Tour de Himachal (देवभुमी)

Submitted by इंद्रधनुष्य on 30 July, 2014 - 07:06

गत सालातील 'Mysterious Ladakh'ची याद धुसर होते न होते... तोच आम्हाला वेध लागले ते लाहुल स्पितीचे... खर तर स्पिती मोहिमेची पाळमुळे रोवली गेली तीच मुळी लेह-लडाखच्या परतीच्या प्रवासात... सार्चु, केलाँग, ग्राम्फू करत आम्ही जेव्हा रोहतांगचा चढ चढू लागलो, तेव्हा गिरीने ड्रायव्हरकडे लाहुल-स्पितीच्या रस्त्याची चौकशी केली... त्यावेळी ड्रायव्हरने ग्राम्फू वरुन स्पितीला जाणारा रस्ता दाखवला होता. तो पांढराफटक रस्ता मनात कुठेतरी घर करुन बसला होता. एके दिवशी फेसबुकवर मुंबई ट्रॅव्हलसची स्पितीची जाहिरात निदर्शनास आली... आणि मग चक्रे गरागरा फिरु लागली... मार्च महिन्यात मुंबई - चंदिगढ - मुंबईची तिकिटे बुक करुन झाली. मुंबई ट्रॅव्हल्स पेक्षा निम्म्या किमतीत VLI म्हणजेच Distant Holidays कडून पॅकेज बुक करुन मिळाले.. मग प्रतिक्षा सुरु झाली ती जुलै महिना उजाडायची... वेध लागले ते चमत्कारिक, चित्तवेधक अश्या दर्‍याखोर्‍यांचे... त्या काळकभिन्न खडकांवर विसावलेल्या हिमनगांचे... आणि मन पुन्हा एकदा त्या खडकाळ रस्त्या मागे दौडू लागले.

लाहुल-स्पिती हा हिमाचल प्रदेशचा उत्तर- ईशान्य असा पसरलेला भाग. या परिसरात हिमालयाची सुंदर आणि रौद्र रुपे एकाच वेळी अनुभवयास मिळतात. शिमला, सांगला, काल्पा या भागात गर्द झाडीने नटलेली नंद्नवने बघायला मिळतात, तर पुढे ईशान्य दिशेला असलेल्या टाबो, काझा या परिसरात हिमालयाचे रौद्र रुप पहावयास मिळते. येथील दर्‍याखोर्‍या विलक्षण गुढ भासतात. स्पितीचा पुर्व-ईशान्येकडील भाग हा तिबेटच्या आंतराष्ट्रीय सीमेला जोडलेला आहे. त्यामुळे या भागावर तिबेटी संस्कृतीची छाप जास्त प्रमाणात दिसुन येते.

द्क्षिणेकडील स्पितीचा भाग हा शिमला पासुन अंदाजे ४०० कि.मी. वर आहे. तर मनाली मार्गे स्पितीचं मुख्यालय 'काझा' हे ४५० कि. मी. दुर आहे. NH-22 मार्गे स्पितीला जाणारा रस्ता म्हणजे जगातील सगळ्यात धोकादायक रस्त्यां पैकी एक आहे.

जून ते ऑक्टोबर या उन्हाळ्याच्या काळात येथील कमाल तापमान २२ आणि किमान ४ डिग्री पर्यंत असते. नोंव्हेंबर ते मे या हिवाळ्याच्या काळात हिमवर्षावा मुळे स्पितीचा गाडी मार्ग बंद होतो. हिवाळ्यातील ८ महिने स्पितीचे लोक केवळ तेथे पिकणार्‍या बटाटा, मटार आणि गहू इत्यादी पिकांवर उदरनिर्वाह करतात. येथील चत्मकारिक निसर्गाशी जुवळुन घेण्यासाठी त्यांनी आपल्या गरजा फार कमी करुन टाकल्या आहेत. बाहेरील जगाशी संबंध तुटल्या वर हिवाळ्याच्या दिवसात स्पितीचे लोक कसं जिनजिवन जगत असतील, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.

दिवस पहिला : मुंबई ते चंदिगढ - शिमला

पाच महिने आधी ठरवलेल्या आमच्या मोहिमेचा दिवस उजाडला तो २ जुलै २०१४ च्या पहाटेला. पहिल्या दिवशी मुंबई - चंदिगढ असा प्रवास करुन आम्ही थेट शिमला गाठले. चंदिगड ते शिमला - सांगला - काल्पा - टाबो - काझा (दोन दिवस) - चंद्रताल - मनाली - चंदिगड असा ९ दिवसांचा बेत ठरवला होता.

चार तासाचा चंदिगड ते शिमला हा १२० कि.मी प्रवास करुन संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही शिमलाच्या हॉटेल शील मधे पायउतार झालो. संध्याकाळी थोडफार शिमला दर्शन करुन हॉटेल वर परतलो.

दिवस दुसरा : शिमला ते सांगला - २३० कि.मी.

सांगला पर्यंतच्या प्रवासाला ८ ते १० तास लागणार होते. म्हणुन आम्ही लवकर चेक आउट करुन खाली रेस्टॉरन्ट मधे आलो. नाष्टा serve करताना वेटरने चौकशी सुरु केली.. "स्पिती जा रहे हो".. म्हणत एकदम खुष झाला... "जाओ.. जाओ.. सिर्फ नसिबवाले लोक स्पिती जाते है".. म्हणत आम्हाला शुभेच्छा दिल्या...

वेटरच्या त्या खुषी वरुन पुढे काय बघायला मिळणार आहे याचा अंदाज येत होता. आमच्या स्पितीवारीचे सारथ्य करायला जगदिश भाय त्याच्या Innova सहित तैयार होता. "गणपती बाप्पा, मोरया"'चा जयघोष करुन आम्ही सांगला कडे प्रयाण केले.

भीमरुपी महारुद्रा |

वाटेतील नजारा डोळ्यांचा पारणं फेडत होता...

NH-22 वरिल हिमालयाच्या कुशीतील नारकांडा, झाकडी, निचर, किल्बा या गावातील केशर आणि फळबागांचे सौंद्रर्य कॅमेर्‍यात टिपत आम्ही सतलज आणि बास्पा नदिच्या संगमावर पोहचलो. डाविकडील सतलज नदिला समांतर जाणारा रस्ता पुढे काल्पाला जातो, तर उजविकडील बास्पा नदीला समांतर जाणारा रस्ता सांगला गावात घेऊन जातो.

सांगला हे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील एक आटोपशीर गाव. बास्पा नदिच्या पात्रात वसलेल एक नयनरम्य ठिकाण. हिमालयातील बाप्सा हिमनगातुन उगम पावणारी बास्पा नदी पुढे सतलज नदित विलिन होते.

सांगला मधे पोहचेस्तोवर संध्याकाळ झाली होती. बुकिंग नुसार प्रकाश गेस्ट हाऊस मधे चेक ईन केले. हॉटेल छान होते. खिडकीतून बास्पा नदीचा सुंदर नजारा दिसत होता.

दिवस तिसरा : सांगला - चितकुल ते काल्पा - ११० कि.मी.

चितकुल हे किन्नौर जिल्ह्यातील इंडो-तिबेट सीमे जवळील शेवटचे गाव. या गावा पर्यंत गाडी रस्ता आहे.

आजचा प्रवास कालच्या प्रवासाच्या मानाने तसा कमी असल्याने आम्ही आरामात आटोपुन चितकुल कडे रवाना झालो. सांगला पासुन चितकुल २६ कि.मी. दुर आहे. आणि चितकुलला जाणारा रस्ता म्हणाल तर... नानी याद आती है...

सांगला सोडुन पुढे जाऊ लागलो तसे बास्पा नदीचा संथ वाटणारा प्रवाह गर्जना करत आपले खरे रुप उलघडू लागला. फक्त २६ कि.मी. वरिल चितकुल गाव गाठायला दिड तास लागला... शहरां पासुन दुर असुनही येथील घरांचा आणि मॉनेस्टरींचा थाट अगदी राजेशाही होता.

या सुंदर आणि शांत गावात कायमचा मुक्काम करावा, असं मनाला न वाटलं तरच नवलं.

चितकुल वरुन परतल्यावर सांगलातील कामरु किल्ला बघायला निघालो. १५-२० मिनिटांच्या चढाई नंतर किल्ल्याच्या दरवाजात पोहचलो. किल्ल्यावर एका मॉनेस्ट्री सोडली तर इतर वास्तू नाहित. आपल्या सह्याद्रीतील किल्ल्याच्या नजरेतुन हा किल्ला बघावयास गेलो तर हिरमोड नक्की समजा...

किल्ला बघुन आम्ही काल्पासाठी निघालो...

