मी एक पाववाला !

Submitted by दिनेश. on 25 September, 2014 - 08:54

माझ्या आजोळी पूर्वापार बेकरीचा व्यवसाय करतात. हे मी नेहमी अभिमानाने सांगत असतोच. पण मला स्वतःला
बेकिंगचा तेवढा उत्साह नाही. घरातले अवन तर कित्येक दिवस वापरलेच जात नाहीत.

इथल्या सुपरमार्केट मधे ब्रेड मेकिंग मशीन बघितले आणि माझ्यात संचार झाला. हे मशीन मी आधी, तेही बर्‍याच
वर्षांपूर्वी दुबईत बघितले होते. पण दुबई मस्कत मधे अप्रतिम पाव शिवाय खबूस मिळत असल्याने मला त्यात
रस वाटला नव्हता.

केनयामधेही आपल्या चवीचेच पाव मिळतात. नायजेरियात बहुतेक पाव गोड असतात व ते मला आवडत नसत.
इथे अंगोलात स्थानिक पातळीवर पाव बेक केले जातात. अनेक दुकानांची स्वतःची बेकरी असते.
पण ते बर्‍याचदा मला अळणी वाटतात. कधी कधी कच्चट वाटतात.

त्यामूळे हे मशीन मी घेऊन आलो. किमतीला साधारण भारतीय ५,५०० रुपये एवढे आहे.

हि ओरीमा कंपनी आहे पोर्तुगालची. कार्टनवर इंग्लीशमधे मजकूर होता. पण आतमधली सगळीच माहितीपत्रके
पोर्तुगीज मधे होती. त्यांच्या सर्वीस सेंटरला विचारून बघितले तर त्यांच्याकडेही ती इंग्रजीत उपलब्ध नव्हती.

मग माझे मीच भाषांतर केले.

या मशीनसाठी ताजी यीस्ट चालत नाही. आपल्याकडे मिळते ती ( पांढर्‍या मोहरीसारखी दिसणारी ) ड्राय यीस्टही
चालत नाही. तर खास ड्राय इन्स्टंट यीस्ट ( खसखशीसारखी दिसते.) लागते.

पोर्तुगीज भाषेचे दोन प्रकार आहेत. एक ब्राझिलची आणि दुसरी पोर्तुगालची. दोन्हीत थोडा फरक आहे.
या मशीनसोबतच्या पुस्तकात फर्मेंटो असा शब्द आहे, खरे तर यीस्टसाठी लेवादुरा असा शब्द हवा.
आमच्या नेहमीच्या सुपरमार्केट्मधे मला ताजीच यीस्ट मिळू शकली असती म्हणून या खास यीस्टसाठी जरा
फिरावे लागले.

तर हे मशीन असे दिसते

या मशीनमधे साधा ब्रेड, फ्रेंच ब्रेड, गोड पाव, होल व्हीट ब्रेड, केक करण्यासाठी पर्याय आहेत. यात नुसते पिठ ( साधे व पावासाठी ) मळून घेता येते. जॅम व पास्ताही करता येतो.

वरचे झाकण बाजूला केल्यावर आत असे ब्रेड पॅन असते

प्रत्येक प्रकारच्या पावासाठी काय घटक लागतात आणि ते काय क्रमाने घ्यायचे याचा तक्ता असतो.
आधी पाणी, त्यातच मीठ, साखर, तेल, मिल्क पावडर असे टाकून वर वजन करून घेतलेला मैदा आणि
वर यीस्ट टाकायची असते.

नंतर मेनू निवडायचा. यात वजनाचे ३ पर्याय आहेत. तसेच पाव कमी, मध्यम वा कडक भाजायचा ते पण ठरवता येते. पाव भाजून झाल्यावर तो काही तास गरम ठेवण्याचीही सोय असते.

आपण मेनू सिलेक्ट केल्यावर झाकण बंद करायचे आणि दिलेल्या वेळानंतर ( साधारण ३ ते ४ तास ) पाव तयार असत.
याच्याकडे लक्ष द्यायची गरज नसते, पण मला ही सगळी प्रोसेस बघायची होती म्हणून,,,

तर थोड्या वेळाने हे मशीन पावाचे पिठ असे चांगले तिंबून घेते.

मग अर्थातच यीस्ट काम करून मिश्रण फुगू लागते. ते चांगले फुगले कि परत मिश्रण तिंबले जाते.
दोन वेळा असे तिंबून झाल्यावर मग ती कॉईल तापते व पाव आपल्या सेटींगप्रमाणे भाजला जातो.

