तुकोबांची अभंगगाथा - परम अर्थ एक वाक्यता अर्थात तुकोबा वन लायनर - भाग ४
"आपुला तो गळा घेई उगवोनी...." अशा अर्थाचे बुवांचे एक वचन आहे. यात ते म्हणतात जगरहाटी ही अनंतकाळापासून जशी चालायची तशी चाललीच आहे, पुढेही अशीच चालणार आहे. ज्याला ज्याची आवड आहे ते तो करीत असतो. ज्याला गायनाची आवड तो बरोबर त्यातील दर्दी, दिग्गज व्यक्तिकडे जाईल, गाणे शिकून घेईल. तसेच इतरांच्या बाबतीतही होय. पण असे मात्र होऊ शकणार नाही की आपली आवड जोपासताना तो इतरही अनेक कलागुणांमधे पारंगत होईल.
ज्याला परमात्माच हवा आहे त्याने बाकी कशाच्या मागे न लागता परमात्मा कसा आपला होईल ते मुख्य पाहावे.
उ. झाकीर हुसेन यांची एक आठवण आहे. लहानपणी त्यांना क्रिकेटचे वेड होते. पण घरात त्यांचे वडिल उ. अल्लारखाँसाहेब त्यांना हमखास तबल्याच्या रियाजाला बसवत. लहानगा झाकीर रियाज चुकवून क्रिकेट खेळायला जायचा. एकदा अल्लारखाँसाहेबांनी चिडून झाकिरच्या एक मुस्कटात लगावली व बजावले - एक तर क्रिकेटर तरी हो नाहीतर तबलजी तरी- बोल काय ठरवतोस ? उ. झाकीर हुसेन म्हणतात - तो एक फटका मला नीट शिकवून गेला आणि मी पूर्ण वेळ तबल्याला वाहून घेतले.
तसेच परमार्थातही आहे.
जो परमार्थी आहे (ज्याला देव आपलासा करुन घ्यायची इच्छा आहे) त्याने असे पहावे की या जन्मात मी हे परमात्मप्रेम मिळवीनच मिळवीन. बाकीच्या ऐहिक गोष्टी मिळाल्या न मिळाल्या तरी चालतील. परमात्मप्रेम ही जी मुख्य गोष्ट मला मिळवायची आहे त्याकडेच सगळ्या जीवनाची दिशा वळवून मी प्राणपणाने प्रयत्न करीनच करीन.
आपण संसारात जी सुखे-दु:खे भोगत असतो ती चिरकाल टिकणारी नाहीयेत. ती येतील आणि जातीलही. मी जर त्यातच गुंतून पडलो तर हा जन्म तर वाया जाणारच पण पुढच्या जन्माचीही तयारी मी करुन ठेवत असतो. असे किती जन्म आले आणि गेले त्याला गणनाच नाही.
बुवांसारखे थोर सद्गुरु आपल्याला ही गोष्ट सांगताना कधीही कंटाळत नाहीत की आपल्याला काही शासनही करीत नाहीत. ते पुन्हा पुन्हा, न कंटाळता सांगतात की याच जन्मात परमात्म्याची ओळख करुन घेणे शक्य आहे - अतिशय तळमळीने त्याला हाका मारीत रहा. आपली विहित कर्तव्यकर्मे करीत रहा. आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली "त्या"च्याकडे जायचा प्रयत्न करा.
या परमार्थाच्या वाटचालीत जेव्हा केव्हा आपला धीर खचेल, जेव्हा केव्हा आपल्याला निराशा येईल तेव्हा जरुर बुवांना तळमळून, आर्ततेने हाक मारा - पक्की खात्री असू द्या- बुवा कधीही नाही म्हणणार नाहीत पण नक्की धावून येतीलच येतील. त्यांचे अंत:करण आईचे आहे, लेकराने कधीही हाक मारली तरी आई धाऊन येतेच येते - आपण लेकरु होणे फार गरजेचे आहे.......
आकाशासारखे तुकोबा अमर्याद आहेत, त्यांचे अभंग वाचत असताना जो काही अनिर्वचनीय आनंद होतो त्याचे कारण बुवाच अशावेळी आपल्या बरोबर असतात. अशा स्मर्तृगामी बुवांचे नित्य सान्निध्य सर्व तुकोबा प्रेमींना लाभो ही बुवांच्या चरणी मनोभावे प्रार्थना.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
१५१] सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका |३०९९|
- हे तुकोबाच म्हणू जाणे. तेच खरे स्थितप्रज्ञ होत.
१५२] माझा पाहा अनुभव । केला देव आपुला
- आणि देव म्हणेल या भक्तामुळेच मी देवत्व पावलो, धन्य झालो ...
१५३] जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर |३१०१||
- तुकोबांच्यामते हे खरे शूरत्व, एरव्ही संसारानेच सगळ्यांना इतके वेढून टाकलंय की ते कोणाच्या लक्षातदेखील येत नाहीये ...
१५४] सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥
न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥ ३११३||
- मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी |
तरीच तत्वता क्षणात हाता येते सहज समाधि ||-स्वामी स्वरुपानंद||
१५५] नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम ॥३॥३११८||
-गाथा "नीट" वाचल्यावर हा दुसरा चरण कोणालाही नक्कीच भावेल ....
१५६] रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही |३१२०|
- साधा सरळ उपदेश ....
१५७] तुका म्हणे धन । ज्याचें वृत्ति नारायण
- नारायणमय वृत्ती होणे हीच खरी संपत्ती.
१५८] तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा
- परमार्थात एकांताचे फार महत्व आहे.
जयास एकांत मानला | सर्वा आधी कळे तयाला | श्रीसमर्थ |
१५९] बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे
- परमार्थ हा काय बोलून दाखवायचा आहे ? हा केवळ अनुभवाचाच प्रांत
१६०] तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती |३१३७|
- किती सार्थ अभिमान आहे बुवांना - विठ्ठलाचे दास म्हणवून घेण्यात. उगाच कोणाकडेही काकुळतीने बघणारांपैकी थोडेच आहेत ते ??
१६१] मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई विवळते (लटिक्या - खोट्या, घाई -घावाने, विवळते =विव्हळते)
- कसे रोख ठोक सांगणे आहे. स्वप्नात आपल्यावर कोणी तलवारीने वार केला तर उगाच ओरडून काय उपयोग ??? त्या झोपलेल्याला जागे केले की झाले काम .... ( म्हणूनच कठोपनिषदातही म्हटलेच आहे - उत्तिष्ठत् , जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत .... )
आत्मैव आत्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मना - तिथे देव काय करणार ??
१६२] आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
तुका म्हणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ति मागें ॥३॥
- उगाच सुखाच्या (सुखाच्या कल्पनेच्या) मागे कशाला धावता, एक देव आपलासा करुन घ्या आणि पहा सुखरुपच व्हाल तुम्ही. या देहभावाला पूर्णतः टाकून द्या म्हणजे मग तुम्ही स्वयं देवरुपच आहात हे लक्षात येईल - तीच खरी किर्ती.
१६३] स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी
- बुवांसारखा खरा भक्तच हे म्हणू शकतो - स्तुती अथवा निंदा करायचीये ना - देवाचीच करा ...
उगाच इतरांची करुन व्यर्थ वाणी शिणवता का ??
१६४] बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान
- तान्ह्या बाळाची भूक-तहान आईच जाणते, अनन्य भक्ताची काळजी देवालाच असते.
१६५] तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्चर्य हें चित्ती वाटतसे
- खराखुरा भक्तच देवापाशी सगळ्या व्यथा मोकळेपणाने मांडू शकतो ...
१६६] पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर
- भविष्यकाळातील या गोष्टीपण बुवा सांगू शकत होते तर !!!
१६७] त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं
- किती सावध होते बुवा ? "मी" अमुक अमुक गोष्टीचा त्याग केला असा अहंकारच वाढीला लागला तर काय करु रे विठ्ठला ?? असे विठ्ठलापाशीच अन्यनतेने विचारताहेत बुवा....
१६८] दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें
- शत्रूशीही कसे वागावे ते सांगताहेत बुवा ....
१६९] अद्वैती माझे नाही समाधान । गोड हे चरणसेवा तुझी | ३७४२ |
- मुक्तिवरील भक्ति हे बुवांचे एक विशेषच ....
१७०] तुका म्हणे येह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों
- लौकिकाला काय महत्व द्यायचे ?? ते तर सगळे नाशिवंत आहे...
१७१] वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥
परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥
- बुवांचा हा जो अनुभव आहे (की देवच हे सगळे बोलवितो आहे) हे कळण्यासाठी तरी थोडी भाविकता हवीच ना ...
१७२] शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ
- अन्न शिजल्यावर अग्नीची आवश्यकता काय ?
१७३] मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव
- जैसा भाव जयापाशी | तैसा देव तयापाशी | जाणे भाव अंतरसाक्षी | प्राणीमात्राचा || श्रीसमर्थ ||
१७४] विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो
- परम विश्वास/ परम श्रद्धा/ परम निष्ठा महत्वाची. या एकाच गोष्टीने "त्या"ची प्राप्ती होते.
१७५] तुका म्हणे बरें धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढवते
- नम्रतेचे महत्व. देव अशा अनन्यशरण भक्ताचे सहजच लाड करतो - अनन्य भक्ति मात्र पाहिजे.
१७६] मन पावे समाधान । हें चि दान देवाचें
- अखंड समाधान हीच परमार्थाची इतिकर्तव्यता.
१७७] आवडी येते कळों । गुणें चिन्हें उमटती
पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी
- संतत्व म्हणजे चमत्कार नाही तर ज्याच्याठिकाणी भगवत्प्रेम हाच सहजस्वभाव आहे तो संतच ... कारण चित्त आणि मन एकरुप झाले की जे पोटात असते तेच ओठात येते ना ....
१७८] वाढविलें सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन
- बुवा संतांचे कार्य स्वमुखाने सांगताहेत. आणि संत म्हणजे चंदन - आंतबाहेर त्या भगवत्प्रेमाने ओथंबलेले.
१७९] अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें
मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी
- बुवांच्या समोर जशा अधिकाराची व्यक्ति येईल तसा उपदेश ते करीत होते. गाथेतील सगळीच्या सगळी वचने उगाच आपल्याला लावून घेण्यात काय मतलब ??
१८०] नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी
- बुवाबाजीवर प्रहार करताना बुवा म्हणतात आम्ही कोणाचे मिंधे नाही की कोणाकडून कसली अपेक्षाही करत नाही. त्यामुळे शुद्ध परमार्थ सोडून भलते सलते काही सांगणारच नाही.
१८१] चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण
- बुवांची अशी सहजस्थिती झाली होती
१८२] अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें
- अनुभवाशिवाय एक शब्दही बुवा बोलले नाहीत.
१८३] आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं
- सगळी गाथा याला साक्ष आहे. ही शब्दरत्ने आपल्या कंठात थोडीबहुत का होईना धारण करणे आपल्यालाच फार उपयुक्त आहेत.
१८४] निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च
- दुर्जनाला काहीही उपदेश करा, तो काही त्याचा स्वभाव सोडणार नाही हेच खरे.
१८५] तुका म्हणे झरा । आहे मुळींचा चि खरा
- कसा जबरदस्त आत्मविश्वास आहे पहा .....
१८६] ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरुनि कळे
- साध्या ताकाला जो नाही म्हणतो तो जेवू थोडाच घालेल .... साध्या साध्या गोष्टीतून मनुष्याची परीक्षा होते ...
१८७] मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता
- मन करा रे निर्मळ | येऊनि गोपाळ राहे तेथे
१८८] स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव
- परमार्थ नुसता बोलू नका तर परमार्थी व्हा म्हणजे मग खरे सुख कळेल. स्वप्नातल्या सुखाने का कोणी राजा होतो ?
१८९] चिंतनाची जोडी । हा चि लाभ घडोघडी
- सतत, घडोघडी परमार्थचिंतन हीच खरी परमार्थ साधना आणि तोच खरा लाभ.
१९०] बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा
- खूप पारमार्थिक वाचन कोणालाही गोंधळातच पाडेल.
१९१] नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद
- बुवा तर आनंदरुप झालेत कारण चित्तात नित्य नारायणच ....
१९२] सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी
- बुवांच्या परमार्थाने किती सहजरुप धारण केलंय - धन्य धन्य ते बुवा ...
१९३] तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला |
- सकलगुणे संपन्न अशा देवाला ज्यांनी ओळखले आहे ते बुवा हे मोठ्या प्रेमाने म्हणताहेत
१९४] दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे |३७८८|
- आपल्या अंतरातील दोष काढून टाकणे ही साधना, हे दोष साधना करताना उफाळून येतात म्हणून साधना सोडायची नसते.
१९५] जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं | ३७९५ |
- परमेश्वराच्याचरणी अनन्य व्हायचे असेल तर मीपणाची जाणीव, माझी बुद्धी हे सारे टाकून देणे आलेच ...
१९६] देऊनियां प्रेम मागितलें चित्त । जाली फिटाफिट तुम्हां आम्हां |३८०५|
- बुवा देवाशी भांडणही करतात पण तेही किती गोड !! - सारे प्रेम देऊन तुझे चित्त मी मागितले - ही अशी फिटं फाट झाली - कशाला तुला उदार म्हणायचे रे ???
१९७] जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे सेवटीं हातीं कांहीं | ३८११|
- साधनेत कितीदा निराशाच दाटून येते तेव्हा आपल्याच अभंगांना बुवा तोंडपिटी म्हणायलाही कमी करत नाहीत.. आणि हे सारे विठ्ठलास सांगताना त्यांना काही वाटत नाहीये ...
१९८] दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया
- आत एक आणि बाहेर दुसरेच हीच दांभिकता
१९९] धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी
- सार्वत्रिक सत्य
२००] तुका म्हणे आम्ही जिंकोनिया काळ । बैसलो निश्चळ होऊनिया |३७९८|
- काळावरही सत्ता गाजवणारे तुकोबा खरे शूर, बळिवंत ...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/48332 गाथा - परम अर्थ एक वाक्यता - भाग १
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/48421 गाथा -परम अर्थ एक वाक्यता - भाग २
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/48816 गाथा -परम अर्थ एक वाक्यता - भाग ३
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
खूप सुंदर लिहिलंयत. लेकराने
खूप सुंदर लिहिलंयत.
लेकराने कधीही हाक मारली तरी आई धाऊन येतेच येते - आपण लेकरु होणे फार गरजेचे आहे.......>>> हे तर अप्रतिम.
एका अभंगाचा अर्थ थोडासा वेगळा वाटतो, कदाचित माझे चुकतही असेल, कृपया तसे सांगावे.
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान
- तान्ह्या बाळाची भूक-तहान आईच जाणते, अनन्य भक्ताची काळजी देवालाच असते.>>>>
फक्त अनन्य भक्ताचीच काळजी देवाला नसते, तर प्रत्येकाची असतेच असते अगदी नास्तिकाचीही. फक्त अनन्य भक्त देव घेत असलेली काळजी समजून घेवू शकतो व त्यानुसार पारमार्थिक प्रगती करत असतो.
म्हणून बाळाची तहान-भूक न सांगता जशी आई जाणत असते तसेच ही जगन्माऊली सर्वांची काळजी वहात असते व ज्याला जे उचित तेच देत असते.
चु.भु.द्या.घ्या.