आधुनिक सीता - कथेसंबंधी चर्चा

Submitted by वेल on 29 May, 2014 - 14:52

ह्यापूर्वी कोणत्याही कथेवर असा चर्चा धागा निघाला होता की नाही मला कल्पना नाही.

पण मी लिहिलेल्या आधुनिक सीता ह्या कथेवर अनेकांची वेगवेगळी मते आहेत. ती मते प्रत्येकाला मोकळेपणाने मांडता यावीत आणि त्या सर्व मतांबद्दलची चर्चा एकाच जागी व्हावी म्हणून हा वेगळा धागा.

कथेचे २९ भाग लिहून झाल्यावर मी हा चर्चा धागा काढला आहे.
मी ही कथा लिहित असताना मूळ कथेचा बेस तर वापरलाच होता पण त्याशिवाय मी त्यात मला पटतील अशा काही गोष्टी अधिक लिहिल्या. काही ठिकाणी विचार आणि लेखन स्वातंत्र्य घेतले. ते कुठे कसे घेतले का घेतले ते शेवटच्या काही भागांमध्ये लक्षात येईलच सगळ्यांच्या पण ते सगळ्यांना कळण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांची मतं काय आहेत ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. अर्थातच कथेच्या ठरलेल्या साच्यात फरक पडणार नाहीच आहे. इथे ती तशीच लिहिली जाणार जशी ती कागदावर लिहिलेली आहे.

तरीही ज्या कोणाला कथेचे नाव पटत नाही, कथानायिकेचे वागणे पटत नाही. कथेच्या खलनायकाचे किंवा नायिकेच्या पतीचे किंवा माहेरच्यांचे वागणे पटले नाही किंवा ही कथाच पटत नाही त्या सगळ्यांनी इथे मनसोक्त लिहावे. एखाद्या प्रसंगात खलनायकाच्या किंवा नायिकेच्या कथेतल्या वागण्यापेक्षा वेगळे काय अपेक्षित आहे तेही लिहावे. खरेतर तेच जाणून घेण्यासाठी हा धागा मी काढला आहे. ही कथा आणखी वेगळी झाली असती का कशी होऊ शकली असती हा अंदाज घेण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येकाला/ प्रत्येकीला त्याचे/तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ते इतरांच्या मते चूक असो की बरोबर. तूच चूक किंवा मीच बरोबर, तुझे विचार असे बदलायला हवेत, किती बुरसटलेले विचार किंवा असे होते काय कधी असे वाद कृपया इथे करू नयेत. मायबोलीवरच्या इतर आयडीज सोबत वैयक्तिक लाथाळ्याही करू नयेत ही विनंती.

ही कथा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीकोनातून वेगवेगळी कशी झाली असती ते शोधण्याचा हा माझा प्रयत्न आहे असे समजा हवे तर.

तर चला लिहिते व्हा ... Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages