अरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब हा उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांनी सुरू केलेला एक मस्त उपक्रम आहे. गेल्या वर्षी सुरू झालेला हा फिल्म क्लब ८ - १६ या वयोगटातल्या मुलांसाठी असून जगभरातले उत्तमोत्तम चित्रपट लहान मुलांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट ही एक कला म्हणून मुलांसमोर यावी, जगाकडे पाहण्याची त्यांची विस्तारावी, कलेविषयीच्या त्यांच्या जाणिवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने तो सुरू केला आहे.
ऑगस्ट २०१३ - जुलै २०१४ या काळात फिचर फिल्म, अॅनिमेशनपट, लघुपट, लघुचित्रपट या प्रकारांशी मुलांना ओळख करून देण्यासाठी मजिद मजिदी यांचा ’चिल्ड्रन फ्रॉ हेवन’, चार्ली चॅप्लिनचा ’मॉडर्न टाईम्स’, ’द कप’, ’अॅनिमल्स आर ब्यूटिफूल पीपल’, ’गोपी गवैय्या, बाघा बजैय्या’, ’जम्पिंग ओव्हर द पडल’, ’द वे होम’ अशा फिल्म्स दाखवण्यात आल्या. या निमित्ताने रेणुताई गावस्कर, विभावरी देशपांडे, सारंग साठ्ये, श्रुती तांबे, चारुहास पंडीत, सोनाली फडके, शिल्पा रानडे या मान्यवरांनी मुलांशी गप्पा मारल्या, चर्चा केली.
या उपक्रमामागची प्रेरणा, या उपक्रमाचं स्वरूप हे दिग्दर्शक-लेखक उमेश कुलकर्णी यांच्याच शब्दांत - 'हल्ली बहुतेक घरांतली मुलं खूप टीव्ही बघतात. या कार्यक्रमांमध्ये हिंसा असतेच असते. या कार्यक्रमांपलीकडे मुलांना जग उरलेलं नाही. एकतर ते टीव्ही बघतात, नाहीतर मोबाईलवर खेळतात. हे असं करू नका, हे मुलांना आपण सांगू शकत नाही. पण काय करू शकता, हे मात्र आपण त्यांना नक्की सांगू शकतो. हे अमुक सकस नाही, असं सांगण्याआधी आपण मुलांसमोर पर्याय ठेवायला हवेत. त्यांतून त्यांना जे आवडेल, ते ते निवडतील.
जगभरात मुलांसाठी उत्कृष्ट चित्रपट / लघुपट बनवले जातात, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. शिवाय हे चित्रपट फक्त लहान मुलांसाठीच आहेत, असं नाही. तर आपल्या प्रत्येकाचं अनुभवविश्व समृद्ध होऊ शकेल, असं काहीतरी या चित्रपटांमध्ये आहे. हे चित्रपट मुलांना दाखवलेच पाहिजेत, असं आम्हांला वाटलं, जेणेकरून मुलांना आपोआप कळेल, की चांगलं काय आणि त्याचा आस्वाद कसा घ्यायचा.
दुसरं असं की, एखादा चित्रपट मुलांनी बघितला, की त्यातून त्या मुलांपर्यंत काय पोहोचलं, मुलांना काय आवडलं, हे जाणून घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, हे अनेकदा पालकांना शक्य नसतं. ही मुलं उद्या चांगली प्रेक्षक होणार आहेत, त्यांच्यापैकी काही कदाचित उत्तम सृजनात्मक कामही करतील. त्यामुळे त्यांंच्यावर उत्तम ठिकाणी चित्रपट पाहण्याचा संस्कार होणं आवश्यक आहे. म्हणून मुलांना उत्तम चित्रपट दाखवावेत, या चित्रपटांबद्दल, त्यांतून मिळालेल्या अनुभवांबद्दल मुलांशी चर्चा व्हावी आणि हे चित्रपट ’राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात’ दाखवावेत, असं ठरलं.
