माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार.
फुलांची सप्तपदी
============================
हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही!
तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?
तर होतं त्याचं ते अस्सं.. आमच्या एखाद्या यजमानाकडनं लग्न-लावण्या बरोबरच अगदी अवर्जून केलेली रिक्वेस्ट असते.
"गुरुजी ती..त्यांच्या लग्नात केलीवतीत ना..तशी फुलांची सप्तपदी हवी बरं का! काय लागयचा तो वेळ लागू दे,पण कार्यक्रम कसा..दणक्यात झाला पायजे..!!!" अता हे एव्हढं जोरात रॉकेट पडल्यावर..नाही कुठनं म्हणा! मग मी त्यांच्या लग्न मुहुर्ताच्या आदला दिवस डायरीत बघतो..आणि त्या दिवसापासून ही सप्तपदी सुरु-होते! म्हणजे...आधी दिवस कोणत्या सिझन मधला आहे त्याचा विचार,नंतर अदला दिवस आपल्या कामा'चा फुल्ल आहे की नुस्ताच फू...ल आहे याचा विचार,मग फुलांच्या कटिंग साठी,कुणि बरोबर मॅनेज होइल का? हा विचार, झालच तर 'कितीत-होइल?' ( ) हा ही विचार,नाही झालं तर आदल्या दिवशी किती वेळ आपल्यालाच ही पुष्प-कात्रणांची बुंदि-पाडायला बसावं लागेल हा विचार! (बुंदी पाडणे!
काय शब्द सुचलाय..व्वा!
)
पण लोकहो..,बुंदि पाडणे-हीच उपमा बरोब्बर आहे. तुंम्ही फक्त १ किलो झेंडू..मी यूट्यूबवर,या इथे- https://www.youtube.com/watch?v=RNW-aegEUqA सांगितलेल्या ..झेंडू कापणी-तंत्रानुसार कापुन बघा..मग पटेल तुंम्हाला!!! कारण माझ्या या फुलांच्या रांगोळ्यांमधे जी रंगांची/आकारांची एकसंधता/पोत इत्यादी येतात,त्याचं यश, हे मी फुलं ज्या विशिष्ट पद्धतीने कापतो,त्यातच आहे. झेंडू कापण्याच्या-प्रमाणेच,लिलीच्या फुलांचं कटींग सुद्धा आपण इथे- https://www.youtube.com/watch?v=iLpMr5bKYO0 बघू शकता. तसेच ही फुलांची सप्तपदी असो,वा मी ज्या इतर रांगोळ्या काढतो,त्या असोत त्यात लिलीच्या फुलांची गोलाकार अथवा इतर आकारात रचना कशी करावी? -त्यासाठी ही पण लिंक - https://www.youtube.com/watch?v=KvuHqFa1d5I पाहा.
तर..असं होता होता..मग अखेर तो लग्नाच्या आदला दिवस उजाडतो..एकदाचा आणि मग मी प्लॅन केल्याप्रमाणे,सकाळी किंवा दुपारी पळतो आमच्या मार्केटयार्डात(गुलटेकडी,पुणे.)..फुलांच्या महा-मंडईमधे.आणि मग..तासाभरात सगळी खरेदी होऊन घरला येतो.. आणि मग थोड्याच वेळात सुरु होते..पूर्व तयारी! आता,आपण आज जी 'काढलेली सप्तपदी' पहाणार आहोत..ति कशी होते?...हे (थोड्ड्सं..) रेसिपी श्टाइलनी बघू
प्रथम फुलं:-
१)लिली:-मिनिमम १० गड्ड्या..गुलाबः-अर्धा किलो..गुलटोक-२ गड्ड्या,जरबेरा:-२ गड्ड्या..
२)स्प्रिंगल गवतः- ६ गड्ड्या..
३) मोगरा:-१किलो,कामिनी(पाला):-३ ते ५ गड्ड्या,तुळजापुरी झेंडू:-१ किलो.
४)झेंडू:- ७ ते १० किलो..
------------
हे झालं साहित्य..
