"बिछडे सभी बारी बारी.....!!" ५ अभिनेते, १ अभिनेत्री

Submitted by अशोक. on 13 August, 2014 - 01:00

माणसाचे आयुष्य अमर नाही हे अमान्य कुणीच करणार नाही. मृत्यू अटळ असतोच. तो कधी कुणाला गाठेल याचे निश्चित असे कुठले सूत्र नसते आणि आजारी पडलेल्या माणसाला देवदूत बनून आलेले डॉक्टर वाचविण्यात यशस्वी तर होतात पण तेच डॉक्टर त्या माणसाचा ज्यावेळी देवाघरी जायचा समय येतो त्यावेळी त्याला रोखू शकत नाही. हे झाले नैसर्गिकरित्या मरणक्रियेबाबत; पण असेही काही दुर्दैवी वा हताश जीव असतात या जगात जे स्वतः नैराश्येपोटी आपली जीवनयात्रा संपवितात. त्याचे कारण मग शोधले जाते. ते मिळते तर बहुधा असते एकाकीपणा, उदासीनता, ढळलेला मानसिक तोल, व्यवसायातून साचलेली अपयशमालिका आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिर आर्थिक दुर्बलता. अन्यही कारणे असू शकतात विविध थरावरील लोकांची जी आत्महत्येला त्याना प्रवृत्त करतात. कलाकारही याला अपवाद नाहीत. अधुनमधून आपण अशाप्रकाराने जगाचा निरोप घेतलेल्या कलाकारांबाबत वाचतो, ऐकतो आणि ज्यावेळी रॉबिन विल्यम्ससारखा नेहमी हसर्‍या चेहर्‍याने सर्वत्र वावरणारा एक चांगला लोकप्रिय अभिनेता आत्महत्येद्वारे आपले जीवन संपवून टाकतो, त्यावेळी मात्र आपल्या मनाला हादरा बसतो. वाटते, अरे याला तर कालच मी मुलांसोबत एचबीओवर "जुमानजी" मध्ये पाहिला आणि आम्ही सर्वच दिलखुलास हसत होतो. हॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतून अशा गुणी कलाकारांच्या मृत्यूची बातमी येणे हा काही नवीन प्रकार नाही. वयोमानामुळे, थकल्यामुळेही जगाला रामराम करणारे अनेक कलाकार आहे. पण आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारून आपल्या चाहत्यांच्या मनावर ओरखडा निर्माण करण्याची परंपरा मेरिलिन मन्रो पासून जी चालत आली आहे ती खंडित होणारी नाही असेच दिसते.

२०१४ मधील हा आठवा महिना चालू आहे. रॉबिन विल्यम्सच्या निघून जाण्यामुळे मी सहज जानेवारीपासून हॉलिवूडचा कलाकार निधनाचा आढावा घेतला तर जी नावे समोर आली त्यांच्या कारकिर्दीकडे तसेच प्रेक्षकांच्या मनी असलेले त्यांचे स्थान पाहिल्यास ही मंडळी जरी आपल्या कुटुंबातील नसली तरीही यांच्या जाण्यामुळे रसिकांच्या मनी खरेच आपल्या घरातीलच कुणीतरी कमी झाले आहे अशीच भावना निर्माण झाली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अनेक कलाकारांच्याबाबतीत मी "बिछडे सभी बारी बारी...." म्हणतो....या लेखाद्वारे त्यांची आठवणही काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पाच अभिनेते आणि एक अभिनेत्री यांच्याचविषयी लिखाण मर्यादित ठेवले आहे, कारण ही सर्व नावे भारतीय प्रेक्षकांना माहीत आहेत. सुरुवात अर्थातच रॉबिन विल्यम्सपासूनच.

१. रॉबिन विल्यम्स : २१ जुलै १९५१ - ११ ऑगस्ट २०१४
ARobin.jpg
भारतीय प्रेक्षकांना "जुमानजी" आणि "मिसेस डाऊटफायर" या दोन चित्रपटांमुळे माहीत झालेला हा अभिनेता आपल्या कारुण्यपूर्ण विनोदी अभिनयशैलीने जगभर लोकप्रिय होता. जुलै १९५१ मध्ये जन्म आणि ऑगस्ट २०१४ मध्ये मृत्यू असे ६३ वर्षाचे आयुष्य लाभलेला विल्यम्स म्हणजे हॉलिवूडला लाभलेला एक गुणी कलाकार होता. तीन वेळा त्याला ऑस्कर पारितोषिकासाठी नामांकन मिळाले होते. मिळाले ते मॅट डेमॉनसोबत काम केलेल्या "गुड विल हंटिंग" चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी. फिशर किंग, अवेकनिंग्ज, मिसेस डाऊटफायर, नाईट अ‍ॅट द म्युझिअम ही आणखीन काही गाजलेले चित्रपट. डिस्नेच्या "अल्लादिन" या लोकप्रिय चित्रपतातील 'जेनी' साठी विल्यम्सने आवाज दिला होता.