आमची एक प्रोग्रॅमिंग टीम आहे. मुलांना कोणते चित्रपट दाखवावेत, त्यांच्याशी बोलायला कोणाला बोलवायचं, हे ही टीम ठरवते. महिन्यातल्या पहिल्या शनिवारी एक चित्रपट आम्ही दाखवतो. आर्काईव्हजच्या प्रेक्षागृहात जाताना चपला बाहेर काढून ठेवाव्या लागतात. चित्रपटांकडे, या कलेकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन यामुळे बदलतो. तिथे जाऊन आपल्या पॉपकॉर्न खाता येणार नाहीये, तर शांतपणे चित्रपट बघून, नंतर त्यावर विचार करायचा आहे, त्याबद्दल बोलायचं आहे, हे मुलांना कळतं. मुलांना वेगवेगळ्या जॉन्रचे चित्रपट बघता यावेत, याचा आम्ही प्रयत्न करतो. चित्रपट / लघुपट / लघुचित्रपट / अॅनिमेशनपट या वेगवेगळ्या प्रकारांशी त्यांची ओळख करून देतो.
गेल्या वर्षीच्या अनुभवावरून एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो, की मुलं फार छानप्रकारे चित्रपट बघतात. मोठी माणसंही जे तपशील पकडू शकत नाहीत, ते तपशील या मुलांच्या लक्षात येतात. त्यांच्या रोजच्या आयुष्याशी त्याचा संबंध लावायचा प्रयत्न करतात. बरेचदा हे तपशील आपल्याला दिसलेले नसतात. या मुलांची ग्रहणशक्ती जबरदस्त आहे. त्यामुळे एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या नजरेनं बघण्याचं त्यांचं कसबही थक्क करून सोडतं. '
हा उपक्रम आम्ही मुलांना ’शिकवण्या’साठी सुरू केलेला नाही. तर मुलांनी आणि आपण एकत्र काही बघावं, त्यातून त्यांना योग्य वाटेल ते त्यांनी घ्यावं, अशी आमची इच्छा आहे.
एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मला मांडावासा वाटतो. या उपक्रमात सामील झालेली बहुतेक मुलं ही एका विशिष्ट आर्थिक स्तरातली आहे. या उपक्रमाचा आनंद सर्व मुलांना घेता यावा, ही आमची इच्छा आहे. रेणुताई गावस्करांच्या संस्थेतल्या, किंवा ’अपना घर’मधल्या मुलांनीही चित्रपटांचा आनंद लुटावा, असं आम्हांला वाटतं. चित्रपट पाहणं, ही एक सामूहिक गोष्ट आहे. एकट्यानं चित्रपट पाहिला की तो वेगळ्या पद्धतीनं प्रतीत होतो. पण एखाद्या ग्रुपाबरोबर सिनेमा पाहिला, तर त्या ग्रुपाची सारी मनोवस्था त्या चित्रपट पाहण्यात उतरते. त्यामुळे हे चित्रपट सर्व मुलांना एकत्र बघता यावेत, असं आम्हांला मनापासून वाटतं. त्यासाठी सध्या आम्ही प्रायोजकांच्या शोधात आहोत. एखाद्या मुलाची फी जरी तुम्ही भरलीत, तरी त्या मुलाला वर्षभरात बारा चित्रपट बघता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मोठ्या व्यक्तींशी बोलता येईल, नवे मित्रही जोडता येतील.
यंदा या उपक्रमाचं दुसरं वर्ष. २ ऑगस्ट, २०१४ रोजी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या उपस्थितीत जाफर पनाही यांचा अनेक पुरस्कारांनी गौरवलेला ’द व्हाईट बलून’ हा चित्रपट दाखवण्यात आला.
उपक्रमातला पुढचा चित्रपट ६ सप्टेंबर, २०१४ रोजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल. चित्रपटाचं नाव आहे ’ऑक्टोबर स्काय’, आणि या वेळी मुलांशी गप्पा मारायला, चित्रपटासंबंधी बोलायला उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर.
मायबोली.कॉम या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. यापुढे या फिल्म क्लबातर्फे आयोजित होणार्या प्रत्येक कार्यक्रमाचे तपशील तुम्हांला मायबोली.कॉमवर वाचायला मिळतील.
या उपक्रमाला मायबोलीकर भरभरून पाठिंबा देतील, अशी खात्री आहे.
अरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब
वयोगट - ८ - १६ वर्षं
शुल्क - रुपये १५००
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी, दुपारी २.३० - ४.३०
स्थळ - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता, पुणे
६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात चित्रपटाच्या आधी नोंदणी करता येईल.
अरे वा, छान उपक्रम. डॉ.
अरे वा, छान उपक्रम. डॉ. नारळीकरांचे बोलणे ऐकणे म्हणजे पर्वणीच असते.
अरे वा, खरंच छान उपक्रम आहे!