भाजल्यावर थोडा थंड झाला कि पॅन बाहेर काढून ते टॅप केले कि असा पाव बाहेर पडतो.

ती मिश्रण करणारी ब्लेड्स पावाच्या आत जातात. पण ती धारदार नसल्याने पावातून सहज ओढून काढता येतात.

पुस्तिकेत बेसिक कृतीच दिल्या आहेत पण यू ट्यूबवर काही प्रयोग आहेत. मी पहिल्याच प्रयोगात लसूण आणि
काळे ऑलिव्हस कापून वापरले. यात घटक कापूनच वापरावे लागतात कारण तो मिक्सर नाही. तसेच ड्रायफ्रुटस
टाकायची तर कधी टाकायची हे पण त्या पुस्तिकेत दिलेले आहे.

बरं इतके करून तयार होणारा पाव कसा असतो ? वरच्या फोटोत दिसतो आहे तसा होतो. याला वरून रंग
येत नाही पण कच्चाही रहात नाही. पोताला आपल्याकडच्या पावाप्रमाणे मऊसर नसतो तर युरोपियन पावाप्रमाणे
जरा कडकच असतो.

टोस्ट करायला चांगला. अगदी पातळ कापही बरीच फर्म राहते. कोलमडत नाही.

भारतात दिसला नाही.. मला एक नवीन खेळणे मिळाले एवढे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

भूक लागली पाव पाहून.
मला पण घरी पाव बनवायचा आहे पण मी सोडून कोणालाच इतका आवडत नसल्याने मशिनचा खर्च करताना अपराधी वाटते

मस्त आहे ब्रेड. इथे मिळते का बघतो हे मशिन, माझ्या डोक्यात बरेच दिवस घरी ब्रेड बनवायचे आहे पण ते कणिक मळून, तिंबून, ओवनमधून भाजण्याचा पेशन्स नाही.

मग माझे मीच भाषांतर केले.
^
तुमच्यातील या उत्साहासाठी _/\_

मी पहिल्याच प्रयोगात लसूण आणि काळे ऑलिव्हस कापून वापरले.
^
आणि एक सतत नवीन काहीतरी करत राहायच्या या प्रयोगशीलतेसाठी _/\_

आभार !
टण्या.. यात छोटी मॉडेल्स पण आहेत. या मशीनमधे कमीतकमी ५६० ग्रॅम्स वजनाचा पाव बनवावा लागतो.
पण एक मात्र खरे.. पिठात हात घालायची गरज नसते.

भारतात मात्र पावाचे अनेक प्रकार तयार मिळत असल्याने हे मशीन लोकप्रिय होणार नाही.

वॉव/__/\__ ग्रेट आहेस.. उत्साह केव्हढा.. टू गुड .. ब्रेड मस्त दिस्तीये..
भारतातही ब्रेड मेकर उपलब्ध आहे असं ऐकलं.. एक मैत्रीण घेणार आहे १४००० रु. ला.. मला इंटरेस्ट नसल्याने डीटेल्स विचारले नाहीत.. Happy

दिनेश, असे एखादे मशिन इथे सिंगापुरला मिळत असेल तर सांगा. त्या तिन्ही ब्रेडस इतक्या छान जाळीदार दिसत आहेत ना की एकदम ब्रेड आणून खावासा वाटत आहे आत्ता मला.

वर्षू / बी ... आपल्या भारतीय चवीचा आणि पोताचा पाव नाही होत यात. साधारण जर्मन ब्रेड असतात ना ( कापायला / चावायला कडक ) तसे होतात. घेण्यापुर्वी शक्य असल्यास ब्रेड चाखून बघा.

वर्षू, मैत्रिणीला अवश्य सांग हे.

मला एक नवीन खेळणे मिळाले एवढे नक्की>>>> >>> देवा रे!
तुमचा उत्साह पाहून मला मंगला बर्वेंच्या लोकसत्तेतील लेखाची आठवण झाली.पटलेले वाक्य 'इतकी आयुधे (मिक्सर इ.) हाताकडे असताना या हल्लीच्या मुली स्वयंपाकाचा आळस का करतात'.मी हल्लीच्या मुलीमधे न मोडताही स्वयंपाक नकोसा वाटतो.तुमचा तर जिव्हाळ्याचा विषय आहे.

