महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समधलं काम दुपारीच संपलं. मित्राला फोन केला. त्याला संध्याकाळशिवाय ऑफिसातून निघणं शक्य नव्हतं. जवळजवळ ३ तास होते. लगेच बस पकडली आणि चर्चगेटला आलो. 'सुखसागर' मधला 'नीर डोसा' हादडला आणि जवळच असलेल्या मरीन ड्राईव्हला आलो. कट्ट्यावर चढून ओबेरॉय हॉटेलपर्यंत चालत गेलो आणि परत आलो. मोकळी जागा बघून बसलो. त्या अनंत जलाशयाच्या लाटा फेसाळत समोरच्या उभट, गोलसर, त्रिकोण वगैरे आकाराच्या सिमेंटच्या दगडांवर फुटत होत्या. मुंबईला येऊन, मरीन ड्राईव्हला बसून स्वत:शी, हवेशी, समुद्राशी गप्पा मारायची आजकाल अनेकांची एक काव्यात्म इच्छा असते. पण खरं तर इथे बसल्यावर मला काहीच सुचत नाही. कदाचित तो भन्नाट वारा सगळे विचार उडवून नेत असावा. औरंगाबादला राहून ह्याच समुद्रासाठी मी लिहिलं होतं -
तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही
आता काही सुचत नव्हतं. सुचावं, असं वाटतच नव्हतं.
जून महिन्याचा उत्तरार्ध होता. आत्तापर्यंत पाऊस मुंबईला दोन-तीनदा तरी स्वच्छ धुवून काढतो. पण ह्यावेळी पाऊस नव्हता. हवा मात्र ढगाळ होती, त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हताच. त्यामुळे माझ्यासारखे बरेच जण दुपारच्या वेळीही शांतपणे बसून होते. ह्या मुंबईची अनन्वित घाण पोटात घेऊनही खिदळणारा तो समुद्र रोज काय काय बघत असेल ? त्याच्या मर्जीविरुद्ध त्याचा वापर करून बधवार पार्कच्या किनाऱ्यावर कसाब आणि त्याचे साथीदार आले होते. कफ परेड, मरीन ड्राईव्ह, नेपियन सी सारखे उच्चभ्रू भाग आणि वरळी कोळीवाडा, माहीमची खाडी सारखे निम्नमध्यमवर्गीयांची खुराडी असलेले भाग हा समुद्र एकाच वेळी बघतो.
'माहीम' म्हटल्यावर मित्र आठवला. तो चर्चगेटला भेटणार होता, तिथून आम्ही माहीमपर्यंत एकत्र जाणार होतो. चर्चगेट स्टेशनला आलो. एक नंबरच्या फलाटावर एका चौथऱ्यावर बसून मी येणाऱ्या, जाणाऱ्या, गाडीतून उतरणाऱ्या, गाडीत शिरणाऱ्या लोकांना न्याहाळत बसलो. पुरुष, बायका, मुलं, मुली, म्हातारे, अपंग, भिकारी, मालवाहक, तिकीट असलेले, विनातिकीट पकडलेले, पोलीस, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, रिकामटेकडे, मवाली, तृतीयपंथी, सुंदर, कुरूप वगैरे हजारो चेहरे. हजारो ते जे मी पाहिले, त्यापेक्षा किती तरी पट माझ्या नजरेतून सुटलेही असावेत. माणसांची एक फळी जात होती, दुसरी येत होती. समुद्राच्या एकामागून एक लाटा याव्यात तश्या. अविरत.
मनात क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार येत होते.
ह्या प्रत्येक चेहऱ्याची किमान एक वेगळी समस्या असेल. प्रत्येकाची एक कहाणी असेल. एक विचारसरणी असेल. ह्या जागेवर कुणाचा प्रवास संपला असेल, कुणाचा सुरु होत असेल, तर कुणाचा अजून बराच बाकी असेल. कुणी आज प्रचंड आनंदी असेल, कुणी अतिशय दु:खी असेल.. पण तरी वेळ थांबत नाहीये. आयुष्य पुढे जातंच आहे. जिथे नेईल तिथे हे सगळे मुकाटपणे जात असावेत.
अपनी मर्जी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर है उधर के हम है
निदा फाजलींनी हे शब्द ह्या चाकरमान्यांसाठीच लिहिले असणार, नक्कीच.
'शहर' असलेले काही शेर उगाच आठवले. इतर काही गाणी आठवली. कविता आठवल्या. मनात सगळ्यांनी एकत्र येऊन एक कल्लोळ केला. मनात हा कल्लोळ आणि बाहेर माझ्या भोवताली नुसती धावपळ. उद्घोषणा, धाडधाड गाड्या, त्यांचे भोंगे.