अरे वा, खरंच छान उपक्रम आहे! थँक्स
मस्त उपक्रम. देशात परत
मस्त उपक्रम. देशात परत आल्यावर माझ्या मुलीला पाठवायला आवडेल
छान उपक्रम! >>सध्या आम्ही
छान उपक्रम!
>>सध्या आम्ही प्रायोजकांच्या शोधात आहोत. एखाद्या मुलाची फी जरी तुम्ही भरलीत, तरी त्या मुलाला वर्षभरात बारा चित्रपट बघता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मोठ्या व्यक्तींशी बोलता येईल, नवे मित्रही जोडता येतील. >>
यात सहभाग घ्यायला आवडेल. अधिक तपशीलवार माहितीच्या प्रतिक्षेत!
अर्रे, मस्त ! आम्हाला यायचे
अर्रे, मस्त ! आम्हाला यायचे आहे
मी गेल्या वेळी जाहिरात पाहिली होती पण उशीराने पाहिली त्यामुळे नाही जाता आले.
आठऐवजी सव्वा-सात वय असेल तर चालेल का ? मुलगा इतरांना व्यत्यय आणणार नाही. चित्रपट नीट बघेल.
ही फी प्रत्येक व्यक्तीमागे आहे की मूल आणि एक पालक ह्यांच्यासाठी आहे ? दोन्ही पालक येऊ शकतात का ? मग फी तीनहजार असेल का ?
अगो + १, ७ वर्षाच्या मुलीला
अगो + १,
७ वर्षाच्या मुलीला सहभागी होता येईल का?
मस्त उपक्रम अगोच्या
मस्त उपक्रम
अगोच्या प्रश्नांची उत्तरे मला देखिल हवी आहेत.
सुन्दर, पुण्यात नाही याचे
सुन्दर, पुण्यात नाही याचे शल्य वाटतेय या एका गोष्टीसाठी.
या निमित्ताने काही मुलांना दाखवण्यासारख्या चित्रपटांची नावे कळली.
१९८४ ते ८६ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये अभिरुची नावाच्या संस्थेने असा उपक्रम केला होता. दर रविवारी उत्तमोत्तम चित्रपट पाहिलेले आठवतात. अनमोल घडी, जवाब आयेगा अशी काही चित्रपटांची नावेपण आठवतात.
स्वाती२, तुम्ही एकतर अरभाट
स्वाती२,
तुम्ही एकतर अरभाट निर्मितीच्या कार्यालयात किंवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ६ तारखेला पैसे देऊ शकता. वर पोस्टरवर दिलेल्या क्रमांकांवर फोन केल्यास अधिक माहिती मिळू शकेल. या उपक्रमात रस दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अगो, स्वर, हर्पेन,
या फिल्म क्लबात दाखवण्यात येणार्या अनेक चित्रपटांना सबटायटल असतात. आशयही अनेकदा वयवर्ष ८+ यांसाठी असतो. ७ वर्षांची मुलं त्यामुळे चित्रपट कितपत आनंद घेत बघतील, हे सांगता येत नाही.; एखादा चित्रपट कळला नाही, त्यामुळे पुन्हा येण्याची इच्छाच उरली नाही, असं व्हायला नको. तिसरी-चौथीत असलेली व त्यापुढची मुलं कदाचित चित्रपट जास्त समजून पाहू शकतील, चर्चांमध्ये भाग घेऊ शकतील. तरीही तुम्ही उत्सुक असाल, तर ६ तारखेला किंवा त्या आधी कार्यालयात नोंदणी करू शकता.
अगो,
पालकही चित्रपटांना हजर राहू शकतात. १५०० रुपये हे मुलासाठी असलेलं शुल्क आहे. पालकांसाठी वेगळे रु. १५०० प्रत्येकी भरावे लागतील.
धन्यवाद,
धन्यवाद, माध्यम्_प्रायोजक,
आशयही अनेकदा वयवर्ष ८+ यांसाठी असतो. ७ वर्षांची मुलं त्यामुळे चित्रपट कितपत आनंद घेत बघतील, हे सांगता येत नाही.; एखादा चित्रपट कळला नाही, त्यामुळे पुन्हा येण्याची इच्छाच उरली नाही, असं व्हायला नको. तिसरी-चौथीत असलेली व त्यापुढची मुलं कदाचित चित्रपट जास्त समजून पाहू शकतील, चर्चांमध्ये भाग घेऊ शकतील. >>> हा मुद्दा वाचून घाई करावी का असं वाटतं आहे. विचार करुन ठरवते काय करायचं ते.
