शहरात आजकाल लोणचं वगैरे कोणी घरी करत नाही. लागेल तशी लोणच्याची बाटली विकतच आणतात. पण आमच्याकडे अजूनही गावाला आम्ही लोणचं घरीच करतो. लोणच घालणं हा एक सोहळाच असतो.
माझं सासर तळ कोकणातलं. तसं बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यापासूनच कैरीचं ताज लोणचं घालायला सुरवात होते. पण बेगमीचं ( साठवणीचं ) लोणचं साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठ्वड्यात घातलं जातं. मुळात आमचं खूप मोठ एकत्र कुटुंब, त्यात गडीमाणसांची जेवणी खाणी घरात , पै पाहुण्यांचा सतत राबता, सगळे सणवार, कुलाचार , त्यातच अधून मधून " वैनीनु, माका वाइच लोन्चा दी " अशी कामगारवर्गाकडून येणारी मागणी, त्यामुळे लोणचं लागतं ही खूप. तर ही त्या लोणच्याची कहाणी.
आमचं एक लोणच्यासाठी चांगल्या कैर्या देणारं माझ्या आजे सासर्यांनी लावलेलं रायवळ आंब्याच झाड आहे. त्याची कैरी खूप आंबट असते आणि त्याची फोड ही खूप दिवस करकरीत रहाते. हा आमचा आंबा इतका पसिद्ध आहे की आजूबाजूच्या घरातून ही याला डिमांड असते. आमचं लोणच घालुन झाल्यावर, असतील झाडावर तर आम्ही देतो ही त्यांना. गावाकडे अशी देवाण घेवाण अजूनही चालते. तर अशा या आंब्याच्या कैर्या जेंव्हा जून होतात तेव्हाच लोणचं घालण्याचा घाट घालता येतो.
लोणच्याची पूर्व तयारी करायला सुरवात झालेलीच असते. विकतचा केप्र किंवा बेडेकरांचा मसाला वापरणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मसाला आम्ही घरीच बनवतो. लोणच्याच्या मसाल्याला लागणारे मुख्य पदार्थ म्हणजे तिखट, लाल मोहोरी, मेथीदाणे, हळद हिंग, मीठ आणि तेल. लोणच्यासाठी लागणार्या उत्तम रंग असणार्या मिरच्या शेतात मुद्दाम लावलेल्या असतात आणि त्या मिरच्यांचं लालभडक तिखट खास लोणच्यासाठी म्हणुन वेगळं राखून ठेवलेलं असतं. लाल मोहोरी धुवुन उन्हामध्ये चार दिवस कडकडीत वाळवून घेतात आणि लोणचं करण्याच्या आधी दोन दिवस कामवाल्या बाईच्या मदतीने ती वायनात म्हणजे उखळात कांडून तिची अगदी बारीक पूड करतात. मेथी दाणे आणि हळकूंड ही तेलात तळून त्याची ही वायनात घालुन पूड केली जाते. खास खडा हिंग आणला जातो आणि ते खडे तेलात तळुन त्याची खलबत्त्यात पूड करतात. हे काम स्वतः जाऊबाई करतात कारण हिंगाची पूड करणे हे कौशल्याचे काम आहे. पूड अगदी बारीक ही चालत नाही कारण बारीक केली तर फोडणीत जळते आणि जास्त जाडी ही चालत नाही कारण मग खडे तसेच रहातात म्हणुन जाऊबाई हे काम दुसर्या कोणालाही देत नाहीत. मीठाच्या गोणीची आणि तेलाच्या डब्याची वाण्याकडे ऑर्डर दिली जाते. तुम्ही म्हणाल, " मीठाची गोण लोणच्यासाठी म्हणजे काय कारखाना वगैरे आहे कि काय ?" दचकु नका , साधारण तीन चार शे कैर्यांचं लोणचं सहज लागत आम्हाला. म्हणूनच हा सगळा खटाटोप.
लोणचं कालवण्यासाठी खास लाकडी काथवट ( मोठी लाकडी परात) आणि मोठा लाकडी कालथा आहे आमच्याकडे. कोणत्याही धातुच्या पातेल्यात नाही लोणचं कालवत. मीठाचा आणि आंबटाचा परिणाम होतो ना त्यावर म्हणून. ती काथवट ही नेहमी वापरात नसल्याने माळ्यावरुन खाली काढून स्वच्छ केली जाते. लोणचं ज्यात भरलं जातं त्या चिनी मातीच्या मोठ्या मोठया बरण्या एकदा धुऊन, पुसुन, वाळवून ठेवल्या असल्या तरी परत एकदा खबरदारीचा उपाय म्हणुन उन्हांत ठेऊन तापविल्या जातात. जुन्या धोतरांचे किंवा साड्यांचे तुकडे बरण्यांना दादरे बांधण्यासाठी तयार ठेवतात.
एवढी तयारी झाली की एखादा त्यातल्या त्यात शुभ दिवस नक्की केला जातो. अमावस्येला वैगेरे आमच्याकडे कधीच बेगमीचं लोणचं घातलं जाणार नाही. त्या दिवशी इतर काही जास्तीची कामं ठेवली जात नाहीत. तरी घरातल्याच १५ /१७ माणसांच जेवण-खाण, चहा- पाणी ही कामं असतातच. आम्ही घरच्याच ६/७ जणी बायका असल्यामुळे शेजारणीना कोणाला आम्हाला मदतीला बोलवावे लागत नाही.
त्या दिवशी पहाटेच जाऊबाई चूल पेटवतात आणि एका पातेल्यात तेलाचा डबा रिकामा करुन ते पातेलं चुलीवर चढवून देतात. लोणच्याला फोडणी गार करुनच घालायची असते. तेलातून लाटा लाटा यायला लागल्या की तेल तापलं असं समजायच हे जाऊबाईंच शास्त्र. हे काम जोखमीच म्हणुन जाऊबाई स्वतः करतात कारण तेल तापायच्या आधी मोहरी घातली तर फोडणी खमंग होत नाही. एकदा तेल तापलं की त्यात क्रमाने मोहरी, हळद , हिंग आणि थोडे मेथी दाणे घालून फोडणी तयार करतात आणि गार करण्यासाठी ठेऊन देतात.
सकाळी कामगार वर्ग लोणच्यासाठी कैर्या उतरवायच्या कामाला रवाना होतो आणि आठ साडेआठ पर्यंत कैर्यांच पहिलं ओझं घरात येत. तो ताज्या नुकत्याच उतरवलेल्या कैर्यांचा हवाहवासा वाटणारा वास घरभर दरवळायला लागतो. मग आम्ही घरातल्या जास्तीत जास्त बायका कैर्या चिरायच्या कामाला लागतो. कामवाल्या बायका ही असतातच हाताशी. काही कैर्या जून पण अगदी छोट्या असतात त्या मुद्दाम वेगळ्या काढून ठेवतो. हे कशासाठी ते येईलच ओघाने. गप्पा मारत मारत हे काम चालत. मुलं मधुन मधुन फोडींवर डल्ला मारत असतात पण आम्ही त्याकडे थोडा कानाडोळाच करतो कारण एखादी फोड तोंडात टाकायचा मोह मोठ्यांना आवरत नाही तिथे लहानांची काय कथा!
जेवण झाली की साधारण दुपारी दोन अडीचच्या सुमारास देवाला नमस्कार करून प्रत्यक्ष कामास सुरवात केली जाते. जी कोण बाई लोणचं कालवणार असेल ती तिच्या हातातील बांगड्या उतरविते. शास्त्रापुरती एखादी ठेवते हातात. कारण भरपुर बांगड्या हातात असतील तर अरुंद तोंडाच्या बरणीत लोणचं भरणं अवघड जात ना म्हणून.
