस, "तुझी बासरी दिवसभर माझ्या आसपास वाजत असते."
अन मग थबकून म्हणालीस, "पण सगळे कुठे दिवसाला सामोरे जाऊ शकतात रे ?"

अन उदास होऊन यमुनेच्या पाण्यात पाय हलवत बसून राहिलीस किती तरी वेळ.

अन मग दिवस कलला, रात्र यमुनेच्या पाण्यासारखी गडद होत गेली. तू तिथेच बसून राहिलीस. मग मी कसा हलणार होतो? सारीकडे शांत शांत होत गेले. आता मी ही पावा बाजूला ठेवला

गोपाळांचे पायारव लांब जात गेले, गायीच्या गळ्यातील घुंगरू नाजूक होत गेले. आता तर गोठ्यात, पार शांतावले ते नाद. मग घर घरातील बाल बोलही थांबले. अन प्रेमळ अंगाई हळुवार झाल्या. हळूहळु माईचे थोपटणेही थांबले.

सारीकडे अलवार शांतता नांदू लागली, एक फक्त यमुनेच्या लाटांचे चुबकावणे, सा-या आसमंतात भरून राहिलेले.
अन तू, त्यात संथ नजरेने दूरवर काही पहात तशीच बसलेली.
अन मी तुला.
कसली, कोणाची वाट पहात होतीस तू ?

असेच अजून काही प्रहर गेले. यमुना, तू, मी अन शांत-क्लांत आसमंत.

आता तर चंद्रही मावळला. चांदण्याची धूसर दुलई पांघरून यमुनाही पहुडली.

तू हळुच पाय काढून घेतलेस. तुझे, माझे अस्तित्वही जाणवू नये अशी खबरदारी घेऊन तू माझ्या सोबत कदंबाला टेकलीस. हळूच पावा माझ्या हातात अलगद टेकवलास. अन नजर उचलून यमुनेच्या खालच्या तीरावर नजर नेलीस.

एक वाकलेली काळी सावली यमुनेला हलकेच स्पर्श करत होती. अगदी यमुनेलाही कळेल, न कळेल इतका अस्पर्श स्पर्श... जगाला, कोणालाही आपले अस्तित्व कळुच नये; यासाठी जीवाचे रान करत; एक एक पाऊल सावकाश टाकत ती पुढे झाली.

अन मला कळलं
मला कळलं, तू कोणाची वाट बघत होतीस.

दिवसाला सामोरी जाऊच न शकणारी ती कुब्जा, रातीच्या अंधारात आपले आन्हिक उरकत होती. तिचा आयुष्यभरचा हा नमस्कार मला आज पोहचत होता. आज तिच्यासाठी; केवळ तिच्यासाठी मी पावा उचलला.

केवळ मला, तुला अन तिला ऐकू येतील असे सूर मी छेडू लागलो. अन चांदण्यात तिची थरथरणारी काया सा-या यमुनेला हेलावून गेली.

तू हळूच पुढे झालीस अन तिला आधार देत बाहेर आणलस.
कुब्जेच्या तोंडी केवळ दोनच शब्द " हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव..."

तिचा नव्हे, माझाच जन्म सफल झाला....
राधे, राधे, केवळ तुझ्यामुळे!

राधे ...

-------

या लेखाची ऑडिओ व्हिज्युअल तयार केलीय.
त्याची ही लिंक http://arati-aval.blogspot.in/2015/01/blog-post.html.

------

राधे ...1. http://www.maayboli.com/node/51393
राधे...2 http://www.maayboli.com/node/51440
राधे...४. http://www.maayboli.com/node/51594
राधे...५. http://www.maayboli.com/node/51968
राधे...६. http://www.maayboli.com/node/52356
राधे... ७. http://www.maayboli.com/node/54215

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!
एका संपू नये वाटणाऱ्या हळुवार कवितेसारखी लेखमाला आहे ही. शब्द न शब्द नितळ निळ्या कृष्णतत्त्वाचा आरस्पानी स्पर्श झालेला.
प्रत्येक लेखातील संवादाचा angle फार छान ठेवलाय.

इतकी चपखल शब्द योजना..
प्रसंग डोळयासमोर अगदी तसाच शांततेचा अनुभव देत उभा राहतो.

"गायीच्या गळ्यातील घुंगरू नाजूक होत गेले" ... हे खुपच भावलं.

आता बाकीचे लेख वाचेन Happy

किती सुन्दर लिहितेय्स अवल!

<<सारीकडे अलवार शांतता नांदू लागली, एक फक्त यमुनेच्या लाटांचे चुबकावणे, सा-या आसमंतात भरून राहिलेले.
अन तू, त्यात संथ नजरेने दूरवर काही पहात तशीच बसलेली.<<
एकेक शब्द न शब्द मी अनुभवला वाचतान्ना!
तुझ्या लेखणीत जादु आहे ग... लिहित रहा! Happy

सुरेख लयदार शब्दरचना!! शब्दांचे नाद, स्पर्श, रंग सगळे पोत अलवारपणे जाणवले...
झिरपत जाते आत आत... बासरीच्या सुरावटीतील हव्याहव्याशा वेदनेसारखी!!!

अतिश्य सुंदर ! बाकि भाग वाचले नाहीत मी पण हे वाचुन मायबोलीवरील 'दाद' च्या लेखांची आठवण झाली :). त्या आठवणींसाठी ही मनापासुन धन्यवाद, Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद
तुम्हा सगळ्यांचा स्नेहच कारणीभूत आहे या लेखनाला.
अन्यथा मनातल्या कल्पना, भावना, शब्द कागदावर... आपलं स्क्रिनवर उतरले नसते Happy

छान झालयं ऑडिओ रेकॉर्डिंग. बाकीच्या भागांसाठी शुभेच्छा!!!

मला १-२ ठिकाणी उच्चार नीटसे ऐकु आले नाहीत (माझाही ऐकण्याचा प्रॉब्लेम असु शकतो, चुभुदेघे)

काय छान लिहिलय. ही तुमची लेखमालीका कालपासुन वाचून काढली. एक एक भाग म्हणजे अक्षरश: मास्टरपीस. अगदी जीव ओतून लिहिताय. सुंदर.

Pages