अशा या अभिनेत्याला व्यसन लागले होते ते कोकेनचे, ते सुटले आणि मग जोडला गेला तो अल्कोहोलशी. यांच्या खाजगी जीवनात डोकावून पाहाण्यात तसा काही अर्थ नसल्याने अशा गुणी कलाकारांना व्यसनाधीन कसे व्हावे लागते हा विषय वेगळाच; पण सिद्ध झाले की विल्यम्स "डीप्रेशन" च्या गर्तेत जाऊन पडला होता. मागील काही महिन्यात तो हॅझेलडन फाऊंडेशनच्या 'अ‍ॅडिक्शन ट्रीटमेन्ट सेंटर" मध्ये दाखल झाला होता. तिथून घरी आल्यानंतरही तो एकाकी मनस्वी अवस्थेत दिवस काढत होता आणि ११ ऑगस्ट २०१४ रोजी त्याच्या सहाय्यकाने त्याची प्रकृती बिघडल्याचे संबंधित इस्पितळाला कळविले पण त्यांची टीम येण्यापूर्वीच अभिनेता विल्यम्सची एक्झिट झाली होती. पोलिस विभागाकडून तो मृत्यू आत्महत्त्या असल्याचा रीपोर्ट दिला गेला.

२. फिलिप सेमूर हॉफमन : २३ जुलै १९६७ - २ फेब्रुवारी २०१४
APhilip.jpg

न्यू यॉर्क इथे जन्मलेला हा विविध तर्‍हेच्या भूमिका करून जगभरातील प्रेक्षकांना पसंत पडलेला होता. "ट्रिपल बोगी" ह्या १९९१ मधील चित्रपटाने त्याने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता तर माय न्यू गन ह्या चित्रपटाद्वारे तो समीक्षकांना पसंत पडला होता. बहुतांशी सहाय्यक अभिनेता यातूनच त्याची चलतचित्राची प्रवासगाडी सुरू झाली होती आणि मुख्य अभिनेता कुणीही असला तरी फिलिपच्या वाट्याला आलेल्या भूमिका तो आपल्या खानदानी रुबाबाने प्रभावीरित्या सादर करीत असे. मॅट डेमॉन आणि ज्यूड लॉ या जोडीने गाजविलेल्या "टॅलेन्टेड मि.रिप्ले" ह्या रहस्यमय चित्रपटात फिलिप सेमूरची फ्रेडी माईल्सची मित्राची भूमिकाही तितकीच प्रभावी झाली होती. मॅट डेमॉनचा "टॉम रीप्ले" एका भांडणाच्या प्रसंगी फ्रेडीचा हॉटेलमध्ये खून करतो, तो प्रसंग अंगावर येतो. त्याला कारण या दोन अभिनेत्याचे कमालीचे सादरीकरण. "फ्लॉलेस", "मॅग्नोलिया" आणि "ऑलमोस्ट फेमस" हे फिलिपचे नावाजलेले आणखीन काही चित्रपट. "सायलेन्स ऑफ द लॅम्ब" अ‍ॅन्थोनी हॉपकिन्स आणि ज्योडी फॉस्टरने गाजविलेला हा चित्रपट. या कथानकाच्या पूर्वीच्या घडामोडीवर म्हणून 'रेड ड्रॅगन" आला होता. यातील फिलिप सेमूरने साकारलेली फ्रेडी लाऊंडस या पत्रकाराच्या भूमिकेचेही स्वागत झाले होते.

अशा प्रवासानंतर त्याच्या अभिनय कौशल्याला पूर्ण वाव देणारा चित्रपट त्याला मिळाला. तो होता "कपोत". ट्रुमन कपोत या पत्रकाराच्या जीवनातील घटनेवर आधारित या चित्रपटाची ही भूमिका अत्यंत गाजली आणि फिलिप सेमूरला २००६ चे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा "ऑस्कर" पुरस्कारही मिळाला.

कारकिर्दीच्या बहारात असताना आणि चाळीशीत असलेला या अभिनेत्याने अशाच एका मानसिक दडपणाच्या अवस्थेत असताना हेरॉईनचा डोस घेऊन २ फेब्रुवारी २०१४ रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

३) जेम्स गार्नर : ७ एप्रिल १९२८ - १९ जुलै २०१४
AJames.jpg
ज्यानी "द ग्रेट एस्केप" हा १९६३ मध्ये आलेला दुसर्‍या महायुद्धातील जर्मन युद्धकैद्यांच्या सुटकेच्या प्रयत्नावर आधारित गाजलेला चित्रपट पाहिला असेल त्याना मुख्य भूमिकेत असलेल्या स्टीव्ह मॅक्विन बरोबरच फ्लाईट लेफ्टनंट रॉबर्ट हेन्ड्लीच्या भूमिकेतील जेम्स गार्नर हा अभिनेता नक्कीच आठवत असणार. जुन्या जमान्यातील एक देखणा सशक्त अभिनेता म्हणून गाजलेला गार्नर वयाच्या सोळाव्या वर्षीत मर्चंट नेव्हीत भरती होऊन नंतर कोरिअन युद्धात प्रत्यक्ष सामील झाला होता व त्याला पर्पल हार्ट मेडलही मिळाले होते. जखमी झाल्यामुळे त्याला तिथून निवृत्ती घ्यावी लागली. त्यानंतर टेलिव्हिजनच्या विश्वात त्याने प्रवेश केला होता आणि तेथील त्याची कामाची तारीफ ऐकल्यानंतर वॉर्नर ब्रदर्स या स्टुडिओने त्याला चित्रपटांसाठी करारबद्ध केले. १९५७ मधील "मेव्हरिक" मालिकेने त्याचे नाव झाले आणि १९६० पर्यंत या मालिकेशी तो निगडित होता. यातील लोकप्रियतेच्या आधारावरच त्याला थ्रिल ऑफ इट ऑल, मूव्ह ओव्हर डार्लिंग आणि ग्रेट एस्केप सारखे गाजलेले चित्रपट मिळाले आणि हॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव झाले. ग्रेट एस्केपच्या बरोबरीनेच पुढे १९६६ मधील 'ग्रॅण्ड प्रिक्स' ह्या काररेसिंग जीवनावरील चित्रपटामुळेही गार्नरचे नाव घेण्यात येऊ लागले. तरीही त्याला लोकप्रियता मिळाली ती टेलिव्हिजनवर येत राहिलेल्या सीरियल्समुळेच...किंबहुना त्याचे नाव गाजावे असा चित्रपट त्याला सत्तरीनंतर मिळाला नाही. ८० च्या दशकात ब्रुस विलिससोबत सनसेट हा चित्रपट त्याने केला तर व्हिक्टर व्हिक्टोरिया आणि मर्फीज् रोमान्स हे आणखीन दोन चित्रपट. मर्फीज रोमान्समधील भूमिकेबद्दल त्याला ऑस्कर नामांकन मिळाले होते. मला स्वतःला त्याचा "३६ अवर्स" हा चित्रपट फार आवडला होता. यातही जर्मनानी पकडलेल्या युद्धकैद्याचीच, पण इस्पितळात पडून राहिलेल्या रुग्णाची, त्याने भूमिका केली होती.

हृदय विकाराने त्रस्त असलेला हा अभिनेत्याने वयाची ८० ओलांडली. १९ जुलै २०१४ या दिवशी घराचे दार कुणी उघडत नाही असा स्थानिक पोलिसांना कळविले गेल्यावर त्यांची रेस्क्यू टीम तिथे आली. दार उघडले गेले तर जेम्स गार्नर त्याना मृतावस्थेत आढळला. हृदयाच्या तीव्र धक्काने जेम्सचे निधन झाले असे पोलिस रीपोर्टमध्ये नमूद करण्यात आले.

४) एली वॅलेच : ७ डिसेंबर १९१५ - २४ जून २०१४
AEli.jpg

तब्बल ९९ वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या आणि अवघ्या जगतात लोकप्रिय असलेला हा चरित्र अभिनेता आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या परिचयाचा झाला तो क्लिंट ईस्टवूडच्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या "द गुड, द बॅड, द अग्ली" ह्या वेस्टर्न चित्रपटातील अफलातून भूमिकेमुळे. दहावीस वर्षे नव्हे तर तब्बल ६० वर्षे त्याने रुपेरी पडदा गाजवून सोडला. १९४९ मध्ये त्याने सुरू केलेल्या अभिनय क्षेत्रातील त्याची कामगिरी त्याने नव्वदी ओलांडली तरी तितक्याच उत्साहाने चालू होती. ज्यावेळी "टायटॅनिक" फेम केट विन्स्लेट जन्माला आली होती (१९७५) त्यावेळी एली वॅलेचने आपल्या वयाची साठी गाठली होती. तर अशा 'वृद्धा'ने चक्क २००६ मध्ये या केट विन्स्लेटसमवेत "द हॉलिडे" चित्रपटात तितक्याच उत्साहाने काम केले होते....यावेळी तो ९१ वर्षाचा होता. इतका उत्साह या हरहुन्नरी कलाकाराकडे कुठून आला असेल हा प्रश्न जगभरातील सिनेप्रेमींना पडलेला असेल. क्लार्क गेबल ते ज्यूड लॉ आणि मेरिलिन मन्रो ते केट विन्स्लेट अशा कितीतरी कलाकारांच्या पिढ्या या उत्साही अभिनेत्याने पाहिल्या आणि त्यांच्यासमवेत विविध भूमिकाही केल्या. याच्या चित्रापटांची निव्वळ यादी जरी द्यायची झाल्यास पान खर्ची पडेल. तरीही आपल्या प्रेक्षकांना माहीत असलेले एली वॅलेचच्या काही चित्रपटांचा उल्लेख करणे जरूरी आहे. अकिरा कुरोसावाच्या जगप्रसिद्ध "सेव्हन समुराई" वर बेतलेला "मॅग्निफिसंट सेव्हन" मध्ये यूल ब्रायनर, स्टीव्ह मॅक्विन, चार्ल्स ब्रॉन्सन, जेम्स कोबर्न आदी सात शूरांना सामोरा जाणारा खलनायक एलीने साकारला होता. मेरिलिन मन्रोसमवेत "मिसफिट्स", अमेरिकेचा इतिहास सांगणारा एपिक धर्तीवरचा "हाऊ द वेस्ट वॉज वन", "लॉर्ड जिम", ऑड्री हेपबर्नसोबतचा "हाऊ टु स्टील अ मिलिअन..." . कित्येक चित्रपट याने केले पण अर्थात यावरचा कळसाचा चित्रपट म्हणजेच सर्जेओ लीऑनचा "द गुड, द बॅड अ‍ॅन्ड द अग्ली" आणि त्यातील एलीचा टुको (खुद्द एली वॅलेचसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात इतका होता की २००५ मध्ये त्याने जेव्हा आपले आत्मचरित्र प्रकाशित केले, त्याला "द गुड, द बॅड अ‍ॅन्ड मी..." असेच नाव दिले). ग्रेगरी पेक व ओमर शरीफसमवेतचा "मॅकेन्नाज गोल्ड" हाही असाच गाजलेला. प्रत्येक दशकातील गाजलेल्या अभिनेत्यासमवेत चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत एली आपला हसरा चेहरा घेऊन वावरायचा. "गॉडफादर भाग-३" मध्येही अल पॅचिनोसमवेत त्याने काम केले तर २००३ मध्ये "मिस्टिक रिव्हर" मध्येही शॉन पेनसमवेत.

हॉलिवूड मधील कलाकारांच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष देवू नये असे मानले जाते कारण तो त्यांच्या खाजगी जीवनाचा भाग. तरीही एली वॅलेचच्याबाबतीत आगळे उदाहरण म्हणून सांगितले पाहिजे की या अभिनेत्याने एकच लग्न केले आणि ६६ वर्षे आपल्या पत्नीसोबत राहिला. तीन मुले, पाच नातू आणि अनेक पणतू त्याने पाहिले आणि त्यांच्यासमवेत जवळपास १०० वर्षाचे आपले खुशालीचे हसतमुख जीवन जगला.

५) मॅक्समिलन शेल : ८ डिसेंबर १९३० - १ फेब्रुवारी २०१४
AMax.jpg

जर्मनभाषिक पण ऑस्ट्रियामध्ये जन्म घेतलेला हॉलिवूडमधील असा अभिनेता ज्याने जर्मन ऑफिसरच्या भूमिकेत (जर्मन कैदी बचाव पक्षाचा वकील) आपली अभिनयक्षमता दाखवून १९६१ च्या "जजमेन्ट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग" चित्रपटासाठी "सर्वोत्कृष्ट अभिनेता" म्हणून ऑस्कर मिळविले. वैशिष्ठ्य म्हणजे याच चित्रपटातील न्यायाधिशाची भूमिका करणार्‍या स्पेन्सर ट्रेसी या ज्येष्ठ अभिनेत्यालाही त्या वर्षी नामांकन मिळाले होते. तरीही शेलच्या अभिनयाची वाहवा झाली होती. मॉरिस शेव्हेलिअर आणि मार्सेल्लो मॅस्ट्रिओनी यांच्या पाठोपाठ मॅक्समिलन शेल या परदेशी अभिनेत्याने हॉलिवूडमध्ये आपले स्थान भक्कम केले होते. स्वीत्झर्लंडमध्ये वाढलेल्या या युवकाने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून शेक्सपिअरच्या नाटकातून भूमिका केल्या आणि हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. १९५८ मध्ये आलेल्या "द यंग लायन्स" या चित्रपटाद्वारे शेलची ओळख झाली. अतिशय देखणे व्यक्तिमत्व आणि संयत अभिनय ही त्याची वैशिष्ठ्ये होती. "जजमेन्ट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग" पाठोपाठ नंतर त्याला द मॅन इन द ग्लास बूथ (१९७५) आणि ज्युलिया (१९७७) या दोन चित्रपटांसाठी पुन्हा ऑस्करची नामांकने मिळाली होती. शेलने पुढे अभिनयासमवेत चित्रपट दिग्दर्शनातही पदार्पण केले. १९७३ मध्ये त्याने दिग्दर्शित केलेला "पेडेस्ट्रिअन" ह्या जर्मन चित्रपटाला "बेस्ट फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म" साठी ऑस्कर नामांकन लाभले तर गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त झाला होता. सुप्रसिद्ध जर्मन अभिनेत्री मार्लिन डिट्रिचवर त्याने "मार्लिन" नामक डॉक्युमेन्टरी तयार केली. यालाही ऑस्कर नॉमिनेशन प्राप्त झाले होते.

भारतीय प्रेक्षकांनी मॅक्समिलन शेलला पाहिले असेल ते प्रामुख्याने दुसरे महायुद्ध आणि तत्संबंधी कथानकावर आधारित चित्रपटातूनच. त्यापैकी प्रमुख म्हणजे "ओडेसा फाईल", "काऊंटरपॉईन्ट", "ब्रिज टू फार", "क्रॉस ऑफ आर्यन" आणि "ज्युलिया". १९९० नंतर शेलने प्रामुख्याने जर्मन टेलिव्हिजन निर्मिती आणि विविध मालिकांमधून कामे केली. अत्यंत सुखी आणि समाधानी आयुष्य या जर्मनभाषिक अभिनेत्याने व्यतीत केले. ऑस्ट्रियामध्ये ३१ जानेवारी २०१४ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला.

६) शर्ली टेम्पल : २३ एप्रिल १९२८ - १० फेब्रुवारी २०१४
AShirley.jpg

वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी हॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या ह्या छोट्या पोरीने जगभर अशी काही प्रसिद्धी मिळविली की आजही तिचे "जगातील सर्वात लोकप्रिय बालकलाकार" या उपाधीने शर्ली टेम्पल हे नाव घेतले जाते. विलक्षण लोकप्रियता मिळविणे म्हणजे काय हे या मुलीने दाखवून दिले होते. वयाच्या पाचव्याच वर्षी अभिनय, गायन आणि नृत्य यात ती चांगलीच पारंगत झाली होती. विलक्षण असे सौंदर्य, कामातील सहजता, सदैव हसरा चेहरा, अमेरिकन राष्ट्राध्यक्षापासून सामान्य कामगार यानी डोक्यावर घेतलेल्या ह्या मुलीने आपल्या चित्रपटाद्वारे स्टुडिओजना लक्षावधी डॉलर्सचे उत्पन्न मिळवून दिले होते. चित्रपटगृहाबाहेर तिच्या अनुषंगाने तयार झालेल्या बाहुल्या, खेळणी, रेकॉर्डस, चहापात्रे, पोषाख आदी अनेक माध्यमाद्वारेही उत्पन्नाचे विक्रम रचले गेले. १९३० ते १९४० या कालावधीत जन्माला आलेल्या मुलींचे नाव "शर्ली" ठेवण्याची लाटच आली होती. हॉलिवूडमध्ये नंतरच्या काळात अत्यंत नावारुपाला आलेल्या "शर्ली मॅक्लेन" चा जन्म १९३४ चा, तर तिच्या पालकांनी तिचे नाव शर्ली निवडले ते या बाहुलीमुळेच. क्लार्क गेबल, बिंग क्रॉस्बी, रॉबर्ट टेलर, गॅरी कूपर आदी अभिनेत्यांच्या चित्रपटांनी त्या वेळी जितका गल्ला गोळा केला त्यापेक्षा अधिकची कमाई शर्ली टेम्पल ह्या बालकलाकाराची होती. गॅरी कूपर तर प्रथम क्रमांकाचा अभिनेता पण असे म्हटले जाते की ज्यावेळी त्याने एका चित्रपटाच्या शूटिंग समयी शर्लीला पाहिले तेव्हा अगदी आतुरतेने तिच्याजवळ जाऊन आपल्या डायरीत तिची स्वाक्षरी मागितली होती. वाढत्या वयासोबत तिच्या कामात फरक पडत जाणे नैसर्गिकच होते. नायिकाचेही कामे तिने मिळविली तरीही तिच्यावरील "बालकलाकार" हा शिक्का प्रेक्षक विसरू शकले नाहीत. चित्रपटसृष्टीपासून जरी ती दूर झाली तरी लोकमानसातील तिची प्रतिमा पुसली गेली नाही. पुढे तिने अमेरिकन सरकारची प्रतिनिधी म्हणून 'राजदूता"चे कार्य केले. घाना आणि झेकोस्लाव्हाकिया या राष्ट्रात ती अमेरिकेन अ‍ॅम्बॅसिडर होती. कार्यरत राहिली अखेरपर्यंत आणि १० फेब्रुवारी २०१४ या दिवशी वयाच्या ८५ व्या वर्षी ही देखणी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.

.....असे हे ५ अभिनेते आणि १ अभिनेत्री....ज्यानी २०१४ मध्ये या जगाचा कायमचा निरोप घेतला....त्यांच्या स्मृती जागवण्याचा हेतू या लिखाणामागे असल्याने कारकिर्दीचा सखोल पाठपुरावा केलेला नाही. रॉबिन विल्यम्स संदर्भात लिहावे असे मनी होतेच, पण त्याच्याविषयी वाचत असताना मग ही काही लोकप्रिय नावेही समोर आल्याने सर्वांना लेखात घ्यावे म्हणून तशी रचना केली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Eli Wallach चा उच्चार इलाय वॉलख/क असा आहे.

फिलिप सिमूर हॉफमनचा आत्ताच आलेला "A Most Wanted Man" highly recommended.

हुडा, मी मध्यंतरी पारल्यात लिहिले होते शोले कुठून उचलला आहे त्या बाबत. स्टोअरी वेगळी असली आणि शोले मध्ये आपले टिपिकल बॉलिवूड पेशल गोतावळे घातलेले असले तरी चक्क बर्‍याच फ्रेमच्या फ्रेम उचललेल्या आढळ्यामला ह्या सिनेमा मधून.
http://en.wikipedia.org/wiki/Once_Upon_a_Time_in_the_West

छानच आढावा घेतलात मामा. किती ताकद असते चांगल्या कलाकारात, जगभरातील चाहत्यांवर गारूड करण्याची. प्रत्येक चांगल्या भूमिकेत आपल्या स्वत्वाचा काही अंश सोडून जातात ही मंडळी आणि आयुष्यभराचा ठेवा देऊन जातात. रॉबिन विल्यम्सच्या दु:खद निधनामुळे या सर्वांच्या आठवणीना उजाळा दिला गेला ह्यापेक्षा चांगली श्रद्धांजली काय असणार !

