पाऊस भावना... (स्फुट)

Submitted by मी मी on 28 April, 2014 - 11:44

पावसाचंही कसं असतं ना...वळवाचा पाउस ...
कधीतरी कोसळतो आभाळ फाटून गेल्यासारखे…. धो धो धो धो
जणू कशाचेच भान नाही, आपल्याच तोरयात

झाडे-फुले, डोंगर-दरी, पक्षी-प्राणी कुणाचीच काळजी नसावी असे,
सगळ्यांनाच उन्मळून टाकायला धावून आलाय जसे ....

सगळंच असण्याचं नसणं करायला व्याकूळ ....
निसर्गाचं मापन खोळंबून टाकावं इतकी असूया घेऊन

एकाच संधीत सगळं लुटून घ्यावं या हावरट भावनेनं व्यापून....
पावसाचंही कसं असतं ना..

पण हाच पाउस फार हळुवार असतो कधी .. रिमझिम किंवा सरसरत
अखंड पडत असतो.. पण सारं सारं भिजवायला फक्त येतो....

कुणालाही इजा होऊ नये इतका अलगद इतकं जपून ...
मनात रुणझुण गुणगुण व्हावी असा

झाडं फूलं बहरून टाकतो...नदी आनंदाने ओसंडून वाहत असते
दर्या-डोंगर हिरवाळ होऊन रमून जातात...
पक्षी प्राणी प्रफुल्लीत होऊन विहरतात....अवकाश मृदगंधानं भरून जातं

आनंदाचंच शिंपण व्हावं या भावनेनं व्यापून.
पावसाचंही कसं असतं ना.…

आपल्याही भावना ...कधी रिमझिम कधी धो धो
आपल्याच भाव विश्वात कधी हव्या हव्या.... कधी कोसळत्या
आपणच निर्माण केलेलं आपलच भावविश्व उन्मळून टाकणाऱ्या ....

विचार करायला हवा नाही....
वळवाचा पाउस होण्यापेक्षा हळवं, सुकुमार आषाढ व्हावं ....
पाषाणाचं शेवाळ होण्यापेक्षा आपल्याच विश्वाचं सोनेरी कुंपण करावं !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयी, मस्तच लिहीलेस. नेह्मीप्रमाणे Happy शेवटचा परिच्छेद तर खासच. खरच विचार करायला लावणारा