तृतीयपंथीय

Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2014 - 23:21

नमस्कार!

ही एक फक्त 'चालू घडामोड' नाही तर बर्‍यापैकी व्यापक विषय आहे, पण येथील विषयांच्या सदरांपैकी तो 'चालू घडामोड' ह्या सदरात सर्वाधिक चपखलपणे बसतो असे वाटले म्हणून ह्या सदरात लिहीत आहे.

तृतीयपंथियांना सर्वोच्च न्यायलयाने एक 'कायदेशीर अस्तित्व' बहाल केलेले आहे. सर्वोच्च न्यायालय असेही म्हणते की हा वैद्यकीय किंवा सामाजिक विषय नसून 'मानवी अधिकारां'चा विषय आहे.

लहानपणापासून आजवर समाजात कोठेही दिसणारे तृतीयपंथीय (किन्नर / हिजडे) हा बर्‍याच अंशी एक कुतुहल, थट्टा, किळस अश्या भावनांचे मिश्रण असलेला विषय असल्याचा प्रभाव सर्वत्र पसरल्याचे चित्र दिसत असे. हे तृतीयपंथीय लोकल ट्रेन्समध्ये पैसे मागणे, देहविक्रय करणे असे व्यवसाय (!) करताना आढळत. नुकताच मी ज्या स्नेहालयात जाऊन आलो त्यांच्या संस्थेशी निगडीत असे अनेक तृतीयपंथीय आहेत जे देहविक्रय करतात. त्यांच्याकडे प्रामुख्याने लष्करातील कर्मचारी शरीरसुखासाठी येतात व अनैसर्गीक संभोगाची इच्छा पुरवून घेतात.

स्त्रीही नाही व पुरुषही नाही ही अवस्था त्या व्यक्तीसाठी लज्जास्पद तर इतरांसाठी हास्योत्पादक आहे हे समीकरण रूढ झाल्यासारखे चित्र असताना अनेक संस्था, व्यक्ती व चळवळींच्या माध्यमातून आता सर्वोच्च न्यायालयाने ही एक समाधानकारक व पुरोगामी भूमिका घेतलेली आहे.

आता कोणत्याही शासकीय अर्जात कदाचित लवकरच 'सेक्स - मेल / फिमेल / ट्रान्सजेंडर' असे काहीसे दिसायची शक्यता आहे, ह्या तृतीयपंथीयांना लवकरच आरक्षण मिळू शकेल. त्यांना समाजाने स्वीकारायला किती काळ जावा लागेल हे मानसिकतेमधील लवचिकतेवर, औदार्यावर अवलंबून असले तरी तसे आगामी काळात होईल इतके नक्की! शाळेमधील वर्गांमध्ये कदाचित आता अशी मुले शिकायला बसू शकतील आणि इतर विद्यार्थ्यांना त्यांचे पालक व शिक्षक 'अश्या मुलांना हसायचे नाही' असे शिकवू लागतील.

कदाचित आपल्याला ट्रीट करणारा मेडिकल ऑफिसर एखादा तृतीयपंथीय असेल आणि गाजलेलाही असेल. कदाचित एखादा संशोधक तृतीयपंथीय असेल.

हे सगळे होईल तेव्हा होईल, पण तूर्त एक मोठीच लढाई ह्या तृतीयपंथीयांनी जिंकलेली आहे.

मात्र मला एकदा हैदराबाद पुणे प्रवासात एक एम डी मेडिसीन डॉक्टर भेटला होता. प्रवासात वेळ घालवायला म्हणून त्याच्याशी ज्या अनेक चर्चा केल्या त्यापैकी चर्चेचा काही भाग तृतीयपंथीयांबाबत होता. त्यातून त्याने मला जी माहिती सांगितली ती काहीशी गोंधळात पाडणारी वाटली व येथे असलेल्या तज्ञांनी त्याबाबत आपली मते देऊन कृपया उपकृत करावे.

१. शरीररचनेनुसार जे जन्मतः तृतीयपंथीय असतात त्यांच्यात दोन प्रकार असू शकतातः

अ - त्यांना जन्मतः लिंग असते पण टेस्टिकल्स नसतात (त्यामुळे ते पुरुष ठरू शकत नाहीत)
ब - त्यांना जन्मतः योनी असते पण योनीखाली टेस्टिकल्सही असतात व स्त्रीप्रमाणे अंतर्गत रचना नसते.

