Submitted by संतोष वाटपाडे on 17 October, 2014 - 06:48
ही हिरवी हिरवी झाडे
हे निळेजांभळे डोंगर
या गोजिरवाण्या वेली
अविरत पक्षांचा वावर
वारा भिरभिरला तेथे
गवताची होते थरथर
कुरणातून नकळत येते
ती साद कुणाची आहे....ही बाग कुणाची आहे
डोकवला हळूच दिनकर
जागवून डोंगरमाथे
घरघरले धरतीवरती
तांबूस पिठाचे जाते
पसरून कोवळी किरणे
नभ रंगून उत्कट होते
सावलीस गहिवरलेल्या
जरतार उन्हाची आहे...ही बाग कुणाची आहे
रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकूम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली
क्षितिजावर लुकलुकणारी
फ़ुलवात कुणाची आहे...ही बाग कुणाची आहे
निजताच रवी घरट्याशी
चंदेरी दिसते अंबर
खोचली फ़ुले लखलखती
अभ्रांची अद्भुत चादर
धरती अन आभाळातिल
मिटलेच कधी ना अंतर
दररोज तरी धरतीला
का ओढ तमाची आहे.....ही बाग कुणाची आहे
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खु$$$प आवडली कविता. बहुदा
खु$$$प आवडली कविता. बहुदा माबोवर कुणीतरी ( प्रमोद देव ? ) चाल लावतात, खरच लावुन घ्या या कवितेला चाल
ये चांदसा रोशन चेहरा.......या
ये चांदसा रोशन चेहरा.......या चालीत गायला मजा येते...... धन्यवाद वर्षाजी....मी बोलतो प्रमोदरावांशी ...