माझे विस्मृतीत गेलेले निकाल

Submitted by रसप on 18 June, 2014 - 01:00

परीक्षा म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक सोहळाच असायचा. माझी प्रत्येक परीक्षा अत्युत्कृष्ट व आनंददायीच गेली. गडबड फक्त निकालात व्हायची. पण अतीव क्लेश दिलेल्या घटना लक्षात न ठेवता पुढे जात राहावे, ह्या विचारावर माझा दृढ विश्वास असल्याने आता मला माझ्या कुठल्याही परीक्षेतले गुण आठवत नाहीत. एव्हढे नक्की की, प्रत्येक वेळी ते नेत्रदीपकच होते.

घटना लक्षात नसल्या तरी काही क्षण मात्र आपल्या नकळतच आपल्या मन:पटलावर कोरले जातात. दहावीच्या निकालाचा क्षणही असाच काहीसा होता.
परीक्षा संपल्यापासून मला एकच आनंद होता की, 'परीक्षा संपली !'
दहावीची परीक्षा होऊन, निकाल लागून, मिळेल त्या मार्कांसह, मिळेल त्या कॉलेजात प्रवेश घेणेच मला जास्त महत्वाचे वाटत होते. कारण वर्गातल्या प्रत्येक मुलीकडून जबरदस्तीने राखी बांधून घ्यायला लागणाऱ्या काळात माझे शालेय शिक्षण झाले. माझ्या मनात मी एक वैश्विक भाऊ त्याच्या मर्जीविरुद्ध मारून मुटकून कोंबला होता. निकालपत्र हाती पडताच त्यातील आकड्यांपेक्षा Passed ह्या शेऱ्याचे मला कौतुक होते. आता घुसमट होणार नाही, हाच एक मोठा आनंद माझ्या मनातून वाकड्या झालेल्या टिफिनमधून बाहेर येणाऱ्या भाजीच्या रश्श्याप्रमाणे हळूहळू ओघळत होता. मिळालेल्या गुणांचं मला सुतक वगैरे अजिबात नव्हतं.

माझे गुण मला नेमके आठवत नसले तरी त्यांचं एक चांगलं होतं. ते अश्या टप्प्यातले होते की माझ्यासमोर शाखा व कॉलेज ह्यांचे फार मोजकेच पर्याय होते. इतर अनेक मुलांना विशिष्ट शाखा व विशिष्ट कॉलेज निवडण्यासाठी करावा लागलेला संघर्ष मला अजिबात करावा लागला नव्हता. मी जी शाखा व जे कॉलेज निवडले, तिथे माझा नंबर शेवटच्या यादीत अगदी सहज लागला. 'कॉलेजला जाणार' ह्याच आनंदात हुरळून गेलेल्या आपल्या निरतिशय निरागस मुलाच्या चेहऱ्यावरचे निष्पाप हसू माझ्या आई, वडील व ताईला मी सदासुखी होणार असल्याची ग्वाही देत होते.

हिरवट मिसरूड फुटलेला पंधरा-सोळा वर्षांचा मी पहिल्या दिवशी कॉलेजला मोठ्या टेचात गेलो होतो. नवा कोरा शर्ट आणि जीन्स, हँगरला लटकवलेल्या कपड्यांसारखे दिसत असले तरी माझा तोरा मात्र मी स्कीनफिट्ट टी-शर्ट घातल्यासारखाच होता. तेल थापून चापून बसवलेले आणि कोंबडा काढलेले केस मला जॉय मुखर्जीसारखा लुक देत असले तरी माझ्या नजरेत मात्र मी तुरा काढलेला आमीर खानच होतो.
लौकरच मी माझ्या भोवतालच्या माधुरी दीक्षित्स, काजल्स, राणी मुखर्जीज चाणाक्ष नजरेने हेरल्या. पण मी जिथे जिथे नेम लावायचो, ते ते लक्ष्य माझा बाण सुटायच्या आतच दुसऱ्याच एखाद्या बाणाने उडवले जात असे. मग हळूहळू मी नेम धरणंच सोडून दिलं. तरी अंदाधुंद तिरंदाजी चालूच ठेवली.
स्वभावत:च खोलाकडे वाहत जाणाऱ्या पाण्याप्रमाणे मीही दुसऱ्या मजल्यावरील अकरावीच्या वर्गाकडून कॉलेजबाहेरच्या रस्त्याकडेच्या कट्ट्यावर लौकरच वाहत पोहोचलो. देशासमोर असलेल्या खेळ, राजकारण, सुरक्षा, सामाजिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती ई. आणि इतर मुलांसमोर असलेल्या प्रेम, शिक्षण, तात्विक मतभेद, घरच्यांचा त्रास, आर्थिक चणचण ई. गहन प्रश्नांवर मी रोज, माझ्यासारख्याच इतर काही हौशी स्वयंसेवकांसह चर्चा, मार्गदर्शन करत असे. आमच्या चर्चांतून मौलिक ते शिकून बरेच जण पुढे गेले पण आम्हाला कधी त्याचायत्किंचितही मत्सर वगैरे वाटला नाही. परंतु, ह्या सगळ्या व्यापात माझी कनिष्ठ महाविद्यालयातली दोन वर्षं विदर्भ, मराठवाड्याच्या आकाशातल्या ढगांप्रमाणे चुटकीसरशी निघून गेली आणि समोर बारावीची परीक्षा रुक्ष दुष्काळासारखी 'आ' वासून उभी राहिली. वर्षातले बहुतेक दिवस कॉलेजबाहेरील कट्ट्यावर मीच इतरांचा क्लास घेत असल्याने मला स्वत:ला अभ्यासासाठी वेळ मिळणं कठीण होतं. पण माझी ही प्रामाणिक अडचण बोर्ड समजून घेणार नव्हतंच आणि ज्याप्रकारे मला पाचवीत असताना नृत्यकौशल्याच्या नावाने बोंब असतानाही केवळ उंची कमी असल्याने पुढच्या ओळीत राहून ग्रुप डान्स करावा लागला होता, त्याच प्रकारे ह्या परीक्षेलाही बसावंच लागलं.
अखेरच्या षटकात ४० धावा हव्या असताना, अखेरचा खेळाडू प्रत्येक चेंडूला ज्या तावातावाने टोलवत अशक्यप्राय आव्हानाचाही पाठलाग करतो, त्याच लढाऊ बाण्याने मी प्रत्येक पेपर टोलवला होता, इतकंच मला लक्षात आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष निकाल मी कधीच विसरून गेलो आहे.

आजकालच्या मुलांना, एक डोळा बंद करून पेपर लिहिला तरी नव्वद-बिव्वद टक्के मिळतात. मला त्यांची एकच काळजी वाटते की इतके मार्क्स मिळाल्यावर पुढे नक्की काय करायचं ह्या विचाराने ते किती गोंधळत असतील. Thank god, मला असा प्रश्न कधी पडलाच नाही. कारण हा प्रश्न माझ्यासाठी माझ्या निकालानेच निकालात काढलेला असायचा.

जाता जाता एक विचार मनात आला. गुण लक्षात न राहण्यामागे अजून एक कारण असावं. गेल्या कित्येक वर्षांत मला कुणीही त्यांबद्दल विचारलंच नाहीये ! असं का बरं ?

....रसप....
१८ जून २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/06/blog-post_18.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय, आवडलं.

शेवटची ओळ तर अगदी मस्त, एकदा १० वी, १२वी चा टप्पा पार करुन गेलं की कुणी विचारतही नाही मार्कस पण त्या मार्कांपायी किती मेहनत, ताण-तणावांचा सामना विद्यार्थी आणि त्यांचे पालाक करताना दिसतात.

Happy

mast Happy

............... १५ वी चा शेवटचा पेपर देउन वर्गा बाहेर पडल्यापडल्या भीष्म प्रतिज्ञा केलेली ..." या पुढच्या आयुष्यात कोणताही परिक्षेचा पेपर लिहिणार नाही" ........ Biggrin