२. जे तृतीयपंथीय चुकून तृतीय पंथात मोडतात ते ह्या दुसर्‍या 'मुख्य प्रकारात' येतात. ते म्हणजे त्यांचे एक कोणतेतरी लिंग नक्की असते, पण जन्माच्यावेळी ते न आढळल्याने त्यांचे संगोपन विरुद्ध लिंगीयाप्रमाणे करणे सुरू होते. पुढे पुढे त्यांची मानसिकता (उदाहरणार्थ) स्त्रीप्रमाणे तर शारीरिक वाढ पुरुषाप्रमाणे होते.

३. तिसर्‍या प्रकारात बालकाचे / किशोरवयीन अवस्थेतील मुलामुलीचे लिंग समजूनही केवळ देहविक्रयामार्फत उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे / स्वतःला एक वेगळ्या प्रकारचे शारीरिक सुख घेण्याची सोय करता यावी / किंवा चक्क वयाने वाढलेल्या व्यक्तीला स्वतःच दुसर्‍या लिंगीयाप्रमाणे वागण्याची इच्छा व्हावी म्हणून बाहेरील जामानिमा पूर्णपणे बदलला जातो व कपड्यांच्या आत व्यक्ती तशीच राहते.

आता ही माहिती जर योग्य आहे असे मानले, तर सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या आदेशानंतर व ह्या माहितीच्या प्रकाशात (तसेच इतर काही तत्सम विषयांच्या प्रकाशात) मला काही प्रश्न पडले आहेत, ज्यावर कृपया चर्चा व्हावी अशी विनंती:

१. सर्वात प्रथम म्हणजे तृतीयपंथीय हा मानवाधिकाराच्या व्याप्तीतील विषय जर मानला जात असेल तर समलैंगीकता का मानली गेली नाही? (कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावीत, समलैंगीकता अनैसर्गीक आहे असे माझे मत त्या चर्चेच्यावेळी नव्हते तर ती नैसर्गीक असणे ठसवले जाण्याचा अतिरेक आणि समुपदेशनाने ओरिएन्टेशन बदलते किंवा नाही ह्यावर माझी मते मांडलेली होती. हे नोंदवण्याचे कारण म्हणजे तेच वाद येथे होऊ नयेत ही अपेक्षा असल्याचे सांगणे!)

२. नैसर्गीकरीत्या तृतीयपंथीय असलेल्यांनाच कायदेशीररीत्या तृतीयपंथीय म्हणून आरक्षण मिळावे की जे जबरदस्तीने वा स्वेच्छेने तसे झाले आहेत त्यांनाही? मग ह्याचा गैरवापर वगैरे टाळण्याच्या यंत्रणाही अर्थातच अस्तित्वात आणाव्या लागतील हे आलेच.

३. काही जण मुद्दाम तृतीयपंथीय होऊन आरक्षण मिळवू शकतील का?

४. आज जे तृतीयपंथीय शरीर विक्रय करतात व मानहानीकारक जिणे जगतात त्यांचे पुनर्वसन कसे होऊ शकेल?

५. सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊन मोकळे झाल्यानंतर माणसाची मानसिकता बदलण्याची जबाबदारी कोणत्या सरकारी संस्थेने घ्यावी?

हे प्रश्न माझ्या मनात आले, इतर कोणाला काही इतर प्रश्न असल्यास कृपया तेही नोंदवावेत.

पण एकुणात, पूर्वी हे तृतीयपंथीय शुभशकुनी समजले जात. ते श्रीमंतही असत. राजेरजवाड्यांकडे ते मोठे पद मिळवून असत. काही मुस्लिम राजवटींमध्ये लहानपणीच काही मुलांना मुद्दाम पौरुषत्वापासून दूर करून पुढे मोठे झाल्यावर स्त्रियांच्या महाली संरक्षक म्हणून नेमण्याची विचित्र प्रथाही होती. असेही समजले जाते की तृतीयपंथीयांच्या शरीरात अधिक ताकद असते, हा फक्त समज असावा. त्यांचा आशीर्वाद शुभ मानणारे अजूनही खूपजण आहेत. लोकल ट्रेन्समध्ये ते आले की स्त्रिया / मुली मान खाली घालून झोपल्याचे नाटक करतात व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद (शाब्दिक / शब्दहीन) साधणे टाळतात. लहान मुले व अनेक पुरुष त्यांना हासतात. 'छक्का' हे संबोधन एखाद्या शिवीप्रमाणे आजही वापरले जाते. मात्र आता हे लोक 'आम्हाला किन्नर' म्हणा असे म्हणत आहेत. हिजडे, छक्के ही विशेषणे वापरू नका असे म्हणत आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे, तृतीयपंथीय म्हणजे एखादा वेल ड्रेस्ड, वेल मॅनर्ड माणूस नजरेसमोर येतच नाही. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते पुरुषी थाटाच्या व्यक्तीने साडी वगैरे नेसून अत्यंत भडक मेक अप केलेला असणे, टाळ्या वाजवणे व उगाचच अती भडकपणामुळे तिरस्करणीय दिसत असणे!

