
Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg (पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी)
मराठी साहित्याचं वाचन पुर्वीपासून असलं तरी एखाद्या लेखकाने कायमचं पछाडल्याचा अनुभव नेहेमी आला नाही. काही प्रथम आवडले. नंतरही वाचन सुरु राहीलं पण वैचारिकदृष्ट्या काही चालना मिळेल असा भाग त्यात कमी होता. जी.एं. नी मात्र सुरवातीपासूनच डोक्याचा ताबा घेतला, वाचल्याक्षणापासून पछाडलं आणि माझं जी.ए. वेड हे उत्तरोत्तर वाढतंच गेलं. आजदेखिल जी.एं चं पुस्तक हातात घेताना वेगळ्याच विश्वाचे दरवाजे आपण उघडतो आहोत हे जाणवतं. वाढत्या वयाबरोबर जी.एं. चं साहित्य हे आयुष्याचे नवनवीन पैलु उलगडत राहतं. अभिजात साहित्याची माझी कल्पना ही सार्वकालिक शाश्वततेची आहे. जी.एं. चं साहित्य हे आजपासून हजार वर्षांनंतर देखिल टवटवीतच राहाणार कारण त्यांनी आपल्या साहित्यात मांडलेले प्रश्न हे सर्व कालात, सर्व मानवी समाजात त्या त्याकाळच्या तत्त्वज्ञांनी हाताळलेले आहेत. नियती, मानव व मानवेतर शक्ती यांतील संबंध, माणसा माणसांतील द्वंद्व, माणुस म्हणुन भोगावं लागणारं दु:ख, मानवी स्वभाव, त्यातील गुंतागुंत, मन, परमेश्वर, समाज या गोष्टींचं गुढ उकलण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पुढेही चालु राहील. या सर्व प्रश्नांची जास्तीत जास्त निर्दोष उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न माणुस करत आला आहे. जी.एं.नी आपल्या कथांमध्ये हेच केलं. वर दिलेल्या “पिंगळावेळ” या कथासंग्रहावरील अवतरणाप्रमाणेच जी.ए. कायम एकच कथा सांगत राहीले. दुखर्या भागाजवळील शीर आयुष्यभर तोडत राहून जी.एंनी हे भरजरी साहित्य लेणं आमच्यासारख्यांना दिलं. आणि हे दान तरी किती श्रीमंत? दहा पंधरा वर्षापूर्वी वाचलेले जी.ए. वेगळे, आताचे जी.ए. वेगळे. दरवेळी नवी जाणीव, नवा अनुभव, नवा पैलु. जी.एं. चं लिखाण हे महासागराप्रमाणे सारंकाही शांतपणे सामावुन घेऊन पुन्हा भरती आल्याप्रमाणे वरचढ, विस्मयचकीत करणारं. अभिजात साहित्याचं हे दान आम्हाला देताना स्वतः जी.एं.नी आयुष्यात अपार दु:ख सोसलं. जी.एं. चं सारं लेखन त्या वेदनेचा हुंकार आहे. किंबहुना आयुष्यभर सोसलेल्या दु:खाने जी.ए. स्वतःच एक वेदना बनुन गेले होते.