आता, मी ऑनस्टेज करतो काय? त्याचा थोडासा वृत्तांत. सगळ्यात आधी दिशा पाहाणे..कारण..ही कित्तीही रांगोळी म्हणून असली तरी ती सप्तपदी आहे.त्यामुळे पूर्वगमनी आणि होमाच्या उत्तरेला अशी दिशा व जागा पाहून सुरवात करायची. जागा फिक्स झाली की आधी त्याच्या चहूबाजूनी ७/८ खुर्च्या लाऊन,भस्सकन-आत येणार्यांसाठी तटबंदी आणि ती तटबंदी टिकायला आमच्या यजमान पार्टीतला कोणितरी रांगोळीप्रेमी रक्षक अथवा रक्षिका (सुद्धा! ) ...त्याला/तिला..जरा(कार्यालयातलाच!
) चहा वगैरे मागवून "तुमच्या सारख्यांमुळे या रांगोळ्या होतात हो..नायतर कसलं काय आलय? =)) .. असं जरा चढवून एका खुर्चीवर अडवुन किंवा अॅडवून ठेवायचा. (फक्त या कामी हौशी व्यक्तिस घेऊ नये..कारण,सारखा त्यांना 'मदती'ला यायचा मोह होतो...आणि दर अर्ध्या तासानी बुरुज सोडून ते मैदानाकडे येतात. ) मग सर्व प्रथम कट केलेल्या लिलीची पिशवी घेउन साधारण १ वीतीच्या अंतराने ..एकापुढे-एक अशी,त्याची ७ कमळं करून घ्यायची. मग कमळाच्या बॉर्डरला तुळजापुरी झेंडू हा .देठाकडून कमळाच्या बाहेरच्या परिघाला एकेक एकेक असा प्रेस करत लावायचा.मग मधे झेंडूच्या पाकळ्या इतरत्र पडणार नाहीत अश्या टाकायच्या(हा कमळ बनवायचा समग्र व्हिडिओ..वरती दिलेला आहे) नंतर मग बाहेरनं मोगरा लाऊन आधी ही सप्तपदीमाळ पूर्ण करायची.
मग थोडा(ऑन द स्पॉट कारावा लागणारा)कुटीर उद्योग...
गुलटोक..गुलाब..जरबेरा हे डेखाकडून फुलाला डेख चिकटत तिथे हलक्या हतानी (कात्री वापरू नये) तोडायचे. अगदी गुलाबाच्या पाकळ्यां अलिकडे असणार्या देठाच्या ५ हिरव्या..सपोर्टिंग पाकळ्याही नखानी उडवायच्या..(म्हणजे नंतर तो गुलाब/गुलटोक..पाकळ्यांच्या थरामधे न हलता/कलंडता शंभर टक्के स्थानापन्न होतो.) ही तयारी एका ताटात लाउन..मग परत जरा चहा घेऊन..फ्रेस्स होऊन यायचं.मग सगळा शोभेचा पाला.. त्याचे बुडखे उडवून कटवून घ्यायचा... मग फायनली खुर्च्यांच्या तट-बंदीच्या आत..पाला/जरबेरा ठेऊन..त्याच्या आत झेंडू-पाकळ्यांची पिशवी,आणि त्याच्या आत गुलाबाच्या ताट आणि अक्षतेच्या वाटिसह आपण!!! अशी व्यवस्था झाली, की मग पुढचा खेळ चालू..मगाशी पूर्ण केलेल्या कमळामधे,मध्यभागी आधी १ गुलाब ठेऊन..त्याच्या पाकळ्यांमधे १ चिमूट अक्षता टाकायच्या,तद् नंतर कमळाच्या आतल्या परिघावर गुलटोकासारखी फुलं लावायची.(आपल्याला हवी तितकी) मग सप्तपदीमाळेच्या भोवती शेवटच्या लेअरकडून बाहेर असा.अंदाजे अर्ध्या फुट रुंदिचा झेंडू-पाकळ्यांचा (दाट) थर हाताने सारखा करत टाकायचा. अर्धा/१फुटाचा थर टाकुन झाला. की मग बाहेरनं वर दाखवलेलं स्प्रिंगल-गवत बाहेरनं लागून घ्यायचं. त्यात वरनं..गुलाव जरबेर्याचं टॉपिंग करायचं.