वाटेतील संगम पार करुन पुन्हा NH-22ला लागलो... ज्याला हिंदुस्तान तिबेट हायवे असही म्हणतात. या रस्त्यावर हिमाचल प्रदेश सरकारचे आणि JAYPEE कं.चे Power Project लक्ष वेधुन घेत होते. आमच्या गाडी चालकाला Project विषयी बरिच माहिती होती.. डोंगरात खोलवर पोखरलेल्या भुयारांतील टरबाईन वर, हिमालयातुन रोरावत येणार्‍या सतलज आणि बास्पा नदीचे पाणी सोडुन त्यापासुन विज निर्मिती केली जाते... हे Power Project म्हणजे हिमाचलचे प्रमुख उत्पन्न आहे, असे त्याचे म्हणणे होते.

सतलज नदीच्या तीरावरुन आमचा किन्नौर व्हॅली कडे प्रवास सुरु होता. जेवणासाठी आम्ही 'रेकाँग पिओ'ला थांबलो. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. गेल्या दोन दिवसात शिमला नंतर रेकाँग पिओला जास्त लोकवस्ती पहायला मिळाली. रेकाँग पिओ हे किन्नौर व्हॅलीच्या तळाचे गाव.. इथून काल्पाला जाण्यासाठी ८ कि.मी.चा घाट चढून वर जावे लागते. काल्पा पासुन अजुन वर ७ कि.मी. वर रोहगी गाव आहे.

किन्नौर व्हॅली हे हिमाचल मधिलच नव्हे तर जगातील एक अप्रतिम पर्यटन स्थळ आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी किन्नौरला भेट दिलीच पाहिजे. किन्नौर व्हॅलीचा नजारा अगदी मंत्रमुगध करणारा आहे. थेट गगनला आव्हान देणारी हिमशिखरे.. खालील दरीतुन वर येणारे ढगांचे पुंजके जेव्हा हिमशिखरांना बिलगतात तेव्हा त्यांचा अगदी हेवा वाटतो. ही दरी जेव्हढी खालुन गुढ भासते तेव्हढीच ती काल्पा वरुन बघताना अद्भुत वाटते.

४,५०० मिटर वरिल काल्पा हे लॉर्ड डलहौसीच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक.. या गावातुन उत्तेरेकडिल किन्नौर कैलास पर्वत रांगेचा अप्रतिम नजारा दिसतो. आमच्या मुक्कामाचे हॉटेल 'Apple Pie' अगदी किन्नौर व्हॅलीच्या समोर होते. हॉटेलच्या बाल्कनीतुन पुर्ण व्हॅलीच विहंगम दृष्य दिसत होतं. ते अप्रतिम सौंद्रर्य टिपायला कॅमेर्‍याच्या लेन्सही कमी पडत होत्या..

हिमालयातील पर्वतरांगांपैकी पुर्व-पश्चिम पसरलेली 'झांस्कर' आणि 'धौलंदर' या दोन पर्वतराजी किन्नौर कैलास मधे विराजमान आहेत. याच पर्वतरांगा मधे शिवलिंग नावाचा ७९ फुटाचा सरळसोट सुळका दिसतो. या हिमरांगेत ४,५७३ मिटर उंचीचे 'किन्नौर कैलाश" हे उत्तुंग शिखर आहे.

मावळतीच्या रंगात न्हाऊन निघणारे 'किन्नौर कैलाश'चे सोनेरी रुप डोळे भरुन पाहताना मन अगदी तृप्त झाले. याची साठी केला होता अट्टाहास !!!

दिवस चौथा : काल्पा - नाको - टाबो - १७५ कि.मी.

आमच्या टुर मधला आजचा ८-१० तासाचा हा आजचा दुसरा प्रवास होता.. कागदा वर जरी हे अंतर कमी वाटत असले.. तरी प्रत्यक्षात मात्र Discovery Channelने गौरविलेला World deadliest road वरचा हा खडतर प्रवास होता.

तिव्र उतारांच्या डोंगराळ भागात शक्य तिथे एकाच गाडीला जाण्या एव्हढा रस्ता बनवण्यार्‍या Border Road Organizationला दिल से सलाम! रस्त्याच्या डाव्या बाजुला कोसळणाच्या प्रतिक्षेत असलेल्या कडे-कपारी आणि उजव्या बाजुला ५०० ते १००० फुट खोल सतलज नदीचे पात्र.. प्रत्येक वळणा वर भीमरुपी महारुद्राचा जप सुरु होता. समोरुन आलेल्या गाडीने पास दिली तर ठिक नाही तर... दरीकडे तोंड करुन त्याला जागा करुन द्यावी लागे.. त्यात जर समोरुन ट्रक येत असेल तर मग... वृषण ललाट गमन!!!

