सारिका चितळे - मलाही कोतबो - सौ. शशीकला सहस्त्रबुद्धे

Submitted by सारिका.चितळे on 4 September, 2014 - 06:27

माझं मेलीचं नशिबच फुटकं. इतक्या लहानश्या घरात चार माणसं. हे, मी, जानू आणि आमचा पिंटया. गाठीला चार पैसे जास्त असणं हे काय चुकीचं आहे का म्हणते मी? पण नाही, घरात कोणालाही माझं म्हणण पटत नाही. मीच एकटी सारखी सगळ्यांचा विचार करत असते. पण कुणालाही माझी काही फिकीर असेल तर शपथ!

आता ते अनिलराव! किती सज्जन माणूस आहे म्हणुन सांगू तुम्हाला. तिन-चार घर आहेत म्हणे त्यांची. जानूशी लग्न केल्यावर काय काय करायला तयार झाले होते ते. ह्यांच्या पायाच्या गुढघ्याचे ऑपरेशन, आमच्यासाठी एक मोठे घर, पिंटयाची नोकरी. मला तर बाई अश्या जावयाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले होते. अहो, आजकाल कुणी करतं का इतकं आपल्या सासु सासऱ्यांसाठी! हां, आता अनिलराव होते थोडे मोठे वयाने जानूपेक्षा. पण जावई म्हणुन ते आम्हाला मान्य होते. अनिलरावांचा मुलगा सुध्दा कुठेतरी परदेशात वेगळा रहात होता म्हणे!

पण आमच्या जानूने मध्येच शेण खाल्ले. अनिलराव चांगल सांगत होते तिला कि लग्नानंतर तुला नोकरी करायची गरज नाही आहे. पण हि ऐकेल तर शपथ. मुकाटयाने बँकेत नोकरी करायची सोडुन बसस्टॉपवर ऊभी राहुन त्या अकाऊंटंटवर प्रेम करत बसली. आता पुढे तो अकाऊंटंट 'गोखले गृह उद्योगाचा' मालक निघाला हिच काय ती आमच्यासाठी समाधानाची बाब!

श्रीरंगरावांशी लग्न झाल्यावरसुध्दा जानूची बँकेतली नोकरी चालूच! केलं असतं जानूने त्या अनिलरावांशी लग्न, तर सुखात राहिली असती पोरगी. पण नाही. काय तर म्हणे, घरी बसुन कंटाळा येतो, काम करायला आवडतं मला. वा रे वा! आता त्या गोखल्यांकडे आहेत इतके बंगले. एखादा सहज दिला असता आम्हाला राहायला. पण नाही. आमच्या ह्यांचा स्वाभिमान आडवा आला. जावयाकडुन घ्यायला कशाला लाजायचं म्हणते मी?

आणि हा पिंटया. चार पैसे कमवायची अक्कल नाही आहे त्याला. सबंध दिवस कुठे ऊनाडक्या करत असतो, देव जाणे? गणपतीची वर्गणी, जानूला राखी पौर्णिमेला इतका महागडा ड्रेस! काय गरज होती याची म्हणते मी? अंथरूण पाहुन पाय पसरावेत माणसाने. आता या पिंटयाला म्हणलं कि त्या गोखल्यांसारखी श्रीमंत घरातली मुलगी बघ. तर नाही. माझं ऐकेल तर तो पिंटया कसला?

श्रीरंगरावांनी त्या मनिषला त्यांच्या गोखले गृह उद्योगात कामाला घेतले. मग याला सुध्दा घ्यायला काय हरकत आहे म्हणते मी? जानूने त्या अनिलरावांशी लग्न केलं असतं तर ते तयार होते ना पिंटयाच्या नोकरीचं बघायला! पण जानूने दिवे लावले आणि…

घरात इतक्या गाडया असताना आमच्या जानूच्या नशिबी मात्र बसप्रवासचं होता. किती मोठया अपघातातुन वाचली बिचारी! काय तर म्हणे स्मृतीभ्रंश! लग्नाआधीचे बाकी सगळं आठवत आहे तिला. फक्त श्रीरंगरावांशी लग्न झाल्यापासुन पुढचे काही आठवत नाही म्हणे! चला, देव पावला! या अवस्थेतसुध्दा अनिलराव जानूशी लग्न करायला तयार झाले होते. पण आमच्या घरचे ऐकतिल तर शपथ. ते गोखलेसुद्धा तसलेच! श्रीरंगरावांना म्हणलं द्या घटस्फोट जानूला तर म्हणतात कसे… मी आयुष्यभरं तिची वाट पाहायला तयार आहे.

काय करणार? नशिबच फुटकं माझं मेलीचं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या कोतबोमध्ये हे वेगळेपण जाणवले की ज्या व्यक्तिरेखेला खलनायकी रंगात रंगवले गेले आहे तिच्याबद्दल सहानुभुती वाटावी असे हे स्वगत आहे. Happy

छान!

शशिकलाबाईंच्या संवादाचा बाज चांगला पकडलाय. यानिमित्ताने मालिकांचे संवादलेखक वेगवेगळ्या पात्रांना संवादांचा वेगवेगळा बाज देतात हे लक्षात आले हेच खूप आहे म्हणतो मी. नाहीतर या मालिकांच्या दिग्दर्शक, कथा--पटकथा-संवादलेखक यांच कौतुक कुण्णाकुण्णाला म्हणून नाही.
एवडी त्या जान्हवीला डोक्यावर पाडली तरी सगळे प्रेक्षक तिच्याच कौतुकात दंग. पण लक्षात ठेवा, मालिकांच्या व्यक्तिरेखांना कुठे कसे पाडायचे हे आम्हीच ठरवतो.
(अर्र, प्रतिसाद लिहिता लिहिता यांचंच मलाही कोतुबो लिहून गेलो)

बरं. शशिकलाबाई दर अडीच वाक्यांत एक म्हण वापरतात तेवढं राहिलं. बाकी काही नाही तरी दातावर मारायची दमडी यायला हवी होती बघा. तसंच त्यांच्या बंधुराजांनाही विसरलात.

सर्वांना मनापासुन धन्यवाद!
आत्तापर्यंत माबोवर मी फक्त दोन चार ओळीत प्रतिसाद/प्रतिक्रिया देत होते. काही लेख लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. तुमच्या प्रतिसादापध्दल धन्यवाद.

अख्या गोखले सहस्त्रबद्धे उर्फ होसुमियाघ फॅमिलीने काही नाही तर नाही माबोकरांमधल्या सुप्त लेखक/लेखिकांना बाहेर काढलं हीच काय ती त्यांची जमेची बाजू म्हणायला हवी Wink