Submitted by भारती.. on 7 June, 2014 - 11:34
तुझ्याशी बोलताना मी..
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते
अगा जो ना कुणाचा त्या नितांतासारखी होते
कसे भोई मिळाले जे जिवाला हादरे देती
कशी शब्दांस जडभारी मनाची पालखी होते
रुसावे मी, अबोलावे, करावी आर्जवे माझी
कधी तूही ! नको काही मलाही आणखी होते
‘’उगा ते कल्पितांच्या काहुरांनी बावरे होती’’
कवीची वेदना सहकंपनेला पारखी होते
सवे जातात अज्ञाती प्रवाहीचे दिवे सारे
सुरम्या ‘भारती’ तेव्हा दिशांची काळखी होते
भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसे भोई मिळाले जे जिवाला
कसे भोई मिळाले जे जिवाला हादरे देती<<<
सवे जातात अज्ञाती प्रवाहीचे दिवे सारे<<<
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते<<<
अप्रतिम!
गझलेतील विचार आणि भाषाशैली अतिशय आवडली.
‘’उगा ते कल्पितांच्या काहुरांनी बावरे होती’’<<<
कवीची वेदना सहकंपनेला पारखी होते <<< वा वा
कशी शब्दांस जडभारी मनाची पालखी होते <<< बहोत अच्छे!
अबोलावे<<< मस्त
गझल आवडली भारती
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते
अगा जो ना कुणाचा त्या नितांतासारखी होत >>>>>>> वाह
मस्त
सुरम्या म्हणजे काय
आधी फेसबुकवर वाचलीच होती इथे
आधी फेसबुकवर वाचलीच होती
इथे दिल्याबद्दल धन्यवाद
भारती.... "...तुझ्याशी
भारती....
"...तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते....."
~ खरे सांगतो....मी या ओळीनंतर पुढे गेलोच नाही काही वेळ..... तिथेच थांबलो. असे वाटू लागले आहे की अशी जर ती इतकी स्वच्छ सखी झाल्याची कबुली देत आहे, तर मग पुढील ओळीत कदाचित दिलेली कारणे कशासाठी वाचावीत ?
पण कविता पूर्ण वाचावी ही ओढही स्वस्थ बसवू देईना....शब्दांची जादू तर तुझ्या भोवती रिंगण घालतच असते सदैव....एखादा प्रतिसाद देतानाही तुझ्या बोटातून उतरणारी ती माया वाचणार्याला मोहवून टाकते तर इथे तर कवितेला असे काही समोर आणले आहेस की आमच्यासारख्यांनी ते केवळ वाचतच राहावे असे वाटते.
"...सवे जातात अज्ञाती प्रवाहीचे दिवे सारे..." ~ अज्ञाती प्रवाही....गूढतेचे हे वातावरण अगदी अंगावर आल्यासारखे झाले आहे.
खरे सांगतो....मी या ओळीनंतर
खरे सांगतो....मी या ओळीनंतर पुढे गेलोच नाही काही वेळ..... तिथेच थांबलो. <<<
सहमत!
असे वाटू लागले आहे की अशी जर ती इतकी स्वच्छ सखी झाल्याची कबुली देत आहे, तर मग पुढील ओळीत कदाचित दिलेली कारणे कशासाठी वाचावीत ?
पण कविता पूर्ण वाचावी ही ओढही स्वस्थ बसवू देईना.<<<
गझलेतील प्रत्येक शेर वेगळी कविता ठरते.
कदाचित<<< गझलचा आस्वाद घेण्यास शेर वाचल्यानंतर पुढचा शेर ऐकण्या/वाचण्यास पटकन मन तात्पुरते ताजेतवाने करावे लागते हे तर तुम्ही जाणताच. मजा येते असा आस्वाद घेताना.
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते
अगा जो ना कुणाचा त्या नितांतासारखी होते>>>> वाह!
शब्दांस जडभारी मनाची पालखी>> सुरेख!!
कशी शब्दांस जडभारी मनाची
कशी शब्दांस जडभारी मनाची पालखी होते >>> वाह!
प्रत्येक ओळ सुंदर. रेखीव गझल. मजा आली वाचताना.
स्तिमित ! "सवे जातात अज्ञाती
स्तिमित !
"सवे जातात अज्ञाती प्रवाहीचे दिवे सारे"
अतिशय आवडलेली ओळ.
काय लिहिलंय..वा वा .
अनेक ओळी आवडल्या. सुरेख.
अनेक ओळी आवडल्या.
सुरेख.
अप्रतिम..खूप दिवसांनी समोर
अप्रतिम..खूप दिवसांनी समोर आली अशी गझल..
