ॐ पर्वताचे दर्शन झाले नीट झाले नाही म्हणून आम्ही तसे नाराज होतो. प्रचंड वारे आणि बर्यापैकी थंड वातावरण असल्यामुळे मग आम्ही रूम मध्ये दडी मारून राहणे पसंत केले. सुप सोबत उद्या काय घालायचे, सामान सोबत किती ठेवायचे ह्याच्या चर्चा रंगल्या. कारण लिपूलेखला पोचल्यावर येथील (भारतातील) पोर्टर पुढे येऊ शकत नाहीत. ३ किमी उतरून त्या बस मध्ये बसेपर्यंत ते सामान तुम्हालाच वाहून न्यावे लागते. (आणि येतानाही परत तसेच).
लिपूलेख पास हा नो मॅन्स लॅन्ड आहे. आणि भारतातील ट्रेकचा सर्वात अवघड टप्पा. तितक्या वर जायचे, तो परत उतरायचा व तकलाकोट गावी पोचायचे एवढा उद्याचा कार्यक्रम होता.
भारतीय वेळेनुसार ७ वाजताच "यात्री एक्स्चेंज" होते. चीन मध्ये गेलेली बॅच त्यावेळी परतते आणि आणखी एक बॅच चीन मध्ये जाते. त्यामुळे हा सर्व कार्यक्रम "वेल मॅनेज्ड" असतो. तेंव्हा तुम्ही तिथे पोचला नाहीत, की झाले. मग तुम्ही चीन मध्ये पोचू शकत नाही, असे आम्हाला बजावण्यात आले. ७ वाजता तिथे उपस्थित राहायचे असेल तर साधारणतः हा पास चढायला रात्री अडीच तीनला सुरूवात करतात.
ते सर्व प्लानिंग चालू असताना LO ने अचानक घोषणा झाली की, उद्या वेळेवर पोचायचे म्हणून सगळ्यांनी घोड्यावर बसावे. त्याला आम्ही विरोध दर्शविला, हे सांगने नकोच. मग ह्यावर उपाय म्हणून पायी चालणार्यांनी लवकर निघावे आणि घोडेवाल्यांनी थोडे उशीरा, अशी मांडवली ठरली.
मग पायी कोण चालणार आणि घोड्यावर कोण जाणार? अशी यादी करण्याचे काम संध्याकाळी आमच्या LO ने श्यामला दिले. ती यादी तयार झाली. १५ एक जण पायी चालणारे होते. मग आम्हा सर्वांनी रात्री १ ला निघावे की २ ला ह्यावर चर्चा सुरू झाली. होता होता दोन वाजता निघायचे आणि १ वाजता उठायचे असे ठरविण्यात आले. आणि घोडेवाल्यांनी १ तास उशीरा निघायचे असेही ठरवले.
आजचा मॅप
आजचे एलेवेशन
ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व उठलो, त्या गडबडीत मग घोड्यावर जाणारेही उठले. आणि ते ही सोबतच निघाले. लिपूला अंधारातच जावे लागते. त्यामुळे सर्वांनी आपापल्या टॉर्च जवळ ठेवल्या आणि वाट तुडवत निघालो. कसे गेलो, कुठे चाललो हे काहीही कळत नव्हते. केवळ आपल्या समोरच्या रस्त्यावरचे दोन तीन फुट आणि दुर अंधारात लुकलुकणार्या टॉर्च एवढेच दिसायचे.
असेच आम्ही खूप वर आलो. सकाळी ५ वाजता फटफटले. तेंव्हा आम्ही लिपू पासून दीड एक किमी खाली होतो. वेळे आधी आल्यामुळे तिथेच सर्वजण थांबलो. कारण वर ७ वाजता पोचायचे होते. लिपूवर भयानक जोरदार वारे वाहत असते. रात्र, भयानक थंडी, ५५०० मिटर्सवरील विरळ ऑक्सिजन आणि वर यायला लागणारी ताकद ह्या मध्ये माणूस गलितगात्र होतो. इतका की, "व्ह्याय डिड आय साईन अप फॉर दिस" असा विचार येतो.
