वक्त बदलते देर नही लगती.

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 August, 2014 - 05:35

आज कित्येक दिवसांनी माझे वाण्याकडे जाणे झाले. निमित्त होते, १०० ग्राम अमूल बटरचे पाकिट, फक्त.

नाक्यावरचाच वाणी. माझ्या जन्मापासून बघत असलेले दुकान. एकमेकांच्या चेहर्‍याची छानपैकी ओळख. मी आत शिरताच गल्ल्यावर बसलेल्या त्या वाण्याने, वय वर्षे साधारण पन्नास, मला हात दाखवत "बोलो शेठ" म्हणत माझे स्वागत केले. असे कोणी वयस्कर माणसाने ‘शेठ वा साहेब’ पुकारले कि उगाच संकोचल्यासारखे वाटावे अश्या वयात मी असल्याने मला तसेच वाटणे अपेक्षित होते. पण आज मात्र गंमत वाटली. कदाचित आतून काहीतरी सुखावलेही गेले. पण असे वाटण्यामागे होता तो माझा भूतकाळ.

एक काळ होता जेव्हा मी याच नाक्यावरच्या वाण्याकडे आईबरोबर रेशनच्या रांगेत उभा असायचो. माझ्या आईसारख्या कित्येक बायका रॉकेल कधी येणार, तांदूळ काय भाव दिले आणि कार्डावर साखर किती मिळणार याची चौकशी करत त्या रांगेत उभ्या असायच्या. त्या वेळी तो वाणी मला मायबाप साहूकारच वाटायचा आणि त्याच्या वागण्याबोलण्यातील रुबाबही तसाच भासायचा. माझी नजर असायची ती त्याच्या समोर मांडलेल्या काचेच्या बरणीतल्या फाईव्हस्टार चॉकलेटवर. पाचेक रुपयाला असावे पण हे आपल्या पहोचच्या बाहेर आहे याची कल्पना असल्याने फक्त बघणेच व्हायचे. मी तिथे बघतोय याची कल्पना आईलाही असावी, पण .............

असो, आताही त्याच तश्याच बरण्यांतील एक ‘डेरी मिल्क सिल्क’ माझ्या ‘तिच्या’साठी म्हणून टोपलीतले चणेफुटाणे उचलावेत तसे मी उचलले आणि त्या वाण्याच्या मुलासमोर शंभर रुपये धरले. हा मुलगा तेव्हाही वडिलांबरोबर दुकानावर दिसायचा, आजही तिथेच दिसला. फरक इतकाच, आज माझ्याकडे बघून तो चक्क हसला. निघताना तो वाणी म्हणाला, "माताजी को बोलो, कुछ सामान वगैरे चाहिये तो भिजवा दूंगा" .. आणि माझ्या डोक्यात Light 1 प्रकाश पडला. हल्ली अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांची सारी खरेदी रिटेल शॉप आणि सहकारी तत्वावर चालणार्‍या फूडस्टोरमध्येच होत असल्याने त्या वाण्याचा धंदा पार बसला होता. त्याचा मुलगाही तिथेच दिसत होता. याचा अर्थ आपल्या मुलालाही हाच पिढीजात व्यवसाय सांभाळायचा आहे, असे म्हणत त्याने त्याला आणखी एखादा उपजिविकेचा मार्ग शोधण्यासाठी सक्षम बनवले नव्हते. ना स्वता कधी वेगळी उडी मारून बघितली होती. त्याच्या आजच्या या अजीजीने बोलण्यामागचे कारण हि बदललेली परिस्थिती होती आणि ती त्याने स्विकारली होती.

घरी परतताना गेल्या पंधरावर्षाच्या काळात बदललेली अशी कित्येक उदाहरणे नजरेसमोर आली. एक पटकन आठवलेले आणि वरचेवर नजरेसमोर दिसणारे एका मित्राचेच, जो तेव्हा आमच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये राहायचा पण क्रिकेट खेळायला आमच्यात असायचा. त्याच्या वडिलांचा स्वताचा देशी दारुचा बार होता आणि मटका-आकडा वगैरे ज्यांना दोन नंबरचे धंदे म्हटले जायचे त्यात भागीदारी. विभागातील एक पोचलेली असामी आणि मग तोच रुबाब त्यांच्या तिन्ही मुलांमध्ये दिसायचा. तो आमचा मित्र अहंकारी नव्हता, की आमच्यात खेळताना त्याने कधी मोठेपणाचा आव आणला असेही झाले नाही. उलट त्याच्या मिळून मिसळून वागण्याने ते कधी जाणवलेही नव्हते. इर्ष्येची भावना कधी उत्पन्न झालीच असेल तर तो आमच्याच मनाचा दोष. कारण जेव्हा आम्ही सारे अर्ध्या चड्डीतली शाळकरी मुले दिसायचो तेव्हा त्याचा पोशाख कॉलेजकुमाराला लाजवेल असा असायचा. त्याच्या बाईकवर बसून एक राऊंड घ्यायचे त्याच्यापेक्षा आम्हालाच जास्त कौतुक वाटायचे. पण पुढे त्यांचे दिवस फिरले, अवैध धंदे बंद झाले, बारला टाळे बसले. वडिलांचे निधन झाले, सर्वच वाताहात झाली. आज एक छोटेसे तुरळक गर्दीचे खानावळसद्रुश्य हॉटेल तेवढे आहे. त्यातही तो, त्याचे दोन भाऊ आणि एक बहिण अश्या वाटण्याही असाव्यात. आणखी काही उत्पन्नाची साधने आहेत वा एखादा कर्जाचा डोंगरच डोक्यावर चढलाय हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. मात्र कधीतरी नाक्यावर येताजाता त्याचे दर्शन घडते. यावेळी बाईक त्याच्या ऐवजी माझ्याकडे असते आणि तेव्हा मनमौजी खिलाडी भासणारा तो, आज आयुष्याच्या रहाटगाड्याखाली पिचलेला लूक घेऊन ताडताड पावले टाकत कुठेतरी चाललेला दिसतो.

तर.., या आठवणी उगाळून मन काही सुखावत नाही. उलट आजचे हे बदललेले चित्र त्या आठवणींत तुरटपणाच भरतात. चांगली गोष्ट एकच होते, आज आपण जिथे आहोत तिथे सुखी आहोत हे जाणवते. इथून पुढे गेलो तरी पाय जमिनीवरच राहतील असा विश्वास राहतो, आणि इथून खाली घसरलो तरी तो निसर्गाचाच नियम म्हणून त्याला स्विकारण्याची हिंमत अंगी येते. आफ्टरऑल, वक्त बदलते देर नही लगती ..

कुठेतरी वाचलेला, आवडलेला शेर शेअर करतो..

समय के एक तमाचे की देर है प्यारे... !
फिर मेरी फकीरी क्या.. तेरी बादशाही क्या... !!

येऊ द्या ...

हिंदी शीर्षकाबद्दल क्षमस्व!
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समय के एक तमाचे की देर है प्यारे... !
फिर मेरी फकीरी क्या.. तेरी बादशाही क्या... !!>>> वा वा काय शेर आहे यार !!! लेखही मस्तच Happy

वत्सला,
हा "अंड्या" प्रश्न मला रीया(?) मॅडमनी सुद्धा विचारला होता. आपण सुद्धा त्याच का?
जस्ट किडींग हा Wink

तेव्हा दुर्लक्ष केले होते, पण पुन्हा हा प्रश्न आल्याने आता माझे अस्तित्वच धोक्यात येऊसे वाटू लागल्याने सांगतो .... तो मी नव्हेच !!

अवांतर - माझा ब्लड ग्रूप ए’ प्लस आहे आणि अंड्या यांचा Wink

जेलस!! आमच्या भोवती जे मुजोर लोक होते ते अधिक मुजोर झाले आहेत, श्रीमंत अधिक श्रीमंत झाले, गरीब अधिक गरीब झाले. कुणाचेच दिवस फिरले अस दिसल नाही. तुमच्या सारखा एक तरी अनुभव यावा अशी सुप्त इच्छा आहे.

सीमंतिनी,
आमेन !
अब की बार मोदी सरकार !
आता फार दिवस तुम्हाला लोकांचे दिवस पलटाताना बघायची वाट पहावी लागणार नाही, बस्स थोडा वेळ द्या, दोन-चार महिन्यात बदलाची अपेक्षा धरू नका. Happy

अदिती,
शिक्षण म्हणा वा कर्तुत्व, आजच्या तारखेला ज्याकडे आहे तोच वाडवडीलांचे वैभव टिकवू शकतो. राजेरजवाड्यांचा आणि जहांगीरदारांचा जमाना गेला की पुढच्या दोनेक पिढ्या निकम्म्या निघाल्या तरी आहे ती जायदाद बसून खातील. मुलांच्या भविष्याची तरतूद पैसे साठवून नाही तर त्यांना सक्षम बनवून करणेच योग्य.

छान लिहिलंय.. खरं तर आपले आडाखे चुकत जातात. एखाद्याची आजची स्थिती बघून पुढे त्याचे आयुष्य कसे जाईल याचे आडाखे.

दुसर्‍या अनुभव ठिक आहे पण पहिला अनुभव नाही पटला. कदाचित त्या मुलाचा इंट्रेस्ट असेल बिसनेसमधे किंवा आभ्यासात 'ढ' असेल. तुम्हाला साहेब म्हणल्यावर तुम्ही सुखावलात यातच त्याचा हेतू साध्य झाला. नव-नविन गिर्‍हाइकं मिळवणे आणि जोडून ठेवणे हेच तर त्यांचे काम. बाकी अजीजीने बोलणे वगैरे इट्स पार्ट ऑफ बिसनेस.

वक्त बदलते देर नही लगती..... >> ह्याला मात्र अनुमोदन.