आम्ही एकदम सगळ लोणचं न कालवता एकेका बरणीच्या हिशोबानी कालवतो. एका बरणीसाठी किती फोडी, किती मीठ, किती मसाला ह्याच प्रमाण माझ्या एका सुगरण चुलत सासुबाईंनी तयार केलेले आहे. त्या आता हयात नाहीत तरी प्रमाण त्यांचेच आहे. लाकडी काथवटीत प्रथम फोडी आणि नंतर क्रमाक्रमाने इतर सर्व जिन्नस घातले जातात. आमच्या कडच्या लोणच्याच वैशिष्ट्य म्हणजे एका बरणीला एक तांब्या पाण्यात मोहोरीची पूड घुसळून ते आम्ही लोणच्यात घालतो. शेवटी फोडणी घालून परत एकदा ते सारख केलं जातं आणि मग बरणीत भरल जातं. भरताना त्या जून छोट्या कैर्या न चिरता तशाच एकेका बरणीत सात आठ तरी घालतोच. मुरल्यानंतर त्या चवीला अप्रतिम लागतात. शेवटी बरणीचं झाकण अगदी घट्ट लावून त्यावर दादरा ही घट्ट बांधायचा आणि बरणीची रवानगी फडताळात करायची व त्यावर तुळशीच पान ठेऊन द्यायच.
मुंबई, पुण्यात असणार्या लेकी सुनांसाठी प्लॅस्टिकच्या बरण्या भरल्या जातात. शेजार्यांसाठी वाडगे भरले जातात. कामगार वर्गासाठी ही प्लॅस्टिकच्या पिशव्या भरल्या जातात. पूर्वीच्या काळी जेंव्हा प्लॅस्टिक नव्हते तेंव्हा लोणच्याच्या देवाण घेवाणी साठी आम्ही नारळाच्या करट्यांचा ( करवंटी) सर्रास उपयोग करीत असू . एकतर को़कणात नारळ भरपूर आणि त्यात आमच्या कोकणस्थांच्या करवंट्या अगदी साफ आणि स्वच्छ. एक कण खोबर्याचा काय राहिल तिला !! ( स्मित करणारी बाहुली). हे अगदी इकोफ्रेंडली होत असं मला वाटतं. पण आता प्लॅस्टिकच्या जमान्यात हे मागे पडलं.
रात्री जेवताना पुरुषांकडून जेव्हा पसंतीची पावती मिळते तेव्हा सगळ्या श्रमांच चीज झाल्यासारख वाटतं. अगदी दोन वर्षाच्या लहानग्याला सुध्दा वरण भाताबरोबर त्या दिवशी कौतुक म्हणून पुसटसं खाराच बोट चाटवल जातं. ते छोटं बाळ ही 'हाय हाय ' म्हणतं पण हातानी "छान छान" अशी खूण करतं तेव्हा जाऊबाईंच्या चेहर्यावर एक वेगळचं समाधान दिसतं. थोड्या मोठ्या मुलांचा निराळाच उद्योग. पानातल्या फोडी धुवायच्या आणि मग जेवण झाल्यावर झोपाळ्यावर बसून त्या गप्पा मारता मारता मिटक्या मारत खायच्या. आम्ही बायका जेवायला बसलो की पहिलं लोणचच वाढून घेतो. तो लाल भडक रंग, खारात मध्येच चमकणार्या हिरव्या पांढर्या फोडी आणि ह्या सगळ्याला तेलामुळे आलेली हलकीशी चमक. बघूनच जीव अर्धा तृप्त होतो. आणि जेव्हा खाराच बोट जिभेवर ठेवल जात त्या क्षणी तोंडातून फक्त "अहाहा" असा उद्गार निघतो. त्या दिवशी जेवताना फक्त लोणचं हाच विषय असतो गप्पांसाठी. एकदा का आपल लोणचं चांगल जमलयं हे कळल की मग चर्चा सुरु होते ती कसं बापटीणीच्या लोणच्यात मीठ्च जास्त होतं किंवा जोशीणीच्या लोणच्याला जरा रंग म्हणून नाही वगैरे वगैरे. आणि समेवर येताना प्रत्येक वेळी " आपल कसं मस्त झालयं " हे ठरलेलं.