पराग आणि मी इथपर्यंत सोबत होतो. पण त्या स्टॉप नंतर पराग मागे पडला. आम्ही सर्वच (घोड्यावर बसणारे अपवाद) इतके थकलो होतो की एकेक पाऊल उचलायला खूप शक्ती लागत होती. माझे पायदेखील लाकडासारखे कडक झाले होते. आणि प्रत्येक पावलागणिक धाप ही लागत होती. प्रत्येक जण इथे "एकला चलो रे" मध्ये गेला होता. सगळ्यांनाच खूप त्रास होत होता.
माझ्यासोबत भीम होता. आमच्या सोबत एक मराठी जवान होता. तो भीम आणि मला इतका वेळ ( त्या तश्या चालण्यात) गप्पा मारत होता आणि आम्हाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागत होते, काहीच नाही तरी हूं हूं असे म्हणावे लागत होते. ती शक्ती आणणे ही कठीण वाटायचे. पण तो मराठी, इतक्या उत्साहाने गप्पा मारतोय, इतक्या दूर मराठी बोलणारे त्यालाही कोणी मिळत नसणार, म्हणून आम्ही त्यासोबत गप्पा चालू ठेवल्या. तो पठ्ठ्या ५ किलो ची रायफल, पूर्ण पोषाख आणि दोर वगैरे सामानासहित मस्त चालत होता. त्याने आम्हाला बराच धीर दिला ! तो सांगलीचा होता.
मध्येच गुमानसिंग मला म्हणाला की घोड्यावर बसता का? मी नको म्हणालो, तेंव्हा तो म्हणाला की, चालेल घोड्यावर नका बसू, हळू हळू चालत राहा. लिपू पास आता दिसत होता. एक शेवटचा मोठा चढ आणि लिपू येईलच असे वाटले. समोर एके ठिकाणी खूप बर्फ साचला होता. अनेक घोडेवाले त्यातूनच घोडा घालत होते. कारण ती शॉर्ट कट होती. असाच चालण्यात थोडा वेळ गेला. आणखी काही वेळाने मला गुमान सिंग म्हणाला, इसकी पुंछ धरलो सर, मजा आयेगा, मग मी त्याचे ऐकले आणि घोडेकी पुंछ को हात मे धर लिया. त्यात होतं काय की, तुम्हाला घोड्याचा स्पिड मॅच करावा लागतो. मग पावलं जोरात ओढली जातात.
पराग मध्ये अन माझ्यामध्ये खूप अंतर आधीच पडले होते. घोड्याची शेपटी धरल्यावर मी जोरात निघालो. इतका की भीमाला मी निदान २० फुट मागे टाकलं. तसे २० फुट काहीच नसतात, पण तिथे एक फुटही खूप जास्त वाटतो, मग २० तर खूप जास्त !
होता होता मी वर येऊन पोचलो. आणि शांत पैकी पाणी पीत बसलो. लगेच भीमही आला. बरेच घोड्यावर येणारे लोकं तेथे आधीपासूनच आले होते. परागही आला. .
आम्ही सर्वांनी मग आपआपल्या पोनी पोर्टरला पैसे दिले. कालच LO ने काही लोकांच्या कानी लागून, सर्वांनी पोनीला ३५००च द्यायचे असे ठरवले होते. पण मी आणि पराग ने असे काही न करता अर्धे पैसे देण्याचे ठरवले होते. बाकी लोकांनी मात्र "यात्री युनियन" फॉर्म करून ३५०० पोनीला आणि ३००० पोर्टरला असा हिशोब चुकता केला. माझ्यासोबत संतोराम नव्हता, पण मी त्याचेही अर्धे पैसे गुमानला दिले. एकंदरीत ही लोकं तुम्हाला इतकी मदत करतात, तरी पण यात्रीगण त्यांनाही त्रास देऊ पाहतात, आणि ते ही कैलासला जाऊन ! व्यर्थ ते जाणं !
लिपूवर फारसे कुणीही फोटो काढले नाही, कारण लोकांमध्ये तेवढी ताकदच नव्हती. अर्थात मी काढलेच
लिपूलेखचे फोटो !
