ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे
हा फोटो जरूर पहा
https://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...
साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती
खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .
डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत )
Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे
हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .
वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो
या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .
या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .
साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ?
मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .
बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .
ओकेज हे जमेल मला
ओकेज
हे जमेल मला
-२८ किलोबद्दल तुझे मनःपूर्वक
-२८ किलोबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन!
लेख आवडला!
सुप्पर अभिनंदन
सुप्पर अभिनंदन
आकर्षक ऑफर... ज्याना ज्यांना
आकर्षक ऑफर...
ज्याना ज्यांना फोटो मधे वजन कमी करुन दिसायचे असल्यास मला तुमचा फोटो पाठवुन द्यावे...
फोटोशॉप मधे वजन कमी करुन मिळेल
धन्यवाद
केदार .. मला चहाची सवय नाहीच
केदार .. मला चहाची सवय नाहीच .. दिवसातुन सकाळी एकदा मिळाला तर पितो. नाहीतर ते ही नाही.. दिवसभर..
त्यामुळे चहा नाही मिळाला कि असे काहीतरी होते हे माझ्यासाठी तरी नविन होते ..
मस्तच !!! अभिनंदन . वजन आणि
मस्तच !!!
अभिनंदन . वजन आणि आहाराच्या नवीन सवयी अशाच राहोत ही सदिच्छा
मंजूडी + १००. मनःपूर्वक
मंजूडी + १००.
मनःपूर्वक अभिनंदन केदार. कीप इट अप
केदार अभिनंदन आणि तुझ्या
केदार अभिनंदन आणि तुझ्या चिकाटीला हॅट्स ऑफ्फ. वजन कमी करणे हे खरंच पहिल्यांदा फार अवघड वाटते. कमी होऊ लागलं की स्फुरण चढतं.
अभिनंदन केद्या. मी सध्या
अभिनंदन केद्या.
मी सध्या नर्वस 90s मध्ये आहे प्रयत्न सुरु केलेत आत्ता.
मस्तच रे! हार्दीक अभिनंदन
मस्तच रे! हार्दीक अभिनंदन !
आता (कॅलरीज) होउ दे खर्च,
(सायकलींग) आहे घरचं....
अशी नवी घोषणा करायला हवी
स्फुरण चढतं. >>>>>.. हो पण
स्फुरण चढतं. >>>>>.. हो पण त्या स्फुरण चे कधी पुरणात रुपांतर होउन ते पुरणपोळी बनुन पोटात जाते तेच कळत नाही
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
वॉव केदार अभिनंदन.... खुपच
वॉव केदार अभिनंदन....
खुपच पॉझिटिव्ह लेख आहे. बरयाच जणांना याचा फायदा होईल.
भारतीय आहार बराचसा
भारतीय आहार बराचसा कार्बोहाड्रेटचा आहे. आदर्श आहार 50% कर्बोदके ,35% प्रथिने, 15% स्निग्ध पदार्थ असा असावा.
सगळ्याना धन्यवाद . खर तर यात
सगळ्याना धन्यवाद .
खर तर यात अवघङ काही नाहीये. फक्त सुरूवातीचे थोडे दिवस मनावर ताबा हवाय .
व्यायामाची तर (विशेषतः चालणे ) सवय झाल्यानंतर नाही केला तर कस तरी वाटू लागत .
जबरदस्त.. तुमच्यामुळे ज्यांना
जबरदस्त.. तुमच्यामुळे ज्यांना ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना नक्कीच हुरूप येईल.. धन्यवाद
क्या बात है, केदार!!!!! हॅट्स
क्या बात है, केदार!!!!! हॅट्स ऑफ!!!
तुमच्यामुळे ज्यांना ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना नक्कीच हुरूप येईल>>>> +१
मी सध्या १०३ वरून ९० वरती आले
मी सध्या १०३ वरून ९० वरती आले आहे. हेवी मेडिकेशन मुळे वेट लॉसचा वेग अतिशय कमी आहे. पण रुटिन मध्ये मुळीच खंड न पाड्ता आणि धीर खचू न देता अजून २५ किलो कमी करायचे आहे या वर्षात.