आणि सगळ्यात शेवटी यायचं ते मास्टरपिसवर! ..सप्तपदा'च्या.. कमळा बाहेर जो कलश ठेवतात,त्याच्या बाहेरच्या डिझाइनवर...! (हे डिझाइन मी नेहमी मला सुचेल तसं गोल..दिल-शेप आकारात/चौकोनी/अष्टदली असं त्याक्षणी सुचेल तसं करतो.) यातही फुलं लावण्याची सगळी कृती वरील प्रमाणेच आहे...(आणि तसंही मी वर जी कृती-कथन केलेली आहे,ती निव्वळ कशानंतर काय? हे ध्यानात याव म्हणून! एरवी रांगोळ्यांना "शिकवणे" हा प्रकार तंत्रोक्ताच्या पलिकडे लागूच पडत नाही.) तर...अश्या एकंदर ४/५ तासाच्या मेहेनती नंतर तयार होते ..........................
ती..ही फुलांची सप्तपदी!
==============================================
ही सप्तपदी (एकट्यानी)काढायला लागणारा एकंदर वेळ:- आदल्या दिवशी फुलं-कटिंग साठी जाणारे..
..६ ते ७ तास+ दुसर्या दिवशी सप्तपदी काढायला जाणारा वेळ ३ ते ४ तास = कमितकमी वेळः- ८ ते १० तास.
==============================================
आता अज्जुन एक मज्जा!!!
बरेचदा ..वधू'चे सप्तपदी-वरून-चालून झाल्यावर,मी यजमान पार्टिला सगळी फुलं वेगवेगळ्या पिशव्यांमधे भरून घरी पायघड्यांसाठी न्यायला सांगतो. फुलं तिथे वापरली जातातच. पण काहिवेळा बरीचशी टाकुन दिली जातात.कारण.. हे सर्व तिथे असलेल्या उप-स्थितांच्या उत्साहावर अवलंबून असतं. मग लोकं फारच कंटाळलेले असले..तर मग यजमान परत मलाच गळ घालतात..."गुरुजी तुम्म्हीच चला ना..प्ली..............ज!!!"
आणि मलाही त्यादिवशी संध्याकळी दुसरीकडे "वर्णी" नसली. तर मग मी त्यांचा कार्यालयातला सगळा धार्मिक-विधिंचा कार्यक्रम अवरून...जेऊन घरी जाऊन १ मस्त पडी लावतो..आणि संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांच्या घरी जातो..
आणि मग सकाळच्याच सप्तपदिच्या फुलांचं री-सायकलींग होऊन तयार होतात........त्या...या..
नवपरिणितां-साठीच्या
..........
गृहप्रवेशनीय..अश्या
.................
प्रसन्नोत्सुक-पायघड्या!
=======================================================
क्या बात है ! व्वाह दिल खुश
क्या बात है ! व्वाह दिल खुश हो गया ! माझ्या लग्नात तुम्हाला ऑर्डर नक्की
फारच सुन्दर. प्रात्यक्शिक
फारच सुन्दर. प्रात्यक्शिक आवडले. चान्गला धडा.
व्वा! मस्तच! अगदी रेखीव
व्वा! मस्तच! अगदी रेखीव रांगोळी..
इतकी मोठ्ठी रांगोळी काढायचा पेशन्स नाहीय माझ्याकडे
किती भारी दिसतंय. या
किती भारी दिसतंय. या फुलांवरून आणि तुमच्या इतक्या तासांच्या मेहनतीवरून पाय देऊन चालायचं म्हणजे टू मच.
वा! फार फार सुरेख! दोन
वा! फार फार सुरेख!
दोन ह्दया.ना जोडणारी ही सप्तपदी !
सुंदर! पण एव्हढ्या कल्पकतेने
सुंदर! पण एव्हढ्या कल्पकतेने काढलेल्या सप्तपदीवरून चालणे मला त्रासदायक वाटेल!
