मॉरिशियस - ओळख

Submitted by दिनेश. on 30 July, 2014 - 07:42

मॉरिशियस ला जायचा तसा प्लान नव्हता. बाकीचे काही देश माझ्या मनात होते. पण माझा नेहमीचा प्रश्न असतो
तो व्हीसासाठी लागणार्‍या वेळाचा. मोजक्या दिवसांच्या सुट्टीतले दिवस व्हीसा मिळवण्याच्या खटपटीत घालवणे
मला रुचत नाही. अंगोलातून व्हीसा अप्लाय करायचा तर अनेक देशांच्या एम्बसीज इथे नाहीत. त्यासाठी
पासपोर्ट साऊथ आफ्रिकेत पाठवावा लागतो ( तेही केलेय मी. ) त्यामूळे सर्व भारतींयाना ऑन अरायव्हल व्हीसा
देणार्‍या या सुंदर देशाची ट्रिप नक्की झाली.

मोरपिशी रंगाच्या समुद्राने वेढलेले हे सुंदर बेट. उसाची शेती, हिरवेगार जंगल आणि मोहक आकाराचे पर्वत यांनी नटलेले आहे. खरे तर तो एक छोटासा भारतच आहे. ५२ % लोकसंख्या भारतीय हिंदु आहे, त्यामूळे आपल्याला परकेपणा अजिबात जाणवत नाही.

तर या देशाची चित्रमय झलक दाखवणारी मालिकाच सुरु करतोय. नेहमीचा शिरस्ता सोडून, नेहमी विचारल्या
जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या भागात देतोय.

१) कसे जाल ?

मुंबई आणि दिल्लीहून एअर मॉरिशियसची थेट सेवा उपलब्ध आहे. मला एमिरेटसचे फ्रिक्वेंट फ्लायर ( स्कायवर्ड्स ) चे माईल्स हवे होते म्हणून मी ते विमान निवडले. मुंबई ते दुबई - ३ तास, दुबईत ३ तासाचा थांबा
व पुढे दुबई ते मॉरिशियस ६ तासांचा प्रवास आहे. दिवसातून दोन विमाने आहेत. त्यापैकी एक ३८० ( डबलडेकर )
आहे. जर तूम्ही तारखा आधी निश्चित केल्यात तर एमिरेटस वरती चांगले डील मिळू शकते ( साधारण ४०, ०००
रुपये )

२) कधी जाल ?

मॉरिशियस दक्षिण गोलार्धात असल्याने आपल्यापेक्षा उलट ऋतू असतात. पण तरी ट्रॉपिकल हवामान असल्याने वर्षभर सुखावह हवामान असते. जून, जुलै मधे बर्‍यापैकी थंडी असते. पाऊसही पडत असतो.
नोव्हेंबर डीसेंबर मधे उन्हाळा असतो. तिथले वनस्पतिउद्यान अतिशय सुंदर आहे. तिथली फुले बघायची
असतील तर मात्र उन्हाळ्यातच जाणे योग्य. तसे खास कपडे न्यायची गरज नाही. पण पाण्यात जायचे
असेल तर पोहण्याचे कपडे जवळ असावेत.

३) व्हीसा वगैरे

वर लिहिल्याप्रमाणे व्हीसा ऑन अरायव्हल आहे. उतरल्यावर दोन फॉर्म्स भरावे लागतात. एक व्हीसासाठी
आणि एक हेल्थ साठी. व्हीसासाठी कुठलाही चार्ज नाही. परतीचे तिकिट असणे गरजेचे आहे. ( मला विचारले
नाही. ) हॉटेल बुकिंग, फॉरेन एक्सेंज वगैरे असावे पण विचारत नाहीत. भारतातून थेट जात असाल तर
कुठलिही लस घ्यायची गरज नाही. ( मला सगळीकडेच येलो फीव्हर व्हॅक्सीनेशन दाखवावे लागते, पण तेही
विचारले नाही. ) पैसे नेण्यावर बंधन नाही. बिया, प्राणी वगैरे मात्र नेऊ नयेत.

४) कुठे रहाल ?

हॉटेल निवडताना मात्र नेटवरचे रेव्ह्यू वाचूनच निवडा. मी थॉमस कूक तर्फे, ल मेरिडीयन निवडले होते.
खुपच सुंदर प्रॉपर्टी होते. परीसरही सुंदर होता. जेवणाखाण्याची चंगळ होती. तिथेच टॅक्सीस्टॅन्ड असल्याने
भटकायची सोय होती.
मला भेटलेल्या काही लोकांची मात्र निराशा झाली. नेटवरून स्वस्तातले डिल मिळाले, प्रॉपर्टी सुंदर होती पण
जेवणाखाण्याचे हाल होते. प्रॉपर्टी एका बाजूला असल्याने बाहेर जाऊन खायचीदेखील सोय नव्हती.

५) काय खाल ?

शक्यतो हाफ बोर्ड निवडा ( ब्रेकफास्ट आणि डिनर हॉटेलमधेच ). दिवसभर भटकून आल्यानंतर परत जेवणासाठी बाहेर जायचे त्राण रहात नाहीत.
दिवसाचे जेवण मात्र बाहेर घ्यावे लागते. टुअर ऑपरेटर असेल तर तो त्याच्या पसंतीच्या हॉटेलमधे नेण्याची
सक्ती करतो. पण ते जेवण चांगलेच असेल याची खात्री नाही ( महागही असते. ) थाली सिस्टीम असते.
शक्यतो ती घ्या म्हणजे एखाद दुसरा पदार्थ आवडू शकतो.

इतर देशांत मी शक्यतो स्ट्रीट फूड खाणार नाही पण मॉरिशियस मधे मात्र ते आवर्जून खावे, असा सल्ला देईन.
बहुतेक पदार्थ भारतीय चवीचेच असतात. भजी, सामोसे मस्त असतात. डाल पुरी / रोटी अवश्य खा.
मऊसूत चपाती, त्यावर डबल बीन्स / बटाटा भाजी, कोबीचे लोणचे, टोमॅटोची चटणी आणि आपल्याला हवी
तेवढी मिरची घालून देतात. खुपच मस्त आणि पोटभरीचा प्रकार असतो. तिथे मिरची नेहमीच स्वतंत्रपणे देतात.

मिरच्या खुप तिखट असतात. (माझ्यासाठी तरी ) तरी तिथली वेगवेगळी लोणची अवश्य चाखा. जमल्यास घेऊनही या. ( काही मायबोलीकरांनी चाखलीत ती. )

जेवल्यानंतर नारळाचे पाणी, इतर फळांचे रसही प्या. अननस मात्र अगदी चाखाच. लहान आकाराचा व्हीक्टोरियन अननस तिथे अनेक ठिकाणी मिळतो. तो नीट कापून त्यावर चिंचेची तिखट चटणी टाकून देतात.
भन्नाट लागतो तो प्रकार. आणि हे प्रकार ( हॉटेलच्या मानाने ) खुपच स्वस्त असतात. साधारणपणे बायकांनी
चालवलेले हे स्टॉल्स ठिकठिकाणी आहेत.
सी फूड पण चांगले मिळते म्हणे.. Happy

६) काय बघाल ?

शक्यतो हॉटेल स्टे आणि सहली असे पॅकेज निवडा. यात साधारण ३ सहली येतातच. त्यापैकी एक बीच टुअर,
एक शॉपिंग टूअर आणि एक साईट सिईंग टुअर असते. आयटनरी बघून त्यात दाखवली जाणारी ठिकाणे
लक्षात ठेवा. बहुतेक महत्वाची ठिकाणे दाखवली जातातच. हॉटेल पिक अप आणि ड्रॉप असतो.

पण त्या ठिकाणांपेक्षाही बघण्यासारखी काही ठिकाणे आहेतच. चहाचे संग्रहालय, साखरेचे संग्रहालय आहे.
एखादा ट्रेकही करता येईल. निरपेक्ष भटकताही येईल.

७) कसे फिराल ?

अरेंज्ड टूअरशिवाय भटकायचे असेल तर टॅक्सीज उपलब्ध आहेत. भाड्याने बाईक्सही मिळतात. सरकारी
बससेवा आहे. पण त्याची नीट चौकशी करून घ्या कारण त्या मला तितक्या संख्येने दिसल्या नाहीत.

एकट्याने फिरण्यात धोका नाही, तरीपण बेसिक काळजी घ्याच. टॅक्सीचे दर आधी ठरवून घ्या. जास्तीचे ठिकाण
बघायचे असेल तर तोही दर आधीच ठरवा. ( शक्यतो वाद होत नाहीत.. तरीपण )

रस्त्यावरती पाट्याही तितक्याश्या नाहीत. लोकसंख्या व वस्ती विरळ आहे. पण रस्ता चुकलात तर स्थानिक
लोक नक्कीच मदत करतात.

८) काय बोलाल ?

मॉरिशियस मधे इंग्रजी, फ्रेंच या सरकारी भाषा आहेत. फ्रेंचचीच बोलीभाषा असल्यासारखी क्रियोल भाषा तिथले
लोक आपापसात बोलताना वापरतात, पण आपल्याला सुखद वाटेल अशी बाब म्हणजे तिथे बहुतेकांना हिंदी
येते. ते हिंदीदेखील उर्दू शब्दांचा किमान वापर करून बोलले जाते. ( त्या मानाने हिंदीतल्या पाट्या कमी
दिसल्या ) त्यामूळे भाषेची अजिबात अडचण नाही.