हे सगळे चित्र केव्हा बदलेल तेव्हा बदलेल, पण ह्या बातमीमुळे 'गे संघटनाही' 'अपबीट' झालेल्या आहेत.

बाकी काही असो, एक देश म्हणून आपण अधिक 'ह्यूमन' होत आहोत हे चांगलेच म्हणावे लागेल.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही जण मुद्दाम तृतीयपंथीय होऊन आरक्षण मिळवू शकतील का?>>>>>> नक्कीच हे घडण्याची शक्यता आहे. जेथे जातीचे खोटे दाखले दाखवले जातात, तेथे हे होणे अगदीच शक्य आहे. यावर उपाय म्हणजे वैद्यकीय शारिरीक तपासणी.

माणसांची मानसिकता बदलण्याची जबाबदारी कोणतीही सरकारी संस्था घेऊ शकेल असे वाटत नाही. प्रत्येक माणूस स्वतःच ती घेऊ शकतो.

पुनर्वसनाकरता, आरक्षण, समुपदेशन, हे उपाय योजले गेले पाहिजेत असे वाटते.

<<स्त्रीही नाही व पुरुषही नाही ही अवस्था त्या व्यक्तीसाठी लज्जास्पद तर इतरांसाठी हास्योत्पादक आहे हे समीकरण रूढ झाल्यासारखे चित्र असताना अनेक संस्था, व्यक्ती व चळवळींच्या माध्यमातून आता सर्वोच्च न्यायालयाने ही एक समाधानकारक व पुरोगामी भूमिका घेतलेली आहे.>>>

सहमत आहे. अतिशय स्तुत्य निर्णय आहे. अर्थात वरील सर्व प्रकारांबरोबर नॉर्मल असुनही रुढी-परंपरांच्या नावाखाली हे 'तृतीयपंथीय' आयुष्य लादले गेलेले कित्येक दुर्दैवी जिव सुद्धा आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची सुद्धा अतोनात आवश्यकता आहे.

ठाण्यात एक किन्नर आहे लक्ष्मिनारायण....दिसायला अतीशय सुंदर आहे....ट्रेन चा फर्स्ट क्लास चा पास असुनही तो बाहेर दरवाजाजवळ बसतो....एकदा तो ट्रेन मधे असताना टि.सी ने त्याच्या कडे पास आहे की नाही याची शहनीशा न करता डायरेक्ट त्याला बाहेर काढु लागला तेव्हा त्यने सांगितल की तुम्ही अस का करताय..माझा कडे पास आहे..तेव्हा आजुबाजुच्या बायका फिदिफिदी हसायला लागल्या की हल्ली कोणीही पास घेउ शकते...तेव्हा त्याने एकीला उत्तर दिलेलं की औरत और मर्द होते है तो वो कमाए हुए पैसे से कुछ भी खरीद सकते हो क्या??? शुक्र मनाओ की आप ऐसे नही हो

बेफिकीरजी, खूप संवेदनशील व औचित्यपूर्ण लेख !
अत्यंत सुविद्य व कट्टर सनातनी कुटूंबातून आलेल्या माझ्या एका दाक्षिणात्य मित्राने गेलीं कांही वर्षं सामाजिक कार्यात स्वतःला झोंकून दिलं आहे. तृतियपंथियांच्या मेळाव्यानाही तो उपस्थित राहतो, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो व त्यातल्या बर्‍याच जणांशीं त्याचे जिव्हाळ्याचे व उभयपक्षीं आदराचे संबंधही निर्माण झाले आहेत. त्याने सांगितलेल्या अशा कांहीं जीवनकहाण्या हृदयद्रावक तर आहेतच पण हिंमत व प्रतिभेच्या गाथा पण आहेत.

