जो जे वांछिल तो ते लाहो... सुमति बालवन - पुणे भेटीचा सचित्र वृत्तांत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 June, 2014 - 11:17

''दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात || ''

राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्थेद्वारे चालविल्या जाणार्‍या सुमति बालवन शाळा व पाखरमाया अनाथाश्रमाच्या संचालिका डॉ. शरयू घोले आम्हाला त्यांच्या संस्थेच्या नावातल्या 'प्राणिजात' शब्दामागची संकल्पना सांगत होत्या. मी, शकुन, सुमति बालवनच्या मानसी देशपांडे आणि डॉ. शरयूताई त्यांच्या गाडीतून शाळेच्या दाराशी उतरलो तसे ह्या 'प्राणिजात' शब्दातून त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे हे उमजू लागले. चिवचिवणारी, प्रसन्न, हसतमुख मुले, उघड्या बोडक्या डोंगरांच्या कुशीत निर्माण केलेली शाळेची ऊबदार वास्तू, कष्टांतून फुलवलेली हिरवाई, निसर्गाशी समतोल राखण्याचे प्रयत्न आणि दुर्दम्य आशेची जोपासना यांमधून हा 'प्राणिजात' शब्द मला सातत्याने खुणावत राहिला...

SB collage4.jpg

पुण्याजवळच्या कात्रज भागातील गुजर निंबाळकर वाडी नावाच्या काहीशा दुर्गम ठिकाणी डॉ. शरयू घोले यांनी गेली अनेक वर्षे पाखरमाया अनाथाश्रम व आजूबाजूच्या भागातील गोरगरीब मुलामुलींसाठी सुमति बालवन शाळा चालविली आहे. ह्या वर्षी महिला दिनानिमित्त आपल्या काही मायबोलीकरांनी केलेल्या सामाजिक उपक्रमात सुमति बालवनचे नाव गरजू संस्था म्हणून सुचविण्यात आले. तेव्हापासून माझ्या मनात या संस्थेला कधी भेट देता येईल ह्याचे वेध लागले होते. जाताना सोबत इतर मायबोलीकरही असावेत ह्या हेतूने मी स्पोकन इंग्लिश वर्गाच्या स्वयंसेवक शिक्षक टीमला विचारले आणि त्यातील साजिरा, शकुन, समीर देशपांडे, आर्या या मायबोलीकरांनी तात्काळ संमती दिली.

दिनांक २१ जून रोजी सकाळी सव्वा अकराचे दरम्यान डॉ. शरयूताईंच्या कारमध्ये आम्ही चौघीजणी, सोबत दुचाकीवरून येणार्‍या कल्पिता व आर्या आणि कात्रज सर्पोद्यान चौकात रस्त्याच्या एका बाजूला आपली कार थांबवून आमची प्रतीक्षा करणारे साजिरा व समीर देशपांडे अशी निघालेली आमची वरात मजल दरमजल करत बारा वाजेपर्यंत शाळेच्या दारात पोहोचली होती. शेवटच्या एक दीड किलोमीटरच्या तीव्र चढणीच्या टप्प्यात रस्ता हा प्रकारच नाही. दगड, मातीचा ओबडधोबड रस्ता. पावसा-पाण्यात ह्या रस्त्यावरून शाळेतली मुले, शिक्षक व इतर कार्यकर्ते कसा प्रवास करत असतील हा विचार मनाला अस्वस्थ करून गेलाच!

शाळेच्या मुख्याध्यापिकांनी आणि तेथील निवासी मुलांवर आपल्या मायेची पाखर घालणार्‍या मावशींनी आमचे दारातच हसून स्वागत केले. दर्शनी भिंतीवर लावलेल्या फळ्यावर मायबोलीकरांच्या स्वागताचा संदेश आणि मायबोलीचे प्रतीक चिन्ह चितारलेले पाहून शाळेने आमच्या स्वागताची तयारी किती अगत्याने केली होती ते जाणवले.