जी.एं. चं लिखाण नियतीवादी आहे का? मला हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. ते नियतीवादी असले किंवा नसले याने खरोखरंच काहीही फरक पडत नाही. आपल्या अवती भवती वावरणारी बहुतेक माणसं नशीबाला दोष देणारी आढळतात. यातील बहुतांश माणसांचा दैववाद हा व्यावहारिक यशाशी निगडीत झालेला असतो. जी.ए, रुढार्थाने अध्यात्मिक नसले तरी देखिल त्यांच्या सार्या लिखाणात “मेटाफिजीकल” धागा कायम दिसुन येतो. किंबहुना स्वतः जी.एं. ना साहित्यिक प्रगल्भता ही अशा तर्हेनेच अपेक्षित होती. व्यावहारिक समस्यांमध्ये त्यांना फारसा रस नव्हता. मानव व मानवेतर शक्ती यांतील संबंध, संघर्ष हाच त्यांच्या आयुष्यभराच्या चिंतनाचा विषय होता. या चिंतनात जी.एं. ना माणसाच्या मर्यादा अपरिहार्यपणे जाणवल्या. या मर्यादा फार क्रूरपणे नियतीने जी.एं. ना स्वतःच्या आयुष्यात स्पष्टपणे दाखवून दिल्या होत्या. जी.एं. ची नियतीशरणता ही यातुन आली असावी. जी.ए. प्रतिभावंताच्या दृष्टीने मानव आणि नियती मधील संबंध निरखित गेले. त्यावर त्यांच्या अफाट वाचनाचा, वैयक्तिक आयुष्यातील अनुभवाचा साज चढवत जी.एं.चं स्वतःचं तत्त्वज्ञान निर्माण झालं. आता हे तत्त्वज्ञान पटणं न पटणं हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणावर अवलंबुन आहे. मात्र भावलेली कला आणि त्यात सांगितलेलं तत्त्वज्ञान हे तात्त्विकदृष्ट्या स्वतःला पटलंच पाहिजे हा आग्रह मला कधीच कळला नाही. कलेच्या आस्वादात त्यामुळे काही फरक पडतो असं देखिल मला वाटत नाही. स्वतः जी.ए. कसल्याच बाबतीत आग्रही नव्हते. नियतीच्या घडामोडीत कसला आकृतीबंध दिसतो आहे का हे पाहण्यात ते गढून गेले होते. या शोधासाठी काहीवेळा आवश्यक असणारा अलिप्त बैरागीपणा त्यांच्यात उपजतच होता. “सांजशकून” आणि “रमलखुणा” सारखे कथासंग्रह वाचताना जी. एं. ची कथा कुठलं वळण घ्यायला लागली होती हे स्पष्टपणे कळुन येते. “सांजशकुन”, “रमलखुणा” मध्ये जी.एं. चा मार्ग स्पष्ट झाला असला तरीही याआधीच्या सर्व कथासंग्रहात जी.एं.ची प्रत्येक कथा विशिष्ठ वळणाने जाणारी आहे हे जाणवते. मानव व नियतीच्या संबंधातील आकृतीबंध शोधाण्याचा प्रयत्न करणार्या जी.एं.च्या कथांना मात्र एक निश्चित आकृतीबंध होता.
आमच्यासारख्या जी.ए. प्रेमींवर सुनिताबाई देशपांडे आणि श्री.पुं. चे खुप उपकार आहेत. त्यांच्याच प्रयत्नांनी जी.एं. ची पत्रं प्रकाशित झाली आणि या कायम अलिप्त, वेगळ्या राहीलेल्या लेखकाच्या आयुष्यावर काहीसा प्रकाश पडला. जी.एं. चं व्यक्तीमत्व अतिशय गुंतागुंतीचं होतं. त्यांच्या आवडीनिवडी काहीवेळा टोकाच्या वाटण्याजोग्या होत्या. स्पष्टपणे आपली मते व्यक्त करताना कुणाचीही भीडमुर्वत न ठेवणारे जी.ए. जवळच्या माणसांबाबत कसे हळवे आणि संपूर्ण शरण होते हे पाहुन गंमत वाटते. पत्रांमध्ये जी.एं. चं नुसतं अफाट वाचनच जाणवत नाही तर त्यावर त्यांनी केलेलं प्रगाढ चिंतन देखिल जाणवतं. जी.एं. ना माणसांप्रमाणेच पुस्तकं सुद्धा वेगळ्या प्रकारची लागत. वेगळ्या वाटेने जाणारी माणसं आणि वेगळे अनुभव देणारी पुस्तकं यांत जी.ए. रमुन जात. मात्र पुस्तकं काय किंवा माणसं काय दोन्ही बाबतीतली जी.एं. ची निवड अत्यंत काटेरी होती. सर्वसाधारण लोकप्रिय पुस्तकं जी.एं. ना फारशी भावली नाहीत. माणसाला, माणसाचे म्हणुन अपरिहार्यपणे पडणारे जे प्रश्न असतात त्यांची चर्चा ज्यांत नसेल अशा लिखाणाच्या जी.ए. वाटेला गेले नाहीत. गुढाचं जी.एं.ना आकर्षण होतं. पारंपारिक अध्यात्म, संतवाड़मय, गांधी हा त्यांच्या कायम टिकेचा विषय राहीला. पण आवडीच्या लेखक, पुस्तकाबद्दल लिहीताना जी.ए, भरभरुन लिहीत. जराही हात आखडता घेत नसत. “सत्यकथा” हा त्यांच्या आवडीचा विषय. काही लेखकांच्या काही आवडलेल्या कथांबद्दल ते हमखास लिहीत. अरविंद गोखले (कातरवेळ), गंगाधर गाडगीळ (तलावातले चांदणे), सदानंद रेगे (चंद्र सावली कोरतो), जयवंत दळवी (रुक्मिणी), ग. दि. माडगुळकर(वीज) यांचे उल्लेख जी.एं. च्या पत्रात वारंवार येतात. मराठी साहित्यात टिकेप्रमाणेच जी.एं. चे खास आवडीचे विषय देखिल होते. गडकरी हा असाच त्यांच्या पसंतीचा विषय. विश्राम बेडेकरांची “रणांगण” कादंबरी, ईरावती कर्वेंची “युगान्त” याबद्दल जी.ए. भरभरुन लिहीत. व्यासांच्या महाभारताला जी.ए. संपुर्ण शरण होते. महाभारत हा त्यांच्या कायम चिंतनाचा विषय राहीला. मात्र जी.एं.च्या प्रचंड वाचनाचा बहुतेक भाग हा इंग्रजी साहित्याने व्यापला होता. इतका कि “माझं सारं ऋण परकिय चलनात आहे” असं ते म्हणत.
जी.एं. च्या पत्रांवरुन सर्वप्रथम जाणवतं ते हे की लहानपणापासूनच जी.एं.ना नियतीचे तडाखे सोसावे लागले. आवडत्या, आपल्या माणसांचे मृत्यु पाहावे लागले. त्यांची जी प्रेमाची माणसं काळाने उचलुन नेली त्यात सख्ख्या बहीणीचाही समावेश होता. जी.एं. मधला कडवटपणा आणि त्यांची नियतीला समजुन घेण्याची सततची धडपड यातुनच आली असावी. सर्वसाधारणपणे कष्टात गेलेल्या बालपणात काही एका मर्यादेत त्यांचे लाडदेखिल झाले. याचा उल्लेख पत्रांत वारंवार येतो. आई, बहीण, गाय याबद्दल लिहीताना जी.एं. भावनावश होतातच. पुढे जी.एं.नी त्यांच्या मावसबहीणींना स्वतःकडे आणुन त्यांचा सांभाळ केला. आपल्या दोन छोट्या भाच्यांबद्दल लिहीताना जी.एं. चा कुटूंबवत्सल चेहरा समोर येतो. लेखक म्हणुन जी.एं. ना अमाप लोकप्रियता मिळाली. मराठी साहित्यात लोकप्रिय लेखक दुर्मिळ नाहीत. मात्र जी.एं. मिळालेल्या लोकप्रियतेची नोंद वेगळ्या तर्हेने करणं आवश्यक आहे. ज्याला “स्टार क्रेझ” म्हणता येईल अशा तर्हेची ही लोकप्रियता होती.लोकांमध्ये फारसं न मिसळणारे, धारवाडसारख्या मुंबई, पुण्या पासून दुर आडवाटेच्या गावात राहणारे, साहित्य संमेलनं, साहित्यीक गप्पा यासर्व गोष्टींपासून अलिप्त असलेले जी.ए. त्यांच्या वाचकांमध्ये तत्त्वज्ञानी लेखकाचं स्थान मिळवुन राहिले होते. आजही त्यांचं हे स्थान अबाधित आहे. लेखक म्हणुन कारकिर्द गाजवत असतानादेखिल नियतीने जी.एं. चा पिच्छा सोडला नाही. त्यांच्या “काजळमाया” कथासंग्रहाला साहित्य अकादमिचं पारितोषिक मिळालं. जी.एं. नी दिल्लीला जाउन ते पारितोषिक स्विकारत बहिणींसमवेत आनंदाचा क्षण उपभोगला. दुर्दैवाने ते पुस्तक प्रकाशन तारीख आणि रजिस्ट्रेशनच्या घोळात अडकलं. अत्यंत मानी असलेल्या जी.एं. नी पारितोषिक रकमेसकट परत केलं. हा जी.एं. चा सर्वस्वी स्वतःचा निर्णय होता. साहित्य अकादमिने याबाबत कसलिही सुचना केली नव्हती. जी.एं.ना पुस्तकावर कसलाही डाग नको होता. मात्र हा सल जी.एं. च्या मनात कायम राहीला. पत्रांमध्ये जी.एं.ची अनेक रुपं समोर येतात. त्यांना अनेक विषयात नुसता रसच नव्हता तर गतीदेखिल होती. संगीत, चित्रकला, फोटोग्राफी अशा अनेकविध विषयांवर ते पत्रात लिहीत. ते स्वतः चित्रकार होते. रेम्ब्रॉचे पेंटिग्ज हा एक त्यांचा अत्यंत आवडता विषय होता. जी.एं. चा अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी पत्रव्यवहार होता. त्यातल्या प्रत्येकाला पत्र लिहीण्याची जी.एं. ची अशी स्वतःची खास पद्धत होती. मात्र ते स्वतःच्या कडव्या मतांना कधीही मुरड घालीत नसत. यादृष्टीने जिज्ञासूंनी सुनिताबाई देशपांडे, श्री. पु. व जयवंत दळवी यांना जी.एं.नी लिहीलेली पत्रे जरुर वाचावीत. फार वेगळे असे जी.ए. त्यात दृष्टीस पडतात.