अजूनही तृतियपंथियांकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात खूपच सुधारणा आवश्यक असली तरीही गेल्या कांहीं वर्षांत
त्या दिशेने बरीच प्रगती झाल्याचंही दिसतं. मुख्य म्हणजे, सामाजिक संस्था व तृतीयपंथी संघटना यानी बराच आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण केल्याचं जाणवतं. या विषयावरच्या कांहीं चांगल्या सिनेमांचा [ उदा., नांव आठवत नाही पण, परेश रावल व पुजा भट असलेला ] यात महत्वाचा वांटा असावा.

बेफिकीरजी, हा लेख वाचून तुम्हाला 'बेफिकीर' कोण म्हणेल ? Wink

[ उदा., नांव आठवत नाही पण, परेश रावल व पुजा भट असलेला ] यात महत्वाचा वांटा असावा.>>>>>>>>>>>>> सडक

स्व. निर्मल पांडे यांच्या तृतियपंथी भुमिकेला बेस्ट फिमेल अ‍ॅक्ट्रेस म्हणुन अवॉर्ड मिळाले आहे.. हे एकमेव उदाहरण आहे..

तॄतीयपंथी मधे आजकाल दुसर्‍याच बाया घुसलेल्या आढळत आहेत. त्या अशाप्रकारे फायदा घेऊन रेल्वेत पैसे कमवित आहेत.

चांगला लेख.

तॄतीयपंथी बद्दल दया येते (खरे तर एका माणसाला दुसर्या माणसाची दया येते हे एका चांगल्या / परीपक्व समाजाचे लक्षण नाही पण येते हेही खरेच :() आपण तसे नाही ह्याचा आनंदही वाटातो पण दुसरीकडे भीती पण वाटते. पण एक नक्क्की त्यांचा तिरस्कार वगेरे वाटत नाही.

बेफिकीर,

मला वाटतं की भारतीय हिंदू समाजाचं पारंपारिक मत जाणून घेण्यासाठी इथली माहीती बरीच उपयोगाची आहे : http://en.wikipedia.org/wiki/LGBT_topics_and_Hinduism

आ.न.,
-गा.पै.

समाज जडणघडणीचा निकोप दृष्टीने विचार करायला लावणारा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय....ज्याचे सर्वच थरातून योग्य प्रमाणात स्वागत केल्याचे दिसत आहे. श्री.बेफिकीर यानी अगदी मुद्देसूद पद्धतीने हा विषय इथे शब्दबद्ध केला आहे, त्यातील विचाराना नि:संशय सर्व पाठिंबा देतील यात संदेह नाही.

निकालाचे वाचन केल्यावर तसेच लेखात उपस्थित केलेल्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने लिहित आहे :

१. सर्वात प्रथम म्हणजे तृतीयपंथीय हा मानवाधिकाराच्या व्याप्तीतील विषय जर मानला जात असेल तर समलैंगीकता का मानली गेली नाही? ~ कोर्टापुढे केवळ हिजडा - Eunuch - यांची कोणत्या संवर्गात निवड केली जावी हा विषय होता....म्हणून निकालानुसार आता प्रत्येक फॉर्मवर "सेक्स = मेल्/फीमेल/ट्रान्सजेंडर" असे तीन घटक असतील. समलैंगिकता हा विषय सर्वस्वी भिन्न असल्याने त्याला मान्यता नाही हे या अगोदरच सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले असल्याने या धाग्यात त्याबद्दल चर्चा येऊ नये....कारण अगोदरच भरपूर देवाणघेवाण झाली आहेच यावर.

२. नैसर्गीकरीत्या तृतीयपंथीय असलेल्यांनाच कायदेशीररीत्या तृतीयपंथीय म्हणून आरक्षण मिळावे की जे जबरदस्तीने वा स्वेच्छेने तसे झाले आहेत त्यांनाही ~ कोर्टाच्या निर्णयात उल्लेख आहे की "if a person surgically changes his/her sex, then he or she is entitled to her changed sex and can not be discriminated..." ~ इथे जबरदस्ती अथवा स्वेच्छा याचा उल्लेख केलेला नाही. ज्याची लिंग अवस्था तृतीयपंथीय गटातील सिद्ध झाली आहे ती प्रत्येक व्यक्ती शासकीय आरक्षण लाभासाठी पात्र ठरली जाईल.