सुंदर कला. कष्टाचं काम आहे.
सुंदर कला. कष्टाचं काम आहे. त्यातून कार्यालयात समोर/खाली काय आहे ते न बघता हवेत चालणार्या वीरांपासून ही कलाकुसर वाचवायची हेही मोठं काम असणार !
सुंदर कलात्मक रांगोळ्या असतात
सुंदर कलात्मक रांगोळ्या असतात तुमच्या.. वेरी इनोवेटिव्ह.. सुपर !!!
एव्हढ्या मोठ्या रांगोळ्या तुम्ही एकटेच काढता का असिस्टंट्स असतात मदतीला??
खुप सुंदर... पाऊल
खुप सुंदर... पाऊल ठेवण्याएवढी जागा रिकामी किंवा तिथे दुसरे काहीतरी ठेवले ( पाट, तबक वगैरे ) तर नाही का चालणार ?
आपने फुल बिछाये, उन्हे हम ठुकराये
हमको डर है के ये तौहीन-ए-मुहोब्बत होगी... !
आपने फुल बिछाये, उन्हे हम
आपने फुल बिछाये, उन्हे हम ठुकराये
हमको डर है के ये तौहीन-ए-मुहोब्बत होगी... ! >>> वाहव्वा... __/\__
सुंदर! पण एव्हढ्या कल्पकतेने
सुंदर! पण एव्हढ्या कल्पकतेने काढलेल्या सप्तपदीवरून चालणे मला त्रासदायक वाटेल!===+१०००
मी आपल्या फुलांच्या रांगोळीची
मी आपल्या फुलांच्या रांगोळीची नेहमीच चाहती आहे.
ही सुध्दा अप्रतिम.
फारच सुरेख! पण खरच, ईतक्या
फारच सुरेख!
पण खरच, ईतक्या सुंदर सजवलेल्या या फुलांवर पाय ठेवायची हिम्मत नाही होणार
फारच सुरेख. कला,पेशन्स दोन्ही
फारच सुरेख. कला,पेशन्स दोन्ही आहे तुमच्यात. पौराहित्या बरोबर जोड बिझिनेस म्हणून हे करण सुचणच मुळात फार ग्रेट आहे.
किती सुंदर कल्पना आहेत या
किती सुंदर कल्पना आहेत या दोन्ही. तुमच्या कल्पकतेला सलाम.
गुरुजी, मी ऑफिसमधे
गुरुजी, मी ऑफिसमधे फोटो/क्लिपान्करता आन्धळा आहे.
पण लिहीलय छान हं ! आवडले.
सुरेख !!!! या फुलांवरून आणि
सुरेख !!!!
या फुलांवरून आणि तुमच्या इतक्या तासांच्या मेहनतीवरून पाय देऊन चालायचं म्हणजे टू मच. >>>> अगदी.. मलाही हेच वाटलं फोटो पहात असताना !
अप्रतिम कला आणि तितकीच
अप्रतिम कला आणि तितकीच मेहनतीची.
खरंच पाय ठेवावेसे अजिबात वाटणार नाही.
अरे माझी कालची पोस्ट गायब कशी
अरे माझी कालची पोस्ट गायब कशी झाली?
अप्रतिम रांगोळी, ____/\____ तुम्हाला.
मी पुणेकरना अनुमोदन.
अप्रतिम रांगोळी, ____/\____
अप्रतिम रांगोळी, ____/\____ तुम्हाला. >>> +१
बापरे किती मेहनतीच काम आहे.
बापरे किती मेहनतीच काम आहे. खरच इतक्या मेहनीतीने केलेल्या सप्तपदी वरून नाही चालवणार:)
हौसेला मोल नाही हेच खर
खूपच सुरेख , अप्रतिम, शब्द
खूपच सुरेख , अप्रतिम, शब्द सुचत नाहीयेत खरं तर. तुम्च्या मेहनतीला सलाम
रांगोळी अप्रतिम सुंदर. पण मला
रांगोळी अप्रतिम सुंदर.