रात्री अंथरुणाला पाठ टेकली की दिवसभरच्या श्रमामुळे शरीर थकल्याच जाणवत, पण लोणचं सगळ्यांना आवडलं हे समाधान खूप मोठ असत. ह्या समाधानाच्या गुंगीतच कधीतरी झोप लागून जाते .
अशी ही साठा उत्तराची लोणच्याची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण.
अबब..खूपच छान वाटलं वाचून!
अबब..खूपच छान वाटलं वाचून!
अतिशय छान लिहिलंय. लोणच्याचा
अतिशय छान लिहिलंय.
लोणच्याचा मसाला घरी कसा बनवायाचा त्याबद्दल कोणी सांगु शकेल का ? इथे केप्र मसाला नाही मिळत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वा! मस्त वर्णन!
वा! मस्त वर्णन!
वा| एकदम खास . तोंपासू
वा| एकदम खास . तोंपासू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंदन, आपल्या लिन्क मधला
नंदन, आपल्या लिन्क मधला गुडविल आंबा हाच असं म्हणता येईल. कारण अशोक हांडे हे आमच्या भागातले खूप, जुने जाणते आणि विश्वासू आंबाएजंट आहेत.
पुढच्या मे महिन्यात सर्व इंटरेस्टेड मोबोकरांना कोकणात/ घरी येण्याचे मनीमोहोरकडून आग्रहाचे आमंत्रण.
आहाहा!! तोंडाला पाणी सुटल हे
आहाहा!! तोंडाला पाणी सुटल हे वाचून. आत्ताच्या आत्ता मला लोणचं पाहिजे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माहेरी असंच बेगमीचं लोणचं, पापड, मसाले प्रकार होतात. आता जरा प्रमाण कमी झालंय कारण हे प्रकार आवडीने खाणार्या आम्ही लेकी चार दिशांना आहोत. पण आई थोडं का होईना पण वर्षाचं लोणचं करतेच आणि आमच्यासाठी पाठवते.
कुरडयाचा चीक, साबुदाण्याच्या पापड्यांचं गरम पीठ, पोह्याच्या पापडाच्या तेल लावलेल्या लाट्या, ताज्या लोणच्याचा लालभडक खार, ती धुतलेली करकरीत फोड, ताजा मसाला गरम भाकरीबरोबर, किंवा खमंग मेतकूट ताज्या भातात कालवून!!!! बालपण समृद्ध आणि सुखी करणारे हे सोबती!! छे, कुठे गेले ते दिवस!!
तुम्ही सर्वानी माझी ही
तुम्ही सर्वानी माझी ही लोणच्याची कहाणी वाचलीत आणि इथल्या सिद्ध्हस्त लिहिणार्यांनी सुद्धा इतके भरभरुन प्रतिसाद दिले त्याबद्दल आपणा सर्वाना मनापासून धन्यवाद.
"सार्या नवोदितांची ही माय मायबोली " ह्या मायबोलीच्या शीर्षक गीतातल्या ओळी सार्थ करणार्या मायबोलीचे ही मनापासून आभार.
वाचून तोंडाला पाणी सुटलं आणि
वाचून तोंडाला पाणी सुटलं आणि आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीतला 'मिडी' च्या लोणच्याचा सोहळा आठवला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिडी = कोईसकट बरणीत घातलेली बेबी कैरी (बेबीकॉर्न तशी बेबीकैरी)
मनीमोहोर, खरे तर कोकणात
मनीमोहोर, खरे तर कोकणात सुपार्या, सोले यांची पण अशीच उस्तवार असते. त्याबद्दल पण वाचायला आवडेल.
खुप मस्त आहे बेगमीच्या
खुप मस्त आहे बेगमीच्या लोणच्याची कहाणी!