लिपू चढताना
ह्या फोटोत तुम्हाला बर्फावर पायी चालण्याच्या खुना दिसतील. तिथून काही उत्साही घोडेवाले शॉर्टकट मारत होते.
आणि तिथे जमलेली ही भाऊगर्दी !
बाय बाय इंडिया ! वेलकम टू तिबेट (चीन)
खाली उतरतानाचा रस्ता
ही जी वाट दिसत आहे ती तीन एक किमी आहे. मग पुढे बस ने ते तकलाकोट ह्या नावी आपल्याला नेतात.
चीन साईडला लिपू खिंड उतरायची. तिकडे बर्फच बर्फ. मग त्यातून वाट काढत निघालेले यात्री. इथे सामान आपणच घ्यायचे !
भारतात परतणारे बॅच तीनचे यात्री. ही वाट आम्ही उतरली, ते चढत आहेत.
ग्लेशियर पार करताना !
खाली तीन किलोमीटरवर दोन बस आमची वाट पाहत उभ्या होत्या. हे उतरणे पण खरे त्रासदायकच झाले कारण पोर्टर नसल्यामुळे पाठीवर ते ७-८ किलोचे धुड वाहावे लागते व उतरण ही बर्फातून होती. व जिथे बर्फ नव्हता तिथे कधी कधी पाय घसरत होता. श्याम आणि मी सोबत होतो.. श्री मराठे व श्री चौबळ ह्यांचे काही आम्ही घेत होतो, त्या गडबडीत पराग, भीम वगैरे पुढे निघून गेले होते.
वाटेत काही जीप उभ्या होत्या. त्यांना आम्ही बस पर्यंत नेणार का असे विचारले होते पण त्या अजून काही वेळ थांबणार होत्या म्हणून पुढे निघालो. उतार असला तरी जाम बोअर होत होते हे खरे. मग आम्ही आमच्या सामानासोबत काही प्रयोग केले. मी आणि श्याम ने काठीचे एकेक टोक पकडून दोघांच्या रकसॅक त्याला लटकवून चालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही कंटाळा आला. मग आम्ही शॉर्टकटस घ्यायचे ठरविले आणि डोंगर धाडधाड उतरू लागलो, हा प्रयोग बराचसा सफल झाला. होता होता आम्ही बस पर्यंत येऊन पोचलो.
मग बाकीचे लोकं त्या जीपने येऊन पोचले आणि चीनी अधिकार्यांनी आमचे पासपोर्ट वगैरे तपासले. तिथून आम्ही मजल दरमजल करत तकलाकोट ह्या गावी पोचलो. तेथे मग कस्टम्स चेक आणि इतर सोपस्कार पार पडले आणि हॉटेल कडे आम्हाला नेण्यात आले.
परत एकदा हॉटेल वाटपाच्या ठिकाणी ही भाऊ गर्दी झाली. चावी हस्तगत करुन परागचे व माझे नाव नोंदवले. हॉटेल मध्ये येऊन आम्ही पहिले काम केले असेल तर गिझर लावणे !! खूप दिवसानंतर (धारचुला नंतर पहिल्यांदाच) हॉट रनिंग वॉटर ही कमोडिटी मिळाली आणि आम्ही यथेच्छ, सचैल वगैरे स्नान केले. त्यामुळे आमचे वजन निदान अर्धा किलो ने कमी झाले असे मला वाटले.
तकलाकोट ह्या चीनी गावात मला फोटो काढायचा काही उत्साह नव्हता. त्यामुळे तेथील फोटो मी काढलेच नाही.