जी.एं.ची कथा ही माझ्यासाठी सर्वस्वी वेगळ्या वातावरणाची, वेगळ्या विश्वाची, इतकंच नव्हे तर वेगळ्या तत्त्वज्ञानाची सफर असते. त्यांच्या काही कथा वाचताना अक्षरशः दम लागतो. “पिंगळावेळ” मधली “स्वामी” ही कथा या जातकुळीतली आहे. काही कथा वाचवत नाहीत एवढी वेदना त्यात भरलेली असते. “वीज” ही कथा अशा वेळी पटकन आठवते. कथा वाचताना जी.एं. च्या पत्रातील काही ओळी आठवतात. “विशिष्ठ सिच्युएशन मध्ये सापडलेली माणसं” हे जी.एं.च्या कथांचे नायक किंवा नायिका. मग तो “वीज” मधला बळवंत मास्तर असो कि “माणुस नावाचा बेटा” मधला दत्तु. “तळपट” मधला दानय्या असो कि “लई नाही मागणे” मधला बंडाचार्य. जी.एं.च्या कथेतला प्रत्येक माणुस नुसता नियतीशी झगडत नाही. कारण तसे सर्वच जण झगडत असतात. ही माणसं काही एका सापळ्यात अडकलेली आहेत. त्यांच्या सामान्य आयुष्यात त्यांना कायमची मान खाली घालावी लागेल असं काहीतरी त्यांच्या हातुन घडलं आहे. काहीवेळा इतरांमुळे त्यांच्या आयुष्याचा जणु ओघच थांबला आहे. काहींच्या मनात अपमानाचं विष कायमचं राहुन त्यांची आयुष्य वठुन गेली आहेत. सारी परीस्थीतीशी तडजोड करीत झगडण्याचा बरेचदा निष्फळ असा प्रयत्न करताना दिसतात. आणि हर प्रयत्नात त्यांच्या मर्यादा अधोरेखीत होत राहतात. मात्र या मर्यादा फक्त त्या कथा नायक किंवा नायिकेच्या नाहीत तर या एकंदर मानवाच्याच मर्यादा आहेत. कथा “ऑर्फीयस” सारखी ग्रीक पुराणकालीन असो कि “इस्किलार” सारखी मध्ययुगीन, जी.एं. ची कथा या मानवी मर्यादांच्या चौकटीतच वावरत राहते. नाईल नदी विशिष्ठ मार्गानेच का जाते याचं जी.एं. ना आकर्षण होतं. त्याचप्रमाणे, नियतीने कथेतील माणसांसाठी आखलेला व्युह, त्यात बरोबर अडकणारी दुबळी माणसे, योग्य वेळ येताच खेचला जाणारा फास, हे सारं काय कोडं आहे याचाच शोध जी.एं.च्या कथा घेत असतात. जी.एं. ना निव्वळ सामर्थ्यवान माणसांचे मातीचे पाय दाखवायचे नसतात तर ही माणसे देखिल नियतीसमोर कशी हतबल असतात हा त्यांच्या कथेचा विषय असतो. “पडदा” कथेतील प्रिं. जठार आपल्या बायको आणि मुलासमोर असेच हतबल झालेले दिसतात. अत्यंत रसिक अशा, जीवन सर्वार्थाने उपभोगण्याची इच्छा असणार्या या माणसाला सारं काही असुन सुद्धा अरसिक बायको आणि मुलगा लाभतात. त्यातही दुर्दैव असं कि ही दोन्ही माणसं कुठल्याही अर्थाने वाईट नसतात. जठारांची रसिकता समजण्याची कुवतच त्यांच्यात नसते. नेमका हाच आकृतीबंध जी.एं.च्या बर्याच कथांमध्ये दिसतो. पूर्णपणे वेगळ्या स्वभावाची एकत्र आलेली माणसं, त्यांच्या मर्यादा, एकमेकांशी तडजोड करण्याची धडपड आणि त्यात आलेलं अपयश. जी.एं.च्या प्रत्येक कथेवर बरंच काही लिहीता येईल. मात्र या लेखाचा तो विषय नाही. येथे मी इतकंच म्हणुन थांबतो की जी.एं.च्या कुठल्याही कथेत अनेक शक्यता दडलेल्या असतात हे नक्की.