या सर्वांतील रॉबिन विल्यम्स खास आवडीचा. जबरदस्त रेंज होती अभिनयात. त्याचे वन अवर फोटो आणि इन्सोम्न्या पाहून थरारून जायला होते. डार्क शेड्सचे रोलही सहजतेने निभावून नेलेत त्याने. कोपु धाग्यावर डेड पोएट्स सोसायटीचा उल्लेख केलाच होता. त्याचा कदाचित सर्वात आवडता चित्रपट माझा. कमाल अभिनेता.

जेम्स गार्नरचा ग्रेट एस्केप सोडला तर बाकी पाहिलेले नाहीत. शोधून बघेन.

जजमेंट बद्दल तुम्ही आणि अतुलरावच जास्त चांगलं लिहू शकतील. अभिनेता बनावे तर असला एखादा रोल मिळण्यासाठी असं प्रत्येक होतकरूला वाटावे अशी भूमिका.

फिलीप सेमूरचा कपोट तर आहेच पण वर प्रतिसादात अतुलरावांनी एका फारच सुरेख चित्रपटाचा उल्लेख केलाय.

लेखात नसलेला पण तुम्ही प्रतिसादात उल्लेख केलेला मिकी रुनी. त्याचा आणि स्पेन्सर ट्रेसीचा "बॉय्झ टाऊन" बघून नि:शब्द झालो होतो. वीसेक वर्षाचा पोरगा ट्रेसीसारख्या मातब्बरासमोर काय ताकदीने उभा आहे त्या चित्रपटात. आपला जागृती नंतर त्याच्यावरच बेतलेला. तोही सुंदरच होता.
वयाच्या पंचविशीपर्यंत हॉलिवूडमधील एक सर्वात व्यस्त, मागणी असलेला कलाकार म्हणून वावरलेल्या रुनीला दुसर्‍या महायुद्धात भरती केले गेले. युद्ध संपल्यावर मोठाच पेच उभा राहिला कारण कमी उंची आणि वाढलेले वय यामुळे युद्धाआधी ज्या प्रकारच्या तरुणाच्या भूमिका तो करत असे त्यांना आता तो योग्य राहिला नव्हता. अचानक त्याचा बहर संपलाच. पुढे उतारवयात चरित्र भूमिका केल्या पण पहिली शान नव्हती.
अंतही कर्जातच झाला. एकेकाळी पैशाची ददात नसेल पण मृत्यूसमयी शेवटी फार हाल झाले असे वाचले होते.

अनेक आठवणी जाग्या झाल्या.

Eli Wallach बद्दल क्लिंट ईस्टवूड आणि रॉबर्ट डी निरो बोलत असल्याचे व्हीडीओ आहेत युट्युबवर. तिथे इलाय असा उच्चार ऐकला त्याच्या नावाचा.

मामा मस्त लिहलयं.... जुमांजी आला तेंव्हा आम्ही जस्ट कॉलेजात गेलो होतो. आणि नंतर कितीतरी दिवस त्यावर चर्चा करत होतो. हाईट म्हणजे, मुलाबरोबर हा पिक्चर बरेच वेळा बघितला आणि तशीच चर्चा केली. तो लहान असताना अगदी कुठुन तरी डुग्डुग आवाज आला की जुम्मांजी व्हायचं. नाईट अ‍ॅट द म्युझियमची स्टोरी मुलानेच म्ला सांगितली ;).

बाकि सगळ वाचुन ज्ञानात बरीच भर पडली. धन्यवाद.

रॉबिन विल्यम्स - खरोखर, एक वेगळंच रसायन होतं... आहे असंच म्हणायला हवं. चित्रपट आणि टेलिविजन शोज (एसएनएल, मोर्क अँड मिंडी) त्याने गाजवलेच पण मला सगळ्यात आवडला त्याचा टॉक शोजमधला हजरजबाबीपणा. जे लेनो, लेटरमन यांच्या लेट नाइट शोजमध्ये तर तो कमाल करायचा. बंदुकितुन सटासट गोळ्या सुटाव्या तसे जोक्स, नकला तो स्पाँटेनियस्ली इमोट करायचा. असा हसतमुख माणुस जीवघेण्या डिप्रेशन मुळे आपल्यातुन निघुन जावा? नाहि पटत.

देव या विश्वात असलाच तर कदाचीत म्हणेल - जीनी, यु आर फ्री...

RIP Robin Williams

राज, अख्ख्या पोस्टला +१! कालच त्याच्या रोल्सची क्लिप पाहात होतो त्यात जिनी म्हणून बोलताना त्याचा आवाज ऐकला आणि कसंतरीच झालं.