३. काही जण मुद्दाम तृतीयपंथीय होऊन आरक्षण मिळवू शकतील का? ~ असे होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण तृतीयपंथीय असल्याचे प्रमाणपत्र देणारी जी शासकीय वैद्यकीय संस्था निर्माण होईल त्यांच्याकडून या संदर्भात नियमावली प्रकशित करण्यात येईल. त्यामुळे आता सवलत मिळत आहे म्हणून कुणी मला त्या गटात घ्या म्हणून शस्त्रक्रियेसाठी आल्यास त्याला अर्थातच नकार मिळेल.

४. आज जे तृतीयपंथीय शरीर विक्रय करतात व मानहानीकारक जिणे जगतात त्यांचे पुनर्वसन कसे होऊ शकेल? ~ याला ते ते राज्य नियम करू शकेल. सुप्रीम कोर्टात या पंथीयांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आलेला नाही. फक्त नोकरीत आरक्षण आणि शैक्षणिक सवलती प्रदान केल्या जातील असे स्पष्ट केले आहे.

या तृतीयपंथीयाना "ओबीसी" गटात घेण्यात आले असून त्या गटाला मिळणारे आरक्षणाचे सर्व लाभ यानाही मिळतील.

५. सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊन मोकळे झाल्यानंतर माणसाची मानसिकता बदलण्याची जबाबदारी कोणत्या सरकारी संस्थेने घ्यावी? ~ अगदी बरोबर. सुप्रीमे कोर्टाने निर्णय देवून याना समाजात योग्य ते स्थान काय आहे हे स्पष्ट केले आहे पण अशाना ते स्थान तसेच सुविधा देण्याची जबाबदारी शासनाची असली तरी सामाजिक पातळीवरील संस्थानींनी पुनर्वसनाच्या कार्यात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. एड्सग्रस्तांना, वेश्याव्यवसाय करण्यार्‍या स्त्रियांच्या अपत्यांना समाजात योग्य ते स्थान मिळण्याबाबत बरीचशी जागृती निर्माण झाली आहे, त्याबद्दलचे चित्रपट लघुपट जाहिराती चर्चासंवाद वेळोवेळी समोर येत असतातच. आता तोच प्रकार तृतीयपंथीयांनाही आपल्या बरोबरीने जागा द्या असा प्रचार सुरू होईल....जे योग्यच ठरेल.

एम.आय.डी.सी. आणि तत्सम मोठे सरकारी, खाजगी उद्योगधंदे इथेही या गटातील उमेदवारांना योग्य ते प्राथमिक शिक्षण देवून कारागिरीची कामे निर्माण केली जातील.

असे अनेक विकल्प उपलब्ध करून देता येतील यात संदेह नाही.....प्रश्न आहे तो या तृतीयपंथीयांच्या मानसिकतेचा. याना नोकरी करून मानाने जगण्यात आनंद आहे की आहे त्या अवस्थेतच राहून चार पैसे कमाविण्याची कला अंगात ठेवणे हेच बरे वाटते का...हे पाहणे रोचक ठरू शकेल.

मध्यन्तरि एक समजसेविक लेखिकेचे जगण हीजद्यन्च हे पुस्तक वाचले. तेव्हपसून या विषायावर बाफ काढणे मनात होते. सुप्रिम कोर्तच्या निर्णया नन्तर हा बाफ काढल्यबद्दल बेफिकीर धन्यवाद.
या पुस्तकत लिखिका रझिया सुल्ताना यानी काही प्रश्न मान्डले होते. त्यातिल सर्वन्त महत्वचा मुद्द म्हणजे किन्नरान्चा एककिपणा. काही किन्नराना लग्न कर्ण्यची इच्छा असते त्यान्च्याच जमातीतिल एखद्या हिजड्या बरोबर कही वेळा स्त्रि-पुरुश हिजडे जोडी तर कही वेळा स्त्रि-स्त्रि आणी पुरुश-पुरुश. अशिही जोडी असू शकते. त्यान्चा एकाकी पणा बाजुला सारण्यासथी हा मार्ग ते अवलम्बू इच्छितात. मात्र भारतात समलिन्गी नागरिकन्सठी काही कायदे नसल्याने हा मोठा अदसर बनून रहातो.