कर्कश्श्य !
अनेक अस्वस्थ चेहऱ्यांमध्ये माझाही एक भेदरलेला चेहरा त्या क्षणी मिसळला असावा. कुणी उशीर होतोय म्हणून बेचैन होता, तर कुणी अंगातल्या घामाच्या धारांनी बेचैन होता, कुणी अजून कशाने, पण मी विचारांच्या थैमानाने अस्वस्थ होतो.
लोक म्हणतात, मुंबई थकत नाही, हरत नाही. बरोबर आहे, हे शहर थकत नाहीच. पण लोक मात्र थकतात. अश्याच एखाद्या ट्रेनमध्ये स्फोट झाला असेल. अश्याच एका स्टेशनवर गोळीबार झाला असेल. प्रत्येक आघाताने लोकांची एक फळी बाद होत असते. काही गडप्प होतात तर काही गप्प होतात. गेलेल्या फळीच्या जागी दुसरी फळी मोर्चा सांभाळते. शहर थकत नाही, थांबत नाही, हरत नाही. लोक बदललेले असतात.
मित्राची गाडी आली. मित्रही आला. समोरच्याच गाडीत शिरून दरवाजा पकडला. गाडी सुरु झाली. गप्पा सुरु होत्याच. चालत्या लोकलच्या दरवाज्यात लागणारी हवा आणि मघाची मरीन ड्राईव्हची हवा ह्यातला फरक मी शोधत होतो. माहीम स्टेशनच्या बाहेरील टपरीवर आम्ही एकेक कटिंग प्यायलो आणि गप्पा मारत चालत निघालो. माहीम टी-जंक्शनपर्यंत आलो. इथून तो त्याच्या घरी आणि मी चेंबुरला. समोर कलानगरहून येणारा सहा पदरी रस्ता आणि पुढ्यात आडवा सायनहून माहीमकडे जाणारा दुसरा सहा पदरी रस्ता. दोन्ही रस्ते एखाद्या कोसळत्या धबधब्याप्रमाणे अंगावर येत होते. ह्या 'T' च्या दोन्ही कोनांत माहीमच्या खाडीला जाऊन मिळणारी गलिच्छ 'मिठी' नदी आणि माझ्या पाठीमागच्या बाजूस एक मोठा कत्तलखाना अन् दुतर्फा विस्तारलेली धारावी. ही मिठी नदी तीच जिचं एक भलंमोठं गटार केलं जाऊन कागदोपत्री तिचा उल्लेख 'नाला' करून तिला हिणवलं गेलं आणि २००५ साली जिने त्याचा बदला घेतला. दोन्हीकडून येणारे घाणेरडे वास नाकातले केस जाळत होते. रस्ता क्रॉस करून मी त्या गटाराच्या जवळजवळ मिठीत असलेल्या बस थांब्यावर गेलो. बस लगेच आली. सायनपर्यंत जाऊ शकत होतो. तिथून रिक्षा केली आणि घरी पोहोचलो.
दिवसभराच्या पळापळीने अंगाचा चिकचिकाट झाला होता. भूक लागावी, तशी अंघोळ 'लागली' होती. स्वच्छ झालो आणि त्या सातव्या मजल्यावरील घराच्या मोठ्या ७ फुटी खिडकीत येऊन उभा राहिलो.
पूर्व द्रुतगती महामार्ग अजगरासारखा पसरला होता. त्या विशाल अजगराच्या सुस्त शरीरावरून निरनिराळ्या रंगांच्या लहान-मोठ्या मुंग्या एका शिस्तीत पुढे पुढे जात होत्या. रस्त्याच्या पलीकडे एक १७ मजली आणि एक अजून किती तरी मजली टॉवर अत्यंत माजोरड्या नजरेने सभोवताल पाहत होते. मघाची 'धारावी' कुठल्या कुठे होती. पण ह्या माजोरड्यांच्या मागे, डावी-उजवीकडेही एक बकाल वस्ती सांडलेली होती. रस्त्यावरच्या झगमगाटाच्या अर्धवट उजेडात मला त्या झोपड्यांच्या डोक्यांवर लागलेल्या केबल टीव्हीच्या छत्र्या दिसत होत्या. धारावी, बेहरामपाडा ह्या व अश्या भागात मी अनेकदा फिरलेलो असल्याने मला समोरच्या वरवर बकाल दिसणाऱ्या वस्तीतही काही घरांत एसी लावलेले असावेत, हे जाणवत होतं.
असो.