या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार नित्याचेच असतात.. त्यामुळे BROवाले JCB घेऊन सदैव सेवेसी तत्पर असतात. या भयावह रस्त्यांवरुन गाडी चालवणार्‍या सगळ्या चालकांच कौतुक वाटतं.

चार एक तासाचा थरारक प्रवास करुन आम्ही 'खाब'ला पोहचलो.. खाब म्हणजे चीन मधे उगम पावणार्‍या सतलज आणि हिमालयातील स्पिती नदीचा संगम. हा संगम पार केल्यावर पुढे हँगरँग व्हॅलीतील 'मलिंग'नाला आडवा येतो. आता या नाल्यावर सिमेंट रस्ता बांधुन रहदारीसाठी सोपा करण्यात आला आहे. पुर्वी 'मलिंग'नाला पार करायचा असेल तर दुपारी ११-१२च्या आत पार करावा लागे. कारण दुपार नंतर वितळणार्‍या हिमनगांमुळे हा नाला दुथडी भरुन वाहत असे.

दुपारच्या जेवणासाठी आम्ही 'नाको'च्या आधी एका धाब्यावर थांबलो. इथवर पोहचे पर्यंत हिमालयातील निसर्गाने कूस बदलली होती. किन्नौरची हिरवाई गायब झाली होती... उजाड डोंगररांगां वरिल हिमनग स्पटिका प्रमाणे चमकत होते... हे विराण सौंदर्यंही मनाला भुरळ पाडत होतं. निसर्गाचा हा चमत्कार अनुभवताना शिमलाच्या वेटरने दिलेल्या शुभेच्छांचा अर्थ आपसूक कळत होता. खरच एका वेगळ्या दुनियेत आल्याचा साक्षात्कार होत होता.

मुनलँड

नाको मधिल कृत्रिम तलाव आणि मॉनेस्ट्री बघण्यात जास्त वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो... कारण संध्याकाळ व्हायच्या आत आम्हाला 'ग्यु'च्या 'ममी'चे दर्शन घ्यायचे होते. ग्यु गाव हे NH-22 पासुन ९ कि.मी. आत आहे. या गावात एका टेकडीवर ५५० वर्षा पुर्वीची Mummy एका काचेच्या कपाटात जतन करुन ठेवण्यात आली आहे.

ग्यु गावाचा नजारा...

इथपर्यंतच्या खडतर प्रवासाने सगळेच शिणले होते. आता वेध लागले होते ते टाबोच्या हॉटेल सिद्धार्थचे... कधी एकदा हॉटेलवर जाऊन आडवे होतेय, हेच विचार आमच्या मनात घोळत होते. टाबो हे गाव स्पिती नदीच्या खोर्‍यात वसलेल आहे. त्यामुळे गावाकडे जाणारा रस्ता सपाटीवरुन जातो... गेल्या तीन दिवसां नंतर आज १ कि.मी. चा सरळ रस्ता बघुन आम्ही धन्य झालो. आणि त्या रस्त्यावर चक्क गतिरोधकही होते. Proud

हॉटेल वर पोहचल्यावर फ्रेश होऊन सगळे अटॅच टेरेस वर चहापानासाठी गोळा झालो. वर निरभ्र आकाश आणि भणभणत्या वार्‍याने दिवसभराचा थकवा पार दुर केला.. चहा सोबत सुरु झालेल्या गप्पा शेवटी सॅटेलाईट वर थांबल्या..

दिवस पाचवा: टाबो - पीन व्हॅली - काझा ४६ कि.मी.

स्पिती नदीच्या खोर्‍यात वसलेल्या टाबोला 'Himalayan Ajanta' म्हणुनही ओळखतात. येथील भित्ती चित्रे आणि शिल्पकलेच Ajantaशी साधर्म्य आढळते. टाबोतीतील प्राचिन मॉनेस्ट्री Chogshkhorला सकाळीच भेट देण्यास गेलो तेव्हा ती बंद होती.

सकाळी नऊच्या दरम्यान चांगलच उकडत होतं... येथील विरळ हवामाना मुळे सुर्याची किरणे थेट शरिरात घुसत असल्याची जाणिव होत होती.