SB collage5.jpg

शाळेच्या अंतर्भागात जाणार्‍या वाटेवरील भिंतींवर रंगवलेली सुंदर कार्टून चित्रे, दुतर्फा लावलेली फुलझाडे व रोपे आणि स्वच्छ परिसर जसा मन प्रसन्न करत होता तसाच मुलांचा किलबिलाटही! आजूबाजूचा निसर्ग कधीचा आम्हाला खुणावत होता. तिथला परिसर बघायला म्हणून बाहेर पडलो तर डोंगर माळरानावरचा सुसाट वारा भोवताली पिंगा घालू लागला. निसर्गाच्या कुशीत, इतक्या शांत परिसरात आणि शहरी जीवनाच्या चकचकाटापासून दूर राहून ही मुलं ह्या शाळेत शिकत आहेत याचा खरोखरी क्षण दोन क्षण हेवा वाटला.

SB collage6.jpg

शरयू ताई व मानसी ताई आम्हाला शाळेबद्दल, त्यांनी राबविलेल्या प्रकल्पांबद्दल भरभरून माहिती देत होत्या. नैसर्गिक स्रोत व ऊर्जेचा वापर, पर्यावरणपूरक जीवनशैली राबविण्याचा प्रयत्न, विज्ञानाची कास आणि मुलांना जीवनमूल्यांची दिलेली शिकवण यांबद्दल त्यांच्याकडून ऐकताना आनंद होत होता. इ.स. २००१ मध्ये ही संस्था स्थापन झाली. शाळेत दीडेकशे मुले शिकतात. ही मुले जवळपासच्या भागातील, गरीब व कष्टकरी समाजातील आहेत. त्यातील जवळपास १५ % मुले शाळेतील वसतिगृहात राहतात. मुलांना शिक्षणासोबतच आपापल्या पायावर उभे राहता यावे म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. त्यांना सकस आहार मिळावा व आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत मिळावी म्हणून संस्था दक्ष असते.

सभोवतालचा परिसर, नवीन वाचनालय व प्रयोगशाळेसाठी सुरु केलेले बांधकाम इत्यादी पाहून आम्ही शाळेच्या अंगणात स्थिरावलो तेवढ्यात शाळेची घंटा वाजली. सर्व वर्गांमधून 'वंदे मातरम्' चे सूर घुमू लागल्यावर आम्हीही ताठ उभे राहिलो. ते सूर विरतात न विरतात तोच वर्गांवर्गांमधून मुलामुलींचे घोळके बाहेर पडू लागले. आमच्याकडे कुतूहलाने पाहणार्‍या या मुलांची मानसी ताई आमच्याशी ओळख करून देऊ लागल्या. कोणी कराट्यांत नैपुण्य कमावणारे तर कोणी वॉल क्लाइंबिंग मध्ये! कोणी योगासनांमध्ये प्रवीण तर कोणी नृत्यात... एक ना दोन!

SB collage7.jpg

शरयू ताई व मानसी ताईंनी विचारताच मुलांनी आपापल्या कलेची प्रात्यक्षिके अतिशय सहजपणे, आढेवेढे न घेता व न लाजता करून दाखवली. भूतनाथचे गाणे मुलांना भलतेच प्रिय असावे, कारण त्या गाण्यावर तब्बल तीन ग्रुप्सनी आम्हाला नृत्य करून दाखवले!! जोशपूर्ण हालचाली, उत्तम परस्पर समन्वय आणि देहबोलीतून जाणवणारा आत्मविश्वास... मजा आली पाहताना!

SB collage12.jpg

मग मुले त्यांनी गेल्या वर्षी नैसर्गिक साहित्य वापरून बनवलेला गणपतीबाप्पा, इतर कलाकृती, चित्रे, स्क्रॅपबुक्स वगैरे घेऊन आली. प्रत्येकाच्या हातातल्या कलाकृतींमध्ये त्यांनी हृदयाशी जपलेली दुर्दम्य स्वप्ने होती आणि डोळ्यांत त्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा निर्धार! आतापर्यंत ह्या शाळेतल्या मुलांना मिळालेल्या वॉल क्लाइंबिंग ट्रॉफीज् पाहिल्या, त्यांना मिळालेली पारितोषिके पाहिली... मनात विचार आला, एवढ्या खडतर परिस्थितीतून आलेल्या या मुलांना हे सारे जमते तरी कसे?