कवीची वेदना सहकंपनेला पारखी होते << किती सजग कल्पना.. बाकीही सुंदर...
आवडलीच..
धन्यवाद..
"...गझलेतील प्रत्येक शेर
"...गझलेतील प्रत्येक शेर वेगळी कविता ठरते...."
~ सही, बेफिकीर जी....मान्यच.
काळखी म्हणजे काय?
काळखी म्हणजे काय?
अंजली ,rmd, मुटेजी,
अंजली ,rmd, मुटेजी, विज्ञानदास खूप आभार !
जाई, ‘सुरम्या’ हे या ओळीत ‘दिशांच्या काळखी’चं विशेषण म्हणून स्त्रीलिंगी केलंय इतकंच. नदीत दीपदान केलेले सगळे दिवे मिळून पात्रात हेलकावत अज्ञातात वहात जातात तेव्हा त्या रमणीय दृष्यामुळे दिशांमध्ये दाटलेला अंधारही भयावह वाटत नाही, सुरम्य होतो.
अशोक ,>>"...सवे जातात अज्ञाती प्रवाहीचे दिवे सारे..." ~ अज्ञात प्रवाही....गूढतेचे हे वातावरण अगदी अंगावर आल्यासारखे झाले आहे. >>- प्रवाहातले दिवे- म्हणजेच प्रकाशमान आत्म्यांच्या संवादामुळे क्षणभंगुर जीवनही सुंदर होते,दाटून येणारा मृत्यूच्या काळोख भयावह वाटत नाही हा लक्षणार्थही आहे त्यात, म्हणून अंगावर येत होती ही ओळ तुमच्या. बेफिकीर म्हणतात तसं, गझलचा प्रत्येक शेर वेगळी कविता असतो , हा शेवटचा शेर जीवनाच्या अज्ञात शेवटाबद्द्ल बोलत आहे..
बेफिकीर, तुम्हाला आवडली म्हणजे ही गझल खरीच जमली असावी .मात्रावृत्त वियदगंगेबद्द्ल तुमच्या लेखात पूर्वी वाचले होतेच, अलीकडील वृत्तबद्ध रचनांच्या काळात हे वृत्त हाताळताना गझलच उतरली , माझ्याकडून क्वचित लिहिली जाणारी
वैवकु,अमेय, ही FB वर दिली तेव्हा तिचा शेवट मला असमाधानकारक,अपुरा वाटला होता तो आज सकारात्म उतरला आहे.
साती,काळखी हे काजळी किंवा काळोख या शब्दाचं इथे आलेलं काव्यरूप.
. माझी तीट..
.
माझी तीट..
किती सुंदर शब्दकळा...
किती सुंदर शब्दकळा... शब्दामागून अर्थ धावत येतो म्ह्णजे काय त्याचा प्रत्यय येतो.
दिनेश , श्रीयु
दिनेश , श्रीयु
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते
अगा जो ना कुणाचा त्या नितांतासारखी होते
पहिली ओळ खरोखर मन जिंकणारी आहे. दुसऱ्या ओळीतला 'अगा' दाताखाली खडा यावा, तसा खटकला मात्र.
कसे भोई मिळाले जे जिवाला हादरे देती
कशी शब्दांस जडभारी मनाची पालखी होते
अप्रतिम..!!
त्यातही पहिली ओळ भारीच.
रुसावे मी, अबोलावे, करावी आर्जवे माझी
कधी तूही ! नको काही मलाही आणखी होते
'कधी तूही माझी आर्जवे करावीस' ह्या विचाराला वृत्ताच्या बंधनामुळे दोन ओळीत तोडावे लागल्याने हळहळ वाटली. अधिक विचार करून ते सलग राहिलं असतं तर हा शेर खूप सुंदर वाटला असता, असं वाटलं.
‘’उगा ते कल्पितांच्या काहुरांनी बावरे होती’’
कवीची वेदना सहकंपनेला पारखी होते
क्या बात !
सवे जातात अज्ञाती प्रवाहीचे दिवे सारे
सुरम्या ‘भारती’ तेव्हा दिशांची काळखी होते
पहिल्या ओळीत तुमची 'सिग्नेचर' जाणवते. इतकी ती 'भारताळलेली' आहे. एक अनामिक, गूढ व निरंतर हुरहूर जी तुमच्या अनेक कवितांतून वास करते ती ह्या ओळीत आली आहे. प्रचंड आवडली.
एकंदरीत सुंदरच..
निकोप काव्य वाटलं.