जास्त वेळ न दवडता आम्ही काझाच्या रस्त्याला लागलो.. काझाला जाणार्‍या रस्त्या पासुन उजविकडे ७ किमी वर धान्खर मॉनेस्ट्री आहे. टेकडी वर जाण्या योग्य गाडी रस्ता आहे. वरुन सभोवतालचा सुंदर नजारा दिसतो.

उन्हाच्या झळा फारच जाणवत होत्या... मॉनेस्ट्री बघुन लगेच पुढच्या मार्गाला लागलो. काझाच्या १० किमी आधी डावीकडिल एक रस्ता पिन व्हॅली कडे जातो... हिमाचल मधिल नॅशनलपार्क म्हणुन ज्याचा उल्लेख आढळतो.. ती पिन व्हॅली बघण्यास आम्ही फार उत्सुक होतो. व्हॅली कडे जाणारा रस्ता कधी पिन नदीतून तर कधी नाल्या मधुन जात होता. ड्रायव्हर आपल्या अनुभवाच्या तिजोरीवर गाडी रेमवटत होता.

दिड तास व्हॅलीच्या दिशेने जात होतो तरी नॅशनल पार्कला साजेसा नजारा काही दिसत नव्हता... दोन तासाच्या खडतर प्रवासा नंतर रस्ता संपला तो 'मुढ' गावात.

नॅशनल पार्क म्हणजे जंगल, तळी, प्राणी, पक्षी अशी आपली ढोब़ळ कल्पना.. पण समोरिल नजारा या कल्पनेला तडा देणारा होता. जसा विराण वाळवंटात मृगजळाचा भास होतो. तसच इथल्या दूरवर पसरलेल्या ओसाड डोंगररांगांवरिल कुंगरी ग्लेशियरच्या खाली एक हिरवागार पट्टा दिसतो. निसर्गाने दिलेल्या या चिमुटभर दौलतीच्या जिवावर मुढ गावातली जनता समाधानी दिसते.

कुंगरी ग्लेशियरचा बराचसा भाग शाबुत होता. इथवर आलोच आहोत तर थोडं बर्फात बागडून घेऊ म्हणुन चांगला अर्धा किमीचा चढ चढुन ग्लेशियर वर गेलो.

परतल्यावर जाम भुक लागली होती. हा भाग दुर्गम असला तरी इथे खाण्या पिण्याची अबाळ मुळीच नाही.. मॅगी पासुन आमलेट पर्यंत सगळं काही मिळतं. स्नो लेपर्डची अपेक्षा ठेवुन नॅशनल पार्क बघायला गेलेलो आम्ही परतीच्या प्रवासात निदान ससा तरी दिसू दे.. अशी प्रार्थना करत होतो. Proud

मुढ ते काझा ४० कि.मी.चा प्रवास करायला अडीच तास लागले. दुपारी चारच्या सुमारास काझाला पोहचलो. जगातील सगळ्यात उंचावरिल Petrol Pump वर इंधर भरुन हॉटेल कडे रवाना झालो .. हॉटेल स्पिती सराईन काझा पासुन ५ कि.मी. दुर होतं. हॉटेल जरी दूर असलं तरी हॉटले मधिल उत्तम सोय पाहुन आम्ही खुष झालो. आता दोन दिवस इथेच मुक्काम होता.

दिवस सहावा : किब्बर, की, लान्गजा, कौमिक

आज फक्त काझा दर्शन करायच होतं. आरामात आटोपुन आम्ही की मॉनेस्ट्री कडे निघालो.. इथपर्यंतच्या प्रवासात बर्‍याच मॉनेस्ट्री पाहुन झाल्या होत्या. म्हणुन आम्ही 'Key'ला बगल देऊन पुढे किब्बर गावाकडे निघालो. किब्बर (४,२०५ मिटर) हिमाचल मधिल सर्वोच्च उंचीवरिल मानव वस्ती असलेलं गाव. दुरुन बघताना गाव निर्जन वाटत होतं.. मात्र फेरफटका मारताना लक्षात आलं की, इथे तर पाठीवर दप्तर घेऊन जाणारी शाळकरी मुलं सुद्धा आहेत. इथं हिमाचल सरकारच फार कौतुक वाटलं... फक्त रस्ताच नाही तर मुलभुत गरजा पुरवण्याच काम अखंडीत सुरु होतं.

किब्बर फिरताना बरिच दगदग झाली.. परिणामी विरळ ऑक्सीजन मुळे डोकं जाम झालं.. कुठे आपटायचीही सोय नव्हती... सगळीकडे दगडच Proud गाडीत येऊन कापुर हुंगायला सुरवात केली... तरी डोकं ठिकाण्यावर येई ना...