वास्तविक स्त्रि आणी पुरुष किन्नर लग्न करत असतील तर तो विवाह कायदेशीर्च ठरू शकतो. मात्र किन्नरन्चे प्रश्न खर्या अर्थने सोड्वायचे असतील तर समलिन्गी लोकान्च्या द्रुश्तीकोनतून बघणे फार महत्त्वचे वाटते.

>>>> सर्वात महत्वाचे म्हणजे, तृतीयपंथीय म्हणजे एखादा वेल ड्रेस्ड, वेल मॅनर्ड माणूस नजरेसमोर येतच नाही. <<<<<,
हे सर्वस्वी खरे नाही. माझ्या माहितीमधे अशी व्यक्ति आहे की जी बाह्यतः पुरुष आहे मात्र लिन्ग अत्यंत लहान वा नसल्यातच जमा आहे. सुविद्य घरात असल्यामुळे ही व्यक्ति उपजिविकेचे रास्त व्यवसाय करते अन अर्थातच अविवाहित आहे.

वरील विवेचनाबरोबरच, "तृतियपंथी" बनविण्याची काळी बाजु सामोरी येणे आवश्यक आहे, असे न होवो की वरील कायदा व नन्तरच्या सवलती/आरक्षणे यांच्यामुळे "तृतियपंथी" बनविण्याचे कारखाने जोरात सुरू व्हावे!

याचबरोर मुम्बै वगैरे रस्त्यावर सध्या दिसणार्‍या तृतियपंथियांच्या मूलनिवास/राज्याचाही विचार होणे गरजेचे आहे की याच विशिष्ट राज्यात/प्रदेशात इतक्या सन्ख्येने तृतियपंथी कसे काय निर्माण होतात/जन्मतात? यावर संशोधन व उपाय होणे गरजेचे आहे असे वाटते.

सर्वप्रथम यांना किमान माणसात घेण्याचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे.
यांना रेल्वे किंवा सिग्नलवर भीक मागताना (किंवा जबरदस्तीने भीक मागताना) पाहिल्यावर वाईट वाटते.त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध असते तर कदाचित चित्र वेगळे असू शकेल.

न्यायालयाच्या निर्णयानंतरही प्रत्यक्ष लोकांनी त्यांना जवळ करणे तेवढेच गरजेचे आहे जे एवढे सोपे नाही .तसे असते तर आज जी जातीयतेची दरी अजून टिकून आहे ती पण दिसली नसती.जे मनावर काळ्या दगडावरच्या रेषेप्रामाणे ओढले गेले ते बदलायला खूप कालावधी आणि प्रयत्नांची गरज आहे.

अजूनही शरिरसुखासाठी अशा व्यक्तींकडे मुद्दामहून जाणारी मानसिक विकृती तीतकीच निंदणीय आहे.मुख्यत्वे समाजप्रवाहात आले तरी इतर बाबी मिळविण्यासाठी त्यांचेकडून नक्कीच प्रयत्न होईल.

हा समाज रेल्वेमध्ये चक्क लूटत असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, त्यामागची कारणीमिमांसा आवश्यकच आहे.मात्र असे करताना रेल्वे पोलीस ,टीसी चक्क डोळे झाकून बसलेले असतात.आपल्या डोक्याला ताप नको म्हणून आपल्यासारखे नागरिक खिशात असलेले २०-५० रुपये त्यांना देवून मोकळे होतात मग आपणच विचार करतो साला यांची कमाई तर आपल्यापेक्षा कितीतरी जास्त असणार, मग अशी पैशाची चटक लागल्यानंतर ही लोक खरच त्यांचा धंदा सोडून चहा बिस्कीट विकतील का हा एक गहन प्रश्न आहे.

हर्माफ्रोडाईट पण एक मेडिकल कंडिशन असते. म्हणजे जन्मतः स्त्री व पुरुष असु शकतात. जी लक्षणम डोमिनेट होतात ते बाह्यांग पण आतील रचना वेगळी.