असामान्य लेखक आणि असामान्य माणुस असंच जी.एं. चं वर्णन करावं लागेल. अतिशय मानी आणि अत्यंत कडवी, काटेरी मतं असणारे जी.एं. मित्रांबद्दल आपुलकी, आदर, कौतुकाने बोलताना थकत नाहीत. माधव आचवलांविषयी जी.ए. असेच हळवे झालेले दिसतात. त्रस्त मनस्थितीत असताना दळवींनी युसीस तर्फे त्यांना भाषांतराची कामं दिली होती त्याचा अत्यंत कृतज्ञतापुर्वक उल्लेख न चुकता आणि वारंवार येतो. जी.एं. बद्दल विचार करताना असं जाणवतं कि त्यांनी स्वतःचं आयुष्यंच कथांमध्ये विखरुन ठेवलं आहे. “रमलखुणा” कथासंग्रहातले दोन्ही प्रवासी म्हणजे खुद्द जी.ए.च असं मला नेहेमी वाटतं. त्यातल्या दोन्ही कथांमध्ये त्यांच्या सार्या तत्त्वज्ञानाचा अर्क उतरला आहे. जी.एं. चा शोध घेण्याचे प्रयत्न कमी झाले नाहीत. त्यांच्या कथांमधुन, त्यांच्या खासगी आयुष्यातील घटनांमधुन काहींनी धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातुन फारसं काही हाती लागलं नाही. यालेखकाविषयी लोकांचं कुतुहल आजतागायत कायम राहीलं. एखाद्या महासागराप्रमाणे जी.ए. अथांगच राहीले.
अतुल ठाकुर
शंतनू.... खुद्द जी.एं.चा नवीन
शंतनू....
खुद्द जी.एं.चा नवीन आवृत्यांना विरोध होता. त्यांचे म्हणणे (ते चूक की बरोबर हा मुद्दा नाही) असे की वाचकाला अमुक एक पुस्तक हवेच आहे तर ते त्याने मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुस्तक दुर्मिळ बनणे हे त्या पुस्तकाची खासियत असायला हवी. दुसर्या आवृत्तीचे सव्यापसव्य त्याना नकोसे वाटत मग त्यांच्यानंतर राहाणार्या प्रभावतीलाही ती कामे झेपणारी नाहीत म्हणून त्यानी भटकळांकडून एक विशिष्ट रक्कम घेऊन त्यानाच सार्या कथासंग्रहाचे हक्क देवून टाकले....बहिणीची आर्थिक दृष्टीने काहीतरी सोय लावावी हाच मुख्य हेतू होता त्यामागे.
ओल्गा लेग्वेलच्या "आय सर्व्हाईव्हड हिटलर्स ओव्हन्स" ह्या कृतीचा जी.ए.कुलकर्णी यानी "वैर्याची एक रात्र" हा अनुवाद केला आहे. त्याची पहिली आवृत्ती १९८२ ची आहे...नंतर दोन आवृत्त्या निघाल्या. माझ्याकडे आहे.