मी डोक्यावर घरघरणारा पंखा बंद केला आणि बाहेरच्या खोलीत येऊन तिथल्या पंख्याखाली डोळे मिटून सोफ्यावर बसलो. मिटलेल्या डोळ्यांसमोरून 'टी-जंक्शन' चे दोन विस्तीर्ण रस्ते आणि आत्ताही कानांना मरीन ड्राईव्हच्या समुद्राच्या गाजेप्रमाणे जाणवणारा पूर्व द्रुतगती महामार्ग हलत नव्हता. आता गुलजारनी छेडलं..
इन उम्रसे लम्बी सड़कों को मंजिल पे पहुँचते देखा नहीं
बस दौड़ती फिरती रहती हैं हमने तो ठहरतें देखा नहीं
इस अजनबी से शहर में जाना-पहचाना ढूँढता हैं......
चार-सहा महिन्यांतून जेव्हा कधी मुंबईची वारी होते, कमी-अधिक फरकाने हा अनुभव येतोच येतो. मी मुंबईचा असलो, तरी मुंबई माझी नाही झाली. माझीच काय ? ती कधीच कुणाचीच नाही झाली. नामदेव ढसाळ तिला 'रांड' म्हणतात, तेव्हा मला आवडत नाही. पण तिला फार तर 'प्रेयसी'च म्हटलं जाऊ शकेल. अर्धांगिनी नाही. आई, बहिण नाही. आणि मैत्रीणही नाहीच. हिचं रोजचं रूप वेगळं असलं तरी नखरा तोच. ही नादाला लावते. ही बोलावते, पण स्वत: येत नाही. ही भेटली, तरी समाधान होत नाही.
रात्रीच्या बसने मी परत औरंगाबादला जाणार. ह्याही वेळी अर्धवट समाधान आणि बाकी हुरहूर उरात घेऊन. पुढच्या भेटीपर्यंत मी पुन्हा व्याकुळ होईन. असे माझ्यासारखे लाखो असतील. पण मुंबईला फरक पडत नाही. ती वाहतच राहील, धावतच राहील, थकणार नाही, हरणार नाही आणि थांबणारही नाही. ती साद देईल आणि मी पुन्हा एकदा मूर्ख प्रेमिकासारखा ओढला जाईन.
पुढच्या वेळेसही हे समोरचे माजोरडे टॉवर असेच छद्मी हसतील. कदाचित त्यांच्या जोडीने अजून दोन उभे राहिलेले असतील.
....रसप....
२४ जून २०१४
खुप मस्त.. .एकदम आवडले.. पण
खुप मस्त.. .एकदम आवडले..
पण तिला फार तर 'प्रेयसी'च म्हटलं जाऊ शकेल. अर्धांगिनी नाही. आई, बहिण नाही. आणि मैत्रीणही नाहीच. हिचं रोजचं रूप वेगळं असलं तरी नखरा तोच. ही नादाला लावते>>>> +१००००००००
आवडले....
आवडले....
मुंबई माझी नाही झाली. माझीच
मुंबई माझी नाही झाली. माझीच काय ? ती कधीच कुणाचीच नाही झाली.>>
इथे मला थोडं अडकायला झालं.. नाही झाली पेक्षा झाली नाही अधीक जमलं असतं!
असो.
छान जमुन आलीय ..
मस्त ..आवडलं..
मस्त ..आवडलं..
इन्द्रधनु, तसंही चालेल. पण
इन्द्रधनु,
तसंही चालेल. पण काही फरक पडेल असं वाटत नाही. अगदीच आग्रह असेल तर करतो बदल. कारण मला ते किरकोळ वाटतं आणि किरकोळ बदलांनाही अडेलतट्टूपणे नाकारणार्या नवकवींपैकी (लेखकांपैकी?) मी नाही !
धन्यवाद !
छान ...आवडले
छान ...आवडले
मस्त खुपच
मस्त खुपच आवडले...
खासकरुन.....
पण तिला फार तर 'प्रेयसी'च म्हटलं जाऊ शकेल. अर्धांगिनी नाही. आई, बहिण नाही. आणि मैत्रीणही नाहीच. हिचं रोजचं रूप वेगळं असलं तरी नखरा तोच. ही नादाला लावते
खुप छान लिहिले आहे ... खरच
खुप छान लिहिले आहे ... खरच मुम्बै नगरी आहेच अशी .. नादाला लावनारी...मी पन राहिलो आहे ८ वर्ष इथे... आता पुन्यात आलो.. पन आजहि जेव्हा काहि कामासाठि जातो.. तेव्हा नेहमीच हा अनुभव येतो... ती साद देते .. आणि आपण ओढलो जातो...
धन्यवाद !!
धन्यवाद !!