किब्बर वरुन परतताना Key Monstery बघायला थांबलो. डोकं जड असल्यामुळे उंचावरिल Monstery वर चढणे मी टाळले. झाडाच्या गार सावलीत बसल्यावर तीन चार शिंका आल्या आणि डोकं एकदम पुर्ववत झालं.

Key Monsteryला प्राचीन इतिहास आहे. ११ व्या शतकात Ge-lug-pa यांनी Monsteryचा पाया रचला. दरवर्षी ऑगस्ट मधे हजारो भाविक येथील 'कलाचक्र' उत्सवाला हजेरी लावतात.

Monsteryच्या परिसरात बाल भिक्षूंच्या सहलीची तयारी सुरु होती. सगळा चमू अगदी उत्साही दिसत होता. चौकशी अंती कळले की, हे बाल भिक्षू युवा भिक्षूंची क्रिकेट मॅच पहायला दुसर्‍या गावात जात आहेत. धन्य ते क्रिकेट!!!

एव्हाना ऊन चांगलच तळपू लागलं होतं.. आम्ही शेवटच्या कौमिक मॉनेस्ट्रीकडे निघालो. वाटेत लान्गजा गाव लागलं. गावा बाहेर क्रीकेटच मोठं मैदान होतं. ४,५०० मिटर उंची वरिल हे एकमेव क्रिकेटच मैदान असावं. क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या अगदी नसानसात भिनल्याच हे उत्तम उदाहरण!

लान्गजा गावात एका उघड्या टेकडीवर मैत्रेय बुद्धाचा ५० फुट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. हिमशिखरांवर नजर ठेवुन बसलेला तो पुतळा पाहताना भार हरपुन जाते. हिमशिखरांवरुन येणार्‍या थंड वार्‍या मुळे इथे जास्त काळ थांबणे अशक्य होते. तरिही हिमशिखरांच्या पार्श्वभुमीवर उडीबाबाचा कार्यक्रम आटोपुन गाडी कडे धावा घेतली.

१४व्या शतकात नव्याने बांधण्यात आलेली कौमिक मॉनेस्ट्री पहायला आम्ही निघालो. हिमशिखरांच्या साक्षीने वळणावळणाचा रस्ता पार करत आम्ही 'कौमिक'ला पोहचलो. मॉनेस्ट्री आणि इतर दोन तीन वास्तू वगळता इथे बाकी काहीच नाही. खाली ४-५ किमी वर कौमिक गाव आहे.

इथुन 'बडा शिग्री ग्लेशियर'च्या हिमरांगेचा अवाढव्य पसारा दिसत होता. मात्र दुपारच कडक ऊन आणि थंड वारा तिथे फार काळ थांबू देत नव्हता.

जेवणासाठी काझाच्या Market कडे निघालो. काझा हे स्पितीच मुख्यालय असल्यामुळे इथे पेट्रोलपंप पासून इंटरनेट पर्यंतच्या सगळ्या सोई उपलब्ध आहे. जेवण झाल्यावर CD आणि कोबीची खरेदी करुन आम्ही काझाची मॉनेस्ट्री बघायला निघालो. बंद मॉनेस्ट्रीचे फोटो काढुन आम्ही हॉटेल वर परतलो. आजचा प्रवास कमी झाल्याने थकवा अजिबात जाणवत नव्हता.. संध्याकाळ नंतर पत्तांच्या डाव रंगला तो थेट रात्रीच्या जेवणाची वेळ उलटे पर्यंत...

दिवस सातवा : काझा - लोसर - कुंझुंम पास - चंद्रताल - मनाली

ज्या दिवसाची आम्ही सगळे आतुरतेने वाट पहात होतो तो दिवस उजाडला तोच मुळी एक वाईट बातमी घेऊन. सातव्या दिवशी काझा वरुन लोसर, कुंझुंम पास मार्गे चंद्रतालला जायच होतं. पण कुंझुंम पास वरुन चंद्रतालला जाणारा १४ कि.मी.चा रस्ता भुस्खलन (landslide) झाल्यामुळे बंद होता. या बातमीची कुणकूण ड्रायव्हरला आधीच लागली होती. आणि तशी त्याने आम्हाला इशारत दिली होती. मात्र आम्ही त्याला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याची विनवणी करत होतो. पण त्याने साफ नकार दिला. कारण कुंझुंम पास ते चंद्रताल लेक पर्यंतचा रस्ता एकेरी होता. त्या रस्त्यात गाडी माघारी वळवायला अजिबात जागा नव्हती. त्यात एक दोन मोठे नाले पार करुन पुढे जावे लागणार होते. Landslide मुळे नाल्यातील अडथळ्यांची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.. त्यात गाडी अडकण्याचा धोका जास्त होता. या सगळ्या शक्यता लक्षात घेता मग आम्हीच माघार घेण्याचा निर्णय घेतला. तसे आमच्या Booking Agentला कळवुन मनालीतील एका दिवसाचा stay वाढवुन घेतला.

