चल हिरव्या हिरव्या गवतावरती घरटे इवले बांधू
घरट्यात भाकरी दोघे मिळून खरपुस आपण रांधू
विश्वास कोवळा भिजवून मातीमध्ये ओल्या ओल्या
ये रुंद कुडाच्या भिंती सार्या लवचिक आपण सांधू
घरट्यास द्यायचा रंग कोणता दोघे बसून ठरवू
अंगणात गंधित धुंद फ़ुलांची मैफ़ल मोठी भरवू
झावळ्या छतावर टाकून काही निवांत छायेसाठी
दारावर नाव तुझे नि माझे मोरपिसाने गिरवू
परसातुन आपल्या दवबिंदूचे मोती आणू वेचुन
झाकण्यास मोती घरात आपल्या नभास घेऊ खेचुन
माळीन छानसा गजरा तुझिया केसांमध्ये अवचित
बनवेन फ़ुले पांढरी रोज मी शुभ्र ढगांना ठेचुन
रानात फ़िरु या थरथरत्या हातात हातही घेऊ
आभाळ निळेसे पाहत पाहत दूर फ़िराया जाऊ
या अवघड वाटेवरती जाता मजला सावरताना
नाहीत सुखाचे दिवस तरीही गीत उद्याचे गाऊ
दुःखास कधीही ओठावरती नाही आणायाचे
धाग्यास आपल्या प्रेमाच्या पण नाही ताणायाचे
संपले कधी जर धान्य घरातील साठवल्या स्वप्नांचे
प्रारब्ध त्यास या जीवनातले आपण मानायाचे
तू लाव कपाळी कुंकू माझ्या डोळ्यामध्ये पाहुन
देशील जगाया रोज उभारी श्वासामध्ये राहुन
आधार मिळावा परस्परांना असाच जन्मोजन्मी
तू जाशिल तेथे येइन मागे तुझी सावली होउन
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
छानच रचना झाली आहे.
छानच रचना झाली आहे.
(प्रतिसाद नाहीत?)
स्वागत मायबोलीवर संतोष !
स्वागत मायबोलीवर संतोष ! सुंदर भावगर्भ कविता नेहमीप्रमाणेच . खूप लेखन शुभेच्छा
सुंदरच. संयत प्रेमाचा,
सुंदरच. संयत प्रेमाचा, आपलेपणाचा भाव रचनेत छानच उतरला आहे.
शुभेच्छा !
छान कविता
छान कविता
वेळेच्या अभावामुळे इथे
वेळेच्या अभावामुळे इथे असलेल्या अनेक सुंदर कवितांवर अभिप्राय द्यायला जमत नाही त्यामुळे नवीन ओळखीही होत नाहीत इथल्या नवीन कवींसोबत. कदाचित त्यामुळे इतर लोकही आपल्याला आगंतुक म्हणून दुर्लक्ष करत असतील ही शक्यताही नाकारता येत नाही. पण याला पर्याय नाही....कामाचा व्याप आणि सोबत या कविता सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे......धन्यवाद
वा ! तरल भावना चांगल्या
वा ! तरल भावना चांगल्या मांडल्या आहेत.
----------------------------------------------------------------------------
(प्रतिसाद नाहीत?) >>> बेफीजी,
तुम्हाला आश्चर्य वाटलं याचं मला आश्चर्य वाटतंय .....
असो....
प्रतिसादाविना रचना ही गोष्ट दुर्मिळ असली तरी
अती-दुर्मिळ नाही. पूर्वी असं क्वचित घडल्याचं आठवतंय.
प्रतिसाद मिळण्याला/न मिळण्याला संयुक्तिक कारणं असतातच
असं ठामपणे सांगता येणं कठीण आहे.
----------------------------------------------------------------------------
संतोष,
इतरांच्या रचना वाचून त्यावर प्रतिसाद देता येत नाहीत ही तुमची खंत असली तरी
त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.