वॉव दिनेश .....किती तो उत्साह! ---------------/\----------------------!
मशीन मस्तय! तिकडे उसगावात लेकीकडे इतकं बेकिंग केलं की भारतात आल्यावर याच प्रकारचं काही तरी घ्यावंस वाटायला लागलं. निदान तिकडच्यासारखी ओव्हनवाली कुकिंग रेन्ज तरी.
तिथे यीस्ट वापरून हनी होल व्हीट ब्रेड बनवला होता. फार मस्त झाला होता. एकाच मटिरियलचे वेगवेगळ्या भांड्यात केलेले हे २ ब्रेड. बाहेरून क्रिस्प आणि आतून मऊ! संपूर्ण कणकेचा.
आणि तुम्ही म्हणता तसा........पातळ स्लाइसेसही न कोलमडणारे........... तिकडे हा ब्रेड ( की ही ब्रेड?) चियाबाटा नावाने मिळतो.

दिनेश.....तुमच्या लेखाने....त्यातही तयार झालेला पाव पाहिल्यानंतर....मला साधारणतः ३० वर्षापूर्वीच्या लक्ष्मीपुरीतील "भारत बेकरी" कडे खेचले आणि ते दिवस आठवू लागले जेव्हा आम्ही त्या बेकरीच्या प्रसिद्ध पावासाठी पाळीत उभे राहिलो होतो. गरमागरम पाव असेल तर तो कापून मिळत नसे, त्यामुळे थांबावे लागे, मजा यायची थांबायलादेखील.....मशिन त्या काळात नसल्याने भली मोठी चकाकती सुरी असायची....धारदार...आणि एक गलेलठ्ठ इसम पावाच्या फाक्या करीत असे....झटझट...आकारात फरक पडत नसे.

बनपाव मिळत असत....स्वतंत्र. आज तुम्ही "पाव" हा आयटम या गटात घेतला...मला वाटते प्रथमच हा प्रकार इथे चर्चेला आला असणार.....सुंदरच सारे.

तुमचा उत्साह पाहून मला मंगला बर्वेंच्या लोकसत्तेतील लेखाची आठवण झाली.पटलेले वाक्य 'इतकी आयुधे (मिक्सर इ.) हाताकडे असताना या हल्लीच्या मुली स्वयंपाकाचा आळस का करतात'.मी हल्लीच्या मुलीमधे न मोडताही स्वयंपाक नकोसा वाटतो.तुमचा तर जिव्हाळ्याचा विषय आहे >>>>

मी हल्लींच्या मुलींमध्ये मोडते . दिनेशदा, तुमच्या रेसिपीज आणि उत्साह बघितला की वाटत , चला आपणपण अस काहीतरी बनवायाचा प्रयत्न करू .
पण कीचनमध्ये शिरेपर्यंत उत्साह मावळतो .

उत्साहाला _/\_
मस्त दिसतोय पाव. गरम गरम खायला मस्त लागत असेल ना
काय काय करत असता हो तुम्ही.

आभार दोस्तांनो.. भारताबाहेर खास करून आफ्रिकेत प्रवासात अजिबात वेळ जात नाही. शिवाय सुरक्षिततेच्या कारणाने, ऑफिसच्या बाहेर पडायची वेळ ठरलेली असते.. त्यामूळे माझ्याकडे मोकळा वेळ भरपूर असतो.. असे खेळायला.

भरत, बाकीचे प्रकार पण ट्राय करून बघतो इथे. यात बेसिक प्रकारात वेळेचे सेंटींग प्रीप्रोग्रॅम्ड आहे. त्यामूळे ते आपल्याला अ‍ॅडजस्ट करता येत नाही. मऊ पावासाठी पाण्याचे प्रमाण वाढवून बघायला हवे.

अशोक, मी केनयात एका बेकरीशी सलंग्न होतो. तिथे आपल्यासारखाच पाव असतो पण त्यांना तो कापलेला ( फाका केलेल्या ) आवडत नसे. तसाच अख्खा लोफ पॅक करत असत. आता मात्र कापलेला ब्रेड लोकप्रिय आहे. कापा करायच्या खास ब्लेड्स असतात. सगळा पाव एकाचवेळी कापतात.

मानुषी.. आता करून बघतो हा पण !

आणखी एक आवर्जून सांगावेसे वाटते. बाजारच्या पावात प्रिझर्वेटीव्ह ( खुपदा व्हीनीगर ) वापरलेले असते त्यामूळे त्याचे शेल्फ लाईफ वाढते. तसेच कॅल्शियम सप्लीमेंट पण टाकलेले असते. (म्हणून तो एनरिच्ड असतो.) या पावात तसे करण्याचे सुचवलेले नाही.

Pages