९) पैसे

मॉरिशियसचे चलन रुपये आहे. एका डॉलरला साधारण ३० मॉरिशियन रुपये मिळतात. ( म्हणजे आपल्या
रुपयांच्या अर्धे ) याचाच अर्थ एक मॉरिशियन रुपया म्हणजे २ भारतीय रुपये होतात.
पैसे नेण्या आणण्यावर बंधने नाहीत. भारतीय रुपये स्वीकारताना दिसले नाहीत कुणी. त्यामूळे शक्यतो डॉलर्स
जवळ ठेवा.

१०) काय खरेदी कराल ?

वरचा विनिमयाचा दर लक्षात घेता, ऐकताना किमती कमी वाटल्या तरी त्या महागच असतात. माझ्या
अनुभवावरुन सांगतो कि भारतासारखी स्वस्ताई जगात कुठे नाही.
तरीपण गेल्यासारखे थोडे शॉपिंग होणारच ना ? तिथे लोक साधारण कपड्यांची खरेदी करतात. ब्रँडेड कपडे
अर्थातच महाग आहेत. पण स्ट्रीट बझारमधे स्वस्त कपडे मिळू शकतात. तिथे बर्‍यापैकी भावही करता येतो.
फॅक्टरी आऊटलेट / शॉप हा तिथला फसवा शब्द आहे. तिथे जरा नेट लावला तर ७५ % ( हो ७५ % ) सूट
मिळवता येते.
शिप मॉडेल्स ही पण त्यांची खासियत. लाकडापासून बनवलेल्या या छोट्या बोटी तूमच्या दीवाणखान्याची
शोभा वाढवतील. पण त्यांची किंम्मतही तशीच छान असते. ( त्याची झलक दाखवीनच. )
साखर हा तिथला महत्वाचा उद्योग आहे. तिथे वेगवेगळ्या स्वादाची साखर मिळते. अवश्य नमुना बघा.
साखरेबरोबरच खास रम देखील मिळते.
शिंपले, मोती, पोवळे दिसले पण त्याच्या किंमती जास्तच वाटल्या. ( नायजेरियात स्वस्त मिळतात. )
वर लिहिल्याप्रमाणे लोणची, मसाले, मिरच्या अवश्य घ्या. व्हॅनिलाच्या शेंगा मिळतील. चहा, कॉफीचे मळे
आहेत पण त्यांचा स्वाद मला आवडला नाही. ( केनयातला चहा आणि इथिओपियातली कॉफी जास्त
चांगली असते. )
साखरेचे नमुने, तिथल्या रंगीत वाळूचे नमुने, सध्या अस्तित्वात नसलेल्या डोडो पक्ष्याच्या प्रतिकृती पण
घेता येतील.

११) काय कराल ?

वॉटर स्पॉर्टससाठी हा देश प्रसिद्ध आहे. भरपूर पर्याय आहेत. तूमच्या सहलीत याचा समावेश नसतो पण तिथे
गेल्यावर काही करावेसे वाटले तर अवश्य करा. तिथे भाव करून स्वस्त दर मिळवता येतील. उन्हापासून संरक्षण
करणारे क्रीम व गॉगल मात्र अवश्य जवळ ठेवा. बाकीचे साहित्य तिथे भाड्याने मिळते.

किनार्‍याजवळचा समुद्र खोल नाही. तिथले पाणीही नितळ आहे. दूरवर मोठ्या लाटा येताना दिसतात.
तिथे मात्र जाऊ नका. आणि तसेही हॉटेलच्या सुरक्षा नियमांचे पालन कराच. झू, बर्ड पार्कस पण आहेत. तिथे माऊंटन बाईकिंगची सोय आहे.

१२) खर्चाचा अंदाज

विमानभाडे, हॉटेल स्टे व ३ टूअर्स यासाठी माणशी १ लाख रुपयांचे बजेट ठेवा, ग्रुप टूअर स्वस्त मिळू शकेल.
स्वतः सगळे अरेंज करणार असाल तर आणखी स्वस्तात होईल.

आता केवळ झलक म्ह्णून काही फोटो टाकतोय.. सविस्तर ओळख नंतर करुन देईनच..

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

पिक्चर अभी बाकी है Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच देश आहे हा, काही वर्षांपूर्वी कामानिमित्त मी जवळ जवळ ३ महिने राहिलो होतो, त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या Happy त्या सप्तरंगी मातीच्या ठिकाणी मोठाली कासवे आहेत का अजून ?

ओह गॉड.. पहिला फोटो कसला भन्नाट आहे. तसे सगळेच फोटो मस्त आहेत..

माणशी १ लाख .. लक्षात ठेवायला हवे.. Happy

वा! दिनेश सगळीच माहिती उपयुक्त Happy
मॉरिशियस चा नितळ समुद्र कायमच चित्रपटात पाहिलाय. (माझ्या आठवणीत त्या अतुल अग्निहोत्रीच्या गाण्यातलाच आहे) आज अगदी फोटोतून खूप जवळून म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्याचाच फिल आला.
खाद्यपदार्थांचेही फोटो टाका की जरा Happy

वा! मस्त.

आम्ही मॉरीशियसला २००८ मध्ये गेले होतो. ल मेरीडियनमध्येच राहिलो होतो. आम्ही कार रेंट केली होती. भारतातल्या प्रमाणेच ड्राईव्ह करायचे असल्याने सोपे जाते. मुख्य रस्ते वगळता इतर रस्ते मात्र अरुंद आहेत आणि कार्स भन्नाट वेगाने चालवतात. तेव्हा थोडं जपून ड्राईव्ह करावं लागतं.

सर्वत्र दिसणारी उसाची शेतं आणि रस्त्याच्या कडेला पांढरी आणि पिवळी सोनटक्क्याची फुलं. अतिशय सुरेख निळा आणि स्वच्छ समुद्र.

दिनेशदा, तुम्ही सबमरीन राईड घेतली की नाही?

हार्पेन, तेथिल झू मध्ये ती प्रचंड कासवं आहेत.

आभार दोस्तांनो. समुद्र, रस्ता आणि धबधब्याच्या क्लीप्स आहेत. बघू या अपलोड करता येतात का ते !

मामी, सोनटक्का कसला माजला होता ! मी होतो त्यावेळी भन्नाट वारा होता त्यामूळे सबमरीन चालू नव्हती. ती राहिली पण अंडर सी वॉक केले.

विमानतळ दक्षिणेला आणि हॉटेल उत्तरेला. ब्लॅक रीव्हर दक्षिणेला.. असे करत चारदा अक्षरशः क्रॉस कंट्री राईड केली..

दक्षे.. तू म्हणतेस ते अतुल अग्निहोत्री आणि करिष्माचे गाणे ना ?
कुछ कुछ होता है, आणि गरम मसाला मधे दिसलेली ठिकाणे बघू या आपण या मालिकेत.

इतके दिवस मॉरिशस म्हटल्यावर मोरस-साखर-उसाची शेतं हे आठवायचं.
आता हा निळा रंगं पाहून लहानपणी प्रयोगशाळेत केलेल्या मोरचूदाच्या स्फटिकांचा निळा रंग आठवेल.
Happy

दिनेशदा....

समुद्राचा तीन वेगळ्या रंगछटा,काय ममस्त टिपलय तुम्ही...आणि अस वाटत जस ते समुद्र धबधब्यासारख वरून खाली येत आहे.

रंगीत डोंगर ही छान

तुम्ही मांडलेली माहिति,त्याच कौतुक करायला शब्द नाहित...भावनाच सनजून घ्या

सुंदर वर्णन दिनेशदा!

मॉरिशस बघायची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. आता तर जावेसेच वाटतेय!

पहिल्या प्रचितला समुद्र अगदी पाचूचा वाटतोय!! मस्त!!

साती.... तो मोरपिशी रंग कॅमेरात पकडता आला याचेच मला अप्रूप वाटतेय.
दुसर्‍या फोटोतले क्षितिजभर पसरलेले इंद्रधनुष्य पण नैसर्गिकच.. हा प्रकार तर मी आयूष्यात पहिल्यांदा बघितला.

गोपिका.. त्या रंगीत डोंगराची वेगळीच कहाणी आहे. ते सगळे रंग नैसर्गिक आहेत.. ओघात येईलच ते सगळे.

अहाहा ११ वर्षापूर्वी मॉरीशियसला गेले होते. त्या आठवणी जाग्या झाल्या. तो मोरपिशी रंग फार सुंदर पकडला आहे तुम्ही.

सविस्तर माहितीमुळे हा भाग आवडला. कधीकाळी जायला मिळाल्यास बरीच उपयोगी माहिती आहे. अजून फोटोज येतीलच Happy

सुंदर होणार ही मालिका Happy

नेहमीचा शिरस्ता सोडून, नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या भागात देतोय. >>> नविन शिरस्ता आवडला Happy

दिनेश, मी पहिला फोटो घेतलाय हो - डेस्कटॉप करता!

Pages