पण मला एकंदरीत कोनत्याच सुंदर फुलांवर पाय देवून चाललेलं पसंत पडत नाही/ पडणार नाही. अतिशय क्रूर वाटते.( हे माझे मत आहे. कोणाला उद्देशून नाही). त्यात मोगर्यासारख्या नाजूक फुलांवर ..:(
मी फुलं सहसा झाडावरच ठेवते. नाहीतर कोणाला हवीच असतील तर डोक्यात घालायला,पुजायला देते.
केवळ अप्रतिम ____/\_____ !!!
केवळ अप्रतिम ____/\_____ !!! महान आहात तुम्ही!
>>खूपच सुरेख , अप्रतिम, शब्द
>>खूपच सुरेख , अप्रतिम, शब्द सुचत नाहीयेत खरं तर. तुम्च्या मेहनतीला सलाम<< +१ __/\__
सुरेख, अप्रतिम. ____/|\____
सुरेख, अप्रतिम. ____/|\____
जवळ जवळ सगळ्यांनीच इतक्या
जवळ जवळ सगळ्यांनीच इतक्या सुंदर..मेहनतीने केलेल्या कलाकृतीवर पाय कसा ठेवायचा? ही रास्त शंका उपस्थित केलेली आहे. तिला आदर पूर्वक प्रणाम.








आणि भरभरून केलेल्या कौतुकाबद्दल मनःपूर्वक धन्यवादही!
पण............. ही कलाकृती असली तरी त्या दिवसाला तिचे रुपक सप्तपदी...हेच गृहीत असते. अनेक ठिकाणी वधू/वरासही वरीलप्रमाणेच भावना होते.पण शेवटी तो धार्मिकविधी आहे. ती सात पावलं चालायलाच हवीत. काहिंच्या कडून धार्मिकता ,म्हणून हे कर्तव्य बजावले जाते.तर काहिंना काहितरी शास्त्र (आणखि) सांगून चालते करावे लागते. धर्म'म्हटला की काही गोष्टी कडूगोड तर काही गोष्टी गोडकडू असणारच.
१) अमेय२८०८०७ | @सुंदर कला.
१) अमेय२८०८०७ |
@सुंदर कला. कष्टाचं काम आहे. त्यातून कार्यालयात समोर/खाली काय आहे ते न बघता हवेत चालणार्या वीरांपासून ही कलाकुसर वाचवायची हेही मोठं काम असणार ! >>> भयंकर प्रकार असतो तो.आधी धक्का लावतात,अगदी सहज चालत आतपर्यंत येतात. आणि आपण काहि बोललो,तर "मी काय मुद्दाम केलं का?" वगैरे सनईही वाजवली जाते.
२)वर्षू नील
एव्हढ्या मोठ्या रांगोळ्या तुम्ही एकटेच काढता का असिस्टंट्स असतात मदतीला??>>> कधि कधि मिळतो,नाहि... तर मग,एकट्याची लढाई!
३) limbutimbu |
@गुरुजी, मी ऑफिसमधे फोटो/क्लिपान्करता आन्धळा आहे.>>> दुसरीकडनं पहा..पण पहाच!
@पण लिहीलय छान हं ! आवडले.>>> धन्यवाद.
मस्त फोटो अन वर्णन
मस्त फोटो अन वर्णन सुद्धा.
स्वगत : एवढी सगळी फुलं जमिनीवर. अन त्यावरुन वधूवर चालत जाणार ? किलोभर मोगरे.!! इथे घरच्या रोपाला ६-७ फुलं एका दिवशी आली तर आनंदी आनंद गडे म्हणतो आम्ही
लोकेशनल प्रायसिंग म्हणतात अर्थशास्त्रात ते हेच असावे
सुरेख. तुम्हाला ही कला अवगत
सुरेख. तुम्हाला ही कला अवगत आहे तेव्हा तुम्ही जाता त्या कार्यात चार चॉंद लागत असणार. एकदम कलात्मक, पण फुलांवर आपल्याच्याने पाय देणे होणे नाही. एक किलो मोगरा एकदम एकत्र बघून जीव कळवळला.
Pages