अगो - मलाही कोतबो : टफी

Submitted by अगो on 4 September, 2014 - 02:18

भूह्हू,भूह्हू ! हम आपके है कौन ? असे विचारणार असाल तर तो प्रश्न मनातच ठेवा. अहो, हम आपके है, टफी.. आहात कुठं ! आता तुम्ही विचाराल की एवढ्या प्रेमळ, कुटुंबवत्सल, सद्वर्तनी आणि सुखी कुटुंबातला असून तुला कोतबोची काय रे गरज ? नाही तशी गरज पडलीच नसती पण एक सल फाsर मनात राहिला होता त्याबद्दल बोलायला आलो होतो पण ... ...

आता आलोच आहे तर इतर काही गोष्टी सांगतो आधी. ह्या कैलाशनाथांची आठशे खिडक्या नऊशे दारांची मोठ्ठी हवेली. एवढी भलीथोरली स्पेस ,पण मला माझी स्पेस मिळेल तर शपथ ! ह्यांचं बोलणं ऐकत घरात बसायचं कायम. शिवाय सारखं आपलं कडेवर घेऊन फिरत असतात. अंग आंबून जातं अगदी. एवढंथोरलं ते हिरवंगार मैदान आहे पण तिथे पळायला मनाई. पळणार हे सगळे आणि मी मुकाट मुन्नाची पॉटीसीट असते तशा स्टुलावर बसून पाट्या उचलत राहायच्या. लल्लूप्रसाद्चं गेंगाणं बोलणं माझ्या जाम डोक्यात जातं. उजवीकडची पाटी उचलली की त्याला फुटवता येतं. आमच्या पूजाभाभीसारखं लाडकं माणूस असेल तर डावीकडची पाटी उचलायची. बसून बसून एवढी ट्रिक शिकलोय मी आता. पाट्या उचलल्या की सगळेजण वेड्यासारखे खिदळतात. त्यांचे माकडचाळे बघणं हाच काय तो विरंगुळा. आणि नाचगाणी तरी कित्ती चालतात घरात. काळजी वाटते हो कधीकधी की करोडोंच्या कारोबारकडे दुर्लक्ष होईल किंवा ह्या तिघांच्या घरेलू आणि साध्याभोळ्या स्वभावापायी कुणीतरी फसवेल ह्यांना आणि मग रस्त्यावर गायची पाळी येईल. पण जाऊदे, लहान तोंडी मोठा घास घेणे बरे नव्हे.

घासावरुन आठवलं की एवढ्या काही तक्रारी सोडल्या तर बाकी अगदी सुखच सुख आहे हो इथे. रुबाब असतो म्हटलं माझा. घासातला घास तर भरवतातच मला पण नाकातून झिणझिण्या आणणारं मजेदार पेयही मी बिनदिक्कत पिऊ शकतो. अगदी भर मैफिलीत ! हायजिन-हायजिन म्हणून ऐकून घ्यावं लागत नाही. पुरुषांनाही जिथे प्रवेश बंद असतो अशा स्पेशल पार्टीत मी जाऊ शकतो. सगळेजण सतत माझी फ्रेंडशिप मागतात. मी उठसूठ कोणालाही देत नाही हा भाग वेगळा Proud घरातले सारखे मला सल्ला विचारतात. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. मग तो निशा आणि प्रेमच्या पहले प्यार का इकरार असो किंवा पूजाभाभीला त्यांच्या प्रेमाचं गोड गुपित कळलं ते असो.
त्या प्यार का इकरारवेळेची तर गंमतच आहे. तोपर्यंत ही निशा एकदम लब्बाड मुलगी होती. सारखी प्रेमभय्याला उल्लू बनवायची. पण चौधरींच्या घरुन येताना भय्याने गाडी अशी काही वेड्यासारखी गोल गोल घुमवलीय की तिचं डोकं ठिकाणावरच आलं एकदम. तेव्हापासून सुतासारखी सरळ आली. तशी गोड आहे हो पण पोरगी ! मला मात्र ह्या गोंधळात गाडी लागते की काय अशी भिती. एका शेतात गाडी थांबवली म्हणून नाहीतर काही खरं नव्हतं त्या दिवशी !

सगळं ठिकाणावर आलंय असं वाटत होतं तेव्हा आमच्या घराला दृष्ट लागली. आमची पूजाभाभी आम्हाला सोडून गेली. फार आवडती होती ती माझी. चार दिवस अन्नही गेलं नाही. मग अचानक सगळ्यांच्या मनात काय आलं आणि राजेशभैय्या आणि निशाचं लग्न ठरवलं. ही गोष्ट कशी काय घडली कोण जाणे ! राजेशभय्यालाही मनातून फार बरे वाटले असावे असे जाणवत होते. असो. आता त्यांचीच इच्छा म्हटल्यावर आपला काय संबंध ! मनातून मात्र मला प्रेम-निशाचे लग्न लागावे असे फार वाटत होते.
होता होता लग्नाचा दिवस उजाडला. मी आपले सहज म्हणून निशाच्या खोलीत गेलो बघायला की तयारी कुठवर आलीय. काय बाई वेंधळेपणा निशाचा ! माझ्या लाडक्या पूजाभाभीने तिला दिलेला हार नको घालायला गळ्यात ? हेच का बहिणीवरचं प्रेम ? असाच उघड्या ड्रॉवरमध्ये पडला होता तो हार धूळ खात. मग दिला तिला आणून की घाल बये ! तर तिने तो कागदात गुंडाळून रुमालात बांधला आणि प्रेमभय्याला दे म्हणून सांगितले. मी गेलो होतो प्रेमला द्यायला पण तो बाळाला खेळवत होता. म्हटलं उगीच जोखमीची वस्तू हरवली तर घ्या काय. मग मी तो सरळ बडेभय्याला दिला तर एकदम चक्रच फिरली. त्यांचे काय बोलणे झाले ते ऐकायला नेमका मी खोलीत नव्हतो त्यामुळे कळले नाही. मी भैय्याला हार दिल्यामुळेच काहीतरी झाले हे निश्चित.
पण घातला बाई तिने एकदाचा तो हार गळ्यात आणि लग्न लागले चक्क प्रेम-निशाचे. मी खूश झालो.

प्रेम-निशाचे लग्न लागले हे चांगलेच झाले पण..पण... पण ...... भय्याचे लग्न मोडायलाही मीच कारणीभूत झालो. सांगायला आलो होतो तो सल हाच ! मी माझ्या प्रेमळ राजेशभय्याला दुखावले हे मला इतके वर्षं विसरता येत नव्हते.
पण काय चमत्कार ...आज इथे मन मोकळे करायला म्हणून आलो आणि पास्ट लाईफ रिग्रेशनचा धागा नजरेला पडला. मला एकदम आठवले की गेल्या जन्मात मी कबूतर होतो आणि आत्ताचा प्रेमळ राजेशभय्या तेव्हा ’जीवन’ बनून फार दुष्टपणा करायचा. मलाही खूप छळले होते त्याने म्हणूनच देवाने त्याला माझ्याकरवी अशी अद्दल घडवली असावी. हे कळल्यावर अपराधी भावना एकदम कमी झाली. कोतबोचीही गरज संपली. बरजात्याघरचा न्याय म्हणतात तो हाच !...भूह्हू, भूह्हू !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व वाचकांना आणि मतदात्यांना मनःपूर्वक धन्यवाद. एरवी मी विनोदी लिहायच्या कधी वाट्यालाही गेले नसते त्यामुळे संयोजकांनाही स्पेशल थँक्स Happy

विनोदी लेखनात आणि ते ही कुत्र्यावर लिहून बक्षीस ( आणि ते ही पहिलं ! ) मिळालेले पाहणे म्हणजे अगदी कोतबो मोमेंट आहे Wink

Pages