*समर्पण-२*
वखवखलेली रात्र संपली कि,
पाठीला पाठ लागते तूझी....
दिवसभर साठवलेले माझ्यासाठीचे,
प्रेम संपते का रे तिथे !!
किती अनोळखी असतोस तू,
किती परक्यासारखा असतोस....
असंख्य इंगळ्या मनाला डसत असताना,
किती शांत निवांत असतोस तू....
सर्वसंमतीने मिळालेल्या गूलामांना,
दोन वेळचे जेवण अन निवारा मिळतो,
अशातलं काही होऊन गेलंय माझ्या बाबतीत...
असं तूला नाही का वाटतं....??
जेव्हा जेव्हा आपण घरात सोबत असतो,
एक अक्षरानेही न बोलणारा तू,
प्रेमाची कबूली फ़क्त अंधारात देणारा तू.....
असे कसे म्हणू शकतो कि प्रेम आहे......!!!!
संसाराचा गाडा एकटीच मी ओढते,
तेव्हा त्या लंगड्या पायावर प्रेम केलंस तू?
तू कमावता आहेस म्हणून तू लोळावं,
माझ्या राबण्यावर कधी प्रेम केलंस तू?
अरे... महिन्याचे चार दिवस मला,
अगदीच अस्पृश्य मानणारा अन,
इतर दिवस निर्विकारपणे गोंजारणारा तू,
असे कसे म्हणू शकतो कि प्रेम आहे......!!!!
झोपलास का रे? ऐकतोय ना...?
झोपलाच शेवट..................
लग्न नावाच्या कायदेशीर तडजोडीने,
आंदण मिळालेल्या निशस्त्र बायकोवर,
भावनाहीन आसूडाचे वार करून झोपला अखेर.........!!
आता पून्हा एकदा तू,
काळ्याकुट्ट निर्लज्ज रात्रीच्या गर्भातून
प्रेमाचे अंकूर काढशील का,
उद्या वापरण्यासाठी.......?
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
भेदक !!!
भेदक !!!
आशय चांगला आहे. थोड्या
आशय चांगला आहे.
थोड्या आटोपशीर मांडणीने आणि अप्रत्यक्ष/सूचक शब्दयोजनेने
कविता अधिक प्रभावी होऊ शकेल...... वैम. कृगैन.
धन्यवाद सर...
धन्यवाद सर...