ज्यांना ज्यांना वजन कमी
ज्यांना ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना नक्कीच हुरूप येईल >>>>>>> नुसता हुरुप आणुन उपयोग नाय काय.. असा धागा निघला पाहिजे पुढच्या ६-७ महिन्यात तरच त्या हुरुपाचे सार्थ होईल
मी फक्त ५८, किलोचा - दोन टाईम
मी फक्त ५८, किलोचा - दोन टाईम जेवण, २ टाईम चहा, ऑफिसात क्वचित चहा पितो.
सकाळी १० ला जेवलो की घरी रात्रई ८, ८.३० मग शतपावली, सकाळी गच्चीवर येरझारा, सुर्यनमस्कार
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा .....उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला>>> हे इतकं पटलंय ना..
बिफोर आफ्टर फोटो मुळे हे डायट सुरु करायचा हुरुप आलाय!
शुभस्य शिघ्रम्!!
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन केदार!
>>"आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक
अगदी! कमी झालेलं वाजन टिकवायला कृतीत सातत्य हवं हे माहिती असूनही हा असा विचार आला की गाडी डिरेल व्हायला वेळ लागत नाही.
अभिनंदन केदारदा! हॅट्स
अभिनंदन केदारदा! हॅट्स ऑफ!
माझं आहारावर नियंत्रण असलं तरी गोड आवडतं असल्याने गाडी घसरतेच ..
1 tas salag vyayam karacha?
1 tas salag vyayam karacha? 30 30 minite sakal syandyakal kela tari chlel ka?
1 tas salag vyayam karacha?
1 tas salag vyayam karacha? 30 30 minite sakal syandyakal kela tari chlel ka? >> चालेल . मीही तसेच करतो . सकाळी संध्याकाळी ४० मिनिटे .
बहुधा सलग २० मिनिटापेक्षा कमी केल्यास फायदा होत नाही म्हणतात , पण मी त्यातला जाणकार नाही
सॉलिडय बॉस! अभिनंदन आणि
सॉलिडय बॉस!
अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा! इथे लिहिलस ते खरच खुप उत्तम केलस. खुप लोकांना हुरुप येइल.
बहुधा सलग २० मिनिटापेक्षा कमी केल्यास फायदा होत नाही म्हणतात , पण मी त्यातला जाणकार नाही >>>>> फार जाणकार असायची पण गरज नाही. काहीही न करण्यापेक्षा काही मिनिटे का असेना काहीतरी केलेलं केव्हाही चांगलं. फक्त असं आहे व्यायामामुळे कॅलरी जाऊन वजनात घट होऊन शरिराला फायदा होण्याचा स्पीड फार कमी असतो. ह्याउलट डायट कडे लक्ष दिलं की एंट्रीलाच आपण लक्ष देत असल्यामुळे स्पीड जास्त आणि अर्थातच फायदा लवकर "दिसतो".
धन्यवाद केदार.... मी पण खुप
धन्यवाद केदार.... मी पण खुप प्रयत्न करतो आहे .. पन अजुनही काहि खास बदल जानवत नाहिये .. अनि नक्कि एक दिवस खाल्ले तर काय होनार ... हेच नडते आहे.. but i m really inspired by your success ... आता नक्कि प्रयत्न आनि असाच फोटो इथे असनार अजुन ७ महिन्याने ... हे निच्छित ... all the best to you too...
हा बीबी कायम वरच रहावा
हा बीबी कायम वरच रहावा ह्याकरता काहीतरी करायला हवं.
जेव्हा केव्हा थोडं मोटिवेशन हवं असतं तेव्हा वाचायला बेस्ट आहे.
अभिनंदन केदार!!
अभिनंदन केदार!!
Pages