मामा ___/\___. किती माहितीचा खजिना. नतमस्तक मी. मला फक्त एकाच रॉबिन विल्यम्स माहितेय यातला.

हॅल्लो अतुल....

अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचल्यानंतर मलाही समाधान वाटले आणि नजरेसमोर आले की आपण दोघेच मुंबईतील मरीन लाईन्सवर फिरत आहोत आणि मेट्रोला लागलेला "गुड बॅड अग्ली" ची तिकिटे घेण्यासाठी त्या आवारात चाललो आहोत. जवळपास तीन तासाचा तो चित्रपट....तीन तगडे नायक, तिघेही खुनशी (ब्लॉन्डी जरी 'गुड' असला तरी त्याचीही गन आग ओकत असतेच), तिघेही पैसा हरेक मार्गाने मिळविण्यासाठी तरबेज....कुणीतरी कार्सन सैनिकाने मरता मरता टुको रामिरेझला कबरीत पुरलेल्या खजिन्याबद्दल सांगतो....कबरीचे नाव मात्र ब्लॉन्डीला. तर तेवढ्यावर पुढचा प्रवास सोपा नाही कारण दोघांच्या मागावर आहे एन्जेल आईज....थंड रक्ताचा उलट्या काळजाचा.... आणि देवा, त्याचे हिरवी झाक असलेले ससाण्याचे डोळे....

या सर्वांवर मात करणारी ती जागा.....ते कोरडे, शुष्क, रुक्ष गाव....आणि प्रत्येक मिनिटाला कानावर पडणार्‍या गोळ्यांचे आवाज....सारे रसायन असे काही जुळून आले की आत्ता पन्नास वर्षे होत आली प्रथम प्रदर्शनाला तरीही आपण आजही भरभरून बोलत लिहित आहोत या चित्रपटाबद्दल.....आणि टुकोबद्दलही....तोही आयुष्याच्या ९९ वर्षाच्या कालावधीत याच चित्रपटाला जवळ घेऊन जगला.

मामा, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. रॉबिन विल्यम्स आणि एली वॅलेच माहिती आहेत, ग्रेट एस्केपमुळे जेम्स गार्नरही. बाकिचे तिघे ओळखीचे नाहीत. तुमच्यामुळे ओळखी वाढताहेत.. सर्वांना श्रद्धांजली.

तरीही आमची फक्त शाब्दिक आणि औपचारीक. तुम्ही त्या मृत व्यक्तींचे मनःपुर्वक स्मरण करता, इतरांना त्या व्यक्तींचे महत्व शक्य त्या सर्व उपलब्ध मार्गांनी जाणवून देता, त्या व्यक्तिंनी दिलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, ही खरी आदरांजली.

सई....

थॅन्क्स...रॉबिन विल्यम्समुळे तरी हा लेख लिहायचे मनी आले....त्याच्यासोबतीने मग याच वर्षात आपल्यातून निघून गेलेल्या अशा कलाकारांची आठवण काढणेही मला योग्य वाटले.

फिलिप सेमूर हॉफमन हा चाळीशीतील...म्हणजे अगदी टॉम क्रूझ ग्रुपमधीलच, त्यामुळे त्याचे चित्रपट तू पाहिले असशील कदाचित...नसेल तर याचा दरारा पाहाण्यासाठी का होईना तू "मिशन इम्पॉसिबल भाग-३' पाहा. फिलिप सेमूर आणि टॉम क्रूझ दोघानींही अगदी जीव तोडून काम केले आहे.

"...त्या व्यक्तिंनी दिलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, ही खरी आदरांजली....." ~ हे खरे आहे...कारण खरेच या ज्ञातअज्ञातांनी जो काही निखळ आनंद दिला आहे त्याची शिदोरी मी वर्षानुवर्षे जपून ठेवली आहे मनी, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

बिछडे सभी बारी बारी.. Every good thing must come to an end.. या आणि अशा वाक्यातून जे हातातून निसटून जातं त्याची चिरंतन हुरहूर व्यक्त होते.
तुमचा हा माहितीपूर्ण आणि भावपूर्ण लेख हाच परिणाम साधत आहे. विशेषत : यातले पहिले दोन तर आत्मघातकी अकालमृत्यू , रॉबिन विल्यम्स यांच्या आत्महत्येमुळे चंदेरी दुनियेची काळी बाजू पुन: एकदा आपल्यासमोर आली आहे.
यानिमित्ताने हॉलीवूड या आवडत्या विषयावर तुम्ही लिहायला सुरुवात केलीत हे खूप बरं झालं, आमच्यासारख्यांना बरीचशी नावे संदर्भयादीत साठवता येतील ..

लॉरेन बॅकॉल नावाच्या अभिनेत्रि बद्दल लोकसत्तात हा लेख आलाय. मी नाव च पहिल्यांदी ऐकले. अशोक काकांना माहीती असेल जास्तीची. हंफ्रे बोगार्ट्ची बायको ही तिची अजुन एक ओळख.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/lorin-bekol-772410/

लॉरेन बॅकॉल यांच्या रूपाने हॉलीवूडच्या सुवर्णकाळातील सौंदर्यसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे. बोगार्ट यांच्याशी नंतर तिने विवाह केला. १९४४ मध्ये पहिल्या चित्रपटापासून त्यांचे सूत जुळत गेले होते. हॉलीवूडमध्ये गाजलेल्या विवाहांमध्ये बॅकॉल व बोगार्ट यांच्या विवाहाची चर्चाही त्या वेळी झाली. 'हॅव अँड हॅव नॉट' व 'द बिग स्लीप' या चित्रपटांतील तिच्या भूमिका गाजल्या. अर्थात या बऱ्याच विस्तीर्ण कारकिर्दीत तिला दोन टोनी पुरस्कार व एक विशेष ऑस्कर मिळाले. हॉलीवूडमधील जुन्या फॅशनच्या ज्या अभिनेत्री होत्या त्यांच्यात तिची गणना होत असे. बॅकॉल जोडप्याने हॉलिवूड चित्रपटांना एक वेगळा बाज प्राप्त करून दिला होता. आपल्यातील सर्वोत्तम अभिनय तिने पडद्यावर साकार करण्यासाठी जिवाचे रान केले.
बॅकॉलचा जन्म १६ सप्टेंबर १९२४ मध्ये ब्राँक्स येथे झाला. त्या वेळी तिचे नाव बेटी जोन पेरस्के असे होते. तिने ७२ चित्रपट केले व नंतर मॉडेलिंगही केले. नाटकांतही तिने भूमिका केल्या. त्या काळात फॅशन मॉडेल म्हणून काम करीत असतानाच ती चित्रपटाकडे वळली. नंतर हॉलीवूड तिला खुणावत राहिले. 'टू हॅव अँड हॅव नॉट' या पहिल्याच चित्रपटात तिने सर्वाची मने जिंकली. हनुवटी खाली, डोळे उंचावलेले अशा थाटात तिने जो लुक दिला होता त्यावरून तिला द लुक असे टोपणनावही पडले होते. द बिग स्लीप (१९४६) व डार्क पॅसेज (१९४७) हे तिचे पुढील दोन चित्रपट होते. पन्नास वर्षे तिने चित्रपटसृष्टी गाजवली. १९९६ मध्ये तिला ऑस्करसाठी 'द मिरर हॅज टू फेसेस' या चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. नोव्हेंबर २००९ मध्ये तिला विशेष ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिची दूरचित्रवाणी कारकीर्द स्पष्टवक्तेपणामुळे व त्याला विनोदाची जोड यामुळे गाजली.

भारती....

"...चंदेरी दुनियेची काळी बाजू पुन: एकदा आपल्यासमोर आली आहे...."

~ होय. पण याचे निश्चित वाईट वाटते, भारती. अशासाठी की काही उदाहरणे "पैसा नाही" म्हणून मरणाला जवळ केले अशीही आहेत. परवाच मिकी रुनी हा आणखीन एक विनोदी कारकिर्द असलेला नट गेला. अल्कोहोलचा नाद होता जबरदस्त....आणि आयुष्याची कमाई त्याने त्यात घालविली...बहार असताना लक्षावधी डॉलर्सची कमाई करीत असलेल्या मिकीजवळ मृत्यूसमयी दवाखान्याची देणे बिले राहिली होती. एक दोन नाही तर आठ विवाह... १५-१६ पोरे...नातवंडे, परतवंडे....एवढा जामानिमा...पण प्रेताला कबरस्थानात न्यायला कुणी पुढे नाही. आठ मुलांनी सांगितले, "त्याने आम्हाला भेटायला बंदी घातली होती....". काय हे चित्र ?

आपणदेखील यात काही करू शकत नाही....वाचायचे, हतबुद्ध व्हायचे....सोडून द्यायचे.

टोचा...

थॅन्क्स...मला माहीत होती लॉरेन बेकॉलच्या मृत्यूची बातमी....आज सकाळीच इथे त्या बातमीचा उल्लेख करताना तिच्याविषयीही थोडीफार माहिती द्यावी असा विचार केला होता; पण दवाखान्यात जायचे होते म्हणून ते राहून गेले. आता तुम्ही दिलेली माहिती छानच आहे......त्यात थोडीशी वाढ करतो.

हम्प्रे बोगार्ट हॉलिवूडच्या त्या काळात अगदी पहिल्या पाचातील कलाकार होता, दबदबा होता. लॉरेन बेकॉल तर नुकतीच मॉडेल म्हणून आलेली मुलगी....पहिलाच चित्रपट तिला मिळाला तोही बोगार्ट नायक म्हणून. तिनेच त्याच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली....दोघांतील वयाचा फरकही लक्षणीय होता....लग्नासमयी तो ४५ वर्षाचा तर लॉरेन २० वर्षाची....तब्बल २५ वर्षांचे अंतर. पण त्या लग्नाला लाभलेल्या प्रसिद्धीचा लॉरेनच्या कारकिर्दीला चांगलाच लाभ झाला.

बर्‍याच आघाडीच्या कलाकारांनी संपन्न झालेल्या "मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस" मधील लॉरेन बेकॉलची भूमिका इथल्या सदस्यांना स्मरत असेल.

Pages