हे गाव सीमेपासून फक्त ३० एक किमी दुर आहे. एक आवर्जून सांगावे वाटते की मध्यवर्ती चीन पासून इतके दूर असणारे हे छोटेसे गाव परिपूर्ण होते. चकचकीत रस्ते, पादचाऱ्यांसाठी मोठाले फूटपाथ आणि सर्व दिवे हे सोलार पॅनल्स वर चालणारे वगैरे. तेथे असणार्या सोयी बघून आम्हाला भारत आठवला नाही तरच नवल. भारतात घारचुलासारख्या मोठ्या तालुक्याच्या गावी साधे सेल फोन चालत नाहीत. गंमत अशी की धारचुला ते कालापाणी पर्यंत फोन नेटर्वक नसतानाही पोर्टरचे सेल फोन चालायचे आणि आमचे नाही. मग विचारल्यावर कळले की ते नेपाळ सेल फोन नेटर्वक आहे आणि ते नेपाळी सीम. आपल्या जवानांकडेही पर्सनल सीम हे नेपाळी असायचे. (थोडक्यात सिक्युरिटीची बोंबच) म्हणजे ज्या सोयी तितक्याच रिमोट एरियात नेपाळ देखील देऊ शकतो, तिथे भारत मात्र बेसिक सोयी देऊ शकत नाही. मग तकलाकोट सारखे परिपूर्ण गाव वगैरे लांबच !
उद्याचा दिवसही तकलाकोट मध्येच राहायचे होते त्यामुळे निवांत होतो. जाताना मी माझ्या बॅगेत चहाच्या पुड्याही नेल्या होत्या. मग काय तकलाकोटला दोन दिवस आमचा ग्रूप चहा सारखा चालूच असायचा. ( इलेक्टॉनिक अधान सारखे ठेवलेलेच असायचे ) फक्त चहात त्यात दूध नसायचे. पण त्या चहा आणि गप्पा भारी होत्या.
आम्ही KMVN कडनं मिळणार्या त्याच त्या इतके जेवणाला कंटाळलो होतो त्यामुळे आज संध्याकाळी तकलाकोट गावी एखादे मस्त पैकी हॉटेल शोधून क्षुधा शांत करण्याचा बेत आम्ही केला आणि त्या शोधात बाहेर पडलो.
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७
कडक रे! वाचतोय सगळे भाग, येऊ
कडक रे! वाचतोय सगळे भाग, येऊ दे अजून
झक्कास चाल्लीय यात्रा!!
झक्कास चाल्लीय यात्रा!! डेन्जर वाटतोय हा लिपुलेख पास!
येउद्या अजुन!
सगळं वाचतेय
सगळं वाचतेय हळूहळू..........................फारच थ्रिलिन्ग! आणि अवघडही.
सॉल्लिड ! फोटोतलं वातावरण
सॉल्लिड !
फोटोतलं वातावरण कसलं डेन्जरसली अफाट आहे! अशा ठिकाणी माझ्या मनात तर 'आपण कोण, आपल्या सवयीच्या सभोवतालाबद्दलची आपली जी बरी-वाईट मतं असतात, त्यांना खरंच काही अर्थ आहे का, अखिल मानवजातीची ऐहिक सुखासाठी चाललेली धडपड, धावपळ खरंच तितकी गरजेची आहे का, का आणि कशासाठी हे सगळं?' असलेच विचार येतील! खासकरून त्या सेपिया टोनमधल्या फोटोच्या ठिकाणी....!
तिसरा फोटो पाहताना, का कोण जाणे, पण 'व्हेअर ईगल्स डेअर' आठवला.
चिनी गावाचं नाव तकलाकोट कसं काय? तद्दन भारतीय वाटणारं?
वाचतेय.
वाचतेय.
लिपूवर फारसे कुणीही फोटो
लिपूवर फारसे कुणीही फोटो काढले नाही, कारण लोकांमध्ये तेवढी ताकदच नव्हती. अर्थात मी काढलेच
>>>>>>
हे मस्त केलेत, आमच्यासाठी
तसेच इतर फोटो काढायचा मोह आवरणारेही धन्य म्हणायचे. एवढ्या धाडसी कामगिरीचे फोटो काढायचे नाहीत म्हणजे काय. ती लांबवर पसरलेली शिखरे बघूनच धडकी भरते. अश्या रस्त्याने कधी संपणार याची कल्पना नसल्यासारखे वेड्यासारखे चालत राहायचे.. ग्रेट पेशन्स !