SB collage8.jpg

SB collage3.jpg

त्याचे उत्तर लवकरच मिळाले. मुलांना ही शाळा व संस्था म्हणजे आपले घर वाटते. एखाद्या घरातले मूल जितक्या विश्वासाने व मोकळेपणाने वावरते त्याच मोकळेपणाने येथील मुले वावरतात. त्यांच्यावर प्रेम करणारी, त्यांना आधार देणारी, त्यांना शिस्त लावणारी व वेळप्रसंगी त्यांना रागावणारी मायेची माणसे इथे त्यांना लाभली आहेत. सकारात्मक विचारांना कष्ट व प्रयत्नांची जोड देण्याचे बाळकडू येथे मुलांना लहानपणापासून मिळते. येथील मुले स्वस्थ बसत नाहीत. आपले छंद, अभ्यास यांच्या जोडीला मोकळ्या वेळेत शाळेत व परिसरात श्रमदानही करतात. त्यातून त्यांना परिस्थितीजैविकीचे प्रात्यक्षिक व उत्तम धडे मिळतात.

SB collage11.jpg

SB collage13.jpg

''आम्ही सुरुवातीला येथे फक्त ३ मुलांपासून शाळा व अनाथाश्रम सुरु केला. ह्या भागात स्थानिक मुलांना शिक्षण देणारी अशी शाळा नव्हती. ज्या काही थोड्या शाळा जवळपास होत्या त्या इंग्रजी माध्यमाच्या होत्या. मग आमच्या शाळेत इथल्या भागातली कष्टकरी लोकांची मुले शिकायला येऊ लागली. शाळेत येण्यासाठी रस्ताच नव्हता. आता तुम्ही जो रस्ता पाहत आहात तो गेल्या एक दोन वर्षांमध्ये तयार झाला आहे. तरी शाळेपर्यंत पोहोचणारा थेट असा रस्ता अद्याप झालेला नाही. इथे ह्या भागात पाण्याचीही खूप समस्या आहे. आम्ही ह्या सार्‍या प्रश्नांवर उत्तर शोधायचा प्रयत्न तर करत आहोतच! मुलांना चांगले व दर्जात्मक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. इथे येऊन नियमित स्वरुपात वेगवेगळ्या कला व कौशल्ये शिकवणारे शिक्षक सहसा मिळत नाहीत. तसे आम्ही अगोदर प्रयत्न केले. पण काही काळानंतर त्या लोकांना इथे सातत्याने येणे जमायचे नाही. मग आम्ही मुलांना सायकली घेऊन दिल्या व तेव्हापासून त्यांना जवळपासच्या भागात क्लासला पाठवतो. काही मुले तर चक्क येथून कात्रजपर्यंत सायकलने जातात, तिथून बसने शिवाजीनगरला त्यांच्या क्लाससाठी, तिथून पुन्हा बसने कात्रजला परत येतात व सायकलीवरून मोठा चढणीचा ओबडधोबड रस्ता कापत दुपारी शाळा सुरु व्हायच्या आत शाळेत हजर असतात.''

SB collage9.jpg

''आमच्या शाळेचे शिक्षकही वेगवेगळ्या भागांत विखरून राहतात. इथे कोणतेही सार्वजनिक वाहन थेट पोहोचू शकत नाही. त्यामुळे आमची एक व्हॅन सकाळी शिक्षकांना गोळा करून शाळेत घेऊन येते व परत त्यांना घरी सोडते. एक शिक्षिका तर पार हडपसरवरून इथे येतात. खूप कष्टाळू व गुणी शिक्षक आणि त्या कष्टांचे चीज करणारे विद्यार्थी आम्हाला लाभले आहेत.'' शरयू ताई व मानसी ताई आळीपाळीने आम्हाला सांगत होत्या.