उत्तम उपक्रम ! माहितितल्या
उत्तम उपक्रम !
माहितितल्या पालकांना लिंक पाठ्वण्यात येईल.
मुंबईतही असा ऊपक्रम सुरु केल्यास बरं होईल
मस्त उपक्रम!! माहितीतल्या या
मस्त उपक्रम!! माहितीतल्या या वयोगटातील मुलांच्या पालकांना ही माहिती नक्की कळवेन.
येत्या शनिवारी, म्हणजे ६
येत्या शनिवारी, म्हणजे ६ सप्टेंबर रोजी अरभाट फिल्म क्लबमध्ये दाखवण्यात येणारा चित्रपट आहे - 'ऑक्टोबर स्काय'.
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. होमर हिकमनची ही गोष्ट. होमर हा एक कोळसा-खाणकामगाराचा मुलगा. १९५०च्या दशकात कोलवूड नावाच्या एका गावात राहणार्या होमरसमोर भविष्यात करण्याजोगी एकमेव गोष्ट म्हणजे कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून जाणे. १९५७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मात्र एक अद्वितीय घटना घडते. ’स्पुतनिक’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशाकडे झेप घेतो. होमरला आता रॉकेट बनवायचे वेध लागतात. कसंही करून स्वत:चं रॉकेट बनवायचंच, या इच्छेनं तो झपाटतो. आपल्या मित्रांसह भरपूर चुका करत त्याचे प्रयोग सुरू होतात. दुर्दैवानं गावातल्या बहुतेकांना, आणि खासकरून त्याच्या वडिलांना, होमरचे हे प्रयोग म्हणजे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय वाटतात. गावातल्या हायस्कूलमधल्या एका शिक्षकाला मात्र होमरच्या आणि त्याच्या मित्रांच्या प्रयत्नांची जाण असते. त्याच सुमारास होणार्या नॅशनल सायन्स फेअरमध्ये भाग घेण्याविषयी तो त्यांना सुचवतो. जिंकले, तर भली मोठ्ठी शिष्यवृत्ती त्यांना मिळणार असते. आता होमरपुढे आव्हान एकच - आकाशात झेप घेणारं रॉकेट बनवायचं!
शनिवारी दुपारी २.३० वाजता पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावरच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा चित्रपट दाखवण्यात येईल.
या क्लबमध्ये प्रवेशासाठीची नोंदणी याच वेळी करता येईल.
चित्रपटानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर या चित्रपटाबद्दल मुलांशी गप्पा मारतील.
तर, ही संधी अजिबात चुकवू नका!
असा उपक्रम मुम्बैइत नाहिये
असा उपक्रम मुम्बैइत नाहिये का?
आतापासून वार्षिक सभासद बनता
आतापासून वार्षिक सभासद बनता येईल का?
येत्या ४ तारखेला कोणता चित्रपट आहे.
फक्त एकावेळेस चित्रपट बघता येण्याची सोय आहे का?
हर्पेन, या शनिवारी, ४
हर्पेन,
या शनिवारी, ४ तारखेला, 'लिट्ल रेड फ्लॉवर्स' या चिनी चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
वेळ - दु. २३० - ४३०
फक्त एका शोपुरतं शुल्क भरून येता येणार नाही (कारण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या नियमांमध्ये ते बसत नाही).
त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद
त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद चिनूक्स,
शनिवारी सभासदत्व घेता येऊ शकेल ना?
सभासदाला पाहुणे आणता येतात का, अशा अर्थाने एकच चित्रपट बघता येईल का? असे विचारायचे होते. मुलाचा मामेभाऊ येणारे.
बहुदा नसावे तरी पण एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारतोय
शनिवारी सभासदत्व घेता
शनिवारी सभासदत्व घेता येईल.
तुझ्या दुसर्या प्रश्नाचं उत्तर आयोजकांशी बोलून देतो.
प्रतिभा,
सध्या हा उपक्रम पुण्यापुरताच मर्यादित आहे.
धन्यवाद माप्रा
धन्यवाद माप्रा
खुप खुप शुभेच्छा
खुप खुप शुभेच्छा
जगाकडे पाहण्याची त्यांची
जगाकडे पाहण्याची त्यांची विस्तारावी . seems need correction?
मुंबईत केव्हा सुरु करणार हा
मुंबईत केव्हा सुरु करणार हा उपक्रम?