काझा ते मनाली हे अंतर २२० किमी आहे. दुपार नंतर वाटेतील लोसर आणि कुंझुंम पासला वितळलेल्या बर्फाचे नाले दुथडी भरुन वहात असतात. तो पॅच दुपारच्या आधी पार करणे गरजेचे होते म्हणुन आम्ही सकाळी सहा वाजताच काझा सोडले.

लोसरच्या चेक पोस्टवर पोहचे पर्यत ९ वाजले होते. लोसर पासुन पुढे कुंझुंम पासचा चढ सुरु होतो.. जसजसे वर जाऊ लागलो तसे हवेतला गारवा वाढू लागला. स्पिती नदीचा उगम कुंझुंमपास जवळील ग्लेशियर मधुन होतो, अशी माहिती गाडी चालक जगदीशने दिली . कुंझुंमपासच्या टॉप वर देवीचे मंदिर आहे. सगळ्या गाड्या या देवळाला प्रदक्षिणा घालुन पुढे जातात.

हवेतील गारठा खाली उतरायचे धाडस करु देत नव्हता... देवीचा फोटो घेण्यापुरता खाली उतरलो नी लगेच पळत येऊन गाडीत बसलो.

डावीकडील नविन रस्त्याने कुंझुंमपास उतरताना उजविकडील नाल्यातुन जाणारा जुना zigzag रस्ता दिसत होता. त्या रस्त्याच्या डावीकडुन येणारा चंद्रभागा नदीचा लयबद्ध प्रवाह दिसत होता.

अधुरी एक कहाणी...

कुंझुंमपास उतरुन बालताल मधे आलो. इथे एका टपरीवर चहा नाष्ट्याची सोय आहे. मनाली ते लोसर दरम्यान असलेली ही एकमेव टपरी... जर पुढिल रस्ता बंद असेल तर बायकर्स इथेच मुक्काम ठोकतात.

चंद्रतालच्या स्टे मधे चायनिज भेल बनवण्यासाठी घेतलेला कोबी बालतालच्या टपरीवर चिरून घेतला.. नुडल्स आणि शेजवान चटणीने भेल मधे रंगत आणली. सोबतीला टपरी वरची मॅगी आणि चहा असा अल्पोपहार होता. चंद्रभागेच्या तिरावरुन आम्ही ग्राम्फु कडे रवाना झालो.

वाटेत तीन चार ठिकाणी पाण्याने भरलेले मोठे नाले पार करावे लागले. अश्याच एका नाल्यातील शेवटच्या टप्प्यात आमची गाडी अडकली.. आणि मागोमाग इतर गाड्यांची रांग लागली. शेवटी मागील गाडीच्या एका ड्रायव्हरने आपले सारे कौशल्य पणाला लाऊन आमची गाडी त्या नाल्यातुन बाहेर काढली.

ग्राम्फु जवळ येऊ लागले तसे हिमालयाचे तेच जुने हिरवेगार रुप परत एकदा दिसू लागले. ग्राम्फुच्या आधी रस्त्यावर कोसळणार्‍या एका धबधब्याच्या प्रवाहात आमच्या पुढे गेलेली Innova अडकली... तीला मार्गी लावुन आम्ही ग्राम्फु कडे निघालो.

ग्राम्फुला केलाँग वरुन येणारा लेह मनाली रोड मिळतो आणि मग त्यानंतर सुरु होतो रोहतांग पासचा अवाढव्य चढ...

रोहतांग पास जवळ येऊ लागला तसा रस्त्याच्या कडेला साचलेल्या बर्फाचे प्रमाण वाढू लागले. याच मार्गाने आम्ही गेल्या वर्षी ऑगस्ट मधे आलो होतो तेव्हा बिलकुल बर्फ नव्हते.. मात्र यंदा एक महिना आधी जुलै मधे आल्याने बर्फाची किनार ल्यालेले रोहतांगचे पांढरे शुभ्र रस्ते पहाण्याचे भाग्य लाभले.

रोहतांगचा सुंदर नजारा...

रोहतांगचा उत्तरेकडिल निसर्ग आणि दक्षिणेकडील निसर्ग यात खुप तफावत आहे... उत्तरेला अंत:करणाचा ठाव घेणारा हिमाचलचा विलोभनीय निसर्ग.. तर दक्षिणे कडिल देवदारच्या हिरवाईने नटलेला मनालीचा निसर्ग काही वेगळाच भासतो..

रोहतांगचा ५० कि.मी.चा घाट उतरुन आम्ही मनालीतील हॉटेल त्रिशुल मधे मुक्काम दाखल झालो.

दिवस आठवा : मनाली दर्शन

मनालीत पाऊस नसला तरी आकाश ढगाळलेलं होतं. कुंद वातावरणामुळे हवेत उष्मा होता. आजचा पुर्ण दिवस मनालीत मुक्काम असल्याने आरामात आटोपुन आम्ही मनालीतील गरम पाण्याचे कुंड बघावयास निघालो.

नंतर Old Manali मधिल व्यास मंदिर, राम मंदिर, हिडिंबा मंदिर बघुन मॉल रोड वर आलो. जेवण आणि खरेदी आटोपुन हॉटेल वर पोहचलो. दिवसभर सवड असल्याने रात्रीच्या जेवणा पर्यंत पत्त्यांचा डाव रंगला. रात्री सामानाची बांधाबांध करुन शेवटच्या मनाली - चंदिगढ प्रवासा साठी सज्ज झालो.

दिवस नववा : मनाली ते चंदिगड - ३२० कि.मी.

संध्याकाळी सहाची फ्लाईट आणि मनाली ते चंदिगड असा दहा तासाचा प्रवास पार करायचा असल्यामुळे आम्ही सकाळी सहा वाजता हॉटेल सोडले. बियास नदीच्या तीरावरचा हाच प्रवास गेल्या वर्षी केला असल्यामुळे त्यात उत्सुकता अशी बिलकुल नव्हती .. त्यातच स्पिती टुरचा शेवटचा दिवस असल्या कारणाने सगळे जण उदास मनःस्थितीत होते. पर कहानी मे व्टिस्ट बाकी था.. आमच्या गाडीचे सारथ्य करणार्‍या जगदशी महाशयांना काय सुचले देव जाणे.. त्याने बिलासपुर नंतर महामार्ग सोडुन गाडी शॉर्टकटला घातली. आणि गेले आठ दिवस नागमोडी वळणे पाहुन थकलेल्या डोळ्यांचा अंत पाहू लागला.

मनाली - मंडी - स्वारघाट असा NH-21 वरुन जाणारा चंदिगढचा महामार्ग सोडुन.. जगदिशन भायने ज्या NH-22 वरुन शिमला प्रवासाला सुरवात केली होती.. त्यावरच आणून सोडले. अश्या प्रकारे नियतीनेच आमची हिमाचल प्रदक्षिणा पुर्ण करुन घेतली.

सतलज, स्पिती, पिन, चंद्रभागा, बियास या पाच नद्यांच्या आशिर्वादाने आमची हिमाचल प्रदक्षिणा निर्विघ्न पार पडली. या टुर मधे ज्यांच्या साथीने धमाल आली त्या गिरिविहार, जिप्सी, संदिप, प्रतिक आणि वैभव यांचे मनापासुन आभार!

किसी शायरने खुब कहा है...

कई जीत बाकी है, कई हार बाकी है...
अभी तो जिंदगी का, सार बाकी है...
यंहा से चले है, नयी मंजिल के लिए..
ये एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है...

यह तो सिर्फ आगाज है... न जाने ये दिवानगी, ले जाएगी कहा???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर रस्ता दिसत आहे, पाहाताना अंगावर शहारे आले.
फोटो आणि वर्णन खुप छान. शेवटचा फोटो मस्तच.
पुढील प्रवासांसाठी शुभेच्छा.

होय... आम्ही कस्टमाईज्ड करुन घेतली होती.
९ दिवसांचा गाडी प्रवास + हॉटेल भाडे + नाष्टा आणि दुपारचे जेवण = फक्त १७,०००/- प्रत्येकी ६ जणांच्या ग्रुपसाठी

Pages