मुंबईत तरी अनेक जण नवसासाठी किंवा पैश्यासाठी मुद्दाम अत्याचार करवून या पंथाला लावले जातात.
( असे टाईम्स ऑफ इंडीया मधे वाचले होते. ) अनेक सिग्नल्सवर किंवा जिथे जिथे तरुण तरुणी एकत्र दिसतात तिथे ते त्रास देतातच. आणि बहुतांशी लोकांना त्यांची किळस वाटत असल्याने त्यांना पैसे मिळतातच. ( तसे वाटण्यासाठी अंगावर थुंकणे, असभ्य चाळे करणे, कपडे वर करणे, नको तिथे स्पर्श करणे असे ते सर्रास करतात.)

पुर्वी त्यांचे एरीया आणि दिवस ठरलेले असत, आता तसे दिसत नाही. ईझी मनीची चटक लागल्याने त्यातले किती जण रुढ जीवन स्वीकारतील आणि त्यांना तशी संधी मिळेल, हे काळच ठरवेल.

सिंधी लोकांमधे लहान मुलांच्या बारश्याला वगैरे मुद्दाम त्यांना आशिर्वाद देण्यासाठी बोलावतात पण अशी संधी त्यांना क्वचितच मिळत असणार. अनेकवेळा मुंबईत बाल्कनीत जर लहान मुलांचे कपडे वाळत घातले असतील तर मुद्दाम ते येऊन त्रास देतात.

एका प्रख्यात बँकेने कर्ज वसूलीसाठी त्यांचा वापर केला होता.

पण तरीही मला तरी असे आढळले कि हे लोक सहसा लोकांच्या उपयोगी पडताना, मदत करताना दिसत नाहीत.
मुंबईत जर लोकलमधे त्यांनी स्त्रियांना मदत केली ( संरक्षणात्मक ) तरी पुरेसे आहे. असे दयाळू वगैरे लोक
जास्त करून मी कथा आणि चित्रपटातच बघितले आहेत.

मुंबईत त्यांच्या मोठ्या संघटना आहेत. त्यांच्या प्रथा ( उदा. मयताला उभ्याने नेणे ) ते पाळतच असतात.
( आमिर खानच्या तलाश चित्रपटात त्याचे चित्रण होते पण ते दृष्य नंतर कापण्यात आले. )

त्यामूळे जर त्यांना कायदेशीर ओळख द्यायची झाली तर त्यांना कुठल्याच कायद्यातून ( सार्वजनिक ठिकाणावरचे असभ्य वर्तन, विनयभंग वगैरे ) सूट मिळता कामा नये.

सहृदय, माहितीपूर्ण व चर्चेस चालना देणार्‍या प्रतिसादांसाठी प्रतिसाददात्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

स्नेहनिल, लिंक द्यायचा प्रयत्न करतो. दरम्यान, चिनूक्स ह्यांच्या लेखनात 'चित्रा पालेकर' ह्या विषयावर जो लेख आहे तो शोधलात तर एक मोठी चर्चा वाचायला मिळेल तुम्हाला!

-'बेफिकीर'!

त्यामूळे जर त्यांना कायदेशीर ओळख द्यायची झाली तर त्यांना कुठल्याच कायद्यातून ( सार्वजनिक ठिकाणावरचे असभ्य वर्तन, विनयभंग वगैरे ) सूट मिळता कामा नये.<<< अनुमोदन!

पण तरीही मला तरी असे आढळले कि हे लोक सहसा लोकांच्या उपयोगी पडताना, मदत करताना दिसत नाहीत.
मुंबईत जर लोकलमधे त्यांनी स्त्रियांना मदत केली ( संरक्षणात्मक ) तरी पुरेसे आहे. असे दयाळू वगैरे लोक
जास्त करून मी कथा आणि चित्रपटातच बघितले आहेत.<<< येथे मात्र असे म्हणावेसे वाटते की वर्षानुवर्षे त्यांना मिळालेली बहिष्कृत वागणूक त्यांच्यातील सहृदयतेला मारक ठरल्यामुळे व ह्याशिवाय स्वतःचे (उपद्रव)मूल्य सिद्ध करणे अशक्य असल्याने ते असे काहीबाही करत असावेत.

मला अजून अश्या प्रकारच्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहे ज्यात तृतीयपंथियांचे जे तीन प्रकार मला त्या डॉक्टरकडून समजलेले होते ते योग्य आहेत की नाहीत ह्यावर भाष्य केले जाईल. कृपया वैद्यकीय तज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा अशी विनंती!

-'बेफिकीर'!