SB collage10.jpg

मुलांच्या सकारात्मक विचारांची झलक मुलांनी सांगितलेल्या अनुभवांमधून आम्हाला मिळतच होती. इथे ही मुलं फक्त मोठी किंवा सुशिक्षित करणे हे संस्थेचे ध्येय नसून त्यांना चांगले नागरिक व एक उत्तम व्यक्ती बनवणे हे ध्येय आहे हे मुलांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होते. मायबोलीकरीण शकुन, साजिरा, समीर मुलांच्या वह्या, पुस्तके बघताना त्यांच्यात पार गुंग होऊन गेले होते. सर्वांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या.

SB collage1.jpg

मधल्या काळात शाळेच्या मावशींच्या देखरेखीखाली बनलेला स्वादिष्ट नाश्ता आमच्या पुढ्यात आला. रुचकर थालिपीठे, काकडीची कोशिंबीर, कैरीचे लोणचे आणि सुमधुर ताक असा जंगी बेत होता. मुलांचे कलाविष्कार पाहत आम्ही नाश्त्याचा आनंद घेतला. नंतर आणखी थोड्या गप्पा झाल्या. फोटो-सेशन तर चालूच होते. शाळेचे वर्ग आतून पाहून झाले. २०१० मध्ये सुपंथकडून शाळेला देणगीदाखल मिळालेली कपाटे पाहिली. नवे बांधकाम पाहिले. शाळेला आणखी वर्गांची गरज आहे हे तर स्पष्ट जाणवत होते. परंतु वर्ग बांधणे हे बरेच खर्चाचे काम आहे. त्यामुळे निधी मिळेल त्याप्रमाणे शाळा हळूहळू हे काम करत आहे. ह्या बाबतीत संस्थेला मदत मिळाली तर हवीच आहे असे शरयूताईंनी आवर्जून सांगितले. ह्या वर्षी त्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमातून मिळालेल्या देणगीतून बांधकामासाठी लागणार्‍या स्टीलची खरेदी केली गेली.

SB collage2.jpg

आम्ही निघालो तशी शाळेतली मुले आम्हाला निरोप द्यायला अगदी दारापर्यंत आली होती. त्यांना भेटून आम्हालाच काहीतरी मोठे गिफ्ट मिळाल्याचा अनुभव येत होता. आपल्यापाशी एवढे सगळे असते तरी आपले चेहरे कितीतरी वेळा जाम त्रस्त असतात. ही मुले ज्या साधेपणाने, आनंदाने व निग्रहाने राहतात ते पाहिल्यावर आपण काय करायला हवे आहे ह्याची जाणीव होते. त्यांच्याकडील स्रोत मर्यादित असतील; पण त्यांची स्वप्ने अमर्याद आहेत. भविष्यात आपण मोठे व्हायचे ह्या ध्येयाबरोबरच आपण आपल्यासारख्या इतरांना मदत करायची आहे हे त्यांनी आतापासूनच मनाशी ठरवले आहे. त्यांच्या ह्या तेजस्वी व सशक्त मनोधैर्याला मनोमन सलाम करूनच आम्ही शाळेचा व मुलांचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो.

प्रकाशचित्रे : सौजन्य : मायबोलीकर शकुन, साजिरा व आर्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचत असतानाच जाणीव होत होती की एखादी संस्था विशिष्ट ध्येय नजरेसमोर ठेवून सुरू तर करता येते, पण तिला सकारात्मक आकार वा रूप येण्यासाठी किती अथक प्रयत्नांची गरज असते आणि ते करण्यासाठी पैसा तर लागतोच, पण त्याहीपेक्षा अत्यंत निरलसपणे या कामासाठी झटणारे हातही अगदी चोवीस तास मिळाले तर हवे असतातच. सुमति बालवन प्रकल्प आणि त्याद्वारे केले जाणारे कार्य याबद्दल अगोदरच थोडीफार माहिती होतीच. शिवाय खुद्द डॉ.शरयू घोले यांच्याशी टेलिफोनवरून माझे जे काही थोडेफार बोलणे झाले होते त्याआधारेही मी संस्थेच्या उदात्त कामाविषयी मनी जे काही चित्र रेखाटले होते त्याचे अगदी सविस्तर रूपच अरुंधती कुलकर्णी यांच्या या लेखाद्वारे समोर आले आहे. सोबतीला संस्थेच्या कार्याची आणि परिसराची दिलेली प्रकाशचित्रे पाहाताना असे वाटत गेले की समाजातील विविध स्तरावरून मिळत असलेले सहाय्य इथे अत्यंत योग्यरितीने वापरले जात आहे.

लेखातील "...त्यांच्याकडील स्रोत मर्यादित असतील पण त्यांची स्वप्ने अमर्याद आहेत...." हे वाक्य खूप काही सांगून जाते किंबहुना लेखाचे हे वाक्य म्हणजे पताकाच होय. अमर्याद स्वप्ने ते पाहातात म्हणजे डॉ.शरयू घोले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तशी स्वप्ने पाहाण्याइतपत त्याना तयार केले आहे असेच म्हणावे लागेल....मुलांच्या या स्वप्नांना सत्यरूप प्राप्त होवो.

त्यांच्या ह्या तेजस्वी व सशक्त मनोधैर्याला मनोमन सलाम >>>> +१००...

_______/\_______

खूपच सुंदर वृत्तांत - अनेक धन्यवाद - अकु ..... Happy

वा अकु, सुरेख आणि सविस्तर वृत्तांत दिलास. धन्यवाद. छान वाटलं वाचताना. मायबोली + मायबोलीकरांचा अभिमान वाटला. एका तळमळीने काम करणा-या संस्थेशी आता आपण कनेक्टेड आहोत ही खुप आनंदाची गोष्ट आहे. सगळ्या सहभागी माबोकर आणि नॉन-माबोकरांना भरपुर शुभेच्छा Happy

माझ्या मुलाचा चौथा वाढदिवस आम्ही सुमती बालवनात जाऊन दिवसभर मुलांसोबत राहून साजरा केला होता. मुलांसाठी मिठाई, प्रत्येकासाठी पुस्तके नेली होती, सोबत घरून जेवणाचे डबे नेले होते. खाणं-जेवणं मुलांसोबतच केलं होतं. तेव्हा तिथल्या मेसमधल्या जेवणाची चव घेतली. जेवण चवदार आणि उत्तम होतं. पोटभरीचं होतं. वाढलेली ताटं मुलं शिस्तीत उचलून नेत होती, जेऊन झाल्यावर नीट साबणाने धुऊन जागच्या जागी ठेवत होती. स्वयंपाकघर स्वच्छ, स्वैपाकाच्या मावशीही स्वच्छ, हस-या आणि मुलांचं हवं-नको मनापासून पाहणा-या होत्या.
नव-याने बालवनातल्या मुलांसोबत सुट्टीतली वर्कशॉप्स केली होती. तेव्हा मुलगाही त्याच्यासोबत महिनाभर रोज बालवनात जात असे. त्यामुळे त्याला तिथला लळा लागलाय. तो बालवनाला 'डोंगरावरची शाळा' म्हणतो. अजूनही ते नेहमी जात असतात.
मला तो बालवनचा परिसर आणि वातावरण अतिशय आवडले. प्रसन्न, हवेशीर टुमदार शाळा आणि हसती खेळती ताणरहित मुलं पाहताना बरं वाटत होतं.

एक सुचवायचे होते. कात्रज चौक ओलांडून कात्रज घाटाच्या दिशेने अर्धा ते पाऊण किमी गेल्यावर डाव्या बाजूला गुजर-निंबाळकरवाडी फाटा लागतो. तशी पाटी आहे मुख्य रस्त्यावर. शाळा कुठे आहे विचारून त्या टेकडीच्या खालच्या रस्त्यावर गाड्या लावून अर्धा किमी वरती चालत जाणे सोयीचे आणि जवळ पडते. वेळ कमी लागतो. शक्य असल्यास पुढच्या वेळी यामार्गे जाऊन पहा. आम्ही असेच जातो म्हणुन सुचवले.