छान लेख.
छान लेख.
सर्व भागातील फोटो पाहिले
सर्व भागातील फोटो पाहिले आताच. अशक्य सुंदर. आत्मा शांत झाला. आधीच्या भागांचे वाचन सवडीने करतो.
मस्तय. पुढचा भाग येऊ द्यात.
मस्तय. पुढचा भाग येऊ द्यात.
सुरेख!! लले, असे प्रवास आपली
सुरेख!!
लले, असे प्रवास आपली सगळी मस्ती उतरवतात. कारण तिथे आहे त्या परिस्थितीतून वाट चालणे आणि जुळवून घेणे ह्या पलिकडे काही करु शकत नाही. अंधार तर अंधार, ओझं तर ओझं, चढ तर चढ, उतार तर उतार, कुणी सोबत चालेल न चालेल....चालत राहा. नेहमीच्या लाईफमध्येही अशी परिस्थिती असू शकते आणि तेच तत्व लागू पडतं.
केदार, मध्येच जीप कुठून आल्या? तिथूनच मोटरेबल रस्ता सुरु होतो का?
या परिसरात वैराग्य आलं तर नवल
या परिसरात वैराग्य आलं तर नवल नाही!!
मस्तच चाललंय वर्णन. काय आहे
मस्तच चाललंय वर्णन. काय आहे तो लिपुलेखचा रस्ता.
केदार ह्या परिक्रमेत किती उंची गाठावी लागते?
लुपीलेख खरच जीव काढतो...
लुपीलेख खरच जीव काढतो...
अश्या रस्त्याने कधी संपणार याची कल्पना नसल्यासारखे वेड्यासारखे चालत राहायचे.. ग्रेट पेशन्स ! >> +१
चिनी गावाचं नाव तकलाकोट कसं काय? तद्दन भारतीय वाटणारं? >> Purang हे त्याच चिनी नाव आहे.
हा मॅप बघा... नथुला आणि धारुचला मधला फरक दाखवणारा
मस्तच.. काही फोटो तर चित्र
मस्तच.. काही फोटो तर चित्र वाटताहेत. इतकी सुंदर जागा प्रत्यक्षात असू शकते, यावर क्षणभर विश्वासच बसला नाही.
केदार ह्या परिक्रमेत किती
केदार ह्या परिक्रमेत किती उंची गाठावी लागते? >> ५५०० +/- मिटर्स तीन वेळा. दोनदा लिपू आणि एकदा डोल्मा. लिपू डोल्मा पास पेक्षा २ - २५० मिटरने कमी आहे
असे प्रवास आपली सगळी मस्ती उतरवतात. >> खरयं आणि म्हणूनच असे प्रवास वर्षातून एकदा करावेत.
केदार, मध्येच जीप कुठून आल्या? तिथूनच मोटरेबल रस्ता सुरु होतो का? >>. हो. त्या दिड एक किमी खाली असतात. आपलं सामान ने आण करण्यासाठी त्या असतात. पण थकलेल्या लोकांना त्या खाली नेतात. येताना आपल्याला तिथपर्यंत आणून सोडतात. अर्थात बहुसंख्य थकलेले असल्यामुळे नंतर ते तिथेच थांबले व जीपने आले. आम्ही पायी गेलो.
या परिसरात वैराग्य आलं तर नवल नाही!! >> अगदी ! म्हणून एकदा गेल्यावर समाधान होणे केवळ अशक्य. एकतर हिमालय तुम्हाला प्रेमात पाडतो नाहीतर यू हेट इट. मध्ये काही नाही.
तकलाकोटवर एकेकाळी आपलेच राज्य होते. म्हणून ते नावं. मंगोलांनी जिकंल्यावर काश्मिरच्या राजाने जोरावरसिंगाला परत जिंकून घेण्यासाठी पाठवले होते. त्याबद्दल माहिती इथे मिळेल. http://en.wikipedia.org/wiki/Zorawar_Singh_Kahluria मी पुढे येतानाच्या भागातही मला असणारी माहिती लिहेल.
तसेच इतर फोटो काढायचा मोह आवरणारेही धन्य म्हणायचे. >> अहो नाही. एक पाऊल उचलायलाही त्रास होतो. तिथे चढताना जे हाल होतात त्यात आपल्याला कॅमेर्याने फोटो काढायचेत आहेत हे देखील लक्षात येत नाही. बिलिव्ह मी. आणि हे जे सर्व चालणे आहे ते ५००० फुटांवर नसूण ५२०० मिटर्स वर आहे.
बाप्रे! फोटो जबरदस्त आणि तुमच
बाप्रे! फोटो जबरदस्त आणि तुमच कथनही. मस्त!
अग बाबौ! काय दिव्य जागा आहे.
अग बाबौ! काय दिव्य जागा आहे. भरुन पावले. माणसाला फिरायला एक जन्म खरच पुरणार नाही ते विशालकाय पर्वत बघुन. हिमालयाला नगाधिराज म्हणतात ते काय उगाच नाही.
कैलासाचा कळस ध्वजा कल्पिला ही, अढळ त्या धृवावरती दृष्टी या सुखाची
साद देती हिमशिखरे....
फोटो अफाट सुंदर आहेत. बाकी
फोटो अफाट सुंदर आहेत.
बाकी तुझे लिखाण म्हणजे माहितीची मेजवानीच असते.
भारीच! फोटो बघुनच भिती
भारीच! फोटो बघुनच भिती वाटतेय..
फोटो अप्रतीम, थरारक मोहीम आहे
फोटो अप्रतीम, थरारक मोहीम आहे हि.
मस्त वर्णन , कसली खतरनाक जागा
मस्त वर्णन ,
कसली खतरनाक जागा आहे रे , आजुबाजुला मच्छरही दिसत नाही , लोकं कसा काय प्रवास करतात तो कैलासच जाणे. आणि चालताना त्या बर्फात सटक सिताराम होत नाही का ?
फोटो, वर्णन मस्त!
फोटो, वर्णन मस्त!
मस्त! थ्रिल वाढतच चाललंय
मस्त! थ्रिल वाढतच चाललंय प्रत्येक भागागणिक .. फोटो तर त्याहून जास्त नाट्यमय आणि गुढ वाटतात ..
काय अफलातून! वाचताना अंगावर
काय अफलातून! वाचताना अंगावर शहारे येत आहेत! स्वप्नातल्या सारखंच आहे जणू!
जस्ट अमेझिंग!!!!!!!!!!!!
जस्ट अमेझिंग!!!!!!!!!!!!
जबरदस्त!
जबरदस्त!
थरारक अनुभव आहेत .फोटो पण
थरारक अनुभव आहेत .फोटो पण भारी आलेत .
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत .
तसेच इतर फोटो काढायचा मोह आवरणारेही धन्य म्हणायचे. एवढ्या धाडसी कामगिरीचे फोटो काढायचे नाहीत म्हणजे काय.>.> इतके चालून दमल्यावर camera काढून फोटो काढणे पण अवघड असते .समोर भव्य दिव्य दिसत असले तरी ,थकल्यावर फक्त डोळ्याने पाहू असे वाटते ..छोट्या मोठ्या ट्रेक चा अनुभव
विकएण्डला सावकाश वाचावा
विकएण्डला सावकाश वाचावा म्हणुन राखुन ठेवलेले सगळे भाग. विकएण्ड सत्कारणी लागला.
तुमच्या दोघांच्याही प्रत्येक भागातील लेखन आणि फोटोज अफलातुन.
(हाच प्रतिसाद परागच्या धाग्यावरसुद्धा देणार )
थ्रिल वाढतच चाललंय प्रत्येक भागागणिक .. फोटो तर त्याहून जास्त नाट्यमय आणि गुढ वाटतात ..>>>>सशल +१
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
आज खुप दिवसान्नी माबो वर
आज खुप दिवसान्नी माबो वर आले.... आल्या आल्य ही मेजवनी.....
सुरेख चाललाय प्रवास.... अनया च्या मानस कैलास यात्रेची आठवण आली.....
Pages