ऐलतिरावर तू नावाडी पैलतिरी मी स्तब्ध उभा
ऐक हाक श्रीहरी पसरली मावळतीवर क्षीण प्रभा
माघारी जाण्याचे रस्ते अंधुक झाले आज जरी
तरी परतले आठवणींचे सारे पक्षी शांत घरी
या जन्मातून नवजन्माला जाणे खडतर ठाव मला
अवघड अंतर पार कराया मार्ग सुखाचा दाव मला
आयुष्याच्या संध्यासमयी मनास माझ्या हाव तुझी
रस्ता सरला अडवळणांचा एकदाच दे नाव तुझी
गाठोड्यागत संचित माझ्या मानगुटीला वाकवते
नशीब फ़ुटके जागोजागी हसून जिभल्या दाखवते
थकले नाही वाटेवरती लडखडणारे पाय तरी
लोभ जगाचा सुटला नाही तडफ़ड करती श्वास उरी
बालपणातुन तारूण्याप्रत धावत सुटलो अंधपणे
तारुण्यावर वार्धक्याचे सावट आले मंदपणे
कैक चुकांना झाकत ओझे डोक्यावरचे वाढवले
सहा रिपुंना तनात नेहमी सख्यासारखे वागवले...
संपुन गेला प्रवास माझा अखेर मजला जाणवले
आरंभाला का मी उगाच अंतापर्यंत ताणवले
सुर्य निमाला क्षितिजावरती वैफ़ल्याची जाण जरी
धाव त्वरेने हाव सरेना हात जोडतो तुला हरी...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)