"सोनपावले" चा तुम्ही उल्लेख केला आहे. अशा संग्रहात....जो जी.ए. गेल्यानंतर प्रकाशित केला गेला....एरव्ही कोणत्याही कथासंग्रहात प्रकाशित न झालेल्या कथा घेतल्या गेल्या अशी जाहिरात केली गेली....पण ज्या घेतल्या त्याचा स्तर खुद्द जी.ए.ना देखील कधीच मान्य नव्हता. सन १९४० मध्ये त्यांची "संध्या" मासिकात "जुना कोट" नामक एक कथा प्रसिद्ध झाली होती. जी.एं.च्या मते ती एक सामान्य कथा होती....{सामान्य विशेषणाचे प्रयोजन खुद्द जी.एं.नी केले आहे}. काही वर्षानंतर प्रसिद्ध झालेली कथा वाचताना जीएंना जाणवले हे माझे लिखाण नाही. वाजंत्रीबरोबर, खर्या सनईबरोबर काल्पनिक सनई वाजवत पोराने चालत राहावे तसा तो लेखनाचा प्रकार. सारे लेखन तकलुपी, बेगडी, भाडोत्री झालेले...... आता इतक्या पोटतिडिकेने स्वतः लेखकानेच अशा कथेविषयी लिहिले आहे म्हणजे परचुर्यानी १९९१ च्या "सोनपावले" मध्ये ती कथा घेणे म्हणजे अशिष्टपणाचेच ठरते, कारण या काळापर्यंत चुनेकरासारख्या संपादकाने जी.एं.चे त्या कथेविषयी मत वाचलेच नसेल असे समजणे बालिशपणाचे मानले पाहिजे. पण आता नावाला वजन प्राप्त झाले आहे....कसाही छापला तरी तो खपला जातो ही एक छुपी व्यावहारीक बाजू पाहिली जाते ती स्पृहणीय मानता येणार नाही.
अतुल राव नेहमी जबरीच लिहितात.
अतुल राव नेहमी जबरीच लिहितात.
त्यातुन विषय जी ए , वेस्टर्न चित्रपट असला असेल तर त्यांची लेखणी बहरात येते.
ह्या निमित्ताने अशोकमामांचा व्यासंग, लोकसंग्रह समोर आला हे ही बरे झाले.
मामा स्वत:ची जाहिरात करणारे नाहीत.
त्यांच्या पोतडीत अशा अनेक गोष्टी आहेत.
प्रत्यक्ष भेटीत (नशीब जोरावर असेल आणि मामांचा मुड असेल) तर बर्याच गोष्टी कळतात / पहायला मिळतात.
तसेच अजून एका कथासंग्रहाबाबत
तसेच अजून एका कथासंग्रहाबाबत (नाव आठवत नाहिये). <<< 'आकाशफुले' का? मला व्यक्तिशः हा कथासंग्रह आवडला नाही.
जीएंच्या पत्रात एका ठीकाणी
जीएंच्या पत्रात एका ठीकाणी कुठल्याशा लेखकाचा उल्लेख आहे. त्याच्या मृत्युनंतर त्याचे उरलेले लिखाण त्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित केले. त्या लिखाणावर परखड टिका झाली आणि लेखकावर मित्रांनी त्याच्या मृत्युनंतर सुड उगवला अशी कमेंटदेखिल केली गेली.
वाचतेय. १ नं. चर्चा चालू आहे.
वाचतेय. १ नं. चर्चा चालू आहे.
अतुल राव आणि अशोक मामा-
अतुल राव आणि अशोक मामा- धन्यवाद. काय सुन्दर लिहिले आहेत तुम्ही!
जी.ए. च्या कथा वाचून मी जसा बावचळून गेलो तसा कोणत्याच पुस्तकाने गेलो नाही. लोक काहीही म्हणोत, मला तर जी.ए. च्या कथांमुळे नेहमी आनंद मिळत आला आहे. अजूनही मला आठवते.. मी तसा मिसरूड फुटलेला असेन... पहिल्यांदाच जी.ए. ची पहिली कथा आणि तीसुद्धा विदूषक वाचली.. वेडा होउन नाचत्/फिरत होतो दोन दिवस...
जी ए. चे पत्राविषयीचे मत माहीत असूनही मी ती पत्रे वाचली, आणि फक्त तेंव्हाच मला "gossip" करत असल्यासारखे अपराधी वाटले. पण "मेरे मजबुरी का नाम जी. ए. था!". आणि ती पत्रे प्रसिद्ध केल्याबद्दल त्या विषयी संबधित सर्वांचे मनोमनी आभार मानले.
Pages