मस्त आहे कहणी ... तोंडाला
मस्त आहे कहणी ... तोंडाला पाणी सुटले... आई पण आधी करायह्ची पण ह्याच्या १०% असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश दा खरचं माझा कोकमं,
दिनेश दा खरचं माझा कोकमं, सुपार्या, आरारूट , नागकेशर ह्या बद्दल पण लिहायचा विचार आहे.
छान लिहीलं आहेत. लोणच्याची
छान लिहीलं आहेत.
लोणच्याची गोष्ट आवडली.
जायफळ, मिरी.... पण !
जायफळ, मिरी.... पण !
मनीमोहोर, मन अगदी मोहरून गेलं
मनीमोहोर, मन अगदी मोहरून गेलं वर्णन वाचताना.. किती छान लिहिलं आहेस.. तुझ्या लोणच्या इतकंच
टेस्टी झालंय.. प्रोसेस वाचताना इतकं तों>>>>>पासु झालंय ना... मस्त मस्त!!!!!!!!!!
मनीमोहोर खरंच लिहा. कधी असं
मनीमोहोर खरंच लिहा. कधी असं नाहीच मिळालं पहायला. आई आजी वगैरे करायच्या पापड लोणची अन बरंच पण इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेलं अन त्याची कहाणी नक्कीच वाचायला आवडेल.
व्वा! काय सुंदर लिहिलय....
व्वा! काय सुंदर लिहिलय.... खुप खुप आवडले...
विशेष म्हणजे लोणच्याच्या बरणीवर ठेवलेले तुळशीचे पान... आणि ती नारळाच्या करवंटीतली देवाण घेवाण
हे फारच भावले.....
लोणच्यात पाणी हे मी पण प्रथमच ऐकते आहे... आमच्याकडे पण साठवणीच्या लोणच्याचा मसाला घरीच
करतात, बरण्या स्वच्छ धुवुन पुसुन, उन्हात तापवुन त्यात पळीभर हिंगाच्या तेलाची फोडणी घालतात...
आणि मग लोणचे भरतात...
मी कोकणातली नाही... पण कोकणावर मनापासुन प्रेम आहे...
ममो, तुमचा लेख खूप भावला.
ममो, तुमचा लेख खूप भावला. असे एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेले पाहिले नाही तसेच वाचले सुद्धा नाही. +१११११११११११११११११११११ -अनेक!
दिनेश दा खरचं माझा कोकमं, सुपार्या, आरारूट , नागकेशर ह्या बद्दल पण लिहायचा विचार आहे - +१०००००००००!
जायफळ, मिरी पण! - उत्तम सूचनेबद्द्ल अनेक +१०००००००००००!
लेखांची वाट पाहतेय!
अमी
दिनेश दा खरचं माझा कोकमं,
दिनेश दा खरचं माझा कोकमं, सुपार्या, आरारूट , नागकेशर ह्या बद्दल पण लिहायचा विचार आहे.>>>>>> लिहाच!
प्रतिसादांसाठी पुनः एकदा
प्रतिसादांसाठी पुनः एकदा धन्यवाद. यामुळे मी किती म्हणुन प्रोत्साहित झाले आहे?
सुरेख लिहीता.
सुरेख लिहीता.
अभिनंदन.. आजच्या रविवार मटा
अभिनंदन.. आजच्या रविवार मटा च्या मुक्तछंद मधे हा लेख छापून आला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
mastta
mastta
अप्रतीम! लेख आणी माहिती
अप्रतीम! लेख आणी माहिती दोन्ही मनापासुन आवडले.:स्मित: मला खरे तर घरच्या मसाल्यातले लोणचे आवडते. पण आता वेळे अभावी केप्र शिवाय पर्याय नाही.
मस्त लेख! आज मटा मध्ये पण
मस्त लेख! आज मटा मध्ये पण वाचला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
अभिनंदन!
अभिनंदन!
मी पण मटामधे वाचला
मी पण मटामधे वाचला
अभिनंदन!!!
मी पण मटा मधे काल वाचला आणि
मी पण मटा मधे काल वाचला आणि घरातल्यांना पण वाचायला दिला लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages