एव्हाना आमच्या होंडा गाडीने माळशेज घाटचा रस्ता पकडलेला.. चार फुटापलीकडचं काही दिसत नव्हत.. पावसाची तुरळक सर अधुन मधून ये- जा करत होती.. पण धुक्याचे लोंढे मात्र सारखे लोटांगण घालत होते..आमच्या पुढे लाल डबा धावत होता तेव्हा गिरिने खबरदारी म्हणून त्याचीच पाठ धरली..
घाट संपताच चहाचा घुटका मारण्यासाठी गाडी एका स्टॉलवर थांबवली.. जेमतेम दहा मिनिटे होतो पण थंडगार वार्याने अंग शहारून गेले. मुंबईत नाही पण इथे तरी पाउस असल्याने भलताच आनंद झाला नि आम्हा ट्रेकरच्या मनात चैतन्याची कारंजी उसळली.. गिरी, रोमा, अनिरुद्ध, मी व माझ्या ऑफिसमधील सहकारी राहुल असे हम पांच 'चावंड-शिवनेरी' पावसाच्या सहवासात करण्याच्या उद्देशाने निघालेलो.. पण घाट मागे पडताच आकाश मोकळे झाले नि चक्क चांदणे पडले.. जल्ला पोपट !
गणेश खिंडीतुन गाडी पुढे आली नि जुन्नर शहराच चांदण लुकलुकू लागलं.. ओझरचा फाटा ओलांडून शिवनेरीलगतचा रस्ता पकडला जो आपटाळे गावाकडे जातो.. चावंडचा फलक येइपर्यंत रस्ता अगदी बेकार अवस्थेत.. तेव्हा आमची होंडा चाचपडत बैलगाडीच्या वेगाने चालू लागली.. असल्या रस्त्यावर होंडा त्याच्या मालकाला काय शिव्या घालत असेल ते गिरिच जाणे.. शिवाय घरचा अहेर तो वेगळा !
झोपी गेलेल्या चावंडवाडीत पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास जाउन पोचलो.. अंधारात सुद्धा चावंड किल्ल्याची भव्यता जाणवत होती.. या पहाडाच्या कुशीतच ही वाडी वसलेली आहे.. ग्रामपंचायतीच्या अंगणातच गाडी उभी करून झोपण्याच्या तयारीला लागलो.. इथे मुक्कामासाठी हनुमानाचे मंदीर वा शाळेची जागाही उत्तम.. अनिरुद्ध व मी बाहेरच ओसरीवर झोपलो तर बाकीचे गाडीत अगदी सुरक्षित.. गाव जरी झोपेत शांत असले तरी सोसाट्याचा वारा फारच आवाज करत होता.. गावात असुनही अगदी गडावरच असल्याचे वाटत होते.. हवेत गारवा होता सो पाउस पडेल अशी आशा होती..
साडेपाच वाजून गेले नि किल्ल्याची आकृती अधिकाधिक स्पष्ट होउ लागली.. जल्ला पाउस काही पडला नाही पण हवेचा जोर कायम.. पहाटेच्या गाराव्यात एक चाय हो जाये वाटत असले तरी गावाला आता कुठे जाग येत होती.. तेव्हा कुणाला त्रास न देता आम्ही सरळ गड चढायला घेतला.
गडावर जाणारी वाट अगदी ठळक नि सोप्पीशी.. किल्ल्याचा आकार बघून वाटले होते चढ़ अंगावर येइल पण वरपर्यंत जाण्यास आता व्यवस्थित पायऱ्या बांधल्या आहेत.. काम अजुन सुरु आहे.. ह्या पायऱ्या अगदी कातळ टप्पा लागेपर्यंत नेणार आहेत.. पायऱ्या संपल्या नि थोडी घसाऱ्याची वाट पार करून कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या.. अगदीच अरुंद.. इंग्रजांच्या सुरुंगी वृत्तिमूळे ही वाट बिकट बनालीय पण आता रेलिंग्स लावल्याने वाट अगदीच सुरक्षित बनालिय.. हा टप्पा चढून गेलो नि अगदी हडसर किल्ल्यावर आहेत तशा वीसेक पायऱ्या लागल्या.. या पायऱ्यांची उंची नि नव्याने बांधलेल्या आताच्या पायऱ्या.. किती तो फरक ढांगा टाकतानाच जाणवला..
- -
कातळाच्या कोनाड्यात लपलेल्या प्रवेशद्वारापाशी आलो नि थंडगार हवेने जोरदार स्वागत केले.. घोंगावणारा तडाखेबंद वारा.. नभ भरुन आलेले.. समोरच्या डोंगरावर घुटमळणारे ढग.. सारे काही मनासारखे.. याचसाठी असतो ट्रेकचा अट्टाहास.. अश्या वातावरणात किल्ल्याबद्दल जास्त कुतूहल वाटते.. मग भग्नावशेष देखिल या जागेचा इतिहास सांगू पाहतात.. त्यावेळचा राजा - ती प्रजा.. तेव्हाची वस्ती तेव्हाचा थाट.. सैन्याचा पहारा नि लढाया.. बरेच काही मनोमनी उलगडत जाते.. इतिहासाची पानं न चाळणारी व्यक्तिदेखिल भुताकाळात डोकावू पाहते..
मुख्य प्रवेशद्वारातून वरती आलो नि सुस्वागातमचा फलक स्वागत करताना दिसला.. एकाबाजुची तटबंदी अजुनही तग धरून आहे.. वरती चढून आलो नि विस्तीर्ण परिसर नजरेस पडला.. थोडीफार हिरवळ उमटलेली.. कुठेकाय आहे हे सांगणारे दिशादर्शक फलक.. नि तशी जाणारी मातीची ठळक वाट.. किल्ला कोणीतरी देखरेखी खाली ठेवल्याचे जाणवत होते.. सुरवातीलाच चौथरा, दोन मोठी उखळ नजरेस पडली.. तिथून आम्ही टेकडीचा रस्ता धरला.. टेकाडावर जायचे म्हटले नि वाऱ्याला अधिक उधाण आले.. इथेच चामुंडा देवीचे पूर्वाभिमुख मंदीर आहे.. शेंदुर लावलेली देवीची प्राचीन मूर्ती आहे तर आजुबाजूस काही भग्नावशेष पडलेले दिसतात.. वातावरण पावसाळी असल्याने सुर्यदेवांनी काही दर्शन दिले नव्हते.. पण ढगांच्या लोटात आजुबाजूची डोंगररांग मंदधुंद होउन गेलेली..
- - -
टेकडी उतरून उजवीकडे गेलो की पुष्करणी तलाव लागले.. पाउसच पडला नसल्याने पात्र जरी कोरडे असले तरी ह्या प्राचीन वास्तुने मनाला भुरळ घातली.. ही पुष्करणी बघून हरिश्चंद्रगड वा अमृतेश्वर मंदिराजवळच्या पुष्करणीची आठवण व्हावी.. येथील पाषाणात कोरलेली पिंड नि भग्नावस्थेतील नंदी पाहून त्याकाळात इथे महादेवाचे मंदीर असावे हे सहज लक्षात येते.. बरीच पडझड झाली असली तरी सुंदर शिल्पकाम काही नजरेतुन सुटत नाही.. तलाव देखिल बराच रेखीव.. आज ही वास्तू पुर्णतः मोडकळीस आली असली तरीसुदधा त्याकाळची भव्यता लक्षात येते..
- -
इथूनच पुढे डावीकडे गेलो की या किल्ल्यावरचे अजुन एक वैशिष्टय सामोरे येते.. सात टाक्यांचा एकत्रित समूह ! या सात टाक्यांचा संबध सप्तमातृकाशी जोडला गेलाय.. सप्त मातृका म्हणजे ब्राम्ही, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणि आणि चामुंडा.. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ.. यावरुनच पुढे चामुंडाचा अपभ्रंश होउन किल्ल्याला चावंड नाव पडले असावे (इथे बरीच माहिती मिळते http://www.trekshitiz.com/marathi/Chavand-Trek-C-Alpha.html ) ह्या टाक्या मोठ्या नि पाण्याने भरलेल्या.. इथे उतरायला पायऱ्या नि गणेश प्रतिमा असलेला सुंदर दरवाजा.. सारं काही अप्रतिम !
---
इथेच पुढे एका बाजुस उतरले की लेण्यांकडे जाणारा फलक दिसतो.. इथे गुहा खोदलेल्या दिसतात.. त्यातली एक गुहा बरी मोठी, सुस्थितीत नि मुक्कामासाठी उत्तम.. या गुहेतच बसून समोरच्या माणिकडोह धरणाचा जलाशय पहावा.. सुर्यकिरणांची पाण्यात उमटणारी झालर पहावी.. भवतालची उत्तुंग डोंगररांग नि तिच्या अंगावर खेळणारे ढगांचे पुंजके पहावे... नि हे सारं पाहताना मंत्रमुग्ध व्हावे...
- -
आता तरी पावसा तू पडशील का..
- - -
आमच्या ट्रेकमध्ये मायबोली टोपी असतेच..
ह्या किल्ल्यावर फिरताना अगदी प्रसन्न वाटत होते.. त्यात आल्हाददायक वातावरण.. खरच शिवाजी राजे यांनी या किल्ल्याला दिलेले 'प्रसन्नगड' हे नाव अगदी समर्पक.. सध्या शिवाजीट्रेल नावाच्या संस्थेने ह्या किल्ल्याच्या देखरेखीचे काम घेतले आहे.. किल्ला फिरताना कुठलीच अडचण न यावी इतके चांगले काम... त्यांनाही मानाचा मुजरा !
आम्ही पेटपुजेचा कार्यक्रम मनसोक्त आटपून घेतला... अजुन नऊदेखील वाजले नव्हते तेव्हा या पसरलेल्या किल्ल्याला फेरा घालायला सुरवात केली.. या फेरीत पाण्याच्या बऱ्याच टाक्या लागल्या.. दक्षिण बाजुच्या अगदी एका बाजुस असणाऱ्या दोन टाक्या अगदी मस्त नि पाणीही पिण्यास उपयुक्त.. पायऱ्या तर एकदम मजबूत !
मनसोक्त फिरून जेव्हा समाधान झाले तेव्हाच किल्ला उतरायला सुरवात केली.. भले पाउस पडला नाही तरी जोरकस नि थंडगार हवेने खुश केले होते.. अर्ध्या तासातच चावंडवाडी गाठली..
नाणेघाटचे पहारेकरी म्हणून ओळखले जाणारे जीवधन, चावंड, हडसर, निमागिरी हा पट्टा पूर्ण झाल्याचे समाधान होतेच पण अजुन एक किल्ला बाकी होता.. तो म्हणजे राजे शिवाजी यांचे जन्मस्थान अशी ओळख असणारा 'शिवनेरी'..
पण त्याआधी चावंडवाडीपासून अंदाजे आठ किमीवर असणारे कुकडेश्वर मंदीर बघायला निघालो.. हेमाडपंथी हेच या मंदिराचे वैशिष्ट्य ! फारसे परिचित नाही म्हणून इथे कसलीही भव्य-दिव्य धाटणी दिसत नाही.. अगदीच साधा पण शांत परिसर.. कुकडी नदीचा उगमस्थान असलेली ही खरीतर प्राचीन वास्तु पण आता दुर्लक्षितच आहे.. मंदिराचा कळसाकडील भाग उध्वस्त असला तरी बाकी मंदीर शक्य तेवढीच डागडूजी करून सावरले आहे..अखंड दगडात कोरलेल्या शिल्पकामाची ही स्थापत्यकला पाहण्यासारखी.. हरिश्चंद्रगडा वरील हरिचंद्रेश्वर असो वा रतनगडाच्या पायथ्याचे अमृतेश्वर असो वा खिरेश्वरचे नागेश्वर मंदीर.. ही सगळी शिवालयं म्हणजे सह्याद्री रांगेत दडलेल्या स्थापत्य कलाकृतींचा मौल्यवान ठेवा.. पश्चिमाभिमुख दरवाजाच्या सुंदर चौकटीतून आत शिरलो नि एक आगळीच अनुभूती मिळाली.. चहुबाजूंनी शिल्पाकृतींचा वेढा नि समोर शिवलिंग .. हर हर महादेव ! मंदिराच्या मागेच गोमुखातून पाण्याचा प्रवाह अखंडीत सुरु असतो हेच ते कुकडी नदीचे उगमस्थान.. याच नदीवर पुढे माणिकडोह धरण बांधलेय..
कुकडेश्वरच्या रस्त्यावरुन दिसणारा चावंडचा घेर !
- -
- -
(वरच्या प्रचित पहिले शिल्प पहिल्यांदाच पाहीले.. कुतुहलाने नेटवर गुगलले तर कळले की 'वेताळ' चे शिल्प तर कोण म्हणे अस्थिपंजरचे शिल्प)
- -
या सुंदर कलाकृतीचा निरोप घेउन आम्ही गाडी शिवनेरीच्या दिशेने वळवली.. घड्याळात आताशे अकरा वाजले होते.. गाडीच्या कृपेमुळे आम्ही ना वेळेला ना एसटीला बांधील होतो.. मनात आले तर अगदी ओझर वा लेण्याद्री उरकणार होतो.. पण आता आकाश अगदी निरभ्र असलेले पाहून कठीणच वाटत होते.. गाडी पार्क करून शिवनेरी फिरायला सुरवात केली.. कड़क उन पडलं तरी वारा मात्र सोसाट्याचा.. गिरी व अनिरुद्ध सोडले तर आमची इथे येण्याची पहिलीच वेळ नि इतक्या शाही थाटात ठेवलेला किल्ला बघण्याचीसुद्धा पहिलीच वेळ ! किल्ल्यावर आलोय की बगिच्यात फिरतोय असेच प्रथमदर्शनी वाटू लागले.. पायऱ्यांच्या दुतर्फा बहरलेला लालबुंद गुलमोहर नि रंगीबेरंगी बोगनवेल यांमुळे किल्ला अधिकच सुशोभित झाला आहे.. पण एका मागोमाग एक असे सात दरवाजे आडवे आले नि अप्रुप वाटले.. हाच किल्ला मराठ्यांना बराच काळ काही जिंकता आला नव्हता.. इथे गिरी, अनिरुद्ध नको तितकी गाईडगिरी करत होते नि आम्ही एकेक दरवाजा न्याहाळत पुढे जात होतो.. प्रत्येक दरवाज्याचा रुबाब निराळा.. स्वागत करणाऱ्या 'महादारावाज्या'तून प्रवेश केला की गणेश प्रतिमा कोरलेली 'गणेश दरवाजा".. मग 'पीराचा दरवाजा' नंतर भव्यदिव्य वाटणारा 'हत्ती दरवाजा'.. इथून पुढे गेलो की सुंदर कलाकृती असणारा 'शिवाई देवी दरवाजा'... या दरावाज्यातुन वाट शिवाई देवीच्या दर्शनासाठी जाते.. याच देवीला नवस दाखवून जिजाऊ मातेने शिवाबाला जन्म दिला..
महादरवाजा
- -
- -
- -
शिवाई दरवाजा
- -
मेणाचा दरवाजा आतून
पुढे 'मेणाचा दरवाजा' नि 'कुलुप दरवाजा" असे दोन दरवाजे पार करून माथ्यावर आलो..समोरच 'अंबरखाना' चे धान्यकोठार दिसते.. पडझड जरी झाली असली तरी बराच भाग अजुनही भक्कम अवस्थेत आहे.. पुढे कड्याच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने गेले असता गंगा- जमुना या पाण्याच्या टाक्या लागतात.. याचपुढे उजव्या बाजुला एक वाट टेकडीवर जाते जिथे दर्गा आहे..तर सरळ वाट शिवाजी राजे यांचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या वास्तुकडे जाते.. इथवर पोहोचेपर्यंत ऊन चांगलेच तापले होते.. पाउस तर दूरची गोष्ट पण इथे चावंड सारखे गार वातावरणही नव्हते..
- -
'अंबारखाना'च्या आतून
शिवजन्मस्थानाच्या आधी उजवीकडे मशीद आहे.. तिकडूनच साखळी वाटेने खाली जाण्यास रस्ता असल्याचे गिरिकडून कळले.. आता इकडून उतरायचे की नाही हा प्रश्न होताच.. शिवजन्मस्थानाची इमारत एकमजली.. पण एकदम मस्त. खालच्या खोलीत आठवण म्हणून पाळणा व राजेंचा पुतळा ठेवलाय.. वरती पायर्या चढून गेले की अगदी इतिहासात एंट्री मारल्याचा भास होतो.. बांधकामच तसे एकदम भक्कम नि सुस्थितीत आहे.. तेव्हाची गॅलरी म्हणजे एकुण पाच खिडक्या.. साहाजिकच इथे पर्यटकांची स्वतःचा फोटो काढुन घेण्याची धडपड सुरु असतेच.. त्यामुळे बाहेरुन या वास्तूचा फोटो घेताना कोण ना कोण त्या खिडक्यांमध्ये टपकतोच.. याच इमारतीच्या पुढे भलेमोठे बदामी टाके आहे नि त्या टाकीच्या मागच्या अंगाला बुरुज आहे जिथून पुर्वी शिक्षेसाठी कडेलोट केला जात असे.. इथून संपुर्ण जुन्नर शहर नजरेत भरतो..
- -
- -
- -
आता आमच्या ग्रुपची फाळणी नक्कीच होणार होती.. अनिरुद्ध व रोमा साखळी मार्गे उतरण्यास आतुर होते तर गिरी व राहूल गाडीमार्गे परतणार होते.. मला ऊनाचा कंटाळा आलेला पण शेवटी विचार बदलून साखळी मार्ग निवडला.. ठरल्याप्रमाणे गिरी व राहूल आम्हाला खाली रस्त्यावर भेटणार होते.. आम्ही त्या मशिदीच्या मागच्या बाजूने उतरायला घेतले.. इथेही पाण्याची मोठी टाकी आहे.. पण वटवाघूळांचा धुमाकुळ सुरु असल्याने जवळ न जाता खालची वाट धरली.. सुरवातीला काटयाकुट्यातून पुढे गेले की कातळात कोरलेल्या पायर्या लागतात... आता आधारासाठी तार लावलेली आहे पण पुर्वी इथे साखळी लावलेली असावी म्हणुन साखळी मार्ग नाव पडले असावे.. या पायर्या देखील अरुंद.. अगदी चावंडसारखाच हा टप्पा.. फक्त इथे रेलिंग प्रकार अजुन आलेला नाही.. या पायर्या उतरल्या नि बाजूलाच असणार्या कातळात कोरलेल्या गुहा बघून घेतल्या.. इथे एका गुहेला असलेला कोरीव दरवाजा छानच..
- -
त्या कातळात कोरलेल्या पंधरा- वीस पायर्या सोडल्या तर आता पुढे नुसती मातीची घसार्याची वाट.. चढण्यासाठी इथून बराच घामटा गाळावा लागत असेल पण उतरताना.. आम्ही अवघ्या वीस मिनीटांत खाली रस्त्यावर पोचलो..!! गिरीला फोन केला तर आत्तासा गाडीपर्यंत पोहोचला होता.. ! पण हा मार्ग करता आला तो गिरीमुळेच.. त्याने मोठया मनाने आमचा प्रस्ताव स्विकारला होता.. जल्ला इतकेच.. सत्कार वगैरे पद्धत आमच्यात नाही..
आम्ही रस्त्यावरच बुड टेकवून बसलो होतो.. दहाएक मिनीटांतच होंडा आली.. आता भुक चळवळ शांत करण्याचा कार्यक्रम ठरलेला.. सह्याद्रीमित्र ओंकार ने 'आशियाना' हॉटेल मस्तय म्हणून सुचवले होते.. पण दरवाज्यावर शुद्ध शाकाहारी हे शब्द बघून आम्ही गाडी फिरवली नि बाजूच्याच 'मांसाहरी जेवण मिळेल' ही पाटी लावलेल्या 'ऋतुजा' हॉटेलसमोर गाडी पार्क केली.. ! दिवसभरातली जुन्नर तालुक्यातील घोडदौडचा अखेर मस्त मस्त जेवणाने झाली नि नॉन-वेज ढेकर देत परतीचा मार्ग धरला... !
आत्ताशे तीन वाजत होते.. तेव्हा माळशेज घाटात पाउस भेटलाच तर मनसोक्त भिजण्याचे ठरलेले.. पण कसले काय.. पावसाने तोंडच फिरवलेले.. जूनचा शेवटचा आठवडा असुनही घाट पुर्णतः सुका नि ओस पडलेला.. टळटळीत उन्हात भोवतालची सह्याद्रीरांग तळपत होती ! घाट उतरुन झाला नि गाडी कडेला लावून आणलेल्या कलिंगडचा आस्वाद घेतला ..
ऐन पावसाळाच्या ऋतूत उन्हाळी ट्रेकचा शेवट करुन आम्ही मार्गी लागलो ते पुढच्या पावसाळी ट्रेकचा प्लॅन करतच... फक्त वरुणराजाची कृपादृष्टी राहूदे हीच इश्वरचरणी प्रार्थना !!
मस्त वर्णन आणि फोटो सुध्दा.
मस्त वर्णन आणि फोटो सुध्दा. खूप छान वाटलं वाचताना.
झक्कास!!!
झक्कास!!!
सुंदर फोटोज आणि वर्णन ही
सुंदर फोटोज आणि वर्णन ही सुरेख!
मस्तच शिवनेरी म्हणजे बागच
मस्तच
शिवनेरी म्हणजे बागच झाली आहे.
सुंदर, फोटोज आणि वर्णन
सुंदर, फोटोज आणि वर्णन दोन्हीही.
नेहमीप्रमाणेच सुंदर!! प्रचि
नेहमीप्रमाणेच सुंदर!! प्रचि १० तर क्लास आलंय!!
आणखी एक गोष्ट... लेख लिहिता लिहिता तुझी अशी एक खास शैली तयार झालीय.
एकदम मस्त!!
एकदम मस्त!!
मस्त वर्णन आणि
मस्त वर्णन आणि फोटो................प्रसन्न झाली सकाळ........
मस्तच!!!!
मस्तच!!!!
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर वर्णन आणि फोटो! तिथे
सुंदर वर्णन आणि फोटो! तिथे जाऊन आल्याचा फील आला
फोटो बघुनच मस्त वाटलं , मस्त
फोटो बघुनच मस्त वाटलं , मस्त मजा करताय .
लै भारी फोटु. मजा आली
लै भारी फोटु. मजा आली
सुपर्ब !!! खत्तरनाक फोटोज आणि
सुपर्ब !!! खत्तरनाक फोटोज आणि वृत्तांत. शिवनेरीची खूप डिटेल माहिती दिली आहेस !! जियो !!
रच्याकने >>>>झोपी गेलेल्या चांदवडवाडीत पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास जाउन पोचलो.. अंधारात सुद्धा चांदवड किल्ल्याची भव्यता जाणवत होती >>>> किल्ला चावंड आहे आणि पायथ्याला चावंडवाडी गाव आहे… चांदवड नाही !!
आणि जल्ला तुमच्या बरोबर अनिरुद्ध होता म्हणून आशियाना सुचवलं होतं नाहीतर जाधवांचं हॉटेल आमंत्रण सुचवलं असतं तर जाता जात वाट वाकडी करून पुण्याला येउन माझा सत्कार केला असतात !!! तिथली चिकन / मटन थाळी म्हणजे अक्षरश: नादखुळा !!!
सुंदर !
सुंदर !
मस्त वर्णन आणि फोटो.
मस्त वर्णन आणि फोटो.
मस्त.... यंदा उडीबाबा नाही
मस्त....
यंदा उडीबाबा नाही आले वाटतं
ओंकार धन्यवाद पण आम्हाला
ओंकार धन्यवाद पण आम्हाला ऋतुजा ने बनवलेले जेवण आवडले.. नविन होटेल पण भारी..
तन्मय उडी असतेच
यो
यो
यो जबर्दस्त रे..... भारी
यो जबर्दस्त रे..... भारी लिहिलेस कि रे... फोटो पण मस्त्च...
मस्तच ... सुर्यकिरणांची
मस्तच ...:)
सुर्यकिरणांची पाण्यात उमटणारी झालर......,,, तो फोटो खूपच सुंदर !
लेख आणि प्रचि दोन्हीपण मस्तच
लेख आणि प्रचि दोन्हीपण मस्तच रे !
क्या बात है पावसाळी ट्रेक
क्या बात है पावसाळी ट्रेक सुरु झाले.
जबरद्स्त प्रचि. पुष्करणीचा तर लय भारी ( जल्ला त्याचा वॉमा पाहुन वाटले तु त्या भिंतीवर खडुने तुझ नाव लिहील आहेस )
प्रश्न भरपुर आहेत पण एकच विचारतो.
त्या किड्याचे तोंड कुठे आहे ?
आवडले .
आवडले .
जब-या फोटोज.. आणि
जब-या फोटोज..
आणि 'यो'-लिखाण!!!!!
चावंडच्या गुहांचा फोटू बघायला आवडेल.. सहज उपलब्ध असेल तर...
अप्रतिम फोटोग्राफी !
अप्रतिम फोटोग्राफी !
मस्त रे ... छान लिहिलस..
मस्त रे ... छान लिहिलस.. आवडेश.
सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी.
सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी.
माझी टोपी का रे?
माझी टोपी का रे?
मस्त फोटो आणि वर्णन !!
मस्त फोटो आणि वर्णन !!
Pages