भराभर ऊतू जाणारा अभिनिवेश नाही. जबरदस्तीने घेतलेला कुठला पवित्रा नाही. त्या त्या विषयावर संयतपणे केलेलं विचारपूर्वक भाष्य. एकदम प्रामाणिक.
रणजीत, तू मन:पूर्वक केलेलं हे
रणजीत, तू मन:पूर्वक केलेलं हे सुंदर मूल्यांकन- स्वत:ला दुसऱ्याच्या नजरेतून पहाण्याचा आनंद देणारं.
हा आनंद खूप विशेष असतो नेहमीच.आणि यात काहीतरी नवीन गवसणं क्रमप्राप्त.
'अगा' खटकलं याबद्दल फक्त : कवयित्रीने तो शब्द आर्तभावनेतून लिहिला आहे, एका आत्यंतिक आत्मीयाशी संवादताना कुठल्याही संवादापलिकडच्या परम-आत्मीयाचं प्रतिबिंब जाणवून.
इतकंच.
किती किती सुंदर 'वाटायला'
किती किती सुंदर 'वाटायला' लागलं माहितीये वाचून...पण अभ्राळलेलं..खूप लिहावसं वाटतं पण अशा कल्पना शब्दातीत आहेत आणि तुमच्या इतकी ताकद नाही हा 'एह्सास' व्यक्त करण्याला.
<किती किती सुंदर 'वाटायला'
<किती किती सुंदर 'वाटायला' लागलं माहितीये वाचून...पण अभ्राळलेलं..खूप लिहावसं वाटतं पण अशा कल्पना शब्दातीत आहेत आणि तुमच्या इतकी ताकद नाही हा 'एह्सास' व्यक्त करण्याला.> +१
तुमची शब्द साधना गझलला कवेत
तुमची शब्द साधना गझलला कवेत घेते .अप्रतिम
काही सुट्या ओळी सुन्दर
काही सुट्या ओळी सुन्दर आहेत..
आशय पण छान
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते
अगा जो ना कुणाचा त्या नितांतासारखी होते
~ खरे सांगतो....मी या ओळीनंतर पुढे गेलोच नाही काही वेळ..... तिथेच थांबलो. असे वाटू लागले आहे की अशी जर ती इतकी स्वच्छ सखी झाल्याची कबुली देत आहे, तर मग पुढील ओळीत कदाचित दिलेली कारणे कशासाठी वाचावीत ? >>>>>> माझ्यासारखीच आणखीही अनेकांची एवढी सारखी अनुभूती असावी... केवळ आश्चर्य ....
बाकीचे सारे नंतरच वाचतो .....
<’उगा ते कल्पितांच्या
<’उगा ते कल्पितांच्या काहुरांनी बावरे होती’’
कवीची वेदना सहकंपनेला पारखी होते >
वा!
अन्य शेरही आवडले. दुसरा मला नीट उलगडला नाहीए. पुन्हा वाचून पाहीन.
"कधी तूही करावी आर्जवे" वाचताच "तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ" आठवले.
आवडली
आवडली
अप्रतिम!
अप्रतिम!
खूप धन्यवाद सर्वांचे ! होय
खूप धन्यवाद सर्वांचे !
होय भरत ,
'कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ..''
तुम्ही लिहिल्यावर लक्षात आले, तशीच भावना आहे ! आत्मगत तेच सार्वत्रिक असतं ..
वा भारतीताई , तुमची गझल ..एक
वा भारतीताई , तुमची गझल ..एक नवी मेजवानी .
तुझ्याशी बोलताना मी निरभ्राची सखी होते ...सुंदर ओळ .
कसे भोई मिळाले जे जिवाला हादरे देती
कशी शब्दांस जडभारी मनाची पालखी होते...क्या ब्बात !
अबोलावे ...अहाहा ..काय सुरेख शब्द .
अगदी 'भारतीताईंची' अशी गझल वाटली .
गझलेचं सौंदर्य एका वेगळ्याच शैलीने खुलवून टाकलंत .
>> कसे भोई मिळाले जे जिवाला
>>
कसे भोई मिळाले जे जिवाला हादरे देती
कशी शब्दांस जडभारी मनाची पालखी होते
<<
वा!
बाकीच्या द्विपदी चांगल्याच, पण गझलेच्या प्रकृतीसाठी काहीशा क्लिष्ट/अलंकारिक वाटल्या. अगा, अबोलावे यासारखे शब्दही मनापासून रुचले नाहीत. असो.
तुमचे काव्य, त्यातील विचार आणि शब्दयोजना नेहमीच वाचनीय असते.
व्वाह...क्या बात है.
व्वाह...क्या बात है.
Pages