क्या बात अकु.. मस्स्त्त्त लिहिलयस. इथे रहाणारी मुलं हसरी, उत्साही आणि खूप गुणी आहेत. एरवी ७-१० वी मधली किशोरवयीन मुलं पाहुण्यांशी बोलायचं म्हणजे लाजतात/कचरतात. पण ह्या मुलांनी मस्त गप्पा मारल्या, स्वतः ची कला उत्साहानी सादर केली.
संस्थेच्या नावात असलेला 'प्राणिजात' हा शब्द मुलांनी अंगिकारला आहे. त्यामुळेच त्या परिसरात पाणी टंचाई आहे तरी शाळेच्या आवारात खूप झाडं आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅस प्रकल्प आहेत. शा़ळेच्या आवाराला कुंपण घालायला पण मुलांनी मदत केलीय. 'शोषखड्डा' अशी एक पाटी आवारात होती. पण ते काय होतं ते विचारायचं राहिलंच. Happy
शाळेच्या बैठ्या इमारती, मधे फरशी घातलेलं अंगण आणि सभोवती मोकळे आवार. इट्स अ ड्रीम स्कूल Happy रोज क्लासला जायला वापरणार्‍या सायकल ला मुलं थँक्यू म्हणतात. सकारात्मक विचार केला की जगातल्या चांगल्या गोष्टी आपल्या कडे आकर्षित होतात असा विश्वास शरयू ताई आणि मानसी ताईंनी त्यांच्या मनात रुजवला आहे. हॅट्स ऑफ टू देम.
सुमती बालवन ची ओळख करून दिल्याबद्दल थॅन्क्स टू अरूंधती. इथल्या गुणवंत मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवायला आणि शाळेला पुन्हा पुन्हा भेट द्यायला मला खूप आवडेल.

वा! अकु तुझे हे असे वृत्तांत खूप प्रेरणादायी असतात आणि जगात कुठेतरी काहीतरी चांगलं घडतंय असा दिलासा देणारेही. खूप छान.

वा अकु! सुरेख वृत्तांत!! सई आणि शकुन, तुमचं अ‍ॅडीशनही आवडलं. Happy
सामाजिक उपक्रमांतर्गत आपण मायबोलीकर अश्या गरजू संस्थांना मदत करतो ह्याचा फार अभिमान वाटतो.
अकु तुझे हे असे वृत्तांत खूप प्रेरणादायी असतात आणि जगात कुठेतरी काहीतरी चांगलं घडतंय असा दिलासा देणारेही. खूप छान. >> +१

सर्वांना धन्यवाद! Happy

सई, थँक्स! कल्पिताला पहिल्यांदाच भेटले आणि तिला थेट डोंगरावरच्या शाळेत घेऊन गेले! पण तिलाही खूप आवडली शाळा हे कळाल्यावर बरे वाटले.

शकुन, सायकलला थँक्स म्हणणारी ही मुलं ज्या मोकळेपणाने तुझ्याशी बोलत होती त्यावरून त्यांचे शिक्षण योग्य दिशेने चालू आहे हे कळत होते. स्पोकन इंग्लिश >> नोंदत आहे गं! अवश्य. इथेही मुलांना इंग्लिशच्या सरावाची गरज आहेच!!

मुलांनी स्वहस्ते बनविलेले इको फ्रेंडली गणपतीबाप्पा व गणोबाचे चित्र!

Sum Gan1.jpg

आणि हे छोटे मूर्तिकार आपल्या मनाजोगती मूर्ती बनवत असताना...

sum gan2.jpg

यावर्षीही मुलांनी मस्त बाप्पा बनवलेत. यंदा शाळेत नेपाळची तीन मुले दाखल झाली आहेत. मुले बाप्पा बनवत असताना टिपलेले हे काही क्षण....

१)

sb1.jpg

२)

sb2.jpg

३)

sb3.jpg

४)

sb4.jpg

५)

sb5.jpg

६)

sb6.jpg

७)

sb7.jpg

८)

sb8.jpg

९)

sb9.jpg

१०)

sb10.jpg