अशोकराव,

तुमचा प्रतिसाद चांगला आहे, आवडला.

विशेष नोंद करण्याजोगा वाटला म्हणून हा प्रतिसाद दिला.

धन्यवाद!

>>>>> मग अशी पैशाची चटक लागल्यानंतर ही लोक खरच त्यांचा धंदा सोडून चहा बिस्कीट विकतील का हा एक गहन प्रश्न आहे. <<<<<
मुम्बैमधे अन अन्यत्रही दिसणारे तृतियपंथी "खरोखरच शारिरिकदृष्ट्ञा" तृतियपंथी आहेत की त्यातील काही केवळ सोन्गे सजविलेले आहेत याचि तपासणी करणारी कुठलीही यंत्रणा नाही.
कायद्याने ओळख दिली, तरी ती ओळख खरोखरच तशी आहे हे वैद्यकियदृष्ट्या न तपासताच ओळखीचे प्रमाणपत्र देणे धोकादायक आहे.

बेफीजी --- चागला विशय मान्डलात ...

पुर्वी मी टी व्ही वर एक मुलाखत पाहिली होती ( अत्ता नक्की तो प्रोग्राम आठवत नाहिये) त्यात ह्या लोकानी त्याची मते दु: ख मान्डले होते ..आणी त्याची माफक अपेक्शा होती समजा कडुन की ----त्याना एक नॉरमल व्यक्ती म्ह्णुन ओळखावे , नोर्मल शाळा , कोलेज , नोकरी ई ठिकाणी प्रवेश असावा आणी कोणतेही आरक्क्षण ई ई नको . अशी विचारसरणी असावी .

ह्या साठी काय करावे ह्याचे काही मुद्धे आपण माडलेलेच आहेत .

<<<एक देश म्हणून आपण अधिक 'ह्यूमन' होत आहोत हे चांगलेच म्हणावे लागेल.>>>>. १०० % अनुमोदन.....

असे दयाळू वगैरे लोक जास्त करून मी कथा आणि चित्रपटातच बघितले आहेत>> नाही, मला प्रत्यक्ष अनुभव आहे.

ट्रेनमधे येतात तेव्हा १०-२० रुपये देणे यापलिकडे माझा एरवी संबंध नाही. पण एकदा कॉलेजच्या वयात मुलीमुली जनरलमधून लांबपल्ल्याचा इमर्जन्सी प्रवास करताना, आणि नंतर परगावी एकटी असताना अगदी मोक्याच्या वेळी मला तृतीयपंथीयांनी आपणहून मदत केली आहे आणि मी सुरक्षित माझ्या इप्सितस्थळी पोचेन याची काळजी घेतलेली आहे. दोन्ही वेळेला परिस्थिती दिसत असूनही आणखी कुणीही मदत करायला पुढे झालेलं नव्हतं. अगदी मी ज्या मध्यमवर्गातली आहे त्यातले लोकही अपवाद नव्हते. केवळ तृतीयपंथी होते म्हणून त्या सिच्युएशन्समधून अतिशय सहज बाहेर पडू शकले.
तेव्हा मला कधीच या लोकांशी फटकून, तुसडेपणे वागता येत नाही. ते वाईट वागत नाहीत, गुंडगिरी करत नाहीत वगैरे म्हणायचं नाही पण तीही एरवी माणसंच असतात. सगळ्यांना एका लेबलमधे नाही बसवता येणार.

लेख आणि अशोक यांचा दीर्घ प्रतिसाद दोन्ही आवडले.

तृतीयपंथियांना आरक्षण देण्याचा मुद्दाही बरोबर वाटतो.

खरं तर यांना वेगळे का मानायचे का ठेवायचे हा प्रश्नच आहे.

काही देशांनी तॄतीय पंथियांना योग्य मार्गी लावण्याचे फार चांगले प्रयत्न केलेत.
थायलंड मधील अल्काझार किंवा टिफनी शोज याचे उदाहरण .
इतकेच नाही तर तिथे अगदी तुमच्या आमच्या सारखे हॉटेलात वेटर, मॅनेजर, दुकानात सेल्समन, गाईड म्हणून हे लोक काम करतात.

माझे काही अविस्मरणीय तॄ. पं. पेशंटस आहेत.
पैकी एकाचा अनुभव यावेळच्या दिवाळी अंकात लिहिला होताच.

Pages