मला आवडलं.. खुपसे माझेच
मला आवडलं.. खुपसे माझेच वाटले. केनयातली काही वर्षे सोडली तर माझे वास्तव्य कायम समुद्राजवळ राहिलेय.
ताकापुना, कंताब, कोर्निश, अल अश्करा, पोर्ट हारकोर्ट, लुआंडा, बेनेफिका...... सर्व सुंदर समुद्रकिनारे.. पण
आपल्या नरीमन पाँईंट, गिरगाव, महालक्ष्मी, दादर, जुहू, मनोरी, वसई, अर्नाळा बद्दल जी आपुलकी वाटली, ती नाहीच वाटली.. आणि मुंबईबद्दल काय लिहू... विमानाच्या खिडकीच्या काचेला नाक लावून बघताना मुंबईचा किनारा ज्यावेळी दिसू लागतो... त्यावेळी सर्व बालपण, शिक्षण, सवंगडी आठवून जातात.
पण एकतर्फी नाही यार.. मुंबईदेखील तूमच्यावर तेवढेच प्रेम करते.
अगदि खर .. हक्काची वाटते ..
अगदि खर ..
हक्काची वाटते .. पण पुर्णपणे नाही .. तो हक्क गाजवावासा वाटत नाही .. कधीच नाही ..
अगदी खरय. मला वैयक्तिकरित्या
अगदी खरय. मला वैयक्तिकरित्या मुंबई भावत नाही. (कारण फक्त वातावरण आणि गर्दी :()
पण जे जे लोक मुंबईत राहतात ते लोक तुझ्याइतकंच मुंबईबद्दल आत्मियतेने बोलतात.
मुंबई खरंच प्रेयसी आहे.
छान लिहीलेय.
छान लिहीलेय.
लेख सुंदर. मुंबई कशीही असो.
लेख सुंदर.
मुंबई कशीही असो. ती भावतेच. ती अंगावर येते. तिचे व्यसन लागते. तिचा जिवंतपणा आपल्याही रक्तात भिनतो. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचे मोल कळते. खरे तर इथे कितीतरी गोष्टींचे मोल कळते. उन्हातान्हात वणवण केल्यानंतर मिळालेले थंड पाणी, मध्येच आलेली एक छोटीशी हवेची झुळूक,जिवापाड श्रम केल्यानंतर मिळालेला थोडासा विसावा,विरंगुळा, खूप ताटकळल्यावर मिळालेली चौथी सीट.. सगळ्या क्षुल्लक गोष्टींचे मोल इथे कळते आणि आपल्याला विनम्र बनवते. त्यामुळेच कदाचित मुंबईकर माजासाठी प्रसिद्ध नाहीत.
आणि इथला पाऊस. गेट्वेचा, माहीम कॉज्वेचा, गांधी-टेकडीवरचा, सं.गां. उद्यानातल्या पायवाटांवरचा, मार्वे-मनोरी तरीत खाडीमध्यातला, विपश्यनापॅगोड्याच्या आत बसून बाहेर घुमणारा..आत ओंकाराचा नाद आणि बाहेर पावसाचा..घनगंभीर. तुंगारेश्वराच्या वाटेवर ओढ्यांतल्या कंबरभर पाण्यात जीव धारेला लावणारा..
इथला समुद्रही तसाच. एखाद्या कंगाल दुर्दैवी मातेने त्याही स्थितीत आपल्या कच्च्याबच्यांना आपल्या मिठीची ऊब द्यावी तसा मुंबईला आपल्या कवेत घेणारा, तिला धीर देणारा, तिची सीमा-मर्यादा राखणारा कृष्णकाळा सावळा.
ता. क. वाक्यातला शब्दांचा क्रम बदलू नये. त्यात एक लय आहे. क्रियापद शेवटी ठेवले तर ते वाक्य सपाट होईल. एक सरळसोट विधान (प्लेन स्टेट्मेंट) ठरेल.
आवडलं. असं काही वाचलं की
आवडलं. असं काही वाचलं की मुंबईची भयंकर आठवण यायला लागते.
काय बोलू यार .. काही
काय बोलू यार .. काही महिन्यांपुर्वी मुंबईतील एक घर विकायची दुर्बुद्धी झाली होती जी मोठ्या मुश्किलने टळली.. त्यानंतर मुलगी झाली , काल हा विषय निघाला की नशीब तो वेडेपणा केला नाही.. आणि आज हा लेख .. मुंबई मेरी जान, नेहमीच !!!
शब्द न शब्द भिडला. खिदळणारा
शब्द न शब्द भिडला. खिदळणारा समुद्र, बेचैनी, आंघोळ लागणे अगदी अगदी...
धन्यवाद !! __/